राष्ट्रनिष्ठ म्हणजे सार्वत्रिक बंधुभावना, सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा बिघडेल असे कोणतेही काम न करणे. या अपप्रवृत्तींपासून शेकडो हात दूर राहणे याचे दुसरे नाव राज्यघटनेशी एकनिष्ठ राहणे होय.
मंत्री, खासदार, आमदार, न्यायमूर्ती, राष्ट्रपती, राज्यपाल इथून ते पोलीस निरीक्षकापर्यंत प्रत्येकाला राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते. शपथ घेणे सोपे असते, शपथेचे पालन करणे कठीण असते. काही जण अत्यंत प्रामाणिकपणे घेतलेल्या शपथेचे पालन करतात आणि काही जण शपथ घेणे हा उपचार आहे असे समजून त्यांना जे करायचे आहे ते करीत राहतात. आपले अनेक हिंदी चित्रपट पोलीस अधिकारी, मंत्री, आमदार-खासदार यांच्यावर आधारित आहेत, ते आपण आवडीने पाहतोही. तुम्ही एखादा संवाद असाही ऐकला असेल, जिथे नायक खलनायकी करणार्या पोलीस अधिकार्याला किंवा राजनेत्याला त्याने घेतलेल्या शपथेची आठवण करून देतो.
राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ म्हणजे काय? त्याचा अर्थ ‘मी राजनिष्ठ राहीन आणि राष्ट्रनिष्ठ राहीन’ असा करावा लागतो. राजनिष्ठ म्हणजे राज्याच्या हितसंबंधाला हानी पोहोचेल असे कोणतेही काम मी करणार नाही आणि राष्ट्रनिष्ठ म्हणजे सार्वत्रिक बंधुभावना, सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा बिघडेल असे कोणतेही काम मी करणार नाही. यापासून शेकडो हात दूर राहणे याचे दुसरे नाव राज्यघटनेशी एकनिष्ठतेची शपथ असे आहे.
आपल्याला सतत याचे भान ठेवावे लागते की, आपल्याला प्रबळ राज्याकडून भावनिक ऐक्याने बांधलेल्या एका अजेय राष्ट्राकडे जायचे आहे. केवळ राष्ट्राचा विचार केला, तर आपले राष्ट्र अतिशय प्राचीन आहे. ते वेदकाळापासून आहे. या राष्ट्राच्या हजारो वर्षांच्या इतिहासात शेकडो राज्ये (स्टेट) निर्माण झाली आणि लयाला गेली. साम्राज्ये उभी राहिली आणि ती संपली. राजघराणी उभी राहिली, त्यांचाही अंत झाला. ‘राम, कृष्णही आले गेले’. यामुळे आपले राष्ट्रजीवन कधीही खंडित झाले नाही. गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे अविरतपणे हजारो वर्षे वाहत आहे, तसे आपले राष्ट्रजीवन अखंडितपणे वाहत आहे.
या राष्ट्रजीवनाने काही मूल्ये जपली आहेत. आपण अस्तित्ववादी आहोत. अनेक वेळा लोक शब्दांचे खेळ खेळतात. त्या वादात आपल्याला शिरायचे नाही. अस्तित्ववादाचा अर्थ असा होतो की, हे ब्रह्मांड ज्यात आपली पृथ्वी आली, ज्यात आपला भारत देश आला, त्याचे अस्तित्व अनंत काळापासून स्वयंभू आहे, त्याचा कोणी निर्माता नाही. विश्व हा चैतन्य आणि अक्षय ऊर्जेचा पसारा आहे. या विश्वरचनेतील मनुष्य ही सर्वोत्कृष्ट कृती आहे. जे विश्वात आहे ते मानवात आहे आणि जे मानवात आहे तेच विश्वात आहे. मनुष्यरूपाने आपण सर्व समान आहोत. त्याला आपला शब्द आहे ‘समत्व’. ही समत्व दृष्टी हे आपल्या राष्ट्रजीवनाचे सर्वश्रेष्ठ वैशिष्ट्य आहे.
सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती इत्यादी मूल्ये आपल्या राष्ट्रजीवनाची स्वतंत्र ओळख सांगणारी आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे आपल्या राज्याचे ब्रीदवाक्य आहे. राष्ट्रीय मूल्यातून ते स्वीकारलेले आहे. ‘अहिंसा परमो धर्मः’ हेदेखील आमचे जीवनमूल्य आहे. तो आपला स्वभाव आहे. आपले राज्य शेजारील छोट्या देशांवर आक्रमण करीत नाही. छोट्या देशाचा युक्रेन करणे, सीरिया करणे किंवा इराक करणे, हे आपल्या राष्ट्रीय मूल्यात बसत नाही. आपले राज्य त्याचे पालन करते. आपली राज्यघटना ही आपल्या राष्ट्रीय मूल्यांवर आधारित आहे. हे विस्ताराने समजून घेण्यासाठी संविधान सभेच्या चर्चेचे बारा खंड वाचावे लागतात.
आपल्या सनातन, प्राचीन, राष्ट्रीय मूल्यात आपल्या संविधानाने काही मूल्यांची भर घातली आहे. म्हटलं तर ती नवीन मूल्ये आहेत, म्हटलं तर त्याला प्राचीन संदर्भ आहेत. आपल्या घटनेचे कलम 21 असे आहे, ‘जीवित संरक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्य: कुठल्याही व्यक्तीचे जीवित अथवा व्यक्तिस्वातंत्र्य, विधिनुसार संस्थापित प्रक्रियेस अनुसरून असलेले अपवाद सोडता, हिरावले जाऊ शकणार नाही.’ नुसते हे कलम वाचून त्याचा अर्थ समजणे अवघड आहे. हे कायद्याचे कलम आहे. हा कायदा सर्वोच्च आहे. हा कायदा हे सांगतो की, कोणत्याही व्यक्तीचे जीवन कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय समाप्त करता येणार नाही. साध्या भाषेत सांगायचे तर प्रत्येक व्यक्तीचे जीवन अमूल्य आहे. प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला स्वतःच्या आवडीप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणेस्वतःचा विकास करून घेण्याचे अमर्याद स्वातंत्र्य आहे. हा सर्वाधिक मौलिक अधिकार आहे आणि त्याचा उगम भारतीय तत्त्वदर्शनात आहे. वैदिक तत्त्वज्ञान, भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान, जैन तत्त्वज्ञान, मनुष्यजीवनाची पवित्रता आणि मौलिकता स्वीकारून पुढे जाते. इस्लाम आणि ईसाई धर्मांतदेखील मनुष्यजीवनाच्या मौलिकतेला मान्यता दिलेली आहे.
राज्यघटनेचा कायदा स्वातंत्र्य, समता, उपासना पंथाची विविधता, अभिव्यक्ती आणि विचारांची विविधता, अशी मूल्ये सांगतो. ही मूल्ये राज्यघटना कायद्याच्या भाषेत परिभाषित करते. या कायद्याची अंमलबजावणी राज्याच्या शासनयंत्रणेवर बंधनकारक असते. ही सर्व मूल्ये यापूर्वी आपल्या देशात नव्हती, असे कुणीही म्हणू शकत नाही.
विचारस्वातंत्र्याचा विषय घेऊ. आपल्या देशात सृष्टिनिर्माता कुणी ईश्वर आहे, असा मानणारा एक विचार आहे. या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा कुणी ईश्वर नाही, असा दुसरा विचार आहे. ईश्वर अवतार घेतो, असा एक विचार आहे. ईश्वरच नसल्यामुळे अवतार घेण्याचा प्रश्नच नाही, असा दुसरा विचार आहे. विविध देवता या ब्रह्मांडनायकाच्या विविध शक्ती आहेत. त्यांची मूर्तिपूजा सांगणारा एक वर्ग आणि विचार आहे. दुसरा विचार मूर्तिपूजा थोतांड आहे, पुरोहित वर्गाचा पोट भरण्याचा हा धंदा आहे, असा आहे. ध्यानधारणा आणि समाधी या मार्गानेच अंतिम सत्य जाणता येते, असे सांगणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग सांगतो की, निष्काम कर्म करा, निष्काम भक्ती करा, अंतिम सत्य तुम्हाला गवसेल. विचारांची अशी प्रचंड स्वतंत्रता जगाच्या पाठीवरील कुठल्याही देशात नाही. राज्यघटनेने- कायद्याने हे मूल्य स्वीकारलेले आहे.
राष्ट्राला बांधून ठेवण्याचे काम राष्ट्राची संस्कृती करते. सांस्कृतिक ऐक्याच्या बाबतीत भारताची बरोबरी करील असा कोणताही देश जगात नाही, असे बाबासाहेब म्हणाले होते. युरोपचे उदाहरण घेऊ या. युरोपात अनेक छोटे छोटे देश आहेत, ते ख्रिश्चनधर्मीय देश आहेत. एका स्लाव्ह वंशाचे आहेत. प्रत्येकाच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. राष्ट्र आणि राज्ये वेगळी आहेत. त्यांनी राष्ट्र आणि राज्ये एकच असले पाहिजे अशी मोहीम चालविली आणि ती यशस्वी केली. राज्ये ही राष्ट्राची सैनिकी शक्ती आणि आर्थिक शक्ती असते. या शक्तीच्या आधारे अतिशय प्रबळ राष्ट्र-राज्याची निर्मिती युरोपातील देशांनी केली.
एक येशू, एक बायबल, एक मेरी, एक वंश असूनही युरोपातील देश कधीही युरोप म्हणून एक राष्ट्र झाले नाहीत. आपापसातील त्यांची युद्धे अतिशय विध्वंसक होती. आताही रशिया आणि युक्रेनचे युद्ध चालू आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरीसारख्या देशांना ‘सैनिकी देश’ असे म्हटले गेले, कारण या देशातील प्रत्येक घर म्हणजे सैनिकांचा अड्डा असे त्याचे स्वरूप झाले होतेे. सैनिक म्हटले की शस्त्रे आली आणि सैनिकी शक्ती आली, माणसे मारण्याचे कौशल्य आले.
भारत अशा अर्थाने राष्ट्र नाही. भारत सैनिकी राष्ट्र नाही, शस्त्रधारी राष्ट्र नाही, भारत शास्त्रधारी राष्ट्र आहे. आमचे शास्त्र मानवतेचे शास्त्र आहे. मानवविकासाचे शास्त्र आहे, मानवकल्याणाचे शास्त्र आहे. आम्ही तेव्हा शस्त्रोपासक होतो, जेव्हा शास्त्र रक्षणासाठी शस्त्राशिवाय पर्याय राहत नाही. जेव्हा श्रीकृष्ण सुदर्शन हातात घेतो तेेव्हा समजून सांगण्याचे सर्व उपाय संपून गेलेले असतात. सुदर्शनधारी श्रीकृष्ण आणि भगवद्गीता सांगणारा श्रीकृष्ण हे आपल्या राष्ट्राचे प्रतीक आहेे.
आपल्या संविधानाची निर्मिती होत असताना आपल्या संविधान निर्माणकर्त्या माता आणि पित्यांनी आपल्या या सनातन वारशाचे जागरण वेळोवेळी केले आहे. आम्हाला स्वातंत्र्य का पाहिजे आहे? तर जगातील परतंत्र देशांना मुक्त करण्याची प्रेरणा आम्हाला द्यायची आहे. जागतिक राष्ट्रांच्या समूहात आम्हाला आमचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करायचे आहे, याची जाणीव संविधान सभेतील आपल्या थोर संविधान निर्माणकर्त्यांच्या भाषणातून व्यक्त झाली.
सशक्त राज्याची बांधणी करा आणि मूल्याधारित राष्ट्रजीवनाची उभारणी करा, हा आपल्या संविधानाचा मला समजलेला अर्थ आहे. दुसर्या भाषेत हा संविधानाचा आदेश आहे. संविधानाच्या या आदेशामागे कोणतीही पाशवी शक्ती नाही. ही शक्ती राज्य-राष्ट्र कल्याण शक्ती आहे. आपण तिचे वारस झाले पाहिजे. शेवटी,
संविधान रक्षित, तर राज्य रक्षित
राज्य रक्षित, तर राष्ट्र वर्धित