इतिहास घडविणारी नेमबाज

विवेक मराठी    05-Aug-2024   
Total Views |
paris olympics 2024  
भारताचे एकूण 117 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची सुरुवात फार आश्वासक झाली नाही; पण 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धा सुरू झाली आणि अखेर भारताला पदक तक्त्यात जागा मिळाली. मनू भाकरने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. त्यानंतर सरबज्योत सिंगबरोबर तिने मिश्र सांघिक कांस्य पदकही पटकावलं. ह्या विजयामुळे अनेक विक्रम तिच्या नावावर नोंदले गेले. भारताचा गेल्या 12 वर्षांचा नेमबाजीतील पदकांचा दुष्काळही संपला आणि इतिहास रचला गेला.
27 जुलै 2024, ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. काही खेळ 25 तारखेलाच सुरू झाले होते. ह्या वेळची ऑलिम्पिक नगरी आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस. जगभरातील क्रीडारसिक अगदी आतुरतेने दर चार वर्षांनी येणार्‍या ह्या क्रीडामेळ्याची वाट बघत असतात. जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा खेळ पाहणं ही एक पर्वणीच असते. 2020चं टोकियो ऑलिम्पिक कोविडमुळे 2021 मध्ये पार पडलं, त्यामुळे ह्या वेळी दोन ऑलिम्पिक्समधील अंतरही कमी होतं. दर वेळी उद्घाटन सोहळा मोकळ्या जागेत आयोजित होत असतो. पॅरिस ऑलिम्पिकच्या वेगळेपणाची सुरुवात तिथेच झाली. हा सोहळा पॅरिसमधून वाहणार्‍या सिएन नदीत पार पडला. प्रत्येक देशाच्या खेळाडूंसाठी कॅमेरा आणि अन्य साधनांनी सुसज्ज असलेल्या बोटींची व्यवस्था करण्यात आली होती. खेळाडूंची परेड अशा प्रकारे पार पडली.
 
पॅरिसमध्ये भारत
 
भारताचे एकूण 117 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये 70 पुरुष खेळाडू आणि 47 महिला खेळाडूंचा समावेश आहे. विविध 16 खेळांमध्ये पदक मिळवण्यासाठी हे खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. उद्घाटन सोहळ्यामध्ये भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू; दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारी पी.व्ही.सिंधू आणि टेबल टेनिसमधील अनुभवी खेळाडू अचंता शरथ कमल हे दोघे भारताचे ध्वजवाहक होते.
 
सुरुवातीच्या दिवसांमधील भारताची कामगिरी
 
भारताची सुरुवात तिरंदाजी ह्या खेळाने झाली. महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात यशस्वी झाले होते. दोन्ही संघांनी थेट उपांत्य फेरीत प्रवेशही केला, मात्र त्यानंतर अत्यंत खराब कामगिरी करून दोन्ही संघ स्पर्धेबाहेर गेले. दीपिका कुमारी आणि तरुणदीप रॉय हे दोघे तर चौथं ऑलिम्पिक खेळत होते; पण संघातील नवोदितांची कामगिरी ह्या दोघांपेक्षा समाधानकारक होती, असं म्हणायची वेळ आली. एकेरीच्या स्पर्धेत ह्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा आहे.
टेबल टेनिसमध्ये शरथ कमल पहिल्याच फेरीत धक्कादायकरीत्या गारद झाला. मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला उपांत्यपूर्व फेरीत बाद झाल्या. टेनिसमध्ये सुमित नागल आणि बोपन्ना-बालाजी जोडी हेही पहिल्या फेरीतच बाहेर पडले. नेमबाजांनीही सुरुवातीला निराश केलं होतं; मात्र पुढे ह्याच खेळाने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. अर्जुन बबुता 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानी राहिला आणि त्याचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं. नेमबाजीतील यशाबद्दल आपण ह्या लेखात पुढे वाचणारच आहोत.
 
 
निखत झरीन, लवलीना बोरगोहेन ह्यांनी त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. पुढच्या फेरीत दोघींसमोरही अवघड आव्हान असणार आहे. पुढे काय होतं ते कळेलच. हॉकी, बॅडमिंटनमध्येही चांगली सुरुवात झाली आहे, मात्र त्या स्पर्धांमधील खरं आव्हान पुढच्या काही फेर्‍यांमध्ये सुरू होईल. भारताचा ऑलिम्पिक पात्रता मिळवलेला एकमेव घोडेस्वार अनुष अगरवाला अंतिम फेरी गाठू शकला नाही. भारतीय पथकातील सर्वात लहान खेळाडू, 14 वर्षीय जलतरणपटू धिनिधी देसिंगू आणि श्रीहरी नटराजन हे दोघेही पुढच्या फेरीची पात्रता मिळवू शकले नाहीत. बलराज पनवर हा भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेला खेळाडू नौकानयन (ीेुळपस-ीळपसश्रश ीर्लीश्रश्र) स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याच्याकडून पदकाची अपेक्षा नव्हतीच, पण पात्रता फेरीत स्वतःची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी करून तो सगळ्यांच्या कौतुकाला पात्र ठरला.
 
सुरुवातीचे चार-पाच दिवस अशा प्रकारे भारतासाठी संमिश्र होते.
 
paris olympics 2024

मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली तिन्ही पदके ही नेमबाजीतीलच आहेत. स्वप्निलनेही यातच पदक पटकावल्याने भारतीय खेळाडूंची नेमबाजीत कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. 
  
नेमबाजी
 
भारताचे एकूण 21 नेमबाज ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरले. सुरुवात फारशी आश्वासक नव्हती, मात्र त्यानंतर 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धा सुरू झाली आणि अखेर भारताला पदक तक्त्यात जागा मिळाली. मनू भाकरने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. त्यानंतर सरबज्योत सिंगबरोबर तिने मिश्र सांघिक कांस्य पदकही पटकावलं. ह्या विजयामुळे अनेक विक्रम तिच्या नावावर नोंदले गेले. भारताचा गेल्या 12 वर्षांचा नेमबाजीतील पदकांचा दुष्काळही संपला.
 
 
मनू भाकर
 
22 वर्षीय मनूचं नाव आज सर्वतोमुखी झालं आहे; पण पॅरिसमध्ये पदक मिळेपर्यंतचा प्रवास तिच्या संयमाची परीक्षा बघणारा होता. अगदी लहानपणापासून मनूला खेळांची आवड होती. मार्शल आर्ट्स, बॉक्सिंग, स्केटिंग, टेनिस अशा अनेक खेळांमध्ये ती पारंगत होती. 14व्या वर्षापर्यंत तिने ह्या सर्व खेळांमध्ये अनेक बक्षिसेही जिंकली होती. त्यानंतर मात्र तिला नेमबाजीची आवड निर्माण झाली आणि अल्पावधीतच तिने त्यातही प्रावीण्य मिळवलं. जसपाल राणा हा भारताचा माजी खेळाडू त्या वेळी भारताच्या युवा नेमबाजी संघाचा प्रशिक्षक होता. त्याच्याच मार्गदर्शनाखाली मनूचा प्रवास सुरू झाला.
 
 
2018 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी मनू राष्ट्रकुल स्पर्धेत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदक जिंकली. त्याच वर्षी तिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पदक मिळवून अशी कामगिरी करणारी सर्वात लहान वयाची भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.
युथ ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्ण पदक मिळवलं आणि पुन्हा एकदा दोन विक्रम तिच्या नावावर नोंदले गेले.
 
 
1. युथ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आणि 2. पहिली भारतीय नेमबाज
2020(21) पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता तिने मिळवली आणि तिच्या चाहत्यांना पदकाची आस लागली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेली मनू टोकियोत मात्र अगदी हतबल ठरली. ऐन वेळी पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे तिला स्पर्धा सुरू असताना मध्येच थांबावं लागलं. ती पुन्हा रेंजवर परतली, मात्र कामगिरी मनासारखी होऊ शकली नाही. तिने भाग घेतलेल्या एकाही स्पर्धा प्रकारात तिला यश मिळालं नाही. त्यानंतर प्रशिक्षक जसपाल राणा ह्यांच्याशी वाद झाला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. मनू आणि संपूर्ण नेमबाजी संघ आणि प्रशिक्षकांनाही देशवासीयांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ‘यशाला अनेक बाप असतात, अपयश मात्र अनाथ असतं.’ टोकियोनंतर मनू मानसिकरीत्या खचली, जसपाल राणादेखील नॅशनल रायफल असोसिएशनपासून दूर गेला. मनू खेळ सोडण्याच्या निर्णयावर येऊन ठेपली होती. मात्र हे नियतीला मंजूर नव्हतं. मानसिक स्वास्थ्यासाठी तिने ध्यानधारणा, वाचन अशा अनेक गोष्टींना सुरुवात केली. पहिलं पदक मिळवल्यावर तिने आवर्जून भगवद्गीतेतील उपदेशाचा उल्लेख केला, ‘कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका’. मनूला फळही मिळालंच. जसपाल राणाशी झालेल्या मतभेदांमुळे तिला नवीन प्रशिक्षकांची गरज निर्माण झाली. साधारण अठरा महिन्यांच्या कालावधीत तिने चार प्रशिक्षक अजमावून बघितले. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या मूळ प्रशिक्षकाशी म्हणजे जसपाल राणाशी संपर्क साधला. जुन्या कटू आठवणींमुळे तिच्या जवळच्या काही लोकांनी तिला असं करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तर अनेक चाहत्यांनीही त्यांची नाराजी व्यक्त केली. मात्र मनू निर्णयावर ठाम होती. त्याच निर्णयाची फळं आज पाहायला मिळत आहेत. जसपाल राणा भारतीय नेमबाजी संघाचा अधिकृत प्रशिक्षक नसल्यामुळे आणि अन्य काही नियम/मर्यादांमुळे त्याला पॅरिसला जातानाही अडचणी आल्या. स्पर्धेच्या ठिकाणीही खेळाडूच्या मागे बसायला परवानगी मिळाली नाही. स्टँडमध्ये इतर प्रेक्षकांमध्येच त्याची जागा होती. मात्र तरीही जसपालची उपस्थिती मनूला सतत आश्वस्त करत होती हे निर्विवाद सत्य आहे.
 
 
ह्या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडं होईल. जसपालशी पुन्हा संपर्क साधणारी मनू आणि मोठ्या मनाने मागचं सगळं विसरून तिला मार्गदर्शन करणारा जसपाल.
 
 
आज देशभरात सर्व स्तरांतून मनूचं कौतुक होत आहे. प्रशिक्षक म्हणून राणाही किती खूश असेल ह्याचा आपण अंदाज बांधू शकतो.
 
 
ह्या ऑलिम्पिकमध्ये मनूची आणखी एक स्पर्धा शिल्लक आहे, त्यातही तिने पदक मिळवलं तर ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठीच संस्मरणीय ठरेल.
 
 
10 मीटर एअर पिस्तूल एकेरी स्पर्धा
 
मनूने अगदी सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने खेळ केला. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी झालेल्या पात्रता फेरीत ती तिसर्‍या क्रमांकावर होती, अंतिम फेरीतही तोच क्रमांक टिकून राहिला. खरं तर रौप्य पदकाचीही तिला संधी होती, मात्र ते थोडक्यात हुकलं.
 
 
10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धा
 
पहिल्या पदकाचा आनंद साजरा करत असताना पुढीलस्पर्धेकडेही तिचं लक्ष होतं. मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंग आणि मनू ह्या जोडीने कांस्य पदक पटकावलं. सरबज्योत वैयक्तिक प्रकारात पदकापर्यंत पोहोचला नाही, मात्र ते अपयश मागे सारत इथे त्याने गरजेच्या वेळी आपला खेळ उंचावला आणि भारताला दुसरं पदक मिळवून देण्यातला आपला वाटा उचलला. हा सामना कोरियन जोडीविरुद्ध झाला होता, त्यापैकी एक कोरियन खेळाडू ह्याच ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत दोन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली आहे. अशा संघाविरुद्ध खेळताना कोणताही अतिरिक्त ताण न घेता, संयमाने खेळून भारतीय जोडीने सर्व देशवासीयांना आणखी एक आनंदाचा क्षण मिळवून दिला.
 
 
ह्या दोन कांस्य पदकांनंतर मनू भाकर स्वातंत्र्योत्तर भारतातील अशी एकमेव खेळाडू ठरली आहे, जिने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवली आहेत. सुशीलकुमार आणि पी.व्ही. सिंधू हे दोन पदके मिळवणारे अन्य भारतीय खेळाडू आहेत; पण ही दोन पदके त्यांनी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक्समध्ये मिळवली होती. मनूचा प्रवास पुढे दीर्घकाळ असाच सुरू राहावा, तिने उत्तरोत्तर यश मिळवावं ह्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
उर्वरित स्पर्धांसाठी सर्वच खेळाडूंना शुभेच्छा.
जय हिंद!