पॅरालिम्पिक पदकांमागची प्रेरणादायी कहाणी

विवेक मराठी    06-Sep-2024   
Total Views |
Paralympic Games Paris 2024
पॅरिसमधील दिव्यांग खेळाडूंसाठी असलेली पॅरालिम्पिक ही स्पर्धा ऑलिम्पिकइतकीच महत्त्वाची मानली जाते. शारीरिक कमतरतांवर मात करून असामान्य कामगिरी करणारे खेळाडू हा प्रेक्षकांसाठी कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय असतो. ह्या स्पर्धेतील प्रत्येक पदकामागे एक प्रेरणादायी कहाणी असते. दिव्यांगत्व कुणी मुद्दाम मागून घेतलेली गोष्ट नाही. अनेक शारीरिक अडचणींवर हे खेळाडू किती धैर्याने मात करतात हे बघून आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळू शकते.
 
 
28 ऑगस्टला पॅरिसमध्ये पॅरालिम्पिकची सुरुवात झाली. या स्पर्धेच्या पाच दिवसांचा आढावा येथे घेत आहोत.
 
 
पॅरिसमध्ये भारत
 
भारताचे एकूण 84 खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. टोकियोमध्ये हाच आकडा 54 होता आणि मिळालेल्या पदकांची संख्या होती 19. या वेळी एकूण खेळाडूंची वाढलेली संख्या बघता पदकांच्या संख्येतही मोठी वाढ होणार हे निश्चित आहे.
 
 
स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी नेमबाजी या खेळामध्ये भारताला पहिलं पदक मिळालं. दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये मोना अग्रवालने कांस्य पदक पटकावलं आणि पाठोपाठ त्याच स्पर्धेत अवनी लेखराने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. योगायोगाची गोष्ट ही, की अवनीने तिचं टोकियोमधील पहिलं पॅरालिम्पिक पदक 30 ऑगस्ट 2021 ह्या दिवशी मिळवलं होतं. 30 ऑगस्ट ही तारीख तिच्यासाठी सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी ठरली आहे.
 



Paralympic Games Paris 2024 
 
वयाच्या अकराव्या वर्षी झालेल्या एका अपघातामध्ये तिने तिचे दोन्ही पाय गमावले. पुढील बराच काळ शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेचा होता; पण कुटुंबीयांच्या मदतीने तिने त्यावर मात केली आणि आज ती अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरली.
मोना अग्रवाल ही पोलिओग्रस्त मुलगी. 2021 पर्यंत तिने पिस्तूल हातातही घेतलं नव्हतं. पतीच्या आजारपणामुळे आणि घरात अन्य कमावता स्रोेत नसल्यामुळे खेळाच्या माध्यमातून तिने घराची जबाबदारी उचलण्याचं ठरवलं. कर्ज काढून तिने खेळाचं साहित्य विकत घेतलं आणि इतक्या कमी कालावधीत पॅरालिम्पिकच्या पोडियमपर्यंत मजल मारली.
 
 
प्रीती पालने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. आत्तापर्यंतच्या पॅरालिम्पिक इतिहासातील ट्रॅक इव्हेंटमधील भारताचं हे पहिलंच पदक आहे. जन्मापासून सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या प्रीतीला योग्य उपचार मिळू शकले नव्हते. शारीरिक कमकुवतपणाचा तिने कधीच बाऊ केला नाही, ती खेळत राहिली. पॅरा एशियन गेम्समध्ये 100 आणि 200 मीटर अशा दोन्ही स्प्रिंट प्रकारांमध्ये ती चौथ्या स्थानी राहिली होती. हे अपयश तिने पॅरिसमध्ये मागे टाकलं आणि पोडियमवर जागा मिळवली.
 
 
मनीष नरवाल ह्या नेमबाजाने भारताला चौथं पदक मिळवून दिलं. टोकियोमध्ये सुवर्णपदक मिळवणार्‍या मनीषला ह्या वेळी रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
 
 
पुन्हा एकदा नेमबाजी खेळातूनच पदकांची सुरुवात झाली. रुबीना फ्रान्सिसने कांस्यपदक पटकावलं. टोकियोतून पदकाविना परत आलेल्या रुबीनाने या वेळी मात्र कमाल केली.

Paralympic Games Paris 2024
प्रीती पालने ह्या पॅरालिम्पिकमधील तिचं दुसरं पदक 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत मिळवलं.
 
 
टोकियोमध्ये उंच उडीत रौप्य पदक मिळवणारा निषाद कुमार या वेळी पदकाचा रंग बदलण्यास उत्सुक होता; पण त्याच्या टी-47 गटात तो दुसर्‍या स्थानी राहिला आणि पुन्हा एकदा रौप्य पदक मिळालं.
 
 
भारतासाठी स्पर्धेचा पाचवा दिवस अगदी खास ठरला.
 
दिवसाची सुरुवात योगेश कथुनियाच्या थाळीफेकीतील रौप्य पदकाने झाली. योगेशने टोकियोमध्येही रौप्य पदक मिळवलं होतं.
नितेश कुमारने दिवसातील पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. नितेश बॅडमिंटन एसएल 3 प्रकारात खेळतो.
 
 
टोकियोमध्ये पहिल्यांदाच बॅडमिंटनचा समावेश पॅरालिम्पिकमध्ये करण्यात आला होता आणि भारताने चार पदके मिळवली होती. याही वर्षी भारताने आपला दबदबा कायम राखला. तुलसीमतीने (SU-5) रौप्य, तर मनीषा रामदास (SU-5) आणि निथ्याश्री (SH-6) ह्यांनी आपापल्या गटात कांस्यपदके मिळवली. सुहास यथिराजने SL-4 प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. हा खेळाडू 2007 च्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. त्याला टोकियोमध्ये रौप्यपदक मिळालं होतं. या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती, त्यामुळे आता सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र फ्रान्सच्या लुकासने त्याला पूर्ण सामन्यात एकदाही अशी संधी दिली नाही आणि पुन्हा एकदा त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
 




Paralympic Games Paris 2024 
 
तिरंदाजी खेळाने देशभरातील क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पहिल्याच दिवशी झालेल्या रँकिंग फेरीमध्ये भारताच्या शीतल देवीने उत्तम कामगिरी केली होती. जुना विश्वविक्रम त्या दिवशी मोडला गेला; पण पुढच्या फेरीत मात्र तिला पराभव पत्करावा लागला होता. उपांत्य फेरीतील निसटत्या पराभवानंतर कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीमध्ये शीतल-राकेश जोडीने विजय मिळवला. एकेरीतील अपयशानंतर शीतल देवी आणि राकेश कुमार ह्या जोडीने मिश्र सांघिक स्पर्धेतील कांस्यपदक पटकावून कंपाऊंड आर्चरीत पदकाची पाटी कोरी राहणार नाही हे निश्चित केलं. पॅरालिम्पिक पदक मिळवणारी शीतल सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचं वय आहे, सतरा वर्षे सहा महिने आणि 19 दिवस. शीतल हात नसलेली जगातील एकमेव महिला तिरंदाज आहे
 
अपेक्षेप्रमाणे ह्या दिवसाचा हिरो ठरला भालाफेक खेळाडू सुमित अंटील. पहिल्याच फेकीने त्याने स्वतःचाच जुना पॅरालिम्पिक विक्रम मोडला आणि पुढच्या फेकीतून तो आणखी मजबूत केला. टोकियो पॅरालिम्पिकनंतर सुमितने कमालीचे सातत्य दाखवले आहे. सध्या त्याची स्पर्धा स्वतःशीच आहे. भालाफेक खेळावर त्याने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे.
पाचव्या दिवसअखेर भारताची एकूण पदकसंख्या 15 झाली.
पाच दिवसांची कामगिरी बघता 8 तारखेपर्यंत भारत एकूण 25 ते 30 पदकसंख्येपर्यंत पोहोचायला हरकत नाही. आधीच्या तुलनेत प्रेक्षकांचा पाठिंबा जास्त प्रमाणात मिळत आहे. या वेळी दूरदर्शनबरोबर जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स18 नेटवर्कवरही सामने बघण्याची सोय आहे. यामुळे घडलेली सर्वात चांगली गोष्ट ही, की दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन. सहानुभूती किंवा दयेची भावना मनात ठेवण्याऐवजी थोडं प्रोत्साहन दिल्यास ह्या व्यक्तीही सामान्य जीवन जगू शकतात आणि अनेक अशक्य गोष्टीही शक्य करू शकतात, हे हळूहळू लोकांच्या पचनी पडू लागलं आहे. शीतल देवीसारखे खेळाडू तर सर्वांसाठीच आदर्श आहेत. तिरंदाजीसारखा खेळ ही मुलगी पायाने खेळू शकते ही गोष्ट खूप वाखाणण्याजोगी आहे. म्हणून खेळ पाहणं आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. दिव्यांगत्व कुणी मुद्दाम मागून घेतलेली गोष्ट नाही. अनेक शारीरिक अडचणींवर हे खेळाडू किती धैर्याने मात करतात हे बघून आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळू शकते.