सांविधानिक राष्ट्रवाद याचा अर्थ संविधानाच्या कायद्यावर निष्ठा आणि संविधानाने प्रतिपादिलेल्या मूल्यांवर निष्ठा. राष्ट्रनिष्ठेचे हे दोन स्तंभ आहेत. त्याची मूलतत्त्वे कोणती? ओळख कोणती? हे आपण या लेखात समजून घेऊ या.
मागील लेखात ‘सांविधानिक राष्ट्रवाद’ असा शब्दप्रयोग केला आहे. ‘सांविधानिक राष्ट्रवाद’ ही काय नवीन भानगड आहे, असा प्रश्न काही वाचकांच्या मनात निर्माण झाला असेल. म्हणून प्रथम त्याचा खुलासा करणे आवश्यक. ‘राष्ट्रवाद’ या शब्दाच्या अगोदर वेगवेगळे शब्द लावले जातात. हिंदू राष्ट्रवाद, इस्लामिक राष्ट्रवाद, ख्रिश्चन राष्ट्रवाद, सेक्युलर राष्ट्रवाद, हिंदी राष्ट्रवाद, आर्थिक राष्ट्रवाद, सामाजिक राष्ट्रवाद इत्यादी. युरोपमधील काही विद्वान ‘कॉन्स्टिट्यूशनल पॅट्रोइटिझम’ असा शब्दप्रयोग करतात, त्यावर पुस्तकेदेखील आहेत. ‘सांविधानिक देशभक्ती’ असा त्याचा मराठी अर्थ करता येतो.
युरोपातील राष्ट्रवादाचा जन्म एकोणिसाव्या शतकात झाला. त्याचे वैशिष्ट्य असे की, एका भूमीवर राहणार्या जनसमूहाचे राज्य (स्टेट) आणि राष्ट्र एकच असले पाहिजे. त्याला शब्द आहे नेशन-स्टेट. एक भाषा बोलणारे, एका धर्माचे, एक परंपरा, इतिहास आणि जीवनमूल्य मानणार्या व्यक्तींचा समूह म्हणजे राष्ट्र, अशी युरोपियन राष्ट्रवादाची परिभाषा आहे. या राष्ट्राचे राज्य म्हणजे राज्याचे शासन, राज्याचे सार्वभौमत्व. राज्याचे शासन राज्याला सैनिकीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ करते. राज्य प्रबळ झाले की, राज्य आणि राष्ट्र समव्याप्त संकल्पना मानल्यामुळे राष्ट्रदेखील सैनिकीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ होते.
जर्मनीचे याबाबतीत उदाहरण घेण्यासारखे आहे. जर्मन भाषिक लोक प्रशियन साम्राज्याचे भाग होते. हे लोक वेगवेगळ्या छोट्या छोट्या राज्यांत विखुरलेले होते. ते एकभाषिक होते. त्यांना ऑटो व्हॉन बिस्मार्क यांचे नेतृत्व लाभले. त्याने सर्व जर्मन राज्यांचे एकत्रीकरण केले आणि जर्मन राज्य-राष्ट्राची पायाभरणी केली. कमी-अधिक प्रमाणात त्याचे अनुकरण युरोपातील अन्य देशांनी केले. पोलंड, हंगेरी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड इत्यादी राष्ट्रे उभी राहिली. तुर्कस्तानात हे काम केमाल अतातुर्क याने केले. हा राज्य-राष्ट्रवाद अतिशय आक्रमक झाला. जर्मनी त्यात आघाडीवर राहिला. ब्रिटननेदेखील आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. आर्थिक साधनसंपत्तीसाठी आणि भूमी संपादन करण्यासाठी या राष्ट्रांमध्ये निरंतर संघर्ष सुरू झाले.
हा कालखंड युरोपियन वसाहतवादाचा कालखंड आहे. आफ्रिका, आशिया खंडांतील अनेक देशांत युरोपातील या राष्ट्रांनी आपला शिरकाव केला. ते देश आपल्या ताब्यात घेतले. तेथील साधनसंपत्ती लुटली आणि आपले देश समृद्ध केले. युरोपियन वसाहतवाद हा स्पर्धेचा विषय झाला आणि त्यातून मग संघर्ष सुरू झाले, युद्धे सुरू झाली. पहिले आणि दुसरे महायुद्ध त्यातून निर्माण झाले.
या आक्रमक राष्ट्रवादाविरुद्ध विचारवंतांनी चळवळ सुरू केली. राष्ट्रवाद हा मानवजातीला घातक आहे आणि तो मनुष्यसंहारक आहे, अशा प्रकारची मांडणी सुरू झाली. याच कालखंडात लोकशाही मूल्ये प्रबळ होत गेली. एकाधिकारशाही असणारे देश हळूहळू लोकशाहीवादी बनत गेले. पुन्हा जर्मनीचे उदाहरण द्यायचे तर हिटलरशाहीकडून जर्मनीचा प्रवास लोकशाहीकडे झाला. इटलीतही मुसोलिनीच्या फॅसिझमकडून लोकशाहीकडे प्रवास सुरू झाला. लोकशाही राजवटीसाठी लिखित राज्यघटना अत्यावश्यक झाली. लोकशाही राज्यघटनेची दोन मूलतत्त्वे स्वीकारली गेली. पहिले मूलतत्त्व ‘सर्व सत्तेचा उगम प्रजा असेल’ आणि दुसरे मूल्य ‘शासनकर्ते कोण असावेत, याचा निर्णय प्रजा करील’. लोकशाहीला पर्यायी शब्द ‘प्रजातंत्र’ असाही वापरला जातो. लोकशाही स्वीकारलेल्या देशांनी या मूलतत्त्वांचा अंगीकार केला.
या दोन मूलतत्त्वांना धरून लोकशाही मूल्यांचा विचारदेखील पुढे आला. या लोकशाही मूल्यांत व्यक्तिस्वातंत्र्य, ज्याला इंग्रजी शब्द आहे लिबर्टी. लिबर्टीचा अर्थ होतो मुक्तता. व्यक्तिविकासाच्या आड येणार्या सर्व कृत्रिम बंधनांतून व्यक्तीची मुक्तता असा याचा अर्थ होतो. व्यक्तिस्वातंत्र्याबरोबर मानवाधिकाराचा विषयदेखील मूल्य म्हणून स्वीकारला गेला. मानवाधिकारात व्यक्तीच्या जीवन जगण्याचा अधिकार, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, उपासनास्वातंत्र्य असे सर्व विषय आले. संविधानाचा कायदा आणि लोकशाहीची मूल्ये यांच्यावर निष्ठा म्हणजे सांविधानिक देशभक्ती असा याचा सोपा अथर्र् होतो. यालाच सांविधानिक राष्ट्रवाद असेही म्हणतात.
भारतीय राज्यघटनेचा विचार करता आपला राष्ट्रवाद युरोपच्या राष्ट्रवादातून उत्पन्न झालेला नाही, हे प्रथम लक्षात घ्यायला पाहिजे. आपली राष्ट्र ही संकल्पना अतिशय प्राचीन आहे. राष्ट्र हा शब्द वेदात आहे, वैदिक वाङ्मयात आहे. आमचे राष्ट्र बलशाली होवो, ओजस्वी होवो, समृद्ध होवो, अशा वैदिक प्रार्थनाही आहेत. भगवान गौतम बुद्ध यांना संबोधि प्राप्त होण्यापूर्वी एक स्वप्न पडले. या स्वप्नात त्यांनी पाहिले की, त्यांचे मस्तक काश्मीरमध्ये आहे, एक हात गांधार (अफगाणिस्तान) देशापर्यंत आहे, दुसरा तिबेटपर्यंत आहे आणि पाय कन्याकुमारीपर्यंत आहे, हे आपले राष्ट्रदर्शन आहे.
युरोपात लोकशाही संकल्पनेचा जन्म 1789च्या फ्रान्स राज्यक्रांतीनंतर झाला, असे इतिहासकार सांगतात. भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या दोघांचा कालखंड 2600 वर्षांपूर्वीचा आहे आणि या दोघांचाही जन्म राजपुत्र म्हणून गणतंत्र राजवटीत झाला. तेव्हाची पद्धत अशी होती की, प्रजा सभागृहात जमून आपले शासक निवडीत असे आणि एकमताने निर्णय करून (बहुमताने नव्हे) राज्य शासन चालवीत असत. ही गणराज्ये छोटी होती. अशी गणराज्ये तेव्हा अनेक ठिकाणी होती. भगवान गौतम बुद्धांनी वैशालीच्या प्रजेला गणतंत्राच्या संदर्भात केलेला उपदेश आणि सांगितलेली सात सूत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. यामुळे लोकशाही आम्हाला माहीत नव्हती, ती आम्ही ब्रिटन, फ्रान्सकडून घेतली, असे म्हणणे अज्ञानमूलक आहे.
आपली राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटना समिती अस्तित्वात आली. पू. डॉ. बाबासाहेब लेखा समितीचे अध्यक्ष झाले. घटना समितीत झालेली चर्चा त्यांनी घटनेच्या कायदेशीर भाषेत कलमबद्ध केली. भारतीय इतिहासाचे, भारतीय धर्मतत्त्वज्ञानाचे आणि घटनात्मक कायदेविषयक ज्ञानाचे ते महापंडित होते. आपल्या प्राचीन लोकपरंपरेचे त्यांना ज्ञान होते. त्याचे प्रतिबिंब राज्यघटनेच्या विविध कलमांत पाहायला मिळते. या दृष्टीने आपल्या राज्यघटनेचा अभ्यास फार कमी लोक करतात, हे आपले दुर्दैव.
राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. हा कायदा देशाची वैचारिक परंपरा, मूल्य परंपरा यांच्यावर आधारित असावा लागतो. उदा. आपला घटनात्मक कायदा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित आहे. हे शब्द केवळ शब्द नसून गहन विचार आहेत आणि जीवनमूल्ये आहेत. विचार आणि जीवनमूल्ये यांचा संगम म्हणजे सांविधानिक कायदा असतो.
सांविधानिक देशभक्ती किंवा सांविधानिक राष्ट्रवाद याचा अर्थ असा होतो की, आपल्या प्रथम निष्ठा संविधानाच्या कायद्यावर आणि संविधानाने आपल्या विचारपरंपरेतून आलेल्या मूल्यांवर असली पाहिजे. राष्ट्रनिष्ठा हा हवेतील शब्द नाही, ती परिभाषित करावी लागते. निष्ठा कशावर ठेवायची, हे स्पष्ट करावे लागते. ज्याच्यावर निष्ठा ठेवायची, ती गोष्ट निष्ठा ठेवण्याच्या योग्यतेची आहे का, याचा विचार करावा लागतो. निष्ठा याचा अर्थ विश्वास, आदर, सन्मान आणि समर्पण. निष्ठा या शब्दाअगोदर व्यक्ती, धर्म, परिवार इत्यादी शब्द लावता येतात. त्याचे अर्थ त्या त्या शब्दानुसार बनत जातात. उदा. व्यक्तिनिष्ठा ही अनेक वेळा आंधळी निष्ठा होते. पू. डॉ. बाबासाहेबांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. आपण विचारनिष्ठ आणि मूल्यनिष्ठ असले पाहिजे.
या दृष्टीने विचार केला तर ज्यावर पूर्ण निष्ठा ठेवावी असे आपले संविधान आहे. या संविधानात आपला प्राचीन विचार आहे आणि आपली जीवनमूल्येदेखील आहेत. मनुष्यजीवन जगताना अन्न, वस्त्र, निवारा यांची आवश्यकता असते, तशीच विचार आणि मूल्यांचीही तेवढीच आवश्यकता असते. विचार आणि मूल्ये नसतील तर मनुष्य आणि पशू यात काही फरक राहत नाही. राज्यघटनेच्या दृष्टीने आपण मानव आहोत, म्हणून विचारनिष्ठ आणि मूल्यनिष्ठ राहणे हे आपले परमकर्तव्य आहे.
मूल्य आणि नैतिकता याचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे आणि येथे धर्माचे स्थान खूप महत्त्वाचे ठरते. अमेरिकेचे राष्ट्रपिता जॉर्ज वॉशिंग्टन यांचे समारोपाचे भाषण अतिशय मनन आणि चिंतन करण्यासारखे आहे. त्यातील शेवटची तीन-चार वाक्ये येथे देतो, ‘धर्माशिवाय नैतिकता टिकवून ठेवता येईल, यावर विश्वास ठेवण्याआधी आपल्याला ही सावधगिरी बाळगणे भाग आहे. एखाद्या विशिष्ट संरचनेतील परिष्कृत शिक्षणाचा मनावरील प्रभाव कितीही मान्य केला तरी धार्मिक तत्त्वांना सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय नैतिकता टिकेल, अशी अपेक्षा करण्यास कार्यकारणभाव आणि अनुभव या दोन्ही गोष्टी साफ मनाई करतात.’
सांविधानिक राष्ट्रवाद याचा अर्थ संविधानाच्या कायद्यावर निष्ठा आणि संविधानाने प्रतिपादिलेल्या मूल्यांवर निष्ठा. राष्ट्रनिष्ठेचे हे दोन स्तंभ आहेत.