'स्त्रीभानाच्या पाऊलवाटे'

27 Dec 2016 16:01:00

भारतीय स्त्री शक्तीचं काम करत असताना स्त्रीविषयक वेगवेगळया विषयांवर पैलूंवर चर्चा घडत असतात. त्यातून वैचारिक जडणघडण, मतांची बैठक पक्की होत गेली. त्यामुळे माझ्या लिखाणावरचा, त्यामधल्या वैचारिक भूमिकेवरचा स्वामित्व हक्क मी भारतीय स्त्री शक्तीला आनंदाने देऊ करते. निर्मलाताईसह अनेक मैत्रिणींची माझ्या लिखाणाला मिळणारी दाद नेहमीच प्रोत्साहन देणारी असते.
हिला चळवळीशी माझा संबंध तसा पंचवीस वर्षांहून अधिक. त्यामुळे माझ्या विचारविश्वात स्त्री - प्राचीन-अर्वाचीन, प्रश्न - नवे-जुने, भारतातले-परदेशांमधले, नातेसंबंध नवरा-बायकोचे मुलांचे इतर नातेवाइकांचे, वेगवेगळया स्थळ-काळ-परिस्थितीत एकमेकांसमोर उभे ठाकणारे स्त्री-पुरुष, त्यांचे वर्तन, क्रिया-प्रतिक्रिया कधीकधी अपेक्षित आणि सरधोपट तर कधी पूर्णपणे अनपेक्षित व धक्कादायक, कधी सुखद, कधी कमालीच्या दु:खद हे सगळं सतत घुसळत असायचं आणि असतंही. स्त्री-पुरुषांचं वागणं इतकं परिस्थिती- आणि व्यक्तिसापेक्ष की एक अधिक एक बरोबर दोन असं उत्तर नाहीच.

त्यातही स्त्रियांच्या बदललेल्या आकांक्षा आणि पुरुषांच्या पारंपरिक अपेक्षा याचा ताळमेळ बसत नाही, हे सतत जाणवतं. त्यात बदल व्हायला हवा. जेंडर जाणीव, स्त्री-पुरुष समानता यांत संख्यात्मक आणि गुणात्मक फरक व्हायला हवा, याची गरजही तीव्र. त्यातूनच 'स्त्रीभान' या सदराचा जन्म झाला.

सर्वसामान्य पुरुषाच्या विश्वात येणाऱ्या बायका म्हणजे आई, बहीण, बायको आणि सहकारी. सहशिक्षणामुळे बरोबरीच्या मुली. तरीही मुली, स्त्रिया यांची पुरुषाहून विचार करायची वेगळी पध्दत, वेगळया अपेक्षा, वेगळया सवयी, वेगळया भावनिक गरजा आणि आजच्या शिक्षण-अर्थार्जनामुळे आलेली स्वायत्तता समजून घेण्यात त्याला अजूनही अडचणी येतात. 'महिला' विषयाची त्याची नेमकी यत्ता कोणती, हे त्याला पालकांनी दिलेलं कौटुंबिक वातावरण, मूल्यं आणि त्याने स्वत:ने टिपलेलं आजूबाजूच्या परिस्थितीचं ज्ञान व आकलन यावर अवलंबून राहतं. बायकांनी पुरुषांचा 'पुरुषी'पणा परंपरेने स्वीकारलेला, तर आता पुरुषाने 'बायकी'पणा समजून घ्यायचा हा परिस्थितीचा रेटा आहे. आणि रेटा झेलायचा किंवा यशस्वीपणे परतवायचा, तर भानावर राहून वादळ अंगावर घ्यावं लागतं. त्याची मानसिक तयारी नसेल तर अपघात अटळ आहेत. नातेसंबंधांच्या पडझडीमधून ते जाणवतं. कधी-कधी त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे न कळल्यामुळे अनेक पुरुष 'म्यूट' राहतात. तेही त्यांच्यासाठी हानिकारक व स्त्री-पुरुषांमधल्या सुदृढ सकारात्मक संबंधामध्ये ताण उत्पन्न करणारं. यात बदल करायचा, तर जेंडर जाणीव वाढवायची आणि बदलत्या परिस्थितीचं भान वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा. यातून जन्म झाला 'स्त्रीभान' या सदराचा.

गेल्या वर्षभरात दिवाळीचे महिने सोडले, तर महिन्यातून दोनदा आपण भेटलो. त्याचं स्वरूप ललित तरीही वैचारिकच होतं. विनोदाच्या किंवा उपहासात्मक बाजू त्याला नव्हत्या. वर्तमान घटनांच्या संदर्भाने, प्राचीन संदर्भ, घटना, साहित्य, कला, देशोदेशींच्या रूढी, परंपरा, धार्मिक श्रध्दा, कायेद, नव्या चळवळी, नेटवरील माहिती, अभ्यास, राजकीय धोरण व अंमलबजावणी असा सगळा लिखाणाचा पट होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मांडणी भारतीय संदर्भात होती. स्त्रीविषयक असे काही मुद्दे या विषयाची जाण वाढवणारे, समानताविषयक वैयक्तिक कृती, वर्तन सुचवणारेही त्यात लिहिले.

अनेकदा असं जाणवतं की एकाच मुद्दयावर व्यक्तीचं वर्तन घरात, समाजात, कार्यालयात वेगळं असतं. उदा. स्त्री सन्मानाबद्दल, स्वत:च्या आई-बहिणीबद्दल खूप संवेदनशील व्यक्ती, तितकीच संवेदना त्रयस्थ महिलेच्या बाबतीत दाखवत नाहीत. आई-बहिणीच्या सन्मानाबद्दल जागरूक मात्र परस्त्रीबद्दल अनुदार असतात. स्वत:च्या नातेवाईक महिलांच्या सुरक्षेसाठी धावून जाणारे पुरुष, त्रयस्थ महिलांच्या सुरक्षेबद्दल कृतिशील नसतात.

वर्तमानातल्या या त्रुटी, हा दुटप्पीपणा कमी व्हावा हाही उद्देश होता. विवेकच्या वाचकांनी त्याचा स्वीकार केला याचा विशेष आनंद आहे. लेख प्रकाशित झाल्यानंतर वाचकांचे फोनही यायचे. अर्थातच त्याचा आनंद होता.

बजेट, त्याकडे पाहण्याचा बायकांचा व राजकीय पक्षांचा दृष्टीकोन, स्त्रियांची वेषभूषा व टिपण्या, सकारात्मक भेदभाव, कुंभाच्या निमित्ताने धार्मिक क्षेत्रातील भेदभावाचा लेखाजोखा, स्वातंत्र्य आणि संकेत, ई-कॉमर्समधल्या संधी, ऑलिम्पिकच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील भेदभाव, सरकारचे महिला धोरण, कायद्याने दिलेली कवच कुंडलं आणि अंमलबजावणीतल्या त्रुटी, समान नागरी कायदा अशा चौफेर विषयांवर लेखन झालं. त्यातून अवलोकन आणि आकलन वाढावं असा प्रयत्न केला. वाचकांना तो आवडला असेल अशी आशा आहे.

भारतीय स्त्री शक्तीचं काम करत असताना स्त्रीविषयक वेगवेगळया विषयांवर पैलूंवर चर्चा घडत असतात. त्यातून वैचारिक जडणघडण, मतांची बैठक पक्की होत गेली. त्यामुळे माझ्या लिखाणावरचा, त्यामधल्या वैचारिक भूमिकेवरचा स्वामित्व हक्क मी भारतीय स्त्री शक्तीला आनंदाने देऊ करते. निर्मलाताईसह अनेक मैत्रिणींची माझ्या लिखाणाला मिळणारी दाद नेहमीच प्रोत्साहन देणारी असते. विवेकमधल्या सदराला मात्र निमित्त अश्विनी मयेकर आहेत. त्यांची मैत्रीही जुनीच आणि आमची विचारप्रक्रियेचीही दिशा एकच. त्यामुळे हे लेखन माझ्यासाठी आनंददायी झालं.

मुद्रित विवेकच्या वाचकांनी आणि ई-वाचकांनी दिलेले 'लाईक्स' यामुळे लेखक सुखावली असली, तरी काही वाचकांनी त्यांचे मतभेदही नोंदवले त्याचंही स्वागत आहे. एकूण 'स्त्रीभान' लिहिणं हा माझ्यासाठी आनंददायी प्रवास झाला.

त्यानिमित्ताने माझंही वाचन, अभ्यास झाला. वाचकांनाही दृष्टीकोन मिळाला असेल किंवा त्यांच्या विचारकक्षेत नवे विलय आले असतील, नवीन माहितीची भर पडली असेल. हे जग सुंदर आहे आणि स्त्री-पुरुषांच्या साहचर्यातून, सहवेदनेतून, सहअनुभूतीतून ते अधिक सुंदर होईल, असा विश्वास मला वाटतो.

9821319835

nayanas63@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0