'लखलख चंदेरी साडीची न्यारी दुनिया'

15 Dec 2016 12:31:00

ध्य प्रदेशमधील 'गुणा' ह्या लोकसभेच्या मतदारसंघात ना धड शहर, ना धड खेडे असे ऐतिहासिक ठिकाण आहे. त्याचे नाव 'चंदेरी'. ग्वाल्हेरचे माधवराव शिंदे यांचा हा मतदारसंघ. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य यांनी येथून निवडणूक लढवून सतत चार वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. 2002मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी प्रथमच ह्या 'चंदेरी'त प्रवेश केला. आडमार्गावर बसलेले हे गाव झाशीजवळ असलेल्या ललितपूरपासून चंदेरी 37 कि.मी. असून खड्डेमय रस्ते पार करून तेथे जाता येते.
ह्या चंदेरीमध्ये बांधलेला काठी किल्ला 'कीर्ती दुर्ग' म्हणूनदेखील ओळखला जातो. अकराव्या शतकांत बांधलेल्या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे ती केवळ स्थानिक रहिवाशांच्या व राज्यकर्त्यांच्या बेफिकिरीमुळे. पण ज्योतिरादित्यांच्या मनात वेगळी कल्पना होती. त्यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधून, पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता दहा वर्षे प्रयत्न करावे लागले. उद्देश हेरिटेज दर्जा प्राप्त करण्याचा व चंदेरीची ओळख सर्वदूर व्हावी यासाठी त्या करिता Fashion designing council of indiaचे अधिकारी व ज्योतिरादित्य शिंदे ह्यांनी  Amazone India fashion weekच्या माध्यमातून 16 फॅशन डिझाइनर्सच्या मदतीने कार्यक्रम सादर केला. त्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे 'चंदेरी' साडया.

ह्या समारंभाचे नाव 'Road to Chanderi' असे ठेवून त्यात गेल्या 1000 वर्षात विणकरांच्या झालेल्या कौशल्याचे देखावे होते. राजपुतांच्या 'गुर्जर प्रतिहार' ह्या विशिष्ट जमातीतील 'कीर्ती पालन' चंदेरी विणण्याची कला शोधून काढल्याचा उल्लेख आहे. इ.स. 1018मध्ये जो कीर्ती कोट किल्ला बांधला, त्याच्या आवतीभोवती फरशांचे मोडके तोडके रस्ते होते. ते नव्याने बांधले. ह्या चंदेरीमध्ये मुसलमान समाजही असल्याने ज्योतिरादित्य शिंदे ह्यांनी दोन भिन्न संस्कृतीचा संगम असे चंदेरीचे वर्णन केले आहे.

चंदेरीची वस्ती 30,000 असून तेथे 12000च्या वर विणकर समाज आहे. गेली चौदा वर्षे ज्योतिरादित्य शिंदे या गावी येऊन येथे सुधारणा करण्यात वैयक्तिक भाग घेत आहेत. Indian National Trust for Art And Culutral Heritage (INTACH)च्या मदतीने त्यांनी किल्ल्यातील राजा-राणी महालाचे नूतनीकरण करून, तेथे बऱ्याच विणकरांचे पुनर्वसन केले आहे. प्रमुख उद्देश म्हणजे तेथील दलालांचे वर्चस्व नाहीसे करणे. चंदेरी साडया विणल्यानंतर त्या ग्राहकांपर्यंत थेट पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला 'चंदेरीयान' असे संबोधण्यात येते.

कीर्ती दुर्ग, कौडाक महाल, बादळ महाल दरवाजा, कटी घाटी, बत्तिसी बावली, शहझादा का रोजा, बडा मदरसा ह्या भागांत नवीन रस्ते बनवून तेथे आजूबाजूला हरित पट्टे अाणि थुईथुई नाचणारी कारंजी बसवण्यात आली आहेत. विणकरांचा माल विक्रीला जावा म्हणून त्यांनी 'Fabindia'शी संपर्क साधून त्यांना तेथून चंदेरी साडया विकत घेण्याची विनंती केली आहे. राहुल मिश्रा आणि संजय गर्ग ह्या कुशल Designersना तेथे विणकरांना मदत करण्याकरिता आपली कार्यालये स्थापण्यास सांगितले आहे. 2004मध्ये हा Trade mark रजिस्ट्रार ऑफ जॉग्रीफिकल इंडिकेशन्स चेन्नई येथे रजिस्टर करण्यात आला आहे. चंदेरीच्या सरहद्दीपलीकडे बनणाऱ्या साडयांना 'चंदेरी' हे नाव देऊन साडया विकता येणार नाहीत व तसे केल्यास तो गुन्हा समजण्यात येऊन कारवाई होऊ शकते.

चंदेरीत 4352 हातमाग असून तेथे आता हाफ हँडलूम पार्क निर्माण करून 240 वेगवेगळया प्रकारच्या साडयांची निर्मिती करण्यात येईल. ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वत: येथील वस्तीत भेट दिली, तेव्हा त्यांना आढळले की तेथे हातमागांची लहान खोल्यात दाटी झाली आहे. विणकरांनी 50,000ची गुंतवणूक केल्यास त्यांना 30 वर्षाच्या भाडे करारावर (Leaseवर) जागा देण्यात येतील. त्याकरिता रास्त भाडे आकारण्यात येऊन. साडयांच्या पॅकेजिंगची व्यवस्था करून त्यांना परस्पर विक्री करता येईल.

चंदेरीचा इतिहास गमतीदार आहे. पूर्वीच्या भारतात ढाक्क्याच्या विणकरांनी येथे चंदेरी आणली. चंदेरीची निर्मिती 300 नंबर (Count) च्या कापसाने होते. ब्रिटिशांनी मँचेस्टरहून येथे 120 ते 200 काउंटचे कापूस आणून स्वस्तात विकले. त्यामुळे येथील विणकरांना अडचणींना तोंड द्यावे लागले. शिवाय पॉवर हँडलूमवाले हा कापूस वापरून स्वस्तात विक्री करू लागले. पण आता सरकारने विशेष लक्ष घालून हातमागांना उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारल्याने चंदेरीला चांगले दिवस आले आहेत. समंत चौहान ह्या Designerने सांगितले की, आता आम्ही चंदेरी नव्या अवतारात आणून भारताबाहेरदेखील त्याचा प्रचार व विक्री करणार आहोत. आतापर्यत चंदेरी केवळ साडयाच होत्या. आता चंदेरी वेगवेगळया प्रकारच्या वस्त्र प्रावरणात मिळणार आहे. जुलैमध्ये नॅशनल हँडलूम दिवस साजरा करण्याकरिता स्मृती इराणी ह्यांनी वाराणसीला भेट दिली. गेल्या वर्षी 16 डिझायनर्सनी ह्यात भाग घेऊन हातमागावरील साडयाच्या वेगवेगळे प्रकार सादर करण्यात आले होते. या वर्षी चंदेरीचा हँडलूम दिवस साजरा करण्यात येणार आहे.

फॅशन डिझाइन काउन्सिल ऑफ इंडियाने ह्यांत विशेष लक्ष घालून Road to Chanderi द्वारे 'चंदेरी'वर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. चंदेरीचा मूळ रंग हस्तिदंती असून त्या साडया जास्तीत जास्त लोकप्रिय करण्याचा विचार आहे. दोन संस्थानिक (Royal Families) आणि चंदेरीचे विक्रेते यांना  F.D.C.I. ह्यानंतर होणाऱ्या फॅशन Weekकरिता नेणार असून तेथे पारंपरिक व आधुनिक अशा साडया ठेवण्यात येणार आहेत.

ज्योतिरादित्य अभिमानाने सांगतात की, येथील रस्ते इतर कुठल्याही गावांपेक्षा स्वच्छ आहेत. विणकरांना जास्त पैसा उपलब्ध करावयाचे साधन मिळणार आहे. 2008मध्ये जे विणकर दिवसाला 70-80 रुपये कमावत असत, ते आता दिवसाला 300 ते 500 रुपये कमावत आहेत. मुझफ्फर अन्सारी हा पूर्वी विणकर होता. तो आता Guide झाला आहे. तो सांगतो, ''पूर्वीची हालाखीची स्थिती संपून आता संपन्नता आली आहे. आता आम्ही भारतातच नव्हे, जगभर विक्री करतो. 2010मध्ये येथे Wi-Fi आणण्यात आले. ई-कॉमर्सकरिता वेबसाइटची निर्मिती करण्यात आली आहे. कॅनडा, फ्रान्स, इटली, जर्मनी या देशांत चंदेरी साडया निर्यात होत आहेत.

चंदेरीयानच्या माध्यमातून जवळ 20,000 Designsचे Digitisation करण्यात आले आहे आणि त्याला मदत दिल्ली येथील Digital Empowerment Foundation मदत करीत आहे. 2000पेक्षा जास्त महिलांना शिवणकामाचे व इतर शिक्षण दिले जात आहे.

'चंदेरी' हे प्रवासी केंद्र (Tourist Destianalion) बनणार असून त्यात ASI लक्ष घालत आहे. युनेस्कोच्या World Heritageच्या यादीतदेखील चंदेरीचे नाव आहे.

ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव शिंदे चंदेरीबद्दल 'शकुन' हा शब्द वापरत असत. चंदेरीचे नुसतेच पुनरुज्जीवन करण्यात येणार नसून ते एक प्रमुख औद्योगिक केंद्र व्हावयास पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. ह्या सगळयातून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 'अश्रफी' ही कला इतिहासजमा होणार आहे. सध्या तरी 'चंदेरीयान'चे धोरण मागणी व पुरवठा असेच राहणार आहे.

चंदेरी फेस्टिव्हलसाठी ज्योतिरादित्यांनी दोन ऍम्फीथिएटर्स बांधून तयार ठेवली आहेत व त्यासाठी सगळेच सजग, कंबर कसून मेहनत करत आहेत. त्यामुळे अर्थातच चंदेरीची ओळख जगभर होणार आहे.

(India Today मधील Weaving a new History या चीया सिंग ह्यांच्या लेखावर आधारित.)

 022-28728226

 

Powered By Sangraha 9.0