प्रभातचे दिवस ....

09 Oct 2016 16:51:00

विविध अभिजात कलांबद्दल, त्यासाठी जुन्या पिढीने घेतलेल्या कष्टांबद्दल, मेहनतीबद्दल आणि त्या कलेच्या दर्जाबद्दल मुलांशी बोललं की मुलांना त्याचं महत्त्व कळतं; त्या कलेबद्दल, त्या कलेच्या खोलीबद्दल, उंचीबद्दल, तिच्या भारदस्त भव्यतेबद्दल, तिच्या प्रामाणिकपणाबद्दल जेव्हा कुणी मन:पूर्वक मुलांना सांगतं, तेव्हा ते त्यांना पटतं, आणि मुलं त्या कलेवर निखळ प्रेम करू लागतात.


या
घटनेला झाली असतील वीसेक वर्षं! तेव्हाही मी मुलांना गाणं शिकवत होतेच, पण गाण्याबरोबर गाण्याच्या परिघातल्या इतर कलात्मक गोष्टींचीही मुलांना माहिती करून दिली पाहिजे, या माझ्या विचाराला हळूहळू पण निश्चित दिशा देणारे ते दिवस होते. माझं गाण्याचं शिक्षण गुरुकुल पध्दतीने झालेलं होतं, त्यामुळे या पध्दतीमध्ये मिळणारा जो सहजसंस्काराचा भाग होता, तो क्लासमध्ये गाणं शिकणाऱ्या मुलांसाठी मिसिंगच असतो, हे माझ्या लक्षात येत होतं आणि त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं फार मनापासून वाटत होतं. आणि एका शुभदिनी मी ठरवलं की संगीतातून व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या या प्रक्रियेतला एक भाग म्हणून मुलांना आपण प्रभातचा 'गोपाळकृष्ण' हा चित्रपट दाखवायचा!

मी माझ्या पालकांपैकी एकांना - ज्यांच्याकडे व्हिडिओ कॅसेट प्लेयर आणि जरा मोठया स्क्रीनचा टीव्ही आहे, त्यांना - एक दिवस माझ्या सगळया विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे हा चित्रपट दाखवू देण्याची अनुमती मागितली आणि त्यांनी ती खूपच आनंदाने दिली. पण अगदी हळूच त्या मुलाच्या आईने मला साशंकतेने विचारलं, '''मुलं बघतील?'' मी जोरात हो म्हटलं. मुलं आणि पालक यांच्या सोयीचा एक रविवार या कार्यक्रमासाठी ठरवला गेला. बऱ्याचशा पालकांनीही हा चित्रपट पाहिला नव्हता, म्हणून त्यांनीही तो पाहावा अशी मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती केली.

आपण एक मस्त सिनेमा पाहणार आहोत आणि एक दिवस धम्माल करणार आहोत, या आनंदात मुलं मग्न होती. कुणी काय खाऊ आणायचा, कुणी कुणाला पिकअप करायचं, हेही ठरवून झालं. मीही खूप मजेत होते. मुलांना काहीतरी खास, वेगळं पाहायला मिळणार या आनंदात! त्याच दिवशी सकाळी अगदी अनपेक्षितपणे माझी पुण्याची बहीण मुंबईला आली माझ्याकडे! मला म्हणाली, ''आज आता तुझं काही काम ठेवू नकोस. मला शॉपिंगला वगैरे जायचंय, चल माझ्याबरोबर!'' मी म्हटलं, ''नाही गं, आज नको. मी उद्या नक्की येईन तुझ्याबरोबर. आज तूच चल माझ्याबरोबर. आज मी मुलांना प्रभातचा गोपाळकृष्ण दाखवायचं प्लानिंग केलंय.'' ''तसं असेल, तर कॅन्सल करून टाक तो बेत! कुठला बाबा आदमच्या जमान्यातला सिनेमा काढलायस! किती जुनाट आणि ब्लॅक ऍंड व्हाईट परत! मुलं पाहणार तरी आहेत का? मुलांना ते हेल काढलेलं बोलणं, ते विचित्र कपडे मुळीच आवडणार नाहीत.'' ती फटकळपणे बोलून मोकळी झाली. मी मात्र तिच्या या बोलण्यावर ''तू म्हणतेस तसं अजिबात होणार नाही, बघच तू!'' असं उलट वक्तव्य केलं.

माझा आत्मविश्वास डबघाईला आणण्याचं काम बहिणाबाईंनी अगदी छानच केलं होतं. ती म्हणत होती त्यात तथ्यांशही होताच की! सहजशिक्षणाच्या माझ्या आदर्श विचारांच्या नादात मी मुलांच्यातली आणि माझ्यातली तांत्रिक जनरेशन गॅप पार विसरले होते. मग मात्र मी बहिणीला चक्क वाळीत टाकलं आणि माझ्या संग्रही असलेल्या ग्रंथराजांच्या दुनियेत शिरले. मुलांनी हा चित्रपट आनंदाने आणि उत्सुकतेने पाहिला पाहिजे, यासाठी चंग बांधला.

ठरलेल्या वेळी सगळे पालक आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर स्थिरावली. चित्रपट सुरू करण्यापूर्वी ''मला काहीतरी बोलायचंय'' असं मी सर्वांना सांगितलं. मी मुलांशी गप्पा मारत त्यांना गुंगवत आजचा आपला सिनेमा खूप जुना ब्लॅक ऍंड व्हाईट जमान्यातला असल्याची कल्पना दिली. त्या जुन्या काळी - म्हणजे 1930 ते 1940च्या दरम्यान चित्रपटाच तंत्र नव्याने विकसित होत होतं, त्या काळची बोलण्याची पध्दत, कपडे वेगळे होते. सिनेमातली पात्रं स्वत: गाणं गायची, एवढंच नाही तर गोपाळकृष्णमधले सगळे नट, नटी, कृष्ण, पेंद्या त्याचे इतर सवंगडी, अगदी गाई-वासरंसुध्दा सहा-सहा महिने शूटिंगसाठी तयार केलेल्या गोकुळातच राहिले होते, हेही मुलांना सांगितलं. दादासाहेब फाळके यांनी 3 मे 1913 रोजी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला मूकपट काढला आणि आज आपण चलचित्रांच्या रंगीबेरंगी दुनियेचा लाभ घेतो आहोत तो केवळ या जुन्या बुजुर्गांनी मेहनतीने, कष्टाने केलेल्या संशोधनामुळे, हेही मी मुलांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला.

एवढं सगळं बोलल्यानंतर किंचितशा धास्तीनेच मी चित्रपट सुरू केला आणि.... आणि हा हा म्हणता मुलं त्या जुन्या पण अत्यंत ताकदीने सिध्द केलेल्या चित्रपटात गढून गेली. त्यांच्या मनात निर्माण केलेल्या पूर्वपीठिकेमुळे कदाचित, किंवा त्या चित्रपटाच्या स्वत:च्या प्रभावानेही असेल कदाचित.. पण माझा हा प्रयोग सुफल संपूर्ण झाला. ''जिंकलंस बाई!'' माझी बहीण कौतुकाने मला म्हणाली. मी यावर तिला म्हटलं, ''निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीची सकारात्मक सत्यता आज मला खरी पटली.'' आम्ही दोघी हसलो. त्याच दिवशी मी मात्र जुन्या सोन्याला नव्याने नटवण्याचं, सालंकृत करण्याचं आणि मुलांशी त्या सोन्याचं नातं जोडण्याचं व्रत मनोमन स्वीकारलं. गोपाळकृष्णच्या निमित्ताने सहजशिक्षणाचा एक परीसच माझ्या हाती लागला!

मग हे जुन्या चित्रपटांचा वेध घेण्याचं एक अनोखं स्वप्न माझ्या मनात पुढची काही वर्षं घोळत राहिलं! मी सगळया जुन्या पण प्रामुख्याने प्रभातच्या चित्रपटांवर अभ्यास करायला, काम करायला सुरुवात केली. आणि माझ्या असं लक्षात आलं की अतिशय वेगळया विषयावर असलेले, कमालीचा उत्कट आशय मांडणारे, अतिशय सत्त्वगुणसंपन्न असे हे चित्रपट आहेत. लहान मुलांना त्या चित्रपटातील गाणी शिकवावीत असं तर मला फार मनापासून वाटलं, कारण गाणी दिसायला सोपी, पण गायला कठीण अशी! मास्टर कृष्णराव, केशवराव भोळे, वसंत देसाई अशा दिग्गज संगीतकारांनी स्वरसाज चढवलेली अशी एकापेक्षा एक बहारदार गाणी! आणि त्या गाण्यांच्या वेळची दृश्यं, त्यांचं चित्रीकरण कमालीचं प्रभावित करणारं होतं! हे सगळं प्रत्यक्षात आणायला काही वर्षं गेली. कारण मला कितीही आवडलं, तरी मुलांच्या मनावर हा जुना कालखंड बिंबवणं कठीण होतं तसं!

पण मी सतत विचार करत होते की काय केलं म्हणजे मुलांना या विषयाच्या जवळ मला नेता येईल? आणि मग एक मस्त कल्पना सुचली. तारापूरला मी मुलांचं एक गुरुकुल निवासी शिबिर घेतलं. अगदी पहिलाच अनुभव होता तो.... सुमारे आठ-नऊ दिवसांचं हे शिबिर शास्त्रीय संगीताप्रमाणेच प्रभात चित्रपटगीतांसाठीही घेतलं! मुलांना शिकवायचा हा निर्णय धाडसीच होता. कारण प्रभात फिल्म कंपनीचा शेवटचा चित्रपट निघाला, तेव्हा माझाही जन्म झालेला नव्हता. मग या मुलांसाठी तर तो अतिप्राचीन इतिहास! त्यात ब्लॅक ऍंड व्हाईट चित्रं, जुन्या पध्दतीची भाषा, गाणी, काहीशी कालबाह्य कथानकं! पण एक निखळ आनंद देणारी, कर्मनिष्ठा, ध्येयासक्ती आणि निर्मळ कौटुंबिक मनोरंजनाचा आणि त्याबरोबरच उद्बोधनाचा वसा घेतलेली ही चित्रपट संस्था, तिचा इतिहास आणि तिचं संगीत मुलांच्या मनात ठाव घेईल असं मला आत कुठेतरी वाटत होतं. आणि माझा अंदाज चक्क खरा ठरला. किमया झाली आणि मुलं अक्षरश: प्रभातमय झाली. शिबिराचा अभ्यासक्रम ठरवत असतानाच मी स्वत: 'प्रभात'वर बरंच वाचन केलं होतं. काही चित्रपट आवर्जून पाहिले. बापू वाटवे, अरुणाताई दामले या 'प्रभात'वर निस्सीम प्रेम करणाऱ्या, प्रभातचाच एक भाग असलेल्या आदरणीय व्यक्तींना भेटले आणि मीही प्रभातच्या प्रेमात अगदी आकंठ बुडून गेले. विशेष म्हणजे माझं हे प्रभातप्रेम मुलांनाही प्रभातच्या रंगात रंगवून गेलं!

'अयोध्येचा राजा' हा पहिला मराठी बोलपट प्रभातने काढला... 'संत तुकाराम' हा चित्रपट परदेशीसुध्दा चित्रपट महोत्सवात गाजला, किंवा 'शेजारी' हा हिंदू-मुस्लीम संघर्षावर प्रभातने काढलेला पहिला चित्रपट होता, 'माणूस' हा चार्ली चॅप्लीनचा आवडता चित्रपट होता..... इ. माहिती मुलांना सांगितली की मुलांना त्याचं फार अप्रूप वाटायचं, अक्षरश: भारून जायची मुलं! त्यांचे चैतन्यमय लुकलुकते डोळे आनंदाने काठोकाठ भरून जायचे. प्रभातच्या इतिहासातल्या या वेधक गोष्टी कळल्यावर प्रभातची चित्रपटगीतं मुलांनी हा हा म्हणता आत्मसात केली. तारापूरच्या त्या टुमदार घरात वेळी-अवेळी माजघरातून, ओटीवरून, विहिरीवरून, गच्चीमधून, झोपाळयावरून, 'लखलख चंदेरी', 'दोन घडीचा डाव', 'कशाला उद्याची बात', 'मन सुद्द तुझं', 'भाव तोचि देव', 'प्रभात समयो पातला', 'भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे' ही आणि अशी अनेक बहारदार गाणी समूहस्वरात ऐकू येऊ लागली. एके दिवशी मुद्दाम शांता आपटेंचा 'कुंकू' मुलांना दाखवला. आता मुलांना तो चित्रपट अजिबात जुना वाटला नाही. त्या सिनेमातली गाणी आता आपल्याला येतात, या जाणिवेने मुलांचा आनंद दुथडी भरून वाहू लागला.

विविध अभिजात कलांबद्दल, त्यासाठी जुन्या पिढीने घेतलेल्या कष्टांबद्दल, मेहनतीबद्दल आणि त्या कलेच्या दर्जाबद्दल मुलांशी बोललं की मुलांना त्याचं महत्त्व कळतं; त्या कलेबद्दल, त्या कलेच्या खोलीबद्दल, उंचीबद्दल, तिच्या भारदस्त भव्यतेबद्दल, तिच्या प्रामाणिकपणाबद्दल जेव्हा कुणी मन:पूर्वक मुलांना सांगतं, तेव्हा ते त्यांना पटतं, आणि मुलं त्या कलेवर निखळ प्रेम करू लागतात.

9594962586

 

Powered By Sangraha 9.0