पंजाबच्या हल्ल्यामागेही पाकिस्तानच !

03 Aug 2015 15:18:00


***अरविंद व्यं. गोखले***

गुरुदासपूर जिल्ह्यात दिनानगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात तीन अतिरेक्यांचा सहभाग होता आणि ते तिघे मारले गेले, तरी प्रारंभी मनात आलेले विचार संपले नाहीत. हा हल्ला खलिस्तानी अतिरेक्यांचा नाही हे त्याच्या फिदायिनी पध्दतीच्या हल्ल्यावरून स्पष्ट झाले. त्यावरून त्याची पाळेमुळे पाकिस्तानात आहेत, पण तो खलिस्तानी हल्ला नाही हे कळून चुकले. याचा अर्थ हा हल्ला जैश-ए-महमद किंवा लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांनी केला. पण तेव्हाच्या त्या 'संभाव्य' हल्ल्यापासून लक्ष अन्यत्र वळवायची ती खेळी नसेलच असेही नाही. या हल्ल्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने बऱ्यापैकी तयारीही केलेली असली पाहिजे. ज्यांनी त्या घोषणा दिल्या त्यांना पंजाबच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असेल. त्यामुळे त्यांच्या त्या घोषणांचे सूत्रधार कोण हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.

 पंजाबच्या एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासमवेत काही दिवसांपूर्वी मी चर्चा केली, तेव्हा पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन व्हायची शक्यता त्याने फेटाळून लावली होती. त्यामुळेच गुरुदासपूर जिल्ह्यातल्या ताज्या हल्ल्याने मला अस्वस्थ केले. पाकिस्तानी सरहद्दीला लागून असलेला हा जिल्हा काही वर्षांपूर्वीपर्यंत दहशतवादाने पुरता पोखरला गेला होता. पंजाबमध्ये पुन्हा दहशतवादाचा उद्रेक होऊ शकतो, या 'रॉ'ने अलीकडेच दिलेल्या इशाऱ्याकडे मी त्याचे लक्ष वेधले, तेव्हा त्याने ''तसा दहशतवाद पुन्हा डोके वर काढू शकणार नाही ही काळया दगडावरची रेघ आहे'' असे म्हटलेले असल्याने मी या हल्ल्यानंतर जरा जास्तच साशंक झालो. मात्र त्याच्या म्हणण्यानुसार पंजाबमधला दहशतवाद कायमचाच गाडला गेला आहे. आताचा शीख तरुण जास्त उद्योगप्रिय आणि प्रगतिशील बनलेला आहे. आताचा आणि 1990पूर्वीचा पंजाब यांच्यात बरेच अंतर आहे. त्या काळात पंजाबमध्ये बेरोजगारांचे प्रमाण जास्त होते आणि सरकार या संस्थेवरचा जनतेचा विश्वास उडत चालला होता. कायद्याचे राज्य संपलेले होते. सरकारमध्येच अनेक तट होते, त्यातल्या काहींचा हिंसाचाराला पाठिंबा नसला तरी विरोध नव्हता. आता ते सगळे संपले आहे. पंजाबमधला तरुण मोठमोठया पदांवर काम करतो आहे आणि त्याचा आदर्श इतर तरुणांपुढे आहे. मी स्वत: घुमानच्या साहित्य संमेलनानिमित्त पंजाबमध्ये गेलो असताना हा बदल पाहिलेला आहे. (1984चा आणि 1988चा अस्वस्थ पंजाबही पाहिलेला आहे.) पंजाबची भूमी सुजलाम सुफलाम आहे आणि त्याची फळे सर्वांना समान चाखायला मिळत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या सभेत जेव्हा खलिस्तानवादी घोषणा दिल्या गेल्याचे वृत्त मी वाचले, तेव्हा संशयाचे धुके अधिकच गडद झाले. बातमी प्रसिध्द झाली, त्याच दिवशी गुरुदासपूर जिल्ह्यात दिनानगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात तीन अतिरेक्यांचा सहभाग होता आणि ते तिघे मारले गेले, तरी प्रारंभी मनात आलेले विचार संपले नाहीत. हा हल्ला खलिस्तानी अतिरेक्यांचा नाही, हे त्याच्या फिदायिनी पध्दतीच्या हल्ल्यावरून स्पष्ट झाले. त्यावरून त्याची पाळेमुळे पाकिस्तानात आहेत, पण तो खलिस्तानी हल्ला नाही हे कळून चुकले. याचा अर्थ हा हल्ला जैश-ए-महमद किंवा लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांनी केला. पण तेव्हाच्या त्या 'संभाव्य' हल्ल्यापासून लक्ष अन्यत्र वळवायची ती खेळी नसेलच असेही नाही. ती बातमी वाचल्यावर 'खलिस्तानवाद्यांनी डोके वर काढलेले दिसते' असाच कोणाचाही समज बनला असता. थोडक्यात, तो खोलवरचा कट असण्याची शक्यता आहे. म्हणजेच या हल्ल्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने बऱ्यापैकी तयारीही केलेली असली पाहिजे. ज्यांनी त्या घोषणा दिल्या, त्यांना पंजाबच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असेल. त्यामुळे त्यांच्या त्या घोषणांचे सूत्रधार कोण हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.

ज्यांनी दिनानगरमध्ये हा हल्ला केला, ते नरोट-जैमलसिंग भागातून भारतात आले, त्यांनीच बरोबर आणलेल्या 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम'वरून असा अंदाज बांधण्यात आला आहे. हे 'जीपीएस' दिनानगरसाठीच वापरायचे हे आधीच ठरलेले होते, हे ते उघडताच स्पष्ट झाले. गुरुदासपूर जिल्ह्यातला तो भाग गुरू नानकदेव विद्यापीठाचा आहे. ते भारतात नरोटची सरहद्द ओलांडून आले. त्या भागाची त्यांनी टेहळणी केली असणार हे तर स्वाभाविक आहे. हा हल्ला चढवून त्यांना पुढे जायचे होते, हेही स्पष्ट झाले आहे. ते आले तेव्हा त्यांच्यासमवेत आणखी कोणी होते की ते तीनच होते हे कळलेले नाही. 27 जुलैच्या पहाटेपर्यंत ते काय करत होते, कुणाकुणाला भेटले, त्यांची आणखी कोणाशी चर्चा झाली किंवा काय तेही अजून स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी तरी सुरक्षा यंत्रणांना त्यांच्यापैकी एखादा तरी हाती जिवंत लागावा असे वाटत होते. म्हणूनच या कारवाईसाठी त्यांनी एवढा वेळ घेतला. ते बामियाल भागात आले आणि त्यांनी तिथला कडेकोट बंदोबस्त पाहिला असणार आणि त्यानंतरच त्यांनी दिनानगरच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला असेल, असेही शक्य आहे. नरोट-जैमलसिंग ते दिनानगर हे अंतर अवघे 22 किलोमीटरचे आहे आणि नरोट ते पठाणकोट हे अंतर 33 किलोमीटरचे आहे. हा रस्ता एकच नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

हे दहशतवादी आले ते लष्करी गणवेशात. त्यामुळे त्यांना अडवले गेले नाही असा दावा केला गेला आहे. त्यांनी सर्वप्रथम पठाणकोट रेल्वेच्या मार्गात बाँब पेरले. त्यानंतर त्यांनी एक प्रवासी बस थांबवायचा प्रयत्न केला, पण तो फसताच त्यांनी त्यावरच स्वैर गोळीबार केला. दोघे-तिघे त्यात जखमी झाले, पण त्या ड्रायव्हरने प्रसंगावधान बाळगून ती बस वेगाने पळवली आणि एकदम इस्पितळाच्या आवारातच थांबवली. त्याच्या या प्रसंगावधानाबद्दल त्याचे योग्य कौतुक व्हायला हवे. त्यानंतर ते तिघे मारुती मोटार पळवून त्या दिनानगर पोलीस चौकीपर्यंत पोहोचले असतील असा कयास आहे. आता प्रश्न असा की त्या तिघा दहशतवाद्यांची प्रसिध्द झालेली छायाचित्रे ही दाढी राखलेल्या अवस्थेतली आहेत. या व्यक्ती आपल्याकडच्या नव्हेत, हे पंजाबमधल्या एकाही व्यक्तीला ओळखता येऊ नये हे धक्कादायक आहे. दाढी राखणारे ते तिघे समजा शीख आहेत असे गृहीत धरले, तरीही त्यांच्या त्या कोरलेल्या दाढीचे रहस्य उघड व्हायला हरकत नव्हती. तसे घडले असते, तर पुढला समरप्रसंग टळला असता आणि पाकिस्तानचे अंतरंग पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले असते.

जम्मू-पठाणकोट हा राष्ट्रीय महामार्ग 44 (एनएच44) आहे आणि तो भारत-पाकिस्तान सरहद्दीला समांतर असा जातो. जम्मू-काश्मीरशी जोडणारा हा एकमेव महामार्ग आहे आणि सध्या काश्मीरमध्ये मुफ्ती महमद सईद यांचे सरकार आहे आणि त्यांचे  दहशतवाद्यांबाबतचे धोरण अतिशय कुचकामी आहे. गेले काही दिवस काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांचा जो नंगानाच चालू आहे, त्याला आवर घालायलाच हवा. तिथे पाकिस्तानचे आणि 'इसिस'चे (इस्लामिक स्टेट ऑॅफ इराक ऍंड सीरियाचे) झेंडे फडकवले जातात आणि त्यांचे समूळ उच्चाटन केले जात नाही, हे लक्षण काही ठीक नाही. त्यातून दहशतवादी शेफारतीलच, पण भारतविरोधी ताकदीला अधिक खतपाणी घातले जाईल. पंजाबपर्यंत आपण जाऊ  शकलो, उद्या आणखीही काही ठिकाणी आपल्याला हा दहशतवाद पोहोचवता येईल ही जर दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची भावना होणार असेल, तर तिचा योग्य तो समाचार घेतला जाणे आवश्यकच आहे. पाकिस्तानला लागून असलेली पंजाबची ही सरहद्द तारेच्या कुंपणाने बंदिस्त करण्यात आली असली तरी आयएसआयच्या मदतीने आरपार खंदक खणून बऱ्याचदा हे दहशतवादी भारतात आणून सोडले जात असतात. त्यातही पावसाळयात नद्यांचे मार्ग बदलतात आणि जो आधीचा मार्ग असतो तो नेमका मोकळा राहतो आणि तिथून सरहद्द ओलांडणे सोपे जाते. त्याच परिसरातल्या घनदाट जंगलामधून दहशतवाद्यांचे जाणेयेणे सहज सुलभ होऊ न जाते. या भागात शिरलेल्या दहशतवाद्यांना वाहने पळवून कोठेतरी दडी मारणे सोपे जाते. हे दहशतवादी अतिशय प्रशिक्षित असतात, हे दिनानगरच्या हल्ल्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यांना 'आयएसआय'चे कायमचेच साहाय्य असते. एकाच वेळी हे हल्ले आणि दुसरीकडे सरहद्दीवर मारा हे पाकिस्तानचे तंत्र आहे. दिनानगरचा हा आत्मघातकी हल्ला होता आणि यापूर्वी तसा आत्मघातकी हल्ला खलिस्तानवाद्यांनी एकदाच म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्यावर केला होता. मी स्वत: फैसलाबादला कित्येक वर्षांपूर्वी खलिस्तानी दहशतवाद्यांचा प्रशिक्षण अड्डा पाहिलेला आहे. अर्थात आता तो तिथे असेल नसेल, पण दहशतवादी तयार करायची पाकिस्तानची भूमिका बदललेली नाही. बादल यांच्या सभेत खलिस्तानवादी घोषणा दिल्या गेल्या याचा अर्थच असा आहे की, एकाच वेळी काश्मिरी आणि पंजाबी दहशतवादी यांचा नव्याने हैदोस घालायचे नवे कारस्थान पाकिस्तानने केले असायची दाट शक्यता आहे.

हे दहशतवादी रावी नदीच्या पात्रातून आले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण नदीचे पात्र हाच आता भारतात येण्याचा एकमेव मार्ग असू शकतो. अनेकांनी आता सरहद्दीच्या त्या परिसरात सुरुंग पेरायचा सल्ला दिला आहे. त्याने काय होईल? तर त्या भागात राहणारा आणि भारतीय गुप्तचरांना माहिती देणारा जो एकमेव आधार आहे, तो तुटण्याचा धोका आहे. हे सुरुंग त्यांच्याच जिवावर उठतील आणि विशेष हे की सुरुंगविरोधी जिनिव्हा कराराचाही तो भंग ठरेल. आपल्याला त्यापेक्षा अधिक चांगली पावले उचलता येणे शक्य आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी अलीकडे चीन आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचा इकॉनॉमिक कॉरिडॉर -आर्थिक महामार्ग - कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केला जाईल असे म्हटले. आमच्या शत्रूने कितीही आदळआपट केली तरी तो पूर्ण होईल असे त्यांचे विधान आहे. देशाच्या आर्थिक कॉरिडॉरसारख्या विषयावर जेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख बोलतात, तेव्हा या विषयाचे गांभीर्य आपल्याला ओळखता यायला हवे. राहील शरीफ हे बऱ्याचदा परदेशात असतात. अलीकडे ते युरोपात होते. त्यांची पावले पाकिस्तानच्या दृष्टीनेही तितकीशी समाधानकारक नाहीत. यावरून जनरल राहील शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना गप्प बसू देणार नाहीत आणि भारतासमवेत कोणतेही सहकार्य घडवू देणार नाहीत.

या हल्ल्याचे आणखी एक वैशिष्टय लक्षात घ्यायला हवे, ते म्हणजे जम्मू-पठाणकोट मार्गावर आपल्या अनेक लष्करी छावण्या आहेत. 'फिदायिनां'पासून त्यांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. त्याच भागात हे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत हिंडत होते. सध्या अमरनाथच्या यात्रेत सहभागी होणारे भाविकही याच रस्त्याने जात-येत असतात. या आधी जम्मू भागात कालूचकमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 31 जण ठार झाले होते, त्यापैकी 21 आपले जवान होते. हा भाग पंजाबपासून वेगळा मानता येत नाही.

पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल झिया उल हक यांनी जुलै 1977मध्ये सत्ता हाती घेतली आणि 'के-2' (काश्मीर आणि खलिस्तान) हा 'उपक्रम' हाती घेतला. त्यांनी 'आयएसआय'ला काश्मीर पाकिस्तानकडे कसे आणता येईल त्याकडे लक्ष द्यायला सांगितले. त्यांनी त्यासाठी 'ऑॅपरेशन टोपॅक' हाती घेतले. आयएसआयने भारतीय मुस्लिमांना हाताशी धरून काश्मिरी मुसलमानांना फितवता येते का तेही पाहिले. भारतात दहशतवाद्यांचे जाळे विणण्याच्या कार्यक्रमाबरोबरच झियांनी खलिस्तानवाद्यांना पाकिस्तानमध्ये खास वागणूक दिली जाईल हे पाहिले. याच झियांच्या काळात खलिस्तानवाद्यांची जा-ये पाकिस्तानात वाढली. त्यांच्या 'ऐवान ए सदर'वर काही भारतीयांची किंवा अनिवासी भारतीयांची खास 'मेहमाननवाजी' केली होती. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन या देशांमधले सधन शीख झियांच्या भोवती जमा झाले. आपण त्यांना खलिस्तान हा शिखांसाठी स्वतंत्र देश मिळवून देऊ  शकतो असे झियांनी त्यांना भासवले आणि त्यासाठी लागणारा पैसा तसेच योग्य ते प्रशिक्षण द्याायची व्यवस्था केली जाईल असेही आश्वाासन त्यांनी या खलिस्तानवाद्यांना दिले. पंजाबमध्ये स्थायिक असणाऱ्या शिखांपेक्षा परदेशातच जास्त शीख राहतात हे ओळखून त्यांनी भारताबाहेरचा शीख तो आपला हे सूत्र हाती घेतले आणि 'आयएसआय'मार्फत त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायचे काम हाती घेतले. वासर्नंसग जफरवाल, सुखदेवसिंग झमके, अवतारसिंग ब्रह्मा, कंवरसिंग धामी हे दहशतवादी झियांचे अधिक लाडके होते आणि झियांसमवेत प्रामुख्याने त्यांचीच उठबस असे. त्यांना पैशाचे पाठबळही त्यांच्याच काळात लाभले. झिया 17 ऑॅगस्ट 1988 रोजी मारले गेले आणि या दहशतवाद्यांना 'आयएसआय' वगळता कोणी वालीच उरला नाही. झियांनंतर बेनझीर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी येणार हे उघड होते. आपले वडील झुल्फिकार अली भुट्टो यांना झियांनी फासावर लटकवल्याने त्या झियांचे धोरण राबवणार नाहीत हे उघड होते. त्यामुळे या दहशतवादी नेत्यांनी पाकिस्तानमधून काढता पाय घेतला. त्यानंतरच्या काळात त्यांचे नावही ऐकू येईनासे झाले. त्यापैकी झफरवाल हा तथाकथित 'खलिस्तान कमांडो फोर्स'चा दहशतवादी 11 एप्रिल 2001 रोजी अमृतसरच्या बसस्टँडवर पकडला गेला. त्याखेरीज जे इतर दहशतवादी आहेत, ते फरारी आहेत किंवा पाकिस्तानात वा अमेरिकेत आहेत. जाताजाता एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. या हल्ल्यात बळी पडलेले पंजाबचे पोलीस निरीक्षक बलदेवसिंग यांच्या हौतात्म्याची किंमत त्यांच्या कुटुंबीयांनी का कमी केली ते कळले नाही. त्यांनी बलदेवसिंग यांच्या चिरंजीवांना पोलीस निरीक्षकपदी बढती दिली जात नाही आणि त्यांच्या दोन मुलींना तहसीलदारपदी नियुक्त केले जात नाही, तोपर्यंत आपण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही असे म्हटले होते. प्रकाशसिंग बादल त्यांच्या घरी गेल्यानंतर तो प्रश्न मिटला.

भारत-पाकिस्तान चर्चा व्हायला हवी असा अमेरिकेने सातत्याने धोशा लावला आहे. तो त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी आहे. दिनानगरमध्ये हल्ला करणाऱ्यांकडे काही महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली. ती अफगाणिस्तानातून आली होती पण ती अमेरिकन बनावटीची होती. अफगाणिस्तानातून कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनचे सैन्य मागे गेल्यावर काश्मीरमध्ये जी शस्त्रे पेरण्यात आली, ती सर्व अफगाणिस्तानात ओतलेली अमेरिकन शस्त्रास्त्रे होती आणि आता अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही.

9822553076

 

Powered By Sangraha 9.0