मी नापास झाले.....

01 Aug 2016 14:27:00

इरा गेल्या वर्षी साधारण सव्वादोन वर्षांची असताना कलांगणच्या संवर्धिनीमध्ये पोहोचली. एकंदर समज अत्यंत चांगली आणि स्पष्ट बोलणं यामुळे तिला वेणू या कोर्समध्ये प्रवेश दिला गेला. ती छान संवाद साधू शकते, गाणी पाठ करायचा प्रयत्न करते; पण अजून त्या गाण्यांचे अर्थ कळणं, नीट सुरात म्हणणं आणि एका जागी बसणं या गोष्टी नाही जमत तिला. लहानच आहे ती! तिला ती समज यावी आणि तिने गाणं एन्जॉय करावं सध्या, असं तिचे आई-बाबा म्हणाले आणि याही वर्षी तिने वेणू कोर्स पुन्हा शिकावा, असं आमच्या चर्चेतून ठरलं.


तीन वर्षांची छोटी इरा धावत धावत माझ्यासमोर येऊन उभी राहिली. लाल रंगाचा फ्रॉक, पुरीसारखे गोबरे गाल, त्या गालांवरची गुलाबी कांती, मोठे मोठे निरागस डोळे आणि दुडुदुडु चाल! तिच्या त्या गोंडस आकृतीकडे मी कौतुकाने पाहत असतानाच तिने डोळे आणखीनच मोठे करून माझ्याकडे पाहिलं आणि मान वाकडी करून मला म्हणाली,

''वर्षामावशी वर्षामावशी, मी नापास झाले.'' मी चमकून तिच्याकडे पाहिलं. मीच काय, माझ्या आवतीभोवती असलेल्या पाच-सहा पालकांचे तर आवाजच थांबले एकदम! हो.... आईवडिलांसाठी 'नापास'सारखा दुसरा अशुभ शब्द नाही. मग ते मूल तीन वर्षाचं असो की तेरा. इरा मात्र पुन्हा पुन्हा मला सांगत होती की ''मी नापास झाले.'' त्या चिमणीला आजूबाजूचं आणि दुसऱ्यांच्या मनाचं भान का असावं? माझं लक्ष तिच्या आईबाबांकडे गेलं. ते दोघेही हसत होते.

मी म्हणाले,

''अरे, हा काय प्रकार आहे?''

तेव्हा तिची आई हसून म्हणाली,

''काही नाही, या वर्षी ती लहान असल्यामुळे आपण तिला परत गाण्याच्या पहिल्याच वेणू या लेव्हलमध्ये ठेवतोय ना, ते मी सांगितलं तिला! तिथेच तिचा चुलतभाऊ होता, थोडासा मोठा... तो तिला म्हणाला, म्हणजे इरा तू नापास झालीस! तेव्हापासून ती सगळयांना सांगत फिरतेय की मी नापास झाले म्हणून!''

इरा गेल्या वर्षी साधारण सव्वादोन वर्षांची असताना कलांगणच्या संवर्धिनीमध्ये पोहोचली. एकंदर समज अत्यंत चांगली आणि स्पष्ट बोलणं यामुळे तिला वेणू या कोर्समध्ये प्रवेश दिला गेला. ती छान संवाद साधू शकते, गाणी पाठ करायचा प्रयत्न करते; पण अजून त्या गाण्यांचे अर्थ कळणं, नीट सुरात म्हणणं आणि एका जागी बसणं या गोष्टी नाही जमत तिला. लहानच आहे ती! तिला ती समज यावी आणि तिने गाणं एन्जॉय करावं सध्या, असं तिचे आई-बाबा म्हणाले आणि याही वर्षी तिने वेणू कोर्स पुन्हा शिकावा, असं आमच्या चर्चेतून ठरलं.

मला आठवलं माझ्याच मुलीचं बालपण! ती पहिलीत असताना मी तिला भरतनाटयम शिकण्यासाठी डॉ. संध्या पुरेचा यांच्याकडे पाठवलं होतं. तिला आवडायचं नृत्य! तिच्या छोटया छोटया हालचालींनी आणि बालविभ्रमांनी आम्ही सुखावून जात असू. एक वर्ष संपल्यानंतर तिची परीक्षा झाली. परीक्षेचा निकाल मात्र अगदीच वाईट होता. तिला शास्त्रशुध्द नृत्याची समज म्हणावी तशी नव्हती आली. तिला बरीचशी उत्तरं देताच आली नाहीत, कारण शास्त्रीय शब्द, मुद्रा, व्याख्या, श्लोक हे नेमकं काय असतं ते तिला कळलंच नव्हतं. तिला इतके कमी माक्र्स का पडले असावेत? असं मी ताईंना विचारल्यावर त्यांनी मला वरील सर्व आशयाचं उत्तर दिलं. ''येईल, पण हळूहळू. डोन्ट वरी!'' त्या म्हणाल्या. मी मात्र विचारात पडले. मी गाण्याच्या क्षेत्रात होते. स्वरज्ञान कच्चं राहिलं, तालाची समज कमी पडली आणि गाण्याची मजा नाही अनुभवता आली, तर नुसत्या परीक्षा देत पुढे जाण्यात काडीचाही अर्थ नसतो, हे मला पूर्ण माहीत होतं. मी बराच विचार केला. माझ्या मुलीलाही विश्वासात घेऊन तिला कळेल अशा प्रकारे माझ्या मनातल्या विचारांची कल्पना दिली आणि दुसऱ्या दिवशी ताईंना भेटून सांगितलं की आपण तिचं प्रथम वर्ष रिपीट करू. ती पुढच्या वर्षी पुन्हा पहिली परीक्षा देऊ दे. तिला नाच शिकण्यात मज्जा येऊ दे. पहिल्या वर्षाचे सगळे शब्द, श्लोक, मुद्रा, अडवू तिच्या अंगवळणी पडू देत.

संध्याताई जरा चकितच झाल्या. पण मला म्हणाल्या,

''तुमचा हा निर्णय अत्यंत उत्तम आहे. तिचं वय पाहता हे योग्यच ठरेल. पण मी एक सांगतेच तुम्हाला... माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवात मुलीला आपण परत नाचाच्या त्याच वर्गात बसवू असं म्हणणारी आई मला पहिल्यांदाच भेटली.''

मी हसले आणि म्हणाले,

''अहो, कलेच्या क्षेत्रात असं मागे, पुढे काही नसतं! मनात आनंदाचा मोर नाचला पाहिजे आणि त्यासाठी सगळं शास्त्र नीट समजून घेण्यासाठी आकलनही वाढलं पाहिजे ना, जाणीव स्पष्ट झाली पाहिजे.'' त्या दिवशी माझा आणि संध्याताईंचा मैत्रीचा एक विशेष बंध जुळला. आमचा निर्णयही अतिशय योग्य ठरला. त्यानंतर माझ्या मुलीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ती प्रत्येक वर्षी प्रथम तर आलीच, तसंच तिने अनेक स्कॉलरशिप्स आणि पुरस्कारही पटकावले. तिचं अरंगेत्रम हा नृत्यवर्तुळात एक चर्चेचा आणि आनंददायी विषय झाला. अर्थातच डॉ. संध्या पुरेचा यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनच त्याला कारणीभूत होतं, तसाच अगदी सुरुवातीला घेतलेला तो निर्णयही होता.

''कला कला म्हणजे असं जगावेगळं काय असतं हो? गाणं किंवा नाच किंवा अगदी चित्रकला.... काय विशेष असतं त्यात?'' एक गृहस्थ मला विचारत होते.

''आमचा राजू बघा, काही शिकला बिकला नाही आणि 'सुरत पियाकी' असं गातो ना की तो सिनेमातला गायकसुध्दा कानाला हात लावेल.''

''हो का? अरे वा! काही मुलांच्यात उपजत असतं गाणं! किती वर्षाचा आहे तुमचा राजू?'' मी.

''दोन पूर्ण, तिसरं लागलंय.'' गृहस्थ अत्यंत अभिमानाने म्हणाले.

''थांबा, मी व्हिडिओच दाखवतो तुम्हाला त्याचा.'' गृहस्थांनी अत्यंत उत्साहाने व्हिडिओ सुरू केला आणि मी लगेचच म्हणजे एका क्षणात हताश झाले. म्हणजे ते बाळ हातवारे करत होतं, सुंदर दिसत होतं, पण कुठल्याच पध्दतीने ते गातंय असं मला म्हणता येईना! गृहस्थांच्या छातीठोक आविर्भावाने माझा अगदी बकरा बनवला होता. बरं, गृहस्थांची तर ब्रह्मानंदी टाळी लागलेली.

''काय मग, आहे की नाही चाबूक?'' चित्रफीत संपताच त्यांनी पृच्छा केली. मी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिले. मी कसंनुसं हो म्हणाले आणि गृहस्थ विजयी मुद्रेने जाते झाले. आपल्या मुला-नातवंडांबद्दल हे कसलं अतिरेकी प्रेम? 'आपला तो बाब्या' या उक्तीला काही सीमा? 'कटयार'सारखे चित्रपट आपल्या संस्कृतीची जपणूक करणारे असतात खरे, पण त्यानंतर या अशा दिव्य पालकांचं पीक येतं, त्याचं काय करायचं? मी तेव्हापासून कमालीची सावध झाले. खूपसे पालक आपल्या मुलाला 'कटयार'मुळे कसं संगीतप्रेम निर्माण झालं आहे आणि तो कसा आता शास्त्रीय संगीतच शिकणार आहे, असं सांगू लागले की माझ्यातली टीचर एकदम जागी होते. मी त्या बालकाचं कौतुक करते, पण कटयारमधल्या सारखं गायचं तर बालकाला दीर्घकाल मेहनत केल्यावरच ते येईल, याची जाणीवही पालकांना देते. यावर ''म्हणजे एक-दोन महिन्यांत जमेल ना?'' असं विचारणारे महान पालकही मला भेटत असतातच!

एक-दोन परीक्षा झालेला एक मुलगा आपल्या पालकांसमवेत माझ्याकडे आला. वय असेल बारा-तेरा वर्षं! चिरंजीव झब्बा वगैरे घालून ऐटीत आलेले! वडीलही एकदम मुलाच्या कौतुकात गुंग! मला म्हणाले, ''गेली दोन वर्षं एका ठिकाणी गाणं शिकतोय, पण आता तिथं नको असं वाटतंय. आता कलांगणमध्ये येण्याचं डिसीजन घेतलंय आम्ही!''

''का बरं?'' मी विचारलं.

यावर मुलगा म्हणाला, ''मला तेच तेच नाही शिकायचं!''

''म्हणजे?'' मी विचारलं.

यावर वडील म्हणाले,

''आधी दीड वर्ष बरं होतं. गाणी शिकवली. आमच्या सोसायटीत प्रोग्राममध्ये गायचा. लोक किती स्तुती करायचे. आता गेले सहा महिने नुसतं सारेगमप चाललंय! नवीन गाणं नाही, काय नाही. नुसतं सारेगम, नुसतं सारेगम... पोरगं हैराण झालंय! तुम्ही काहीतरी गाणीबिणी शिकवा म्हणे!''

मी म्हणाले,

''अहो, बरोबरच आहे. त्याला गाणं नीट समजायला हवं की नको? स्वर हे गाण्याचं व्याकरण आहे. आपल्या भाषेला असतं की नाही, तसंच! आणि आता पुरेसा मोठा आहे तो. त्याने न कंटाळता स्वर ओळखायला शिकलं पाहिजे. तो आमच्या अकादमीत आला तरी वर्षं-दोन वर्षं त्याला स्वरज्ञान होण्यासाठी मेहनत करावी लागणार! एकदा का स्वर समजायला लागले की पुढे छान कळायला लागतं गाणं आणि मजाही येते.'' मी यापुढेही बरंच बोलले. त्यांना ते कळतंय का, पटतंय का याचा विचार न करता बोलले, कारण मला ते फार आवश्यक वाटत होतं! पण पालथ्या घडयावर पाणी या म्हणीचा शब्दश: अर्थ कळण्याचा दिवस होता तो.

त्यानंतर बाबा द ग्रेट म्हणाले, ''म्हणजे तुम्हीपण गाणीबिणी शिकवणारच नाही म्हणा की... म्हणजे तुम्हीपण तेच तेच शिकवणार! चल पोरा, इथं पण काय डाळ शिजंना आपली!'' आणि माझ्याकडे रागारागाने बघत सरळ निघून गेले.

मुलांना कोणतीही कला शिकवण्याचा विचार करण्यापूर्वी त्याबद्दल प्राथमिक माहिती तरी पालकांनी करून घ्यायला हवी. प्रत्येक घरात कलावंत किंवा कलेचा वारसा नसतो. त्यामुळे पालक खूप गोंधळलेले तरी असतात किंवा त्यांनी काही विचित्र मतं तरी बनवून ठेवलेली असतात. ती बरेचदा चुकीची किंवा दिशाभूल करणारी असतात. आज खूप खात्रीलायक पुस्तकांमधून किंवा इंटरनेटवरूनसुध्दा गाणं, नृत्य किंवा वाद्यवादन म्हणजे नेमकं काय आहे, शालेय अभ्यासापेक्षा त्याचं  वेगळेपण काय, कला शिकल्याने नेमकं काय मिळतं, व्यक्तिमत्त्वात कसे बदल होतात, मनाची एकाग्रता कशी वाढते, असं बरंच काही ऐकायला, वाचायला मिळतं. कलेने मनोरंजन होत असलं, तरी ते एक शास्त्र आहे आणि दखल घेण्याजोगा कलाकार व्हायचं, तर संयम आणि प्रदीर्घ - म्हणजे काही वर्षांची प्रदीर्घ डोळस तालीम आवश्यक आहे.

9594962586

kalavarshab@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0