ज्ञानयोध्दयाची अखेर...

25 Jul 2016 15:33:00

ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व सावरकरांच्या विचारांचे अनुयायी जयवंत जोगळेकर यांचे शुक्रवार, दि. 15 जुलै रोजी निधन झाले. 'ज.द.' या नावाने परिचित असलेल्या जोगळेकरांनी हिंदुत्व व राष्ट्रवाद या विषयांवर विपुल लेखन केले. 35 पुस्तके व शेकडो लेख त्यांच्या नावावर आहेत. संदर्भसंपन्न व रोखठोक भूमिकेतून केलेले लिखाण ही त्यांची खासियत होती. ज.दं.च्या व्यक्तित्त्वाचे पदर उलगडणारा हा लेख.

जोगळेकरांच्या घरी फोन केला आणि प्रेमाबाईंनी तो उचलला की, साहेबांना फोन दिला जायचा. माझा एक प्रश्न ठरलेला. 

''हाऊ  इज लायन?''

फोन सावरून जोगळेकर म्हणायचे,

 ''लायन इज रोअरिंग ऍज चर्चिल रोअर्ड फॉर युनायटेड किंगडम.''

ज.द. जोगळेकर हे असे होते. जोगळेकरांची पहिली भेट कधी झाली ते आठवत नाही, पण त्यांच्याबाबतचा एक प्रसंग नीट आठवतो. 2005 साली 'सा. विवेक'चा राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार ज.दं.ना देण्यात आला होता. लालकृष्ण अडवाणी, मदनदासजी देवी, प्रमोद महाजन अशा दिग्गजांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रम संपण्यापूर्वीच ते लगबगीने निघाले होते. त्यांच्या सवयीनुसार पुरस्काराच्या रकमेत स्वत:ची काही रक्कम घालून तो परत करून ते घरी परतत होते. त्यांना विचारले तर म्हणाले, ''अरे काही कात्रणं काढली आहेत. मग लेख लिहिणार आहे.'' त्यांचा लेख त्यांच्या डोक्यात घुमत होता. चिंतन, मनन, लेखन हा त्यांचा पिंडच होता. लिखाण ही त्यांच्या आयुष्याची प्रेरणा होती. सतत लिहीत राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. तरुण वयात जोगळेकरांनी कुस्तीतही दोन हात केले होते. त्यामुळे तालीम, सराव हा त्यांच्या नित्यकर्माचा भाग होता. कुस्ती सुटली, पण नंतर हाच अभ्यास त्यांनी लिहिण्याच्या बाबतीत आत्मसात केला. त्यांच्या लिखाणाची मांडणी कधीच भावनिक आधारावर नव्हती. अत्यंत तर्कशुध्द आणि भरपूर संदर्भांनी संपन्न असे त्यांचे लिखाण आहे. त्यासाठी ते तितकेच कष्ट घेत. वृत्तपत्रांची कात्रणे, त्या संदर्भातील विषयवार वाचन, संदर्भांच्या प्रमाणीकरणासाठी टिपणे काढणे, असे त्यांचे काम अव्याहतपणे चालत होते. 'मध्यपूर्वेचे राजकारण' या विषयावर त्यांनी सखोल अभ्यास केला. हिंदुत्वनिष्ठांची मुस्लीम प्रश्नाविषयीची मांडणी सर्वश्रुत आहे. पण जोगळेकरांच्या मांडणीत सूत्रबध्द वेगळेपणा होता. लादेनने केलेल्या अमेरिकेतील टि्वन टॉवरवरील हल्ल्यानंतर इस्लामी दहशतवादाचे भयंकर स्वरूप एकदम पाश्चिमात्य राष्ट्रांच्या लक्षात आले आणि या विषयावर अभ्यार्सपूण पुस्तकांची निर्मिती व्हायला लागली. जोगळेकरांनी या विषयातील जवळजवळ सर्वच पुस्तके मिळवून वाचून काढली होती. ते एश्ाियाटिक लायब्ररीचे सदस्य होते, पण पुस्तकाची भूक त्यांना वाचनालयापुरती मर्यादित ठेवू शकली नाही. त्यांच्या घरात प्रचंड पुस्तके आहेत. टीव्ही वगैरेही ते फारसे पाहत नसत. इंटरनेट न वापरणाऱ्या पिढीचे असल्याने त्यांना मदत लागायची, मग फोन करून पुस्तके मिळविण्याची आज्ञा यायची. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या संकेतस्थळांवरील उपलब्ध असलेल्या पुस्तकांची माहिती जोगळेकरांना कोण देते हे मला आजही न उलगडलेले कोडे आहे. जोगळेकरांना पुस्तके आतूनच सुचायची. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे दैवत, त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले होते. जोगळेकरांना अनेक पुरस्कार मिळाले, परंतु त्यांच्यालेखी हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार.

वृत्तीने लेखक असले, तरी जोगळेकर स्वभावाने अत्यंत रसरशीत होते. वाळकेश्वरच्या त्यांच्या शांत घरी गेले की अत्यंत खटयाळ डोळयांनी आणि हसतमुख मुद्रेने ते स्वागत करायचे. ''ऐक, तुला एक गंमत सांगतो,'' असे म्हणून ते जे सुरू  व्हायचे, त्याला तोड नाही. दोन-तीन तासांची निश्चिंती. मग राज्यक्रांत्या घडायला सुरुवात व्हायच्या. आपण जोगळेकरांचे बोट धरून दुसऱ्या महायुध्दानंतरच्या जगाच्या सफरीवर निघालोय, असेच वाटत राहायचे. युध्दाच्या तोफा सरकायला लागायच्या... नेपोलियनपासून ते चर्चिलपर्यंत कोण कोण यात येऊन जायचे. या नायकांची अवतरणे ते अस्खलित ब्रिटिश धाटणीच्या उच्चारात खणखणीतपणे म्हणून दाखवायचे. कधी ती अवतरणे नसायची, तर ते उतारेच्या उतारे सांगायचे. हा सगळा मामला त्यांना तोंडपाठ होता. नुसता तोंडपाठ नाही, तर अचूक. या साधनेचे एक तेज असते आणि ते त्यांच्या रोमारोमात भरलेले होते. जोगळेकर एखाद्या ज्ञानयोध्दयाच्या आविर्भावात बोलत, किंबहुना तोच त्यांचा स्थायिभाव होता. त्यांची मूळ कथा नेपोलियनची, पण त्यात केमाल पाशाही जोडला जायचा. हे जरा विचित्र वाटेल, मलाही वाटायचे, पण त्यातच जोगळेकरांचे वेगळेपण होते. जोगळकरांचे मूळ कथानक सुरू  असतानाच त्यात अनेक उपकथानके जोडली जायची. वयोमानानुसार ते विसरले आहेत की काय असे वाटावे आणि त्यांनी आपल्या मूळ कथानकाकडे परतायला सुरुवात केलेली असायची. यातील प्रत्येक गोष्ट स्पष्ट आणि खणखणीत. अनेकांसाठी अशी युध्दे प्रेरक, रंजक वगैरे असतात. जोगळेकरांना त्यात परस्पर संदर्भ सापडायचे. जागतिक युध्दे ही केवळ पराक्रमाच्या गाथा सांगत नाहीत, तर  इतिहास, भूगोल, अर्थकारण आणि राजकारणही बदलतात. ही अनेक वषर्े चालणारी प्रक्रिया असते. ज.दं.ना ही प्रक्रिया उत्तम कळत होती. या प्रक्रियेचे परिणमाही ते एखाद्या द्रष्टयाप्रमाणे मांडू  शकत होते. मराठीत अशी पुस्तकेच नाहीत, किंबहुना मराठीत अशा प्रकारची पुस्तके लिहिणारे ज.द. पहिलेच असावेत.

'हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व' हा त्यांचा 1950 साली लिहिलेला पहिला ग्रंथ. 'राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्व' या विषयावर त्यांनी भरपूर लेखन केले आहे. हिंदुत्व, भारतीयत्व आणि निधर्मी शासन, जागतिक राष्ट्रवादाचे प्रवाह आणि हिंदुस्थान, हिंदुत्व आणि इतर विचारधारा ही त्यांची अशीच काही पुस्तके. ज.दं.च्या नावावर पस्तिसेक पुस्तके आहेत. त्यातील ही काही. हिंदुस्थानच्या राष्ट्रीयत्वाची मांडणी करताना पाश्चिमात्यांना सरसकट चुकीचे ठरविण्याचा प्रमाद त्यांनी कधीही केला नाही. उलट ज्या ज्या राष्ट्रपुरुषांनी पश्चिमेकडे राष्ट्रवादाचे निरूपण केले, त्यांची लहान लहान चरित्रेच त्यांनी लेखमालेच्या स्वरूपात लिहून काढली. 'निधर्मी राष्ट्रवादाचे श्ािल्पकार' नावाचे त्यांचे पुस्तक आहे. रिशेल्यू ते केमाल पाशा अशा सात राष्ट्रनायकांचे अत्यंत रंजक आणि तटस्थ चित्रण त्यांनी यात केले  आहे. या मंडळींनी त्यांचा त्यांचा राष्ट्रवाद निर्माण करताना काय संकटांना तोड दिले, त्याचेर् वणन त्यांनी यात केले आहे. एकोण्ािसावे आणि विसावे शतक हे अशाच राष्ट्रवादाच्या संकल्पांच्या उदयाचे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे होते.
रिशेल्यू, तालेराँ, काव्हूर, बिस्मार्क, कोसूथ, केमाल पाशा आणि सर्वात शेवटी जेफरसन. राष्ट्रवादाच्या संकल्पनांचा विचार करताना असे जागतिक संदर्भ सोडून पुढे सरकता येत नाही. संपर्क माध्यमांमुळे जग जवळ येत असल्याचा भाव दृढ होत आहे. प्रत्येक राष्ट्राला जगाशी जोडलेले राहायचे आहे. जगाशी जोडलेले राहायचे असले, तरी त्यांना स्वत:चे अस्तित्व मात्र कायम राखायचे आहे. आपापल्या राष्ट्रात जपलेली राष्ट्रीयत्वाची भावना हा त्यातला महत्त्वाचा भाग असेल. तीच येणाऱ्या काळात त्यांची ओळख ठरू शकेल. अमेरिकनांचा अमेरिकेच्या संदर्भातला 'ही भूमी आमची आहे आणि तिचे रक्षण करण्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ' हा आणि इतका नेमका अमेरिकन राष्ट्रवाद नेमका कसा आणि कुठून विकसित होतो, हे समजायला ज.द. वाचावे लागतात. त्यांच्या प्रस्तावना, भूमिका, प्रत्येक पान त्यावर मूळ संदर्भ कुठून घेतला आहे त्याची माहिती आहे. हा मोठेपणाही आहे आणि त्यांच्या अफाट व्यासंगाचा पुरावादेखील. भूमीशी अनुरक्त असलेला राष्ट्रवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या राजकारणाची त्यांना उत्तम जाण होती. आजच्या भाषेत ज्याला 'जिओपॉलिटिक्स' म्हणतात, ते ज.दं.नी उत्तम पध्दतीने आत्मसात केले होते. मध्यपूर्वेतील देशांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.

 ज.द. आक्रमक होते. मूळचे सावरकरवादी असल्याने आपला विषय ठामपणे मांडायची त्यांना सवय होती. सावरकरांचा उल्लेख नेहमी तात्याराव असा असायचा. वाद-विवादात ते कधीच मागे हटले नाहीत. हिंदूंचे एकमेव देशव्यापी संघटन म्हणून रा.स्व.संघावर त्यांचा विश्वास होता आणि भरपूर अपेक्षाही होत्या. ज.दं.च्या वादातही अनेक संदर्भ, अवतरणे, किस्से असायचेच. जितक्या चटकन चिडायचे, तितक्याच चटकन नंतर शांतही व्हायचे. मग हाताचा गोरापान पंजा दाखवून 'जरा थांब' म्हणायचे. आपण जरा जास्तच तापलो, असा काहीसा भाव चेहऱ्यावर असायचा. ते सदैव योध्दयाच्या पवित्र्यातच जगले. त्यांचे लिखाणही तसेच होते. तात्यारावांची झुंजार वृत्ती ते आपल्याला वारशात देऊन गेले आहेत, असेच समजून ज.द. जगले.

इस्लामी दहशतवादावर बोलणाऱ्या - लिहिणाऱ्यांना जातीयवादी ठरविण्याच्या, त्यांना सार्वजनिक व्यासपीठे उपलब्ध करून न देण्याच्या काळात जोगळेकरांनी आपले लिखाण केले आहे. आज इस्लामी दहशतवादाचे जागतिक स्वरूप लक्षात येत असताना जोगळेकरांसारख्या विचारवंतांनी काय लिहिले होते, हे संदर्भासाठी पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे, पण तेव्हा हे सोपे नव्हते. सत्ता काँग्रेसकडे आणि विचारवंतांची शक्तिस्थाने डाव्यांकडे, अशा काळात जोगळेकर लढले आहेत. उजव्या विचारांच्या विचारवंतांची कुचेष्टा, अवहेलना होत असताना ते लिहीत राहिले. या सगळया कामात त्यांच्या पत्नीने त्यांना खूप साथ दिली. डॉ. शोभा जोगळेकर या प्रथितयश स्त्रीरोगतज्ज्ञ. ज.दं.च्या सगळया कामाला त्यांनी सर्व प्रकारे हातभार लावला. ज.दं.ना या त्यांच्या कामासाठी सर्व प्रकारे मोकळे ठेवले. ज.दं.नी त्याचीर् पूण जाण ठेवली. ते त्यांना प्रेमाने 'डॉक्टर' म्हणत. कधी खूप खिन्न झाले किंवा उत्साहात आले की ज.द. उसळून म्हणायचे, ''ए...आज डॉक्टर असती तर?'' दुर्दैवाने डॉक्टर त्यांच्या आधीच गेल्या. मुले अमेरिकेत स्थायिक झाली. ज.द. मात्र कधीही अमेरिकेत रमले नाहीत. तिथे जाऊन ते भरपूर पुस्तके घेऊन यायचे. त्यांना इथे त्यांच्या हिंदुस्थानातच राहायचे होते. काही ना काही कारण काढून जोगळेकर अमेरिकेहून मुलाकडून परत येत. आता परत येणार नाही, असे सांगून ते दोनदा गेले होते. परत आल्यावर भेटायला गेलो तर डोळे मिचकावून म्हणाले, ''अरे! आपलं सगळं इथेच आहे.'' खरोखरच त्यांचे सगळे इथेच होते.

buletforbulet@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0