ज्या काळात शालेय शिक्षण पूर्ण करून मुली वैद्यकीय शिक्षण घेऊ लागल्या होत्या; पण अभियांत्रिकीमधील पुरुषी मक्तेदारी अजून कुणी मोडली नव्हती. अभियांत्रिकी शाखेत शिकणारी ती एकमेव विद्यार्थिनी होती. भारतातील पहिली महिला अभियंता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या ललिताचा हा प्रवास अत्यंत खडतर असूनही या सर्वांवर तिने मात केली हे विशेष.
महिला अभियंता सोसायटीच्या ‘सोसायटी ऑफ वुमन इंजिनीयर्स’च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना ललिता यांनी म्हटले होते, “150 वर्षांपूर्वी माझ्यावर वैधव्य आले असते, तर मला अंत्यसंस्कारात सती जावे लागले असते; पण 1937 साल इतके वाईट नव्हते. मी माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकले आणि मुलीसाठी जगण्याचा निर्धारही प्रकट करू शकले.”
विसाव्या शतकाचं दुसरं दशक होतंच तसं पुढारलेलं. याच दशकात जन्मलेल्या इंदिरा गांधी भविष्यात भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या. याच दशकात जन्मलेल्या होमाई व्यारावाला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे, तर पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकून कर्तृत्व गाजवणार्या भारताच्या पहिल्या महिला छायाचित्रकार बनून कारकीर्द गाजवू शकल्या. याच दशकात जन्मलेल्या सरला ठुकराल विमान उडवणार्या भारतातील पहिल्या महिला वैमानिक बनू शकल्या आणि याच दशकात चेन्नईमध्ये जन्मलेली ए. ललिता घरच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर भारताची पहिली महिला विद्युत अभियंता बनू शकली.
आज जगातील महिला अभियंत्यांच्या संख्येतील 40 टक्के महिला या भारतीय आहेत; परंतु दुर्दैवाने त्यातील नोकरी-व्यवसायात असणार्या अभियंता स्त्रियांचे प्रमाण अवघे 14 टक्के आहे, अशी उपलब्ध आकडेवारी सांगते. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथेमॅटिक्स या चार शाखांत शिकलेल्या महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे; परंतु त्यांचाही उद्योग-व्यवसायाला हवा तितका हातभार लागताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिल्या महिला अभियंत्याने विपरीत परिस्थितीशी टक्कर घेत मिळवलेल्या यशाची कहाणी थक्क करणारी आहे.
चेन्नईमध्ये एका तेलुगू कुटुंबात पप्पू सुब्बा राव यांच्या पोटी जन्मलेली ए. ललिता जन्मतःच शिक्षणाचा वारसा घेऊन आली असावी, कारण तिचे वडील पप्पू सुब्बा राव हे स्वतःच कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, गिंडीमध्ये विद्युत अभियांत्रिकी शाखेत प्राध्यापक होते. चार मोठ्या भावंडांच्या पाठीवर जन्माला आलेली असूनही आणि दोन लहान भावंडे असतानाही पप्पू सुब्बा रावांनी तिला शिक्षणासाठी उत्तेजन दिलं. तत्कालीन प्रथेनुसार वयाच्या पंधराव्या वर्षी तिचं लग्नही लावून दिलं; पण तेही एका अशा घरात जिथे लग्नानंतरही तिच्या शिक्षणाला परवानगी मिळेल. शालेय शिक्षण यथावकाश संपलं, ललिताला मुलगी झाली आणि चौथ्या महिन्यातच, तिच्या स्वतःच्या अठराव्या वर्षी तिच्या पतीचं निधन झालं.
पुढे काय हा प्रश्न होताच. तो काळ असा नव्हता, की स्त्रीला वैधव्य आल्यानंतर सती जावं लागावं. त्यामुळे पप्पू सुब्बा रावांनी सासरच्या मंडळींशी बोलून तिचं पुढचं शिक्षण सुरू ठेवलं. क्वीन्स मेरी कॉलेजमधून ललितानं इंटरमीजिएट शिक्षण प्रथम वर्गात उत्तीर्ण केलं आणि पप्पूंनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य चाको यांच्याशी बोलून ललिताला विद्युत अभियांत्रिकीला प्रवेश मिळवून दिला. त्या काळात शालेय शिक्षण पूर्ण करून मुली वैद्यकीय शिक्षण घेऊ लागल्या होत्या; पण अभियांत्रिकीमधील पुरुषी मक्तेदारी अजून कुणी मोडली नव्हती. अभियांत्रिकी शाखेत शिकणारी ती एकमेव विद्यार्थिनी होती. त्याचबरोबर तिच्या पदरी एक चार महिन्यांची मुलगी होती. तिची जबाबदारी तिच्यावरच होती. तिला दुसरीकडे ठेवून शिकायला दहा-दहा, बारा-बारा तास बाहेर घालवणं तिला पसंत नव्हतं. त्यामुळेच वडील आणि भावाच्या पावलावर पाऊल ठेवून तिनं अभियांत्रिकी शिक्षण घेणं स्वीकारलं.
ललिताबरोबरच आणखी दोघींनी अभियांत्रिकी शाखा पत्करली आणि कॉलेजमध्ये पुरुषी वातावरणात एक मंदशी झुळूक अनुभवायला येऊ लागली. चौघी जणी 1943 साली पदवीधर व्हायच्या होत्या. ललिता त्यातील एक होती. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील ऑनर्स डिग्री तिनं पटकावली. जमालपूर रेल्वे वर्कशॉपमध्ये तिचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालं. पदवी हातात येताच ललितानं शिमल्यात सेन्ट्रल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनमध्ये इंजिनीअरिंग असिस्टंट म्हणून नोकरी पत्करली; सहा वर्षांची मुलगी वहिनीजवळ राहू शकेल आणि आपल्याला नोकरी करता येईल, या एका उद्देशाने. डिसेंबर 1946 पर्यंत तिनं ही नोकरी केली आणि मग लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सची ग्रॅज्युएटशिपची परीक्षा दिली. तिच्या वडिलांचं संशोधन क्षेत्रात नाव होतं, काम होतं, बरीच पेटंट्स त्यांच्या नावावर होती.
माझ्याबरोबर संशोधन क्षेत्रात काम कर, असं वडिलांनी सुचवलं; पण ललिताला नोकरी आवश्यक वाटत होती. तिनं कोलकात्यातील असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीजमध्ये नोकरी स्वीकारली, कारण तिचा आणखी एक भाऊ तिथे राहत होता. तिनं डिझाईन इंजिनीअर क्षेत्रात अनुभव घेतला. भाक्रा नांगल धरणाच्या प्रकल्पावर इलेक्ट्रिकल जनरेटर्सवर काम करण्याची संधी तिला मिळाली. मग तिने ट्रान्समिशन लाइन्स डिझाईन करणे, सबस्टेशन लेआऊट करणे आणि कराराची अंमलबजावणी करणे सुरू केले. भाक्रा नांगल धरणाच्या इलेक्ट्रिकल जनरेटरच्या कामाशीही ती जोडली गेली. ती ज्या कंपनीत काम करत होती, ती कंपनी पुढे जनरल इलेक्ट्रिक कंपनीनं ताब्यात घेतली आणि निवृत्त होईपर्यंतची सारी वर्षं त्याच कंपनीत नोकरी केली. लंडनच्या ‘कौन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स’नं तिला 1953 मध्ये असोसिएट सदस्यत्व आणि 1966 मध्ये पूर्ण सदस्यत्व देऊ केलं.
ललिताच्या कारकीर्दीचा कळसाध्याय म्हणजे 1964 साली न्यूयॉर्कमध्ये भरलेल्या ‘सोसायटी ऑफ वूमन इंजिनीअर्स’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी तिला आलेलं आमंत्रण. या परिषदेत 35 देशांतील 500 इंजिनीअर्स सहभागी झाल्या होत्या. ललिता यांच्या या दौर्याला भारतीय वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिद्धी दिली. 1966 मध्ये पूर्ण सदस्यत्व मिळाल्यानंतर 1967 मध्ये लंडनमध्ये भरलेल्या परिषदेतही त्या सहभागी झाल्या. ललिता तब्बल 35 हून अधिक वर्षे कोलकात्यात राहिल्या. श्यामला हे त्यांच्या कन्येचं नाव. ती म्हणते, “माझी आई माझ्यासाठी पहाड बनून उभी राहिली, त्यामुळे मला वडिलांची उणीव कधी भासलीच नाही.”
1977 साली, वयाच्या 58 व्या वर्षी ती औपचारिक नियमांनुसार निवृत्त झाली. दोन वर्षं ती मुलीबरोबर देशभर फिरली. 1979 साली वयाच्या साठाव्या वर्षी मेंदूच्या पक्षाघाताने तिचं निधन झालं. वय लहान असताना अन् मुलगी अवघी चार वर्षांची असताना आणि नवरा ऐन तारुण्यात गेला असताना ललितानं पुनर्विवाह करावा, असा आग्रह अनेकांनी केला; पण तिने तो मानला नाही. परंतु तिच्या निवृत्तीनंतर मात्र तिला मुलीला पिता द्यायला हवा होता, अशी रुखरुख लागून राहिली. अशा तरुण विधवांनी पुनर्विवाह करावा, असं जाहीर मतही तिनं मांडलं; पण जे स्वतः केलं नाही ते इतरांना पटवून देण्यात ती स्वाभाविकपणे कमी पडली.