कोब्रा कमांडो बनलेली
केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची पहिली अधिकारी
(1988)
केंद्रीय राखीव सुरक्षा दलात दाखल होणारी उषा किरण ही काही पहिलीच तरुणी नव्हती; परंतु कोणत्याही विशेष सवलती न मागता, पुरुषांच्या दलात सहभागी होत, बस्तरसारख्या नक्षलग्रस्त भागात एकटीनेच जायला ती तयार झाली होती. बस्तरमधील ज्या ग्रामीण भागात तिचं पोस्टिंग झालं आहे तिथे ती लोकप्रिय आहे. ‘लेडी सिंघम’ म्हणून तिचा नावलौकिक होत आहे.
ही घटना आहे 2018 सालची. ‘व्होग इंडिया’ मासिकाचं त्या वर्षीचं एक मुखपृष्ठ मला आजही आठवतं. त्या मुखपृष्ठावर स्वतःचं करीअर निवडू पाहणार्या तरुण, तडफदार, धाडसी आणि तरीही सुंदर दिसणार्या तरुणींची छायाचित्रं छापली होती. निमित्त होतं ’यंग अचिव्हर ऑफ द इयर’ पुरस्काराचं. ते छायाचित्र स्वाभाविकपणे होतं डिझायनर गाऊन्स घालून रेड कार्पेटवर चालणार्या देखण्या तरुणींचं; पण त्याच वेळेस आणखी एका नियतकालिकात दोन छायाचित्रं छापली गेली होती. त्यातल्या एका छायाचित्रात ’मिस इंडिया’ स्पर्धेत उतरलेल्या 32 सुंदर तरुणी होत्या, तर दुसर्या छायाचित्रात होत्या कमांडो बनलेल्या लष्करी गणवेशातील 32 तरुणी...
लष्करी गणवेशातील या तरुणी छत्तीसगडमधील बस्तर भागात नियुक्त झाल्या आहेत. तिथल्या नक्षलग्रस्त भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तिथल्या नागरिकांना सामान्य पद्धतीनं जीवन जगता यावं यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी. त्यात होती एक धाडसी तरुणी. ती तरुणी होती केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील एक सर्वाधिक तरुण अधिकारी. दलाच्या 232 महिला बटालियनमध्ये दाखल झाल्यानंतर वर्षभराच्या प्रशिक्षण काळात, पुढे कुठे काम करायला आवडेल, या वरिष्ठांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या तरुणीने पसंती दर्शवली होती जम्मू-काश्मीरला अथवा पूर्वोत्तर भारतातील दहशतग्रस्त भागाला. दलानं तिला रुजू करून घेतलं होतं कोब्रा दलात. कोब्रा म्हणजे कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट अॅक्शनमध्ये आणि तिची रवानगी केली होती छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागासाठी...
केंद्रीय राखीव सुरक्षा दलात दाखल होणारी उषा किरण ही काही पहिलीच तरुणी नव्हती; परंतु कोणत्याही विशेष सवलती न मागता, पुरुषांच्या दलात सहभागी होत, बस्तरसारख्या नक्षलग्रस्त भागात एकटीनेच जायला ती तयार झाली होती. उषा किरण मूळची गुरुग्रामची. रसायनशास्त्रातील पदवीधर. तिचे आजोबा आणि वडीलदेखील केंद्रीय राखीव सुरक्षा दलात होते. त्यामुळे शिक्षण झाल्यानंतर केंद्रीय राखीव सुरक्षा दलात जायचं हे तिनं लहानपणीच ठरवलं होतं. गुरुग्राममधील कादरपूर सीआरपीएफ अॅकॅडमीत तिचं बेसिक ट्रेनिंग पार पडलं. ते सुरू असतानाच तिनं मनाशी निश्चित केलं होतं छत्तीसगडसारख्या आव्हानात्मक प्रदेशात काम करण्याचं. सुदैवानं तिला बस्तरमध्ये पोस्टिंग मिळालं. सीआरपीएफच्या काऊंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्सची माहिती तिला मिळाली आणि तेच काम तिला आव्हानात्मक वाटलं. तिनं ते स्वीकारलं आणि ती कोब्रा बनली.
उषा किरण ही मुळातली उत्तम अॅथलीट, ट्रिपल जंप प्रकारात ती दिल्लीचं प्रतिनिधित्व करत असे. तिचे वडील दरवर्षी तिला राजधानीतील राजपथावर घेऊन जात. कडक शिस्तीतल्या आणि लष्करी पोशाखातल्या स्त्रिया आणि पुरुषांचा संचलनातला वावर तिला आकर्षित करत असे. आपल्याला अशा संचलनात कधी भाग घ्यायला मिळणार, असा प्रश्न तिला पडत असे. जसजशी ती मोठी होत गेली, सुरक्षा दलाचं, सैन्यदलाचं काम जसजसं तिला समजत गेलं, तसतसं सैन्यात जाणं म्हणजे कडक इस्त्रीचे कपडे घालून राजपथावर संचलनात मिरवणं नव्हे हे तिच्या ध्यानात येत गेलं. जवानांना सामोर्या जाव्या लागणार्या परिस्थितीचं भान तिला येत गेलं आणि तिचं केंद्रीय राखीव सुरक्षा दलात जाणं अधिकाधिक पक्कं होत गेलं.
कोब्रा युनिट हे मुळातच गोरिला युद्धतंत्र वापरून जंगल भागातील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी स्थापन केलेले युनिट. ते 10 बटालियन कमांडो फोर्सचा एक विभाग मानलं जातं. पुरुषांसाठीच्या शारीरिक क्षमता स्त्रियांसाठीदेखील तशाच असतात, त्यात कोणतीही शिथिलता दिली जात नाही. विशिष्ट अंतर धावून जाण्यासाठी पुरुषांना जेवढा वेळ लागणं अपेक्षित असेल, तेवढाच वेळ, तितकीच मिनिटं-तितकेच सेकंद स्त्रियांनाही दिले जातात. उषा किरण ही या दलातील पहिलीच महिला होती. तिच्यापाठोपाठ तिथे नियुक्ती झाली आहे अर्चना गौरा नावाच्या तरुणीची. ती आहे कोंडागावमध्ये. तिचं यशस्वी होणं, तिनं शारीरिक क्षमता सिद्ध करणं यावर भविष्यातील बर्याच गोष्टी अवलंबून राहणार्या होत्या. ती अपयशी ठरली असती तर महिलांचा भविष्यातील या विभागातील प्रवेश रोखला जाणार होता. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर बस्तरमधल्या ज्या भागाची सुरक्षा तिच्यावर सोपवण्यात आली, तिथलं नियोजन तिलाच करायचं होतं. त्या नियोजनात ती यशस्वी झालीच; परंतु सहकारी जवानांचा विश्वासही तिनं संपादित केला. त्यांच्या डोळ्यांतले ते विश्वासाचे भाव तिची हिंमत वाढवणारे ठरले.
बस्तरमधील ज्या ग्रामीण भागात तिचं पोस्टिंग झालं आहे तिथे ती लोकप्रिय आहे. महिलांचा तिच्यावर विश्वास आहे. पुरुष जवान आणि अधिकार्यांशी बोलायला ग्रामीण महिला कचरतात, घाबरतात; परंतु उषा किरणशी त्या मोकळेपणानं बोलतात. बस्तरच्या त्या विशिष्ट भागाची सुरक्षा आणि अतिरेक्यांवर नियंत्रण एवढ्यापुरतंच मर्यादित आपलं काम नाही हे तिनं मनापासून जाणलं आहे. त्यामुळे गावातल्या शाळकरी मुलींचा अभ्यास घेणं, त्यांच्या अडचणी सोडवणं यासाठी ती वेळ काढत असते. आदिवासी महिलांच्या हाती एके-47 देण्यापेक्षा पाटी-पेन्सिल दिली पाहिजे, त्यांचं मन घडवलं पाहिजे, नक्षलवादाविरोधात आपणच उभं राहिलो तर पुढची पिढी त्या मार्गाकडे वळणार नाही हे त्यांनी ओळखलं. त्यामुळेच त्यांच्यावर संस्कार घडविण्यावर भर दिला पाहिजे, असं उषा किरण सांगत असते. संजय यादव हे तिचे वरिष्ठ सहकारी. ते म्हणतात, माओवाद्यांच्या शोधात राखीव सुरक्षा दलाच्या तुकड्या गावागावांत जाऊ लागल्या, की उषा किरणच्या उपस्थितीमुळे गावकर्यांचं सहकार्य मिळतं असा आमचा अनुभव आहे. राखीव दलाच्या तुकड्या गावागावांत घुसून महिलांवर अत्याचार करतात, या नक्षलींच्या आरोपांना एक महिला अधिकारी आमचं नेतृत्व करते यानंच परस्पर उत्तर मिळत असे.
‘व्होग इंडिया’चा पुरस्कार घ्यायला ती सुरक्षा दलाच्या गणवेशात गेली, तेव्हा झालेला टाळ्यांचा कडकडाट आसमंत दुमदुमून टाकणारा होता. उषा किरण पुरस्कार स्वीकारायला मंचावर आली तेव्हा तिचा परिचय करून देताना ‘लेडी सिंघम’ असा शब्दप्रयोग वापरला. उषा म्हणते, तुम्हाला समजून घेणारे कुटुंबीय असेल तर अशा जंगलभागात, पुरुषांच्या साथीने महिनोन्महिने काम करतानाही मानसिक दडपण येत नाही. उषा आपल्या यशाचं मोठं श्रेय त्यामुळेच आपल्या वडिलांना आणि कुटुंबीयांना देते. ‘अन्य सर्व गोष्टी दुय्यम, नोकरी-जबाबदारी प्रथम’ या त्यांच्या शिकवणुकीमुळेच मी उत्तमरीत्या काम करू शकते, असं ती म्हणते, जे खूप काही सांगून जाते.