कुंपण पार करताना

04 Oct 2016 12:05:00

परिस्थितीवशात असो व स्वनिर्णय म्हणून असो, महिला आज नवनवी क्षेत्रे धुंडाळत आहेत, प्रयत्नांची जोड देऊन यशस्वी होत आहेत. त्याला घराचे आणि समाजाचेही सहकार्य लाभत आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचार, पारंपरिक बंधने, कालबाह्य रूढी यांच्या पार्श्वभूमीवर बंधनाच्या सीमा उल्लंघून जाणाऱ्या या स्त्रिया प्रेरक, आदर्श ठरतात. नव्या शोधलेल्या पाऊलवाटांवर अनेकींना येण्याचे आमंत्रण देतात. सकारात्मक बदल तो हाच.


चा
कोरीची कुंपणे पार करणाऱ्या काही जिद्दी, करियरचा ध्यास घेतलेल्या तर काही अगदी सामान्य वाटाव्या अशा या काही जणी. आपल्या परीने जगण्याला भिडलेल्या, परिस्थिती वाकवून स्वत:ला ताठ ठेवणाऱ्या! समाज, चालीरिती, धार्मिक चाकोरी, गावाची-जातीची-घराण्याची इभ्रत आणि काय काय! आजूबाजूची प्रतिकूलता मोडून काढून वेगळया वाटा चोखाळणाऱ्या या काही जणी. सीमोल्लंघनच हे!! सीमोल्लंघन म्हणजे काही नेहमीच युध्दाची ललकारी, तोफा आणि घोडदलाच्या टापा आणि अटकेपार झेंडा नसते. समोरच्या व्यक्ती-रूढी-पध्दतीवर वार, हल्ला आणि प्रतिकूलतेवर मात, हिमतीवर परिस्थितीला आपल्या बाजूला वळवणे, चाकोरी, जनरीत तोडून बंधनांच्या दृश्य-अदृश्य भिंती तोडणे हेच सीमोल्लंघन, अंधाऱ्या वर्तमानात पावलापुरता प्रकाश शोधणे ते नक्कीच असते. येणाऱ्या पिढयांना वाट दाखवणारे, स्वत्व पणाला लावणारे, दांभिकतेचा बुरखा फाडणारे ते नक्कीच असते आणि आहे. या सीमोल्लंघनाच्या निमित्ताने अशा काही जणींची ओळख करून घेऊ या. या महिलांनी अंतरिक्षापासून भूगर्भापर्यंत आपल्या कामाचा, अस्तित्वाचा ठसा कसा उमटवला आहे हे पाहू या, समजून घेऊ या.

गेल्या आठ मार्चला एअर इंडियाने दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को 'all women' विमान पाठवले, त्याची मोठी बातमी झाली. या प्रवासाचे वैशिष्टय म्हणजे 14,500 कि.मी.चा प्रवास, 17 तास सलग उड्डाण. ती सर्वात लांबची व विनाथांबा तर होतीच, त्याशिवाय कॉकपिट ते केबिन, ग्राहक सेवा, डॉक्टर, चेक इन स्टाफ, एअर ट्राफिक कंट्रोल.... सर्व ग्राउंड हँडलिंगही महिलांनी केले होते. विमानातल्या सेवेमध्ये महिला हे बिलकुलच नवे नाही, वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांना अध्येमध्ये महिला वैमानिकही भेटतात. पण या वर्षी भारतीय वायुदलात युध्द वैमानिक (Fighter Pilot) म्हणून भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तिघींची नेमणूक झाली हे विशेष. अर्थातच हे काम, मुलगी म्हणून कोणतीही सवलत नसलेले, केवळ उड्डाणक्षमतांचा कस लावणारे नसेल तर निर्णयक्षमता, साहस, आत्मविश्वास यांचीही कसोटी पाहणारे असेल.

गेल्या वर्षी भारताने मंगळावर पाठवलेल्या यानाचे यशस्वी उड्डाण आपण पाहिले. त्याच्या यशस्वी उड्डाणानंतर 'काकूबाई' वाटणाऱ्या, तुमच्या-आमच्यासारख्या दिसणाऱ्या, पारंपरिक साडया नेसलेल्या, V for Victoryची खूण दाखवणाऱ्या शास्त्रज्ञ महिलांचे हसरे फोटो आपण पाहिले होते. या वैशिष्टयपूर्ण Mars Orbiter Mission (MOM) मोहिमेला 'MOM' हे नाव सार्थक ठरेल असा महिला शास्त्रज्ञांचा यात सहभाग होता. इस्रोच्या एकूण चौदा हजार कर्मचाऱ्यांपैकी आज महिला 20% असल्या, तरी वाढत आहे. अशा वैशिष्टयपूर्ण कामाच्या संधी घेणाऱ्या, त्यांना सहकार्य करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत आहे. अशा वैशिष्टयपूर्ण अशा साहसी मोहिमा, कामाची ठिकाणे आकर्षक वाटली तरी त्यात खूप मोठी रिस्कही असते. भारतीय नौसेनेच्या सेवेत असलेल्या किरण शेखावत या वैमानिकाचा मृत्यू झाल्याची घटनाही मार्च 2015ची. ती गस्त घालत असलेल्या डॉर्निअर विमानाला गोव्याच्या किनारपट्टीवर अपघात झाला आणि कामावर असताना मृत्यू झालेली ती पहिली महिला अधिकारी ठरली.

भारतीय नौदलात महिलांना काही पदांवर नियुक्त करण्यास 1992पासून सुरुवात झाली. तिथेही त्या उत्तम कामगिरी करतच आहेत. पण अनेकींना उसळणाऱ्या सागरलाटा वेगवेगळया कारणासाठी खुणावत आहेत. नवनवी क्षेत्रे त्या धुंडाळत आहेत. मर्चंट नेव्ही या पूर्णपणे पुरुषी क्षेत्रात वावरणाऱ्या पारोमिताला सागरी आव्हानाबरोबरच पूर्वग्रहाचा, पुरुषी मानसिकतेचा आणि साचेबध्द विचारसरणीचा सामना करावा लागला. ही करियर सोडून देण्याचे सल्लेही मिळाले, पण स्वत:वरचा विश्वास, क्षमता आणि जिद्द यांच्या जोरावर ती या क्षेत्रात टिकून आहे. एकाकीपणा, घराची आठवण, पुरुषी सहकाऱ्याचा तिच्या कार्यक्षमतेवर दाखवलेला अविश्वास यावर मात करून 'दर्यावर्दी' पारोमिता अनेकींसाठी रोल मॉडेल बनली आहे.

उधाणलेल्या सागरलाटांवर स्वार होणारी इशिता मालवीय ही पहिली भारतीय व्यावसायिक महिला सर्फर (Surfer) आहे. माहिती जालावर 'महिला सर्फर' असा शोध घेतला, तर भारतातल्या नव्हे, तर जगातल्या महिला सर्फरची यादी मिळेल, ती अर्धशतकाच्या जवळही पोहोचत नाही. त्यामुळे भारताच्या समृध्द किनारपट्टीला 'सर्फर डेस्टिनेशन' बनवण्याचे इशिताचे स्वप्न तितकेच भारी वाटते.

स्कुबा डायव्हिंग या साहसी खेळात पारंगत पहिली भारतीय महिला आहे अर्चना सरढाना. मधुमती ही सर्वात कमी वयाची या क्षेत्रातली मुलगी. ती 2014मध्ये Rescue Diver म्हणून काम करत होती. व्यावसायिक पाणबुडे म्हणून महिलाही या क्षेत्रात आपला ठसा उमटवतील यात शंका नाही.

अंतराळ ते समुद्राच्या मधल्या भू-भागावर महिला वाहन चालकांची कमी नाही. सायकलपासून कार, रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक, ट्रॅक्टर ते ई-रिक्षा चालवणाऱ्या महिला आपल्याला दिसतात. पण व्यवसाय म्हणून मालवाहतूक करणारे, मोठमोठया चाकांचे ट्रक चालवणाऱ्या महिला कमीच दिसतात.

मध्य प्रदेशातल्या मंदसौरची पार्वती आर्य ही केवळ भारतातली नव्हे, तर आशियातली पहिली महिला ट्रक ड्रायव्हर ठरली आहे. गिनीज बुकमध्ये तिची नोंद झाली आहे. तर भोपाळची योगिता रघुवंशी ही उच्चशिक्षित महिला ट्रक ड्रायव्हर आहे. वकिलीचे शिक्षण असूनही तिने हा पेशा स्वीकारला आहे.

वेगळया वाटा चोखाळणाऱ्याच्या प्रेरणा कधी साहसाच्या असतात, कधी नव्या शोधाच्या, तर कधी परिस्थितीला उत्तर देण्याच्या, मार्ग काढण्याच्या. कधी वाट अनवट असते, पण बरेचदा बिकट वाटच असते. तिला वहिवाट बनवण्याचे श्रेय या महिलांकडे जाते. त्याचे महत्त्व कमी तर होत नाहीच, उलट प्रतिकूलतेच्या पार्श्वभूमीवर ते अधिक उजळून निघते, अनेकींना प्रेरणा देणारे ठरते. जातीच्या, जनरितीच्या वर उठून, परिस्थितीला भिडून केशकर्तन करणारी भारतातली पहिली महिला म्हणजे कोल्हापूरच्या हासुर गावाच्या शांताबाई श्रीपती यादव. 1984मध्ये पतीचे अचानक निधन झाले आणि चार मुलींचा उदरनिर्वाह करायची जबाबदारी येऊन पडली. तुटपुंज्या शेतीत ते जमेना, मग पतीचा न्हावीकामाचा व्यवसाय त्यांनी पुढे चालू ठेवला. 30-32 वर्षांपूर्वी एका बाईने पुरुषांची दाढी-हजामत करायची, हे फारच क्रांतिकारक होते. जेन्डरच्या घिशापिटया कल्पनांना धक्का देणारे होते. गावातील सन्मान्य हरिभाऊ कडूकर यांच्या पाठिंब्यामुळे ते शक्य झाले. शांताबाईंना अनेक पुरस्कार मिळाले, त्या सभापतीही झाल्या. चकाचक सलूनमध्ये काम करणाऱ्या आधुनिक केशकर्तन कलाकारांनी आज सत्तरीत असलेल्या शांताबाईचे मोल जाणले पाहिजे.

तिरुमला तिरुपती मंदिर भाविकांच्या केशदानासाठी प्रसिध्द आहे. सर्व वयाचे स्त्री-पुरुष भाविक तिथे स्वेच्छेने केस दान करतात. 2001पासून तिथे महिलानाही संधी द्यावी अशी मागणी होत होती. 2012मध्ये मंदिर कमिटीने ती मान्य केली आणि ज्या मंदिरात लाडू-फुलांपेक्षा ज्या केशकर्तनाचे आणि केस विक्रीचे उत्पन्न जास्त आहे, अशा व्यवसायात महिलांना प्रवेश मिळाला. स्त्री भक्तांच्या आणि मुलांच्या केशकर्तनासाठी महिलांना प्राधान्य दिले जाते. आता तिथेही समान कामासाठी समान दाम हे मुद्दे आहेतच, पण एक वेगळे व्यावसायिक क्षेत्र महिलांना उपलब्ध झाले आहे.

मानवी सामाजिक जीवनात, आदरातिथ्यात खाणे आणि पिणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पदार्थाची चव, दर्जा पारखणे याला व्यावसायिक खाद्यउद्योगात महत्त्व आहे. त्यातही चहा, कॉफी, वाईन अशा पदार्थांची चव बघून त्यांना मानांकित करणे हे कौशल्याचे  कार्यक्षेत्र आहे. जगातला पहिला 'चहा चवतज्ज्ञ' - Tea Tasters - महिलांचा क्लब बंगळुरूमध्ये आहे, तर वाईन चवतज्ज्ञ सोवना पुरीचा या क्षेत्रात बोलबाला आहे.

पारंपरिक पुरुषी मानले गेलेले बारटेंडरचे काम महिलांना करू देण्यासाठी 2007चा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा निर्णायक ठरला. शत्भी बासू या क्षेत्रातल्या आद्य स्त्री.

हिंदी चित्रपट क्षेत्रात चारू खुराणांना मेकप कलाकार म्हणून मान्यता व सदस्यत्व मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली.

परिस्थितीवशात असो व स्वनिर्णय म्हणून असो, महिला आज नवनवी क्षेत्रे धुंडाळत आहेत, प्रयत्नांची जोड देऊन यशस्वी होत आहेत. त्याला घराचे आणि समाजाचेही सहकार्य लाभत आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचार, पारंपरिक बंधने, कालबाह्य रूढी यांच्या पार्श्वभूमीवर बंधनाच्या सीमा उल्लंघून जाणाऱ्या या स्त्रिया प्रेरक, आदर्श ठरतात. नव्या शोधलेल्या पाऊलवाटांवर अनेकींना येण्याचे आमंत्रण देतात. सकारात्मक बदल तो हाच.

9821319835

nayanas63@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0