शिपाईगडी

25 Jul 2016 15:08:00

ब.ना. जोग, दि.वि. गोखले, चित्तरंजन द. पंडित व ज.द. जोगळेकर हे सर्व जण 'साप्ताहिक विवेक'चे संस्थापक तर होतेच, त्याचप्रमाणे लेखक, मार्गदर्शक व हितचिंतकही होते. 15 जुलै 2016 रोजी  शुक्रवारी ज.द. जोगळेकर यांचे देहावसान झाले. त्यामुळे या तेजस्वी पत्रकारांच्या मालिकेतील शेवटचा दुवादेखील  निखळला आहे.


माझे वडील व विवेकचे प्रथम संपादक चित्तरंजन पंडित हे ब.ना. जोग, दि.वि. गोखले आणि ज.द. जोगळेकर या तिघांचाही उल्लेख 'माझे सख्खे मित्र' असा करत असत. सुमारे तीन वर्षांपूर्वी जोगळेकरकाकांना एक पुरस्कार जाहीर झाला होता. त्या वेळी त्यांना भेटण्याची व त्यांचे अभिनंदन करण्याची इच्छा दादांनी बोलून दाखविली. मध्यंतरी बराच काळ संपर्क नव्हता, पण जोगळेकरकाकांना हे कळवताच त्यांनीही आनंदाने व आग्रहाने भेटीचे निमंत्रण दिले. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मी व दादा त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो.

भेट होताच दादांनी त्यांच्या या ज्येष्ठ मित्राच्या पायावर डोके ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यांना दोन्ही हातांनी धरून उठवताना जोगळेकरकाका म्हणाले, ''अरे चित्तरंजन, तू हे काय करतो आहेस? अत्यंत जवळचा मित्र आहेस तू माझा.'' त्या वेळी त्या दोन्ही मित्रांच्या डोळयांमध्ये आनंदाश्रू तरळले होते.

एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर मग गप्पांचा असा काही फड रंगला की 3-4 तास कुठे निघून गेले हे समजलेच नाही. साप्ताहिक विवेकच्या निमित्ताने झालेली दोघांची ओळख, त्यातून निर्माण झालेली मैत्री, हिंदुत्वाच्या प्रचार व प्रसाराच्या चळवळीतील दिवस, तात्याराव सावरकरांच्या आठवणी, त्या वेळची तसेच आजची पत्रकारिता याबरोबरच हिंदू समाजाची मानसिकता, त्यातून निर्माण झालेले प्रश्न, स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशासमोर निर्माण झालेल्या समस्या, त्यांचे स्वरूप व त्यावरील उपाययोजना अशा अनेक विषयांवर या दोघांची विस्तृत चर्चा झाली.

या गप्पांच्या ओघात आलेल्या एका गोष्टीचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. दादांनी जोगळेकरांना प्रश्न विचारला की, ''स्वातंत्र्योत्तर काळात इतक्या सकारात्मक गोष्टी असतानादेखील आज आपल्या देशासमोर अनेक भीषण समस्या उभ्या आहेत. असे होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण काय?''

जोगळेकरकाका म्हणाले, ''असे एकच सर्वात महत्त्वाचे कारण शोधणे थोडे कठीण आहे, पण एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील भारताचा एकही पंतप्रधान हा शिपाईगडी नव्हता. शिपाईगडी म्हणून युध्द लढला नव्हता.''

हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले, ''दुसऱ्या महायुध्दाच्या काळात जर्मनी, ब्रिटन, रशिया तसेच अमेरिका या युध्दात भरडल्या गेलेल्या राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांनी ज्या प्रकारे आपापल्या देशाचे नेतृत्व केले, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे सर्व जण मुळात शिपाईगडी होते. ते शिपाईगडी असल्यामुळे, अनेक लढाया लढल्यामुळे धैर्य, आक्रमकता, अपयश पचवण्याची धमक तसेच विजयाला गवसणी घालण्याची विजिगीषू वृत्ती हे सर्व गुण त्यांच्यामध्ये आपोआप आले होते आणि त्यामुळेच ते अत्यंत कणखरपणे आपापल्या देशाचे नेतृत्व करू शकले.''

आज आपल्या देशाला भेडसावणाऱ्या समस्या व त्यांचे युध्दसदृश स्वरूप पाहता जोगळेकरकाकांनी मांडलेला हा विचार निश्चितच आपल्याला विचार करायला लावणारा आहे.

केवळ आपल्या राजकीय नेतृत्वानेच नव्हे, तर आपल्यासारख्या देशावर प्रेम व निष्ठा असणाऱ्या प्रत्येक नागरिकानेदेखील 'शिपाईगडया'चे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे हीच जोगळेकरकाकांसारख्या 'शिपाईगडयाला' भावपूर्ण श्रध्दांजली ठरू शकेल. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन... & 9619359453

 

Powered By Sangraha 9.0