कोकणात गणेशोत्सव साजरा करताना गणपतीच्या अलंकारांकडेही विशेष लक्ष दिलं जातं. काळानुरूप त्यात बदल होत गेले. सार्वजनिक मंडळं प्रसिद्ध झाली असली, तरी अनेक घरगुती गणपतीही सार्वजनिक झाले आहेत. काही गणपतींना पेशवेकालीन संदर्भही आहेत, तर काही गणपतींच्या प्रथा-परंपरा वर्षानुवर्षे टिकून आहेत.
गणेशोत्सवाचा उत्साह कोकणात ओसंडून वाहत असतो. आपल्या दैनंदिन जीवनात गणपती एकरूप झालेला आहे, अशी कोकणवासीयांची भावना असते. म्हणूनच जीवनावश्यक वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ गणपतीलाही मनोभावे अर्पण केल्या जातात. पेहरावाच्या आकर्षकतेचा एक भाग म्हणून जे अलंकार माणसं परिधान करतात तेसुद्धा गणपतीला आवर्जून घातले जातात आणि नंतर गणपतीचा आशीर्वाद म्हणून ते अंगावर घातले जातात. काळानुरूप गणेशोत्सवात जसजसा बदल होत गेला तसतसं गणपतीला अर्पण करायच्या आभूषणाच्या प्रकारातही बदल होत गेला.
उत्सव साजरा करत असतानाच गणपतीच्या अलंकारांकडेही विशेष लक्ष दिलं जातं. पूर्वी गणपतीच्या मातीच्या मूर्तीमध्येच ही आभूषणे कोरली जात असत आणि त्यांना योग्य ती रंगरंगोटी करून ते दागिने खरे असल्याचं मानलं जात असे. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, ‘शेंदूर लाल’ अशा गणपतीच्या आरत्यांमध्ये असलेल्या वर्णनाप्रमाणे मूर्ती तयार करून घेण्याचा आग्रह असे. आरतीमधल्या ‘हिरेजडित मुकुट शोभतो बरा’ या ओळीनुसार मुकुटात मात्र हिरा लावण्याची सूचना मूर्तिकारांना केली जात असे. काळानुरूप त्यात बदल होत गेला. तो बदल कसा झाला, याविषयी साटवली आणि मठ (ता. लांजा) येथील मूर्तिकार उमेश आंबर्डेकर यांनी माहिती दिली. त्यांच्या वडिलांपासूनची सुमारे 50 वर्षांची ही मूर्तिशाळा आहे. ते म्हणाले, पूर्वी मातीच्या मूर्तीमध्येच आभूषणं घातली जात असत आणि ती हुबेहूब रंगविली जात असत. एकवीस दुर्वांचा हार, कंठी, वाकी, कंबरपट्टा, जानवं, कर्णभूषणं, मनगटावरचे दागिने अशा आभूषणांचा त्यात समावेश असे. त्यामुळे मूर्तिकाराचीही कसोटी लागत असे. मुळात अशी आभूषणं हुबेहूब रंगवायची झाली, तर मूर्ती पूर्णपणे सुकलेली असायला हवी; पण अनेकदा श्रावण महिन्यातच भरपूर पाऊस पडत असल्यानं मूर्ती वाळवणं कठीण होत असे. मूर्ती वाळल्यानंतरच रंगरंगोटी करावी लागते. ओल्या मूर्तीवर रंगकाम केलं, तर रंग काळपट दिसत असे. आता त्यात बदल झाला आहे. मूर्तीचं रंगकाम झाल्यानंतर घरोघरी मूर्ती रवाना होतात. मूर्तीची प्रतिष्ठापना होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही अनेक अलंकार मूर्तीला घातले जातात. त्यामध्ये सोनं किंवा चांदीचं जानवं घातलं जातं. कानात सोन्याची भिकबाळी घालण्याची पद्धत आता रूढ होत आहे. बहुतेक सर्वच मूर्तींना भिकबाळी घातली जाते, डोक्यावर किरीट घातला जातो. मातीच्या मूर्तीमध्ये किरीट असतोच; पण त्यावर बाहेरून किरीट चढविला जातो. सर्वांनाच खरे दागिने घालणं शक्य नसतं. अशा वेळी खोटे दागिनेही घातले जातात. मूळच्या मूर्तीच्या मुकुटावर क्रेप कागद लावून नवा मुकुट चढविला जातो. मोठ्या भावनेनं हे केलं जातं. त्यामुळे त्याला पर्याय नसतो. पूर्वी फेटेवाला गणपती असावा, गळ्यात 21 दूर्वांचा हार असावा, अशी मागणी असायची. आता सुवर्णकारांकडून सोन्याचा वर्ख लावलेला दूर्वांचा हार आणि इतर आभूषणं खरेदी करून लावली जातात. पूर्वी मूर्तीच्याच हातात मोदक असायचा. आता तो हात रिकामाच ठेवायला सांगितलं जातं. पूजेपूर्वी त्या हातात चांदीचा किंवा सोन्याचा मोदक करून तो ठेवला जातो. कमरपट्ट्यावर हिरे लावले जातात. त्यासाठी एका बाजूनं चपटे असलेले कृत्रिम हिर्याचे खडे विकत मिळतात. अनेक सुवर्णकारांकडे असे कृत्रिम किंवा सोन्याचांदीचा वर्ख लावलेले विविध दागिने उपलब्ध होतात. त्यांचा खरेदी महोत्सवही साजरा केला जातो. त्यातून ही आभूषणं खरेदी केली जातात.
पोमेंडी (रत्नागिरी) येथील नरेश पांचाळ म्हणाले, मूर्तीच्या अलंकारांमध्ये आता कानात बाळी घातली जातात. काही जण मूर्तीमध्येच भिकबाळी घालून मूर्ती मागतात, तर काही जण भिकबाळी घालण्यासाठी मूर्तीच्या कानाला छिद्र ठेवण्याची सूचना करतात. त्यामध्ये मूर्ती तयार झाल्यानंतर भिकबाळी घातली जाते. गळ्यात, हातावर, कमरेत, खांद्यावर, मनगटावर दागिने घालण्यासाठी आता मूर्ती तयार करताना तिथली जागा रिकामी ठेवण्याची सूचना केली जाते. मूर्ती घरोघरी गेल्यानंतर बाहेरून हिरे लावले जातात. इतरांचं पाहूनही हे केलं जातं. पूर्वी फेट्याचा गणपती, पेशवाई गणपती अशा मूर्तींची मागणी व्हायची. त्यात अलंकार नेहमीचेच असत. जानवं, इतर आभूषणं रंगवून घेतली जात. आता साध्या मूर्तींचीच मागणी असते. बारीक दागिने तयार करतात. बालगणपती असेल, तर कानात डूल असतात. वेगळे खडे डिझाइनमध्ये करून घेतले जातात. मुकुट, कंबरपट्टा, हाताला वाकी, गळ्यातले हार, सोनसाखळी असे कृत्रिम दागिने कॅनव्हास कागदावर तयार करून ते चिकटवतात. पूर्वी मागच्या हातात फुलं असत. आता मागच्या हातात सोनेरी कडी घातली जातात. त्याला मोती लावतात.
ही झाली घरोघरच्या गणेशमूर्तींची वैशिष्ट्यं; पण सार्वजनिक उत्सवातही मूर्तीच्या अलंकारांकडे लक्ष दिलं जातंच. गणेशोत्सव हा कोकणातला घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाला कोकणात अधिक महत्त्व आहे. तुलनेनं सार्वजनिक गणेशोत्सवांना फारसं महत्त्व नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सार्वजनिक गणेशोत्सव अवघे दीडशे आहेत. लोकमान्य टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; पण त्यांचं जन्मगाव असलेल्या रत्नागिरीत सार्वजनिक उत्सव होत नव्हता. धार्मिकता जपणार्या उत्सवांना सामाजिक एकता आणि सुधारणेची जोड दिली पाहिजे, हा लोकमान्यांचा विचार रत्नागिरीतल्या टिळक आळीतल्या तेव्हाच्या नागरिकांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातूनच 1926 साली टिळक आळीतला सार्वजनिक उत्सव सुरू झाला. मारुती गणपती पिंपळपार देवस्थानाचा हा उत्सव कोकणातला पहिला सार्वजनिक उत्सव होता. त्यानंतर तेव्हाच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सार्वजनिक उत्सव सुरू झाले; पण त्या सर्वांचं सामाजिक उपक्रम हेच अधिष्ठान होतं. धार्मिक कार्यक्रमापेक्षा अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं जातं. तरीही मूर्ती आकर्षक करण्याकडे कल असतोच.
रत्नागिरीतल्या बंदर रोड मित्र मंडळाचे अध्यक्ष विनय दात्ये यांनी 44 वर्षांची परंपरा - त्यांच्या उत्सवाची माहिती दिली. ते म्हणाले, प्रख्यात मूर्तिकार नंदू सोहोनी यांच्याकडूनच दरवर्षी मूर्ती आणली जाते. दरवर्षी वटपौर्णिमेला मूर्ती तयार करायला सुरुवात केली जाते. सुरुवातीच्या काळात रँडचा खून, ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांवर आधारित मूर्ती केली जात असे; पण अलीकडे मूर्ती एकाच स्वरूपाची केली जाते. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीप्रमाणे एकाच प्रकारची मूर्ती आता रूढ झाली आहे. तीन फुटांची उत्सवमूर्ती तयार केली जाते. बंदर रोडच्या प्रत्येकाच्या घरात या मूर्तीचं छायाचित्र हमखास मिळेल. मूर्तीचा वेश ठरलेला असतो. एका हातात मोदक, एका हातात परशू आहे. एका हातात जास्वंदीचं फूल आहे. कानात भिकबाळी, गळ्यात कंठी आहे. मोठा हार घातला जातो. चांदीचं जानवं घातलं जातं. दूर्वांचा पदकांचा हार मूर्तीला घातला जातो. मंडळाच्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येकाच्या डोक्यावर गणपतीचं कृपाछत्र नेहमीच असावं, या भावनेनं मूर्तीच्या डोक्यावर चांदीचं छत्र तयार करण्यात आलं आहे. मंडळाच्या परिसरातले लोक तसे कमावते नव्हते; पण त्यांनी वर्गणीतून 10-20 रुपये जमवून पैसे गोळा केले आणि 1995 साली मुकुट तयार करून घेतला. दोन वर्षांनी छत्रही तयार करून घेण्यात आलं. बंदरकर गुरुजी यांच्याकडून सुरुवातीला छोटी छत्री बनवून घेतली. नंतर गणपतीला आहेर केलेले नवसाचे दागिने मोडून त्यापासून मोठ्या आकाराची छत्री चिपळूणमधील लवेकर यांच्याकडून तयार करून घेतली.
सार्वजनिक मंडळं प्रसिद्ध झाली असली, तरी अनेक घरगुती गणपतीही सार्वजनिक झाले आहेत. एकट्या संगमेश्वर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या मूर्ती आहेत. राजेशाही थाटात त्यांचं पूजन, अर्चन, भजन, विसर्जन केलं जातं. माखजनमधल्या गणेश मंदिरामध्ये आजही साजर्या होणार्या उत्सवाला पेशवेकाळापासूनची परंपरा आहे. 350 वर्षांनंतरही हा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होतो. माखजनला 350 वर्षांपूर्वीचं गणेश मंदिर असून तिथला गणेशोत्सव पेशवेकाळापासून सुरू आहे. या मंदिरात पंचधातूची गणेशमूर्ती आहे. पेशवेकाळात माखजनच्या जोशी घराण्याचे पूर्वज ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी केलेली कित्येक भाकितं खरी ठरली होती. त्यांच्या विद्वत्तेवर खूश होऊन पेशव्यांनी त्यांना ‘मागा’ असे म्हटल्यावर त्यांनी श्री गणेशाची मूर्ती मागितली. पेशव्यांनी त्यांना पंचधातूने बनविलेली गणेशमूर्ती भेट दिली. या मूर्तीची प्रतिष्ठापना जोशींनी माखजन गावातच केली. पेशव्यांनी दिलेली ही पंचधातूची गणेशमूर्ती योद्ध्याच्या रूपातली असून बाजूलाच रिद्धी-सिद्धी विराजमान झाल्या आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीला छोटा उत्सव साजरा होतो. मूर्तीवरचं कोरीवकाम आकर्षक आहे. जोशी घराण्याच्या आठव्या पिढीतले सतीश जोशी आणि कुटुंबीय श्री गणेशाची सेवा करत आहेत. पेशवाई थाटात उत्सव साजरा होतो. पेशवाई पगडी हे महत्त्वाचं आभूषण असतं.
कोंडगाव-साखरपा गावातल्या अश्वारूढ गणेशमूर्तींची परंपरा आहे. त्या परिसरात सध्या वास्तव्य करून असलेली अभ्यंकर, केळकर, केतकर, रेमणे ही घराणी विशाळगडावरून आली. ती घराणी पेशवाईमध्ये विशाळगडावर अधिकारपदावर होती. त्यांपैकी अभ्यंकर पागा सांभाळत होते. केतकर यांच्या घराण्यात सुभेदारी होती, तर केळकर दिवाण होते. त्या घराण्यांचा उल्लेख पागे अभ्यंकर, सुभेदार केतकर, दिवाण केळकर असाच होतो. सरदेशपांडे यांचं घराणं विशाळगड परिसरात महसुली प्रमुख होतं. त्यांच्या घराण्यात खोतकी होती. रेमणे घराणं विशाळगडावर आणि परिसरातल्या बारा गावांमध्ये ग्रामोपाध्येपण करत. त्या घराण्यांना गडाखाली कोंडगाव-साखरपा परिसरात जमिनी इनाम म्हणून मिळाल्या होत्या. देशात इंग्रजांनी सत्ताविस्तार केला आणि गडांवर राहणार्या घराण्यांचे अधिकार अस्ताला गेले. उदरनिर्वाहासाठी ती कुटुंबं कोंडगाव-साखरपा भागात स्थायिक झाली. त्यांना मिळालेल्या जमिनी ते कसू लागले. ते गडावरून- घोड्यावरून आले म्हणून घराण्यात घोड्यावरून गणेशमूर्ती आणण्याची प्रथा सुरू झाली. ती प्रथा त्या घराण्यांमध्ये सांभाळली जात आहे. घोडा हेच त्या मूर्तींचं महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं. त्या घराण्यांमध्ये पूर्वी लाकडी घोडे तयार केले होते. ते घोडे मूर्तिकारांकडे पाठवले जात. मूर्तिकार थेट त्या घोड्यांवरच मूर्ती तयार करत. लाकडी घोडे बनवताना त्याच्या पाठीवर लोखंडी सळी घालण्यात आली. मूर्तिकार त्या सळीच्या आधाराने गणेशमूर्ती साकारत. काही घराण्यांमधले जुने घोडे नष्ट होऊन गेले. लाकडी घोड्यावरून गणपती आणणं आणि विसर्जन करणं अवघड जात असल्यामुळे काही घरांत लाकडी अश्व असतानाही त्यांनी गणेशमूर्ती मातीतूनच अश्वासह तयार करायला सुरुवात केली; पण घोड्यावरचा गणपती हे साखरप्यातलं वैशिष्ट्यच आहे.
असंच आगळंवेगळं वैशिष्ट्य जपणारा उत्सव देवरूखमध्येही आहे. देवरूखच्या चौसोपी वाड्यातल्या या गणेशोत्सवालाही 350 वर्षांची परंपरा आहे. या उत्सवाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला सुरू होणारा उत्सव. नेहमी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. मात्र देवरूखच्या ऐतिहासिक चौसोपी वाड्यातला उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि शुद्ध षष्ठीला संपतो. या उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकातल्या मोरगावच्या मयूरेश्वराप्रमाणे हा उत्सव साजरा होतो. इ.स. 1700 साली सांगली जिल्ह्यातले कांदे मांगले या गावाहून देवरूखात आलेले भास्कर जोशी यांचे थोरले चिरंजीव बाबा जोशी यांना दुर्धर व्याधी जडली. त्यावर विविध उपाय करून झाले; मात्र गुण येईना. आता सगळे परमेश्वराच्या हाती, असे म्हणून त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील मठ धामापूर येथील शंकराच्या जागृत सोमेश्वर देवस्थानात आणि नंतर मोरगावातील मयूरेश्वराच्या मंदिरात कडक उपासना सुरू केली. मोरगावात उपासना सुरू असताना त्यांना दृष्टांत झाला. त्यानुसार एका ठिकाणी खोदकाम केल्यावर त्यांना चांदीच्या डब्यात श्री सिद्धिविनायकाची नुकतीच पूजा केलेली मूर्ती सापडली.
दृष्टांतानुसार त्यांनी ती मूर्ती देवरूखात आणली आणि चौसोपी वाड्यात तिची प्रतिष्ठापना केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध प्रतिपदेचा होता. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि शुद्ध षष्ठी उजाडता संपतो. पेशवाई काळात मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यामुळे तेव्हा युद्धप्रसंगी वापरल्या जाणार्या आयुधरूपी आभूषणांनी मूर्ती सजविली जात असे. देशभक्तीपर आरासही केली जात असे. आजही परंपरा सुरू असलेल्या या उत्सवात आता मात्र फुलं, पानं, दूर्वा या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सजावट केली जाते. मुकुट, कंठी, हातातील इतर दागिन्यांच्या जागी फुलांचीच सजावट केली जाते.