‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ हा अतिशय लोकप्रिय श्लोक आहे. देवासाठी भक्त सर्व काही प्राण पणाला लावून देवाची भक्ती करीत असतो. ‘दासबोधा’त समर्थांनी या विचाराचा पाठपुरावा केला आहे. देवाच्या सख्यत्वासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा विचार ‘दासबोधा’त आला आहे.
रामदासस्वामींच्या ‘रघुनायेका मागणे हेचि आता’ या ‘करुणाष्टका’तील पहिल्या तीन कडव्यांचा परिचय आपण मागील लेखात करून घेतला. या ‘करुणाष्टका’तील पुढचा 4था श्लोक ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ हा अतिशय लोकप्रिय श्लोक आहे. जुन्या पिढीतील लोकांना आठवत असेल की, त्या वेळी जेवणाच्या पंक्तीत हा श्लोक हमखास म्हटला जायचा. आजही अनेक घरांतून देवाच्या आरत्या म्हणून झाल्यावर तसेच ‘दासबोध’ पारायणप्रसंगी शेवटी ‘सदा सर्वदा...’ हा श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. लोक मोठ्या भक्तिभावाने हा श्लोक म्हणतात. तो या ‘करुणाष्टका’तील पुढचा श्लोक असा आहे -
सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।
नुपेक्षीं मज गुणवंता आनंता ।
रघुनायेका मागणे हेचि आता ॥4॥
भक्ताला वाटते की, आपण भगवंताच्या सहवासात राहावे. भक्त म्हणतो, देवा, मला नेहमी तुझ्या संगतीचा योग येऊ दे. तुला मी माझ्या अंत:करणात राहण्याची मागणी यापूर्वी केलेली आहे. नामस्मरणाने तुझे रूप व गुण मनात साठवण्याचा मी प्रयत्न करीत आहे; पण तरीही मला या जगात, भोवतालच्या माणसांत वावरायचे असते. एकांतात नाम घेताना कदाचित तुझ्या कृपेने, तू माझ्या अंत:करणात वस्ती करून आहेस, याची जाणीव होईल; परंतु व्यवहारात इतरांशी संबंध आल्यावर ते शक्य होणार नाही. यासाठी नेहमी मला तुझा योग घडू दे. ‘योग’ हा शब्द ‘युज’ धातूपासून तयार झाला आहे. ‘युज’ याचा अर्थ जोडणे असा आहे. ‘योग तुझा घडावा’ म्हणजे मी तुझ्याशी जोडला जाऊ दे. असे सर्वकाळ घडून आले तर माझ्यातील खोट्या ‘मी’चे अस्तित्व शिल्लक राहणार नाही. मी आणि तू एकरूप होऊन जाऊ. म्हणून मला सदासर्वदा म्हणजे नेहमी तुझा योग घडू दे. जर नेहमी तुझा योग घडून आला तर पहिल्या श्लोकात ‘अती आदरे सर्व सेवा करावी’ हे मागणे मी केले आहे. ते कार्य साधता येईल. मला तुझी सेवा घडू दे. एवढेच नव्हे, तर तुझ्या काजासाठी माझा हा देह पडला तरी हरकत नाही. देवाचे दास्यत्व पत्करल्यावर भक्त सर्व काही भगवंताला अर्पण करतो. स्वत:साठी वेगळे काही राखून ठेवत नाही. प्राणाचीही पर्वा करीत नाही. म्हणजे देवासाठी भक्त सर्व काही प्राण पणाला लावून देवाची भक्ती करीत असतो. ‘दासबोधा’त समर्थांनी या विचाराचा पाठपुरावा केला आहे. देवाच्या सख्यत्वासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा विचार ‘दासबोधा’त आला आहे.
समर्थ म्हणतात-
देवाच्या सख्यत्वासाठी। पडाव्या जिवलगांसी तुटी।
सर्व अर्पावें सेवटीं। प्राण तोहि वेचावा ॥4.8.8॥
तरीही ‘करुणाष्टका’तील ‘तुझे कारणी देह माझा पडावा’ यातील भावार्थ नीट समजून घेतला पाहिजे. ‘देह पडावा’ याचा अर्थ या देहाचा अंत व्हावा असा करता येत नाही. भक्ताच्या मानवी देहाचा नाश झाला, तर त्याला भक्ती कशी करता येईल? त्यामुळे ‘देह पडावा’ याचा वाच्यार्थ न घेता लाक्षणिक अर्थ शोधावा लागतो. अहंकार बाळगल्याने माझ्या ठिकाणी एक खोटा ‘मी’ तयार झाला आहे. या खोट्या ‘मी’ने माझ्या ठिकाणी देहबुद्धी पक्की झाली आहे. त्या खोट्या ‘मी’चे पतन झाल्याशिवाय व त्या अनुषंगाने देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय परब्रह्म रामाचे ज्ञान प्राप्त होणार नाही. समर्थांनी ‘दासबोधा’त अद्वैत तत्त्वज्ञान प्रमाण मानून उपदेश केला असला तरी भक्तिपंथाच्या आचरणासाठी स्वामींनी मी आणि राम हे वेगवेगळे मानले आहेत. ‘करुणाष्टका’चा मूळ पाया भक्तिपंथाचा असल्याने येथे सारी प्रार्थना, विनवणी, मागणी आपल्या आराध्य दैवत रामाला उद्देशून केली आहे. देव व भक्त वेगळे असतील, तर भक्तिप्रेमाचा आनंद लुटता येतो. हे रामा, माझ्या ठिकाणी अनेक दोष आहेत याची मला जाणीव आहे. माझ्या ठिकाणी असलेले प्रमुख दोष अहंकार व देहबुद्धी तुझ्या भक्तीच्या आड येत आहेत. त्यांना नष्ट कर, अशी मागणी मी केेलेली बरी. तेव्हा माझ्या ठायी दोष भरलेले असले तरी हे रामा, तू माझी उपेक्षा करू नको. तू गुणवंत आहेस, अनंत आहेस, तेव्हा तू या दासाची उपेक्षा करू नको. तू ऐश्वर्यसंपन्न आहेस आणि मी तुझा दास आहे, शरणागत आहे. हे मला काही प्रापंचिक गोष्टी प्राप्त व्हाव्यात, या इच्छेने मी म्हणत नाही. लोक ऐहिक लाभाच्या आणि प्रापंचिक मागण्यांच्या प्राप्तीसाठी तुझ्या देवळासमोर रांगा लावून उभे आहेत. हे मी सभोवार पाहात आहे; पण मी काही असे ऐहिक प्राप्तीचे उद्देश मनात ठेवून तुझ्याकडे आलोे नाही. तू रूप, गुण, ऐश्वर्यसंपन्न आहेस आणि हा तुझा दास ज्या मागण्या घेऊन आला आहे त्या तुझ्या भक्तीसाठी आहेत. त्यांचा प्रापंचिक गोष्टींशी संबंध नाही. आता मी हे आणखी स्पष्ट शब्दांत सांगतो-
नको द्रव्यदारा नको येरझारा।
नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा।
सगुणीं मज लाविं रे भक्तिपंथा।
रघूनायेका मागणे हेचि आता ॥5॥
लोक प्रापंचिक गोष्टी मागण्यासाठी आशाळभूतपणे तुझी भक्ती करीत आहेत. हे मी रोज पाहात आहे; पण तुझ्या या दासाला या भौतिक गोष्टी नकोत. हे रामा, अगदी स्पष्टच बोलायचे तर मी द्रव्यदारा मागण्यासाठी तुझ्याकडे आलो नाही. मला पैसाअडका किंवा संसारसुखासाठी भार्या काही नको. या संसारात जन्माला आल्यानंतर जर मी प्रापंचिक गोष्टींची इच्छा, आकांक्षा बाळगून जीवन व्यतीत केले, तर हा मानवी देह सोडल्यानंतर अतृप्त इच्छाआकांक्षासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हे जन्मोजन्मी घडून येईल आणि मृत्यू-जन्माच्या चक्रात मी अडकून जाईन. मग जन्ममृत्यूच्या येरझार्यात मला तुझी आठवण कशी राहील? मला या येरझार्यात अडकायचे नाही. या जगातील मोहमायेपासून तू मला सोडव. या जन्मात तुझा साक्षात्कार होऊ दे. मला आशा, आकांक्षा, स्वार्थबुद्धी, हाव, विषयवासना यांच्या तृप्तीसाठी जन्ममृत्यूच्या येरझारा नकोत. माझे हे मागणे सामान्य माणसांसारखे नाही. मला तुझी भक्ती, प्रेम, सहवास, तुझे ज्ञान हवे, असे मी म्हणतो याचाच मला गर्व होईल. हे रामा, मी स्वत:ला तुझा दास म्हणवून घेत आहे. तुझी भक्ती, ज्ञान यांचा अभ्यास करीत आहे आणि मी इतरांपेक्षा वेगळा असून मला तुझे ज्ञान प्राप्त होत आहे, याचा सूक्ष्म अहंकार माझ्या ठिकाणी उत्पन्न होईल. शिवाय भौतिक ज्ञानाचा अहंकार आहेच. ही अहंकाराची सूज, गर्वाचा फुगारा माझ्या आध्यात्मिक भक्तिमार्गात अडथळा निर्माण करीत आहे. तेव्हा माझ्या मनातील ज्ञानाचा व त्याद्वारे आलेला गर्वाचा फुगारा मला नको. मला तुझ्या भक्तिपंथानेच जाऊ दे. निर्गुण ज्ञानापेक्षा गर्व उत्पन्न करणार्या सगुण भक्तिमार्गाला तू मला लाव. रघुनायका, हेच आता माझे तुझ्याकडे मागणे आहे.
तू परब्रह्म निर्गुण, निराकार, शाश्वत आहेस. बाकी सर्व मोहमाया अशाश्वत, नाशवंत आहेत. निराकाराची भक्ती करणे कठीण असल्याने मला तुझी भक्ती सगुण रूपात करायची आहे. यासाठी माझे एवढेच मागणे आहे की, मला सगुण भक्तिपंथाला तू लाव.