राजस्थानमधील सरपंच छवी राजावत ही 2010 साली झालेल्या निवडणुकीत सर्वप्रथम निवडून आली. एम.बी.ए. झालेली भारतातील पहिली सर्वाधिक तरुण महिला म्हणून तिला ओळखले जाते. कॉर्पोरेट यशापासून ते राजस्थानच्या सोडा या छोट्याशा गावातील सरपंचपदापर्यंतचा तिचा सेवेचा मार्ग, ती ग्रामीण विकासासाठी अथक समर्पित झाली असल्याचेच सूचित करतो. तिच्या कार्यकाळात तिने मूलभूत सेवा, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रचार करताना आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले.
’सरपंच’ या शब्दाचा उल्लेख केल्यावर महाराष्ट्रात जी प्रतिमा डोळ्यासमोर येते ती धोतर-झब्बा घातलेला, गबरू मिशा असलेला आणि डोक्यावर मुंडासं किंवा पांढरी तिरकी टोपी असलेल्या व्यक्तीची. तर उत्तर भारतात समोर येते ती प्रतिमा साधारणपणे राखाडी केसांच्या वयोवृद्ध माणसाची; बहुधा पगडी आणि मोठ्या मिशा असलेला, हातात काठी धरलेला आणि ज्याच्या नजरेत संपूर्ण गावावर जरब आहे अशा व्यक्तीची. त्यांच्या तुलनेत स्त्रीची प्रतिमा क्वचितच मनात येते.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा आणि पंजाबच्या काही भागांत ग्रामप्रधान; राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, मध्य प्रदेश आणि ओडिशात सरपंच; तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये पंचायत अध्यक्ष; आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मंडल प्रजा परिषद अध्यक्ष; बिहार आणि झारखंडमध्ये मुखिया, तर आसाममध्ये गाव पंचायत अध्यक्ष असं संबोधलं जातं. अशाच यादीमधलं एक नाव राजस्थानमधील सरपंच छवी राजावत हिचं. 2010 साली झालेल्या निवडणुकीत ती सर्वप्रथम निवडून आली.
देशभरातल्या पाच प्रभावी महिला सरपंचांची जी यादी केली जाते त्यात आहेत ओदिशातील गंजम जिल्ह्यातील आरती देवी, जी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून ओळखली जाते. तिला 2014 चे राजीव गांधी लीडरशिप अॅवॉर्ड मिळाले होते. तीही एमबीए झालेली आहे. दुसर्या आहेत मीना बहेन. त्या गुजरातमधील व्यारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील.
तिसरी आहे छवी, चौथ्या आहेत सुषमा भादू. त्या हरयाणातील तीन गावांच्या एकाच वेळेस सरपंच आहेत. घुंघट आणि हुंडा या दोन प्रथांच्या विरोधात केलेल्या कामामुळे ती लोकप्रिय आहे. पाचवी आहे राधादेवी, तीही आहे राजस्थानची.
सोडा हे राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील, मालपुरा तालुक्यातील एक छोटंसं गाव. टोंक हा सर्वात मागासलेला जिल्हा, जयपूरपासून सुमारे 78 किलोमीटर अंतरावर असलेला. छवीचा जन्म जयपूरमध्ये एका श्रीमंत आणि खानदानी घराण्यात झाला. छवीचं शालेय शिक्षण आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली स्कूलमध्ये झालं. तिचं महाविद्यालयीन शिक्षण राजस्थानमधील मेयो कॉलेज गर्ल्स स्कूलमध्ये आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झालं. नंतर तिचं शिक्षण पुण्याच्या बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमधून झालं.
एमबीए झाल्यानंतर तिनं ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘कार्लसन ग्रुप ऑफ हॉटेल्स’, ‘एअरटेल’मध्ये काही काळ प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं; परंतु भरगच्च पगाराची कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून तिने समाजकारणात उतरायचे ठरवले. ते करताना तिच्या डोळ्यासमोर आदर्श होता तो महावीर चक्र विजेते ब्रिगेडियर रघुबीर सिंग यांचा. सैन्यातील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सोडा या गावचे ते तब्बल वीस वर्षे सरपंच होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून छवीने ही जबाबदारी स्वीकारायचे ठरवले. सोडा आणि जयपूर या दोन शहरांमध्ये ती आलटून पालटून राहते. तिच्या वडिलांचे नाव नरेंद्र सिंह राजावत आणि आईचे नाव हर्ष चौहान आहे. तिचे वडील लेदर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करतात, तर तिची आई मुख्यतः जयपूरमध्ये हॉटेल चालवते. कुटुंबाच्या व्यवसायातील जयपूर शहरातील याच हॉटेलची आणि घोडेस्वारी शिकवणार्या प्रशिक्षण केंद्रासाठी खरेदी केलेल्या घोड्यांच्या पालनपोषणाची जबाबदारीही ती पाहते.
सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तिने आपल्या गावात अनेक घरांवर रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवली आहे आणि घराघरांत शौचालये बांधून दिली आहेत. ग्रामीण राजस्थानचा चेहरामोहरा बदलण्याचे श्रेय ‘टाइम्स’ वृत्तसमूहाने तिला देऊ केले आहे. 25 मार्च 2011 ला न्यूयॉर्क येथे 11 वी इन्फोपॉवर्टी जागतिक परिषद भरली होती, त्या परिषदेत बोलण्याची संधी तिला मिळाली होती. छवीने केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. तिने महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठीही अनेक उपक्रम सुरू केले. महिलांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देताना तिने त्यांना चरितार्थासाठी उपयुक्त ठरतील अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले. या गोष्टींमध्ये शिवणकाम, कलाकुसर याबरोबरच संगणकीय साक्षरतेचा अंतर्भाव होता.
सोडा गावात आरोग्यविषयक सुविधा नसल्यामुळे तिने वैद्यकीय शिबिरे आयोजित केली. गावात स्टेट बँकेची पहिली शाखा सुरू व्हावी यासाठीही तिने प्रयत्न केले. 2015 मध्ये तिचा सरपंचपदाचा कार्यकाळ संपला; पण तिचे गावाच्या उन्नतीसाठीचे काम सुरूच राहिले. राजस्थान राज्य सरकार, हिमालया ड्रग कंपनी, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी, नेरोलॅक पेंट्स, रोटरी इंटरनॅशनल, हिंदुस्थान कोका-कोला फौंडेशन आदींचेही सहकार्य तिला लाभले.
छवीच्या या कामाची योग्य दखल तत्कालीन राष्ट्रपतीए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही घेतली होती आणि तिला सन्मानित केले, तर माध्यमसमूहांनीही तिच्या कामाला प्रसिद्धी देतानाच आयबीएनलाइव्हने तिला ‘यंग इंडियन लीडर’ सन्मान देऊन गौरवले. दी ऑस्ट्रेलिया इंडिया युथ डायलॉग, इंटरनॅशनल व्हिजिटर्स लीडरशिप प्रोग्राम आणि एशियन फोरम ऑन ग्लोबल गव्हर्नन्स यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी तिला लाभली. ईआयएच नावाच्या लक्झरी हॉटेलच्या संचालक मंडळावर तिची नियुक्ती झाली. छवीने अगदी अलीकडे, 2023 साली, भारतीय जनता पक्षाच्या राजस्थान प्रदेश अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे कॉर्पोरेट यशापासून ते राजस्थानच्या सोडा या छोट्याशा गावातील सरपंचपदापर्यंतचा तिचा सेवेचा मार्ग, ती ग्रामीण विकासासाठी अथक समर्पित झाली असल्याचेच सूचित करतो. तिच्या कार्यकाळात तिने मूलभूत सेवा, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रचार करताना आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. व्यवसायातील तिच्या अनुभवावरून तिने शहरासाठी मोठ्या गुंतवणुकीची मागणी केली.