नास्तिकाचे अध्यात्म

09 Nov 2015 12:14:00


****दिलीप करंबेळकर****

ऐहिक ज्ञानाची आस, निष्काम कर्मयोग, समाजहिताबद्दल श्रध्दायुक्त भक्ती व मनाच्या स्थिरतेसाठी आवश्यक तेवढी ध्यानसाधना ही नास्तिकांच्या अध्यात्माची चतु:सूत्री आहे. आपल्या संस्कृतीत ज्ञान हा शब्द 'आत्मज्ञान' या अर्थाने वापरला जातो. आत्मज्ञान हेच खरे व बाकी ज्ञान हे खरे ज्ञान नव्हेच, ती माया आहे, ही आपली पारंपरिक शिकवण आहे. याचा परिणाम आपण ऐहिक ज्ञानाकडे तुच्छतेने पाहतो. याउलट वैज्ञानिक विचार फक्त ऐहिक ज्ञानालाच मानतो. त्यामुळे अध्यात्मवादी समाज विरुध्द विज्ञानवादी समाज असे द्वंद्व तयार झाले आहे. त्याचेच रूपांतर पाश्चात्त्य संस्कृती विरुध्द पौर्वात्य संस्कृती यांच्या कथित संघर्षात झाले आहे. वास्तविक हे दोन्ही प्रवाह एकाच मानवी जाणिवेचे विभिन्न दिशांनी झालेले विकसन आहे.

***

आजवरच्या मानवी संस्कृतीच्या जडणघडणीचे तीन प्रमुख टप्पे पडतात. पहिला टप्पा हा आदिम संस्कृतीचा. या टप्प्यात मानवी जीवन व प्राणिजीवन यात फरक नव्हता. जीवन संघर्षात आपण स्वत:ला वाचविणे, आपले जीवन सातत्य टिकविणे, आपले प्रभुत्व निर्माण करणे, परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता स्वत:मध्ये बदल घडवून आणणे हा प्राणी जीवनचक्राचा एक अटळ भाग होता. या संस्कृतीत माणूस हा टोळयांच्या स्वरूपात राहत होता. शिकार हे त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. हा वानरजीवनाचा पुढचा टप्पा होता. त्याचे जीवन निसर्गावलंबी होते. कुटुंबव्यवस्थेसकट कोणत्याही स्वरूपाची समाजव्यवस्था अजून निर्माण व्हायची होती. त्याचे सर्व निर्णय अंत:प्रेरणेवर अवलंबून असत. त्यामुळे निर्माण होणारी नातीही क्षणभंगुर असत व त्यामागची प्रमुख प्रेरणा ही इतर प्राण्यांसारखीच होती. त्याच्या गुणदोषांचे उद्रेक नैसर्गिक, सहज आणि उत्कट असत. संयम, नैतिकता, सुसंस्कृतता आदी गोष्टींशी त्याचा परिचय व्हायचा होता. मात्र निरीक्षण व त्या निरीक्षणानंतर मिळालेल्या अनुभवांची संगती लावण्याचे गुणवैशिष्टय त्याने प्राप्त केले होते. या गुणाच्या बळावर त्याने आपल्या परिसरावर, सभोवतालच्या प्राण्यांवर, निसर्गावर नियंत्रण आणायला सुरुवात केली. आपण आपल्या निरीक्षणांच्या बळावर आपल्या अनुभवांची संगती लावून आपल्या जीवनाचे नियम आपण बनवू शकतो, याचे भान मानवी संस्कृतीच्या विकासाच्या ज्या टप्प्यावर त्याला आले असेल, तेव्हा त्याचा प्रवास एका वेगळया वाटेने सुरू झाला. हा त्याच्या सांस्कृतिक विकासाचा पहिला पैलू. या प्रक्रियेतून त्याने स्वत:ची 'जाणीव ' विकसित केली आणि त्यातूनच टोळीचा 'समूह' बनण्याची प्रक्रिया सुरू झाली. खुणांच्या, प्रतिमांच्या, शब्दांच्या रूपाने या 'जाणीवे'द्वारे एकमेकाशी संवाद साधता येऊ शकतो, या 'जाणीवे'चे आदान-प्रदान करता येऊ शकते, याचा त्याला अनुभव आला, तेव्हा अनेक अंगांनी त्याचे समूहजीवन सामर्थ्यवान होऊ  लागले. आपण शारीरिकदृष्टया दुबळे असलो, तरी आपण समूह म्हणून राहिलो तर या गुणाच्या बळावर आपण आपल्या परिसरावर, सभोवतालच्या प्राण्यांवर, निसर्गावर नियंत्रण आणू शकतो याचा अनुभव त्याला येऊ लागला.

या अनुभवाचे दुसरे पाऊल कृषिसंस्कृतीच्या रूपाने पडले. आपल्याला आपले अन्न शोधण्यासाठी भटकत जाण्याची आवश्यकता नाही, तर आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण त्याची लागवड करू शकतो, या शोधाने त्याची भटकंती संपली  व गाव वसवण्याच्या विचाराला प्रारंभ झाला. आपण शेती वसविणारे एकत्र राहिलो, तर शेतीसाठी एकमेकांना मदत करता येईल, जंगली प्राण्यांपासून आपले व आपल्या शेतीचे रक्षणही करता येईल, शेतीला लागणाऱ्या परिश्रमांची श्रमविभागणीही करता येईल असे अनेक विचार अनुभवांच्या आधारे त्याने प्रत्यक्षात आणले. परंतु हा विकास होत असतानाच जीवनसंघर्षात टिकण्यासाठी ज्या मूलभूत प्रेरणा होत्या, त्याही जशा त्याच्या व्यक्तिगत जीवनात टिकून होत्या, तसेच त्यांचेही सामाजिकीकरण होत होते. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास हा त्याच्या मूलभूत प्रेरणा व त्याला आलेले 'जाणीवे'चे नवे भान अशा दोन रूळांवरून होणार होता. त्यातील प्राणिज प्रेरणा ही नैसर्गिक होती, तर निर्माण झालेली 'जाणीव' ही माणसाची स्वत:ची निर्मिती होती. त्यामुळे या दोन्ही रुळांवरून जाणाऱ्या प्रवासाचा विचार म्हणजे मानवी संस्कृतीचा विचार.

प्राणिज प्रेरणांपासून आजच्या सुसंस्कृत मानवी जीवनापर्यंतची जी स्थित्यंतरे झाली, तिची दिशा सर्वसाधारणपणे सारखी असली, तरी जगातील अनेक संस्कृतींनी आपला विकास वेगवेगळया सिध्दान्तांवर केला. यात प्रामुख्याने तीन तत्त्वांचा समावेश होता. प्राणिज भावनांचे सामाजिकीकरण, निसर्ग आणि मानव यांच्या संबंधांचा उलगडा आणि आपल्या अस्तित्वाच्या कारणांचा शोध. या तिन्हीच्या शोधातून अनेक तत्त्वज्ञाने तयार झाली. त्यांचा अत्यंत थोडक्यात आढावा घेऊ.

प्राणिज भावनांचे सामाजिकीकरण

आपले अस्तित्व चिरकाल टिकण्यासाठी आपल्या जातीचे जीवनसातत्य असले पाहिजे, ही जीवनसंघर्षातील प्राथमिक प्राणिज भावना आहे. यासाठीच उच्चतर जातींच्या प्राणी-पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या कामवासना निर्माण होते. नवी पिढी जन्मल्यानंतर ती स्वबळावर टिकून राहीपर्यंत तिचे संरक्षण करण्याकरिता विविध प्राण्यांनी विविध प्रकार विकसित केले आहेत. नुकत्याच जन्मलेल्या मुलाची नीट काळजी घेतली जावी, या दृष्टीने माणसाने कुटुंबव्यवस्था निर्माण केली. ती करीत असताना कुटुंबव्यवस्थेच्या अंतर्गत व बाहेर समाजात वावरताना माणसाला आपली कामप्रेरणा नियंत्रित करणे आवश्यक बनले. त्यातूनच मातृत्व, बंधु-भगिनी अशा संकल्पना निर्माण झाल्या. लग्नव्यवस्थेला नैतिक, धार्मिक व कायदेशीर दृष्टीने महत्त्व निर्माण करून देण्यात आले. लग्नबाह्य संबंध अनैतिक, अधार्मिक, बेकायदेशीर ठरविण्यात आले. प्रत्येक प्राण्याने जीवनसंघर्षात टिकण्यासाठी प्रतिकारक्षमतेची आपली साधने निर्माण केली. परंतु समाज निर्माण करताना मानवाने या प्रतिकारक्षमतेचेही सामाजिकीकरण केले. जर प्रत्येकाने आपल्यावरील आक्रमणाचा प्रतिकार करायला सुरुवात केली असती, तर त्यातून अराजक माजले असते. म्हणून एखाद्याला अपाय झाला, अन्याय झाला तर त्याचे निवारण करण्यासाठी कायदा, पोलीस, न्यायालये अशा यंत्रणा निर्माण झाल्या. इतरांवर वर्चस्व गाजविण्याकरिता हिंसात्मक भाव निसर्गाने निर्माण केला. परंतु सांस्कृतिक वाटचालीत प्रारंभीच्या काळात व्यक्तिगत हिंसेच्या प्रेरणेचे टोळयांच्या स्वरूपात सामाजिकीकरण केले व नंतर देशासाठी लष्कर निर्माण करून हिंसेच्या प्रेरणेचे उन्नयन व उदात्तीकरण केले. एखाद्या उदात्त तत्त्वासाठी, ध्येयासाठी संघर्ष करण्यात, बलिदान देण्यात गौरव आहे असा मूल्यभाव निर्माण केला. त्याचबरोबर आपल्या समाजात नेतृत्व करण्यासाठी शारिरिक क्षमता नव्हे तर भावनिक, बौध्दिक, नैतिक क्षमतांची आवश्यकता असण्याची गरज पडेल अशी सामाजिक संस्कृती विकसित केली. केवळ शारीरिक क्षमतेवर नेतृत्व देणाऱ्या समाजाच्या सांस्कृतिक पातळीचा दर्जा खालचा आहे, असे समजले जाऊ लागले. लोकशाही व्यवस्थेत तर लोकांची स्वीकारार्हता हा राजकीय नेतृत्वाचा एकमेव निकष बनला. या सर्व काळात व्यक्ती आणि समाज यांचे संबंध अधिकाधिक परस्परपूरक, परस्परावलंबी आणि जैविक बनत गेले. एखादी व्यक्ती कोणत्याही कारणामुळे आपला समाज सोडून विशिष्ट काळासाठी किंवा कायमची देश सोडून गेली, तरी ती आपल्या समाजाची मुळे विसरत नाही; कदाचित एका पिढीत ती विसरली गेली, तर ती पुढच्या पिढीत जागृत होतात असा अनुभव येतो. त्यामुळे व्यक्ती व समाज यांना बांधणारी संस्कृती ही नवी ओळख तयार झाली. जसजशी माणसामधील सामाजिक भावना अधिकाधिक प्रभावी होऊ लागली, तसतसा व्यक्तीच्या जीवनावरचा सांस्कृतिक प्रभाव वाढू लागला.

निसर्ग आणि मानव

प्रारंभीच्या काळात माणसाचे अस्तित्व पूर्णपणे निसर्गाच्या  लहरीवर अवलंबून होते. आपल्या अस्तित्वासाठी इतर प्राण्यांप्रमाणेच त्याला निसर्गावरच अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे निसर्गाबद्दलची भीती, निसर्गाला संतुष्ट करण्याची भावना, निसर्गातून मिळणारा आनंद, त्यातून मिळणारे आत्मसमाधान असे अनेक पदर माणूस आणि निसर्ग यांच्यामधील नात्यामध्ये निर्माण झाले. जसजसे हे बंध अधिकाधिक भावनिक होत गेले, तसतसे आपल्या अंतर्गत असलेली जीवशक्ती आणि निसर्ग यांच्यात कोणतेतरी नाते आहे, याची त्याला जाणीव झाली. ही जाणीव हा मानवी संस्कृतीच्या विकासातला दुसरा महत्त्वाचा पैलू बनला. आपणाला व आपल्या भोवतालच्या निसर्गाला निर्माण करणारी आणखी कोणतीतरी महाशक्ती आहे व निसर्गाची प्रार्थना करण्यापेक्षा जर त्या निर्मात्याचीच आपण प्रार्थना केली, तर आपल्या अडचणी दूर होतील अशी श्रध्दा निर्माण झाली व मानवी संस्कृतीतील धार्मिकतेचा पैलू विकसित होत गेला. ईश्वराने मानवासहित सर्व जगाची निर्मिती केली असल्याने मानवी सुख कशात आहे याची त्यालाच कल्पना आहे व त्यामुळे त्याच्या नियमानुसार चालणे हेच माणसाच्या दृष्टीने हितकर व नैतिक आहे, ईश्वराचे नियम फक्त त्याच्या दूतांनाच कळू शकतात, इतरांनी त्याचे फक्त पालन करायचे असते, असे नियम बनवले गेले. माणसाच्या सामाजिक भावनेला मिळालेले हे धार्मिक अधिष्ठान होते.

आत्मजाणीव

जैविक उत्क्रांतीत वेगवेगळया टप्प्यांतून एकपेशीय अमीबाचे रूपांतर अत्यंत गुंतागुंतीच्या अशा मानवी शरीरात झाले, त्याचप्रमाणे एखाद्या नायकाच्या ताब्यात असलेल्या साध्या टोळीचे रूपांतर आजच्या अत्यंत गुंतागुंतीच्या अशा समाजरचनेत झाले आहे. त्यामुळे समाजातील व्यक्तींचे परस्पर संबंधही गुंतागुंतीचे बनले आहेत. त्यामुळे समाज विविध स्तरांवरील अनेक गटांत व स्तरांत विभागला गेला आहे. व्यक्ती आणि समाजावर अनेक प्रेरणा एकाच वेळी काम करीत आहेत. त्याच्या प्राणिज अंत:प्रेरणा अजूनही शिल्लक आहेत. त्यातील सर्वात प्रबळ भावना ही जीवनसातत्याची आहे. आपल्या मृत्यूनंतरही आपले अस्तित्व असले पाहिजे, ही प्रबळ जाणीव जशी जैविक पुनरुत्पादनासाठी कार्यरत असते, तसे समाजात मृत्यूनंतरचा स्वर्ग या स्वरूपात अस्तित्वात राहते. संस्कृती हीसुध्दा व्यक्तीच्या जैविक अस्तित्वाचाच भाग बनल्याने आपले अस्तित्व संस्कृतिरूपाने जपणे हाही त्याच्या जीवनसातत्याचाच एक भाग बनला. माणूस आपली संस्कृती टिकविण्यासाठी प्रसंगी जिवाच्या आकांताने का लढतो, याचे उत्तर त्यात आहे.

औद्योगिक क्रांती व नवी व्यवस्था

कृषी अर्थव्यवस्थेनंतर वैज्ञानिक क्रांतीनंतर जशी औद्योगिक क्रांती आली, तशी व्यक्तीची विचारपध्दती व मूल्यव्यवस्थाही बदलली. मनाच्या जागी बुध्दीला, भावनेच्या जागी तर्काला, संस्कारांऐवजी व्यावहारिक यशाला, श्रध्देऐवजी बुध्दिप्रामाण्यवादाला, संवेदनांच्या जागी उपयुक्ततेला, सहकार्याच्या जागी स्पर्धेला, प्रत्यक्षापेक्षा प्रतिमेला, समूहवादाच्या जागी व्यक्तिवादाला, अंत:प्रेरणेच्या जागी अनुभवनिष्ठतेला महत्त्व मिळायला सुरुवात झाली. जशी व्यक्तीची मानसिकता बदलली, तशीच सामाजिक मूल्यभावनाही बदलली. परस्परांतील व्यवहार भावनेपेक्षा व्यावहारिक लाभावर ठरू लागले, व्यक्तिवादाच्या प्रभावामुळे कुटुंबसंस्थांसह सर्व व्यवस्था हादरू लागल्या, धर्मसत्तेपेक्षा राजसत्ता आणि परंपरेपेक्षा कायदा, पारलौकिक जगापेक्षा ऐहिक जगाचा विचार अधिक प्रभावी बनला. विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी विकासाची दिशा ठरवू लागले.

संप्रदायप्रधान व कृषिप्रधान मध्ययुगीन मूल्यव्यवस्था ही सरंजामशाही, पारलौकिक जीवनाच्या विचारांच्या आधारावर उभी असलेली विषमतापूर्ण समाजरचना होती. औद्योगिक क्रांतीनंतर ज्या विचारधारा विकसित झाल्या, त्यात व्यक्तिस्वातंत्र्य, समानता, बुध्दिवादी इहवादी दृष्टीकोन, मानवीय मूल्ये, सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रक्रियेत सहभागित्वाची भावना अशी नव्या मूल्यांची चौकट निर्माण झाली. त्या आधारावर राजकीय संस्था, न्यायालये, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था आदी नवे संस्थाजीवन तयार झाले. यातून विचारांचे जे विविध आविष्कार तयार झाले, ते विचारसरणींच्या स्वरूपात प्रकट झाले.

मानवी संस्कृतीच्या विकासातील हा अटळ आणि अपरिवर्तनीय टप्पा आहे. जगातील कोणत्याही गोष्टीची शक्यता ईश्वरी इच्छेवर न सोडता, आपल्या बुध्दीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न अव्याहतपणे चालू आहे. जे विश्व अजूनही आपल्या अनुभवाच्या किंवा बुध्दीच्या कक्षेत आले नाही तो भाग ईश्वरी आहे आणि म्हणून आपल्या आकलनकक्षेच्या बाहेर आहे असे म्हणून माणूस आपले प्रयत्न सोडून देणार नाही. जिथे त्याला आपल्या बुध्दीच्या मर्यादा जाणवतात त्या तशा उद्या राहणार नाहीत, याची त्याला आजवरच्या अनुभवावरून खात्री पटली आहे. यातून जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते ईश्वरी कृपेतून सुटणार नसून अधिकाधिक प्रयोगशीलतेतूनच त्यांची उत्तरं मिळणार आहेत, याची त्याला खात्री आहे. त्यामुळे कितीही संकटे आली, प्रश्न निर्माण झाले, अडचणी आल्या तरी मध्ययुगीन ईश्वरी श्रध्देला पुन:प्रतिष्ठा मिळणार नाही, हे निश्चित.

परंतु केवळ व्यवस्था बदलल्याने माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती बदलत नाहीत. फक्त त्या वेगळया स्वरूपात प्रकट होतात. त्यामुळे औद्योगिक संस्कृतीत जुने प्रश्न कमी होत असताना त्यातून नवे प्रश्न तयार झाले. मन आणि भावना यांच्यापेक्षा बुध्दी आणि तर्क यांना प्राधान्य आल्यामुळे परस्पर संबंधातील ओलावा नष्ट झाला आहे. त्यामुळे आलेल्या भावनिक कोरडेपणाने जीवनातील मानसिक एकटेपणा वाढला आहे. संस्कारांचे महत्त्व कमी होऊन व्यावहारिक यशाला महत्त्व आल्याने नीती आणि अनीती यातील सीमारेषा अस्पष्ट होत चालल्या आहेत. सहकार्याच्या जागी जीवनाच्या केंद्रस्थानी स्पर्धा आल्याने परस्पर अविश्वासाची भावना वाढली आहे. त्यामुळे असुरक्षितेची भावना वाढली व त्यामुळे मनावरील तणाव वाढला, प्रत्यक्षापेक्षा प्रतिमेला अधिक महत्त्व आल्याने प्रत्यक्षाकडे दुर्लक्ष करून प्रतिमांची लढाई सुरू आहे. त्याचा परिणाम एकाच शरीरात एकाच व्यक्तीची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे तयार होण्यात झाला आहे. 'जग हे केवळ माझ्यासाठी आहे' या आत्मकेंद्रित विचारांमुळे उपभोगवादी विचारांना वैचारिक प्रतिष्ठा मिळाली आहे, व त्याचा परिणाम सामाजिक व पर्यावरणीय ऱ्हासात झाला आहे. सेक्युलॅरिझमच्या संकल्पनेत धार्मिक संघर्षाला स्थान नसले, तरी विचारसरणींचे संघर्ष तेवढयाच कडवटपणे, हिंसात्मक अभिनिवेशाने लढले जात आहेत. तोंडी समानतेचे किंवा मानवतेचे मूल्य असले, तरी शोषणाच्या वेगवेगळया व्यवस्था उभ्या रहात आहेत. ऐहिक यश हेच एकमेव जीवनमूल्य बनल्याने आपली सर्जनशीलता, नीतिमूल्ये, विवेकबुध्दी यांचा बळी देऊन, भावनिक व नैतिकदृष्टया भग्न झालेल्या व्यक्ती यशस्वितेच्या तथाकथित शिखरावर उभ्या आहेत. त्यामुळे आजची समाजव्यवस्था ही चैतन्यहीन बनली असून ती केवळ क्षणोक्षणी कोसळून पडणाऱ्या कायद्याच्या चौकटीवर उभी आहे.

नवा विचार

या समाजव्यवस्थेचे भवितव्य काय? या प्रश्नाने वैचारिक विश्वाला ग्रासलेले आहे. याची उत्तरे देणाऱ्यांची तीन गटात विभागणी करता येईल. पहिल्या गटाला असे वाटते की या संस्कृतीपेक्षा जुनी संस्कृतीच चांगली होती व त्या संस्कृतीकडे परत गेले पाहिजे. त्यामुळे वर्तमानातील प्रश्न भूतकाळातील उदाहरणे देऊन सोडविण्याचा प्रयत्न करतात. हे करीत असताना ते एक महत्त्वाची गोष्ट विसरतात की काळाच्या मागे जाऊन भविष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधता येत नाहीत. कृषिसंस्कृतीतून औद्योगिक संस्कृतीत झालेले स्थित्यंतर हे मानवी संस्कृतीने गाठलेला विकासाचा एक टप्पा आहे. सांस्कृतिक संघर्षात औद्योगिक क्रांतीच्या सामर्थ्यापुढे कृषिसंस्कृतीचा निभाव लागला नाही. त्याची कारणमीमांसा करण्यासाठी वेगळया विवेचनाची गरज आहे. औद्योगिक क्रांतीच्या आधी जागतिक बाजारपेठेवर चीन आणि भारत यांचे वर्चस्व होते. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर आधी युरोपीय देश व नंतर अमेरिका यांचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील महत्त्व वाढले. आपण जागतिक व्यापारात मागे पडत आहोत हे लक्षात आल्यानंतर चीनने औद्योगिक संस्थांचा विचार केला, पण त्यातील सांस्कृतिक मूल्ये स्वीकारली नाहीत. त्यामुळे चीनचा आर्थिक विकासही संकटात आला आहे. औद्योगिक प्रगती हे केवळ नवे तंत्रज्ञान नाही, तर त्यासोबत येणारी विचारपध्दती, मूल्यव्यवस्था व त्यातून निर्माण होणारी औद्योगिक संस्कृती हे तिचे अपरिहार्य घटक आहेत. त्यामुळे यावर उत्तरे शोधणारा दुसरा गट म्हणतो की औद्योगिक क्रांतीने प्रस्थापित केलेली मूल्यव्यवस्थाच बरोबर आहे. सर्व जण त्या मूल्यव्यवस्थेनुसार वागत नाहीत, हाच खरा प्रश्न आहे. परंतु आज अनुभवावरून असे सांगता येते की औद्योगिक संस्कृतीने निर्माण केलेली मूल्यविषयक चौकटच अशी आहे की या चौकटीतून हे प्रश्न सोडवू शकणाऱ्या कुवतीचे नेतृत्व निर्माण होणे अवघड आहे. एकवेळ असे नेतृत्व निर्माण झाले, तरी इतरांच्या नेतृत्वाला बाधा येत असल्याने ते टिकणे अवघड आहे.

विज्ञाननिष्ठेच्या मर्यादा

औद्योगिक संस्कृतीत विसंवाद होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या संस्कृतीने 'मानवी जीवनातील आत्मा' या घटकाकडे केलेले दुर्लक्ष. औद्योगिक संस्कृतीत मूलभूत वैचारिक घटक म्हणजे विज्ञाननिष्ठा. विज्ञाननिष्ठा तीन घटकांनी मिळून बनलेली असते. त्यातील पहिला घटक म्हणजे विचारांची पध्दत. प्रत्येक गोष्ट सिध्द होईपर्यंत तिच्याकडे संशयाने पाहा असे हा घटक सांगतो. परमेश्वरावर, धार्मिक निष्ठांवर, धर्मग्रंथांवर श्रध्दा व विश्वास ठेवू नका असे सांगणारी व त्यावर आधारित मूल्यनिष्ठेला विरोध करणारी ही विचारपध्दती आहे. याचा दुसरा भाग असा की, विज्ञाननिष्ठा केवळ प्रयोगशाळेत अनुभवसिध्द झालेल्या गोष्टींवर विश्वास ठेवते. ज्या घटकांचे मोजमाप करून मूल्यमापन करता येत नाही, त्यावर ती विश्वास ठेवत नाही. आणि विज्ञाननिष्ठेचा तिसरा भाग असे सांगतो की, ज्या विशिष्ट पध्दतींनी एखादी घटना घडते किंवा वस्तू निर्माण करता येते, ती विशिष्ट पध्दत वापरल्यानंतर ती कोणत्याही व्यक्तीला आणि कुठेही करता आली पाहिजे. या विचाराचा चौथा घटक म्हणजे प्रत्येक घडणाऱ्या घटनेला कारण असते आणि त्यातून परिणाम घडत असतो. कारण आणि परिणाम यांचे तार्किक संबंध स्पष्ट करणारी साखळी म्हणजे विज्ञान. कोणताही विचार या चार वैज्ञानिक कसोटया पूर्ण करीत नसेल, तर त्या विचाराला विज्ञान विचारांत स्थान नाही आणि म्हणून औद्योगिक संस्कृती त्याकडे अंधश्रध्दा म्हणून पाहते. जीवाचे स्वरूप अजून प्रयोगशाळेत सिध्द करता आलेले नाही. त्यामुळे ज्याला जीव किंवा आत्मा म्हणतात, त्यावर आधारित सर्व विचार या वैज्ञानिक दृष्टीने बाद ठरतात. त्यामुळे होमिओपथी किंवा साक्षात्कार, अनुभूती आदी विषय विज्ञान विचाराच्या कक्षेत येत नाहीत. परंतु माणसाला व्यवहारात या सर्व गोष्टींचा अनुभव येत असतो. हा प्रत्यक्ष येणारा अनुभव आणि विज्ञान विचार यांची संगती कशी लावायची? यापलीकडेही अनेक विषय आहेत की ज्यांची संगती लावण्यात अजून तरी विज्ञान विचाराला यश आलेले नाही. एखादी व्यक्ती एका विशिष्ट सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्तर असलेल्या कुटुंबातच का जन्मते?, सर्व घटक समान असतानासुध्दा एखादे वेळेस एखादे काम होते आणि एखादे होत नाही, यातील नशीब नावाचा घटक काम करत असतो ज्याचे स्वरूप अजून तरी विज्ञानाला अज्ञात आहे. त्यामुळे विज्ञान विचाराला सर्व मानवी अनुभवांना कवेत घेण्याची शक्ती अजून प्राप्त झालेली नाही, असा निष्कर्ष काढावा लागतो. या सर्व अनुभवांची संगती कशी लावायची? मानवी वागणुकीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? यावर नियंत्रण कसे प्राप्त करायचे? अशा अनेक दिशांनी आज विचारमंथन चालू आहे. आपण येथे त्यातील काही भागांचा थोडा विचार करू.


मानवी जाणीव ही एकात्म नसते. तर औद्योगिक संस्कृतीने ती द्विभागलेली असते असा निष्कर्ष काही मानसशास्त्रज्ञांनी काढला आहे. माणसाच्या अंतःप्रेरणा, प्राणिज प्रेरणा आणि ज्या कौटुंबिक व सांस्कृतिक पर्यावरणातून त्याची जडणघडण झालेली असते आणि ज्या व्यवस्थात्मक मर्यादित वातावरणामध्ये त्याला वागावे लागते, यातून माणसाच्या मनावर ताण निर्माण होत असतो. जे असा ताण सहन करू शकतात, ते अंतर्यामी दुःखी असूनही त्या ताणाखाली जीवन व्यतीत करू शकतात. परंतु ज्यांना हा ताण सहन करणे अशक्य बनते, ते एक तर आत्महत्या करतात किंवा हिंसक बनतात आणि ही भावना जेव्हा सामूहिक स्वरूपाची बनते, तेव्हा तो समूह आत्महत्या किंवा हिंसात्मकता यांपैकी कोणतातरी एक पर्याय निवडतो. जिहादची प्रेरणा हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांना मध्ययुगीन शरीयतकालीन समाजरचना आणायची आहे. ती रूढ मार्गाने आणणे शक्य नसल्यामुळे जर ती आणता येत नसेल तर जगाचा विध्वंस केला पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. हे करण्यात आपल्याला अपयश आले आणि मृत्यू झाला, तर स्वर्गाचे दार आपल्याला उघडलेले आहे अशी त्यामागची प्रेरणा आहे. अशा अनेक छोटयामोठया प्रेरणा जगभरात अनेक समूहमनात अस्तित्वात आहेत. केवळ विज्ञानवादी विचार त्या नष्ट करू शकत नाही, याचे कारण मानवी जीवनाचा बहुतांश भाग अजूनही विज्ञान विचारांच्या कक्षेच्या बाहेर आहे.

या पार्श्वभूमीवर विज्ञान विचारांच्याही पलीकडे असलेली एखादी अनुभवाची कक्षा आहे का? याचा शोध घेतला जाऊ लागला आहे आणि यातून अध्यात्माच्या नव्या वाटा खुल्या होत आहे. या आध्यात्मिक वाटा कर्मकांडातून नाहीत किंवा काही श्रध्दांमधून निर्माण झालेल्या नाहीत, तर निखळ बौध्दिक जिज्ञासेतून निर्माण झालेल्या आहेत. या जिज्ञासेला भारतीय परंपरेतील ध्यान, योग आणि विपश्यना आदी संप्रदायरहित विशुध्द अध्यात्माचा विचार करणाऱ्या संकल्पनांनी आकर्षित केले आहे. विविध आध्यात्मिक साधनांत शरीर, मन आणि बुध्दीवर जे जैवरासायनिक परिणाम होतात, त्याचे मापन करणेही आता शक्य होत आहे. आपल्या श्वासाला नियंत्रित करून त्या आधारे प्राणतत्त्वाचा उपयोग करीत आपल्या शारीरिक, मानसिक आणि बौध्दिक प्रक्रियांवर नियंत्रण साधणे शक्य आहे. या अनुभवाचे मापन सर्व पातळयांवर करण्याची प्रयोगसिध्द प्रक्रिया विकसित होत आहे. याच प्रक्रियांना आपल्याला 'नास्तिकांचे अध्यात्म' असे म्हणता येईल.

आपल्या उत्क्रांतीच्या काळात व्यक्ती ही संस्कृतीच्या रूपाने समाजमनाशी एवढी निगडित झाली आहे, की तिला आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवणे अशक्यप्राय बनले आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी एखादी व्यक्ती आपल्या व्यक्तिगत साधनेच्या जोरावर मोक्ष मिळवूही शकत असे. परंतु आता समूहमनाचा प्रभाव एवढा मोठा आहे की जोपर्यंत अशी आध्यात्मिक जाणीव समूहमनाच्या रूपाने प्रकट होणार नाही, तोपर्यंत नवी मानवी संस्कृती उदयालाही येणार नाही. गेल्या दीड शतकात भारतात यासाठी अनेक प्रयत्न झाले. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन स्थापन केले, योगी अरविंदांनी पाँडिचेरीला आश्रम स्थापन केला त्यामागेही हीच कल्पना होती. जे. कृष्णमूर्तींचा प्रयोगही अशाच स्वरूपाचा होता. त्यांना काही प्रमाणात व्यावहारिक यशही मिळाले. परंतु त्यातून सर्व समाजाला व्यापून टाकणारे सांस्कृतिक तत्त्व निर्माण होऊ शकले नाही. त्यासाठी विज्ञानाधिष्ठित प्रयोगशील अध्यात्माचे नवे दार उघडण्याची आवश्यकता आहे. त्याकडे लक्ष ठेवून अनेक लोक आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यातून अजूनही सुसंगत आणि एकात्म अशा स्वरूपाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. परंतु मार्ग सापडेल तर तो याच प्रयत्नांतून सापडेल एवढा विश्वास वाटण्याइतपत या मार्गावरची पायवाट दिसू लागली आहे, एवढे मात्र निश्चित म्हणता येते.

अध्यात्माचे शास्त्रीय स्पष्टीकरण!

प्रयोगशाळेचा मार्ग अध्यात्माचे शास्त्रीय स्पष्टीकरण देईल व जसजसे जनुकीय विज्ञान आणि जैवरसायनिक विज्ञान यांची प्रगती होत जाईल, आध्यात्मिक प्रगती व त्याचा माणसावर होणारा परिणाम यांचे आकलन वाढत जाईल व त्यातून काही निष्कर्ष निघाले तर कदाचित त्याचे उलटे applicationही शक्य होईल. उदाहरणार्थ, स्थितप्रज्ञ माणसाच्या शरीरातील जैवरासायनिक क्रियांचा अभ्यास केल्यानंतर तपस्या न करताही माणसाच्या शरीरात तशा कृत्रिमरित्या जैवरासायनिक क्रिया घडविता येतील व स्थितप्रज्ञ माणसे बनवून देणाऱ्या प्रयोगशाळा निघतील. आता क्लोनच्या तंत्रज्ञानाने प्राण्यांच्या नवनिर्मितीचे तंत्रज्ञान मानवी बुध्दीच्या कक्षेत आले आहे. त्यामुळे वरील प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता नाकारण्यासारखी नाही. अर्थात हा या लेखाच्या चर्चेचा विषय नसून सामाजिक परिवर्तनात नास्तिकांच्या अध्यात्माची भूमिका कोणती असेल, याचा विचार केला पाहिजे.

ऐहिक ज्ञानाची आस, निष्काम कर्मयोग, समाजहिताबद्दल श्रध्दायुक्त भक्ती व मनाच्या स्थिरतेसाठी आवश्यक तेवढी ध्यानसाधना ही नास्तिकांच्या अध्यात्माची चतु:सूत्री आहे. आपल्या संस्कृतीत ज्ञान हा शब्द 'आत्मज्ञान' या अर्थाने वापरला जातो. आत्मज्ञान हेच खरे व बाकी ज्ञान हे खरे ज्ञान नव्हेच, ती माया आहे, ही आपली पारंपरिक शिकवण आहे. याचा परिणाम आपण ऐहिक ज्ञानाकडे तुच्छतेने पाहतो. याउलट वैज्ञानिक विचार फक्त ऐहिक ज्ञानालाच मानतो. त्यामुळे अध्यात्मवादी समाज विरुध्द विज्ञानवादी समाज असे द्वंद्व तयार झाले आहे. त्याचेच रूपांतर पाश्चात्त्य संस्कृती विरुध्द पौर्वात्य संस्कृती यांच्या कथित संघर्षात झाले आहे. वास्तविक हे दोन्ही प्रवाह एकाच मानवी जाणिवेचे विभिन्न दिशांनी झालेले विकसन आहे. त्या अलग जाणिवा नाहीत. त्यापैकी एका जाणिवेचा अधिक विकास पौर्वात्य देशात झाला व दुसऱ्या जाणिवेचा विकास पाश्चिमात्य देशात झाला, असे फार तर म्हणता येईल. पण त्यातही फारसे तथ्य नाही. त्यामुळे तिथल्या कल्पना इथे लागू पडत नाहीत असे म्हणणे ही स्वत:ची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. एका माणसाबाबतच्या बाबी दुसऱ्याला तंतोतंत लागू पडत नाहीत हे खरे असले, तरी माणसांच्या वागण्यावरून काही समान नियम बनविता येतातच. तसे बनविता आले असते, तर समाजाचे नियम तयार करताच आले नसते. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक प्रवाहात सुप्त राहिलेल्या ऐहिक जाणिवांना पाश्यात्त्य संस्कृतीने क्रियान्वित केले आहे. या जाणिवा आपण नाइलाज म्हणून स्वीकारल्या आहेत. त्याचा जोवर सकारात्मक स्वीकार आपण करीत नाही, तोवर आपण परिपूर्णतेचा विचार करू शकणार नाही.

जर आपण केवळ ऐहिक ज्ञानाची उपासना केली व त्याचा समतोल सांभाळला गेला नाही, तर आपल्या समाजाचे पाश्चात्त्यीकरण होईल अशी भीती व्यक्त केली जाते. आज औद्योगिक संस्कृतीतील दोषांनी आपला समाज ग्रस्त झालेला असल्याने ही भीती खरी आहे असेही वाटू शकते. परंतु पाश्चात्त्य संस्कृती टाळणे हा त्यावर उपाय नसून आत्मिक आणि ऐहिक जाणिवांमधील परस्परपूरक घटकांशी समरस होऊन जीवन जगणे हा त्यावर उपाय आहे.

आत्मिक आणि ऐहिक जाणिवांमधील परस्परपूरकता शोधायची असेल, तर त्या दोन्ही प्रवाहांकडे व त्यांच्या परिणामांकडे तटस्थतेने पाहणे भाग आहे. तसे पाहायचे असेल, तर जीवनापासून अलग होऊन त्याचा विचार करता येणार नाही. त्यासाठी निष्काम कर्मयोगाचा मार्ग उपयोगी पडतो. जो माणूस आत्मकेंद्रित आहे, तो कोणतीच गोष्ट तटस्थपणे पाहू शकत नाही. त्यामुळे निष्काम कर्मयोगाची पहिली पायरी म्हणजे आपल्या हितापेक्षा अधिक उच्चतर ध्येय डोळयासमोर ठेवून जीवन जगणे. ज्याप्रमाणे एका देवाच्या मूर्तिपूजेपासून सुरू झालेल्या भक्तीचा प्रवाह विश्वात्मक देवाच्या भक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असते, तसेच आपण आपल्या हितापेक्षा अधिक उच्चतर ध्येयाच्या दिशेने सुरू केलेल्या जाणिवांच्या विकासाचा प्रवास अखिल मानवीय व वैश्विक मूल्यांच्या जाणिवांपर्यंत विकसित झाला पाहिजे.

तसा तो विकसित व्हायचा असेल, तर आपल्या मनाच्या गाभ्यामध्ये मानवी हिताबद्दलची प्रगाढ श्रध्दायुक्त भक्ती असली पाहिजे. अशी भक्तीच आपल्या आंतरदृष्टीला सुयोग्य मार्गदर्शन करू शकते. ही भक्तीच संसार प्रवाहातील आपल्या प्रवासाची दिशा हरवू नये म्हणून सुकाणूचे काम करते. आणि हे सर्व करीत असताना संकटे असोत की यशाचे प्रसंग असोत, आपल्याला तणाव जाणवू नये, आपले भान हरवू नये म्हणून ध्यानधारणेची उपयुक्तता असते. एकदा हा मार्ग स्वीकारला की त्यातून जी अनुभूती येते, तिलाही 'नास्तिकाचे अध्यात्म' असे म्हणता येईल.

विकासातील अटळ टप्पा

इतर प्राण्यांसोबतच्या जीवनसंघर्षात जेव्हा माणसाला आपल्या 'जाणिवेचा' शोध लागला, तेथून त्याचे जीवन बदलून गेले. आपल्या अस्तित्वरक्षणासाठी व समाजनिर्मितीसाठी त्याने 'ईश्वर' या संकल्पनेचा आधार घेतला. तो आधार प्रस्थापित करण्याकरिता स्वर्ग, नरक, ईश्वरी कृपा आणि कोप या संकल्पना तयार केल्या. परंतु जसजसा त्याच्या जाणिवांचा विकास होऊ लागला, विज्ञानाची प्रगती सुरू झाली, कार्यकारणसंबंधांचे नियम उलगडू लागले, तसतसे ईश्वरी सत्तेचे क्षेत्र कमी होऊ लागले. आता रोगाची साथ आली, तर लोक देवाला बळी न देता डॉक्टरांकडे जातात. माणसाचे बौध्दिक क्षेत्रजसे वाढू लागले, तशी त्याला आपल्या दैनंदिन जीवनात परमेश्वराची मदत कमी लागू लागली. या प्रक्रियेकडे आपण कसे पाहतो, हे महत्त्वाचे आहे. आईचा हात सोडून जेव्हा लहान मूल स्वबळावर चालू लागते, त्या वेळी त्याला होणारा आनंद अवर्णनीय असतो व तो त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. अशा प्रकारे आईवरचे अबलंबित्व कमी होणे हा जशी व्यक्तीच्या विकासातला अटळ टप्पा आहे, तसाच ईश्वराचा संदर्भ सोडून आपल्या अस्तित्वाचा विचार करणे हाही सामाजिक संस्कृतीच्या प्रगतीतला अटळ टप्पा आहे. ज्याप्रमाणे आईच्या हाताचा आधार सोडल्याने आई मुलाच्या जीवनातून रिटायर होत नाही, तसेच हे नवे भान आल्याने आजवरच्या सांस्कृतिक वाटचालीत ईश्वर या संकल्पनेने केलेले योगदान व त्याचे माणसाच्या मनावर झालेले परिणाम रिटायर होऊ शकत नाहीत. त्या संकल्पनेच्या कक्षा बदलतात. नेमके हे आज समजून घेण्याची गरज आहे.

आजची संस्कृती एका आवर्तात सापडली आहे. मनुष्य एक समाज म्हणून अत्यंत बलशाली झाला आहे. आजवर कल्पनाही केले नसेल असे तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसाच्या हाती आले आहे. असे असूनही व्यक्तिगत स्तरावर प्रचंड हतबलता, निरर्थकपणा, पोकळपणा माणसाला जाणवू लागला आहे. त्यातून पुन्हा एकदा ईश्वराची भक्ती, कर्मकांडे यांचे सर्वत्र पेव फुटले आहे. पण त्यातही श्रध्देपेक्षा दिखाऊपणाच अधिक आहे. भूतकाळात जाऊन भविष्यातील उत्तरे मिळत नसतात. त्यासाठी वर्तमान पचवून भविष्याकडे जाण्याची ताकद कमवावी लागते.

kdilip54@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0