ज्योतिर्लिंगांची पावन भूमी

विवेक मराठी    02-Aug-2024   
Total Views |
मराठवाड्याला पवित्र भूमी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मराठवाड्यात प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंगे आहेत. श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी शिवभक्तगण देशभरातून मराठवाड्यात येतात.
Kolahapur
 
मराठवाडा संतांची भूमी, मराठीचे माहेर म्हणून जसा ओळखला जातो, तसाच प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंगे असलेली पवित्र भूमी म्हणूनही ओळखला जातो.
 
ही ज्योतिर्लिंगे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील पूर्णस्थान श्रीघृष्णेश्वर मंदिर, बीड जिल्ह्यातील परळी येथे वसलेले श्रीवैद्यनाथ मंदिर आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील श्रीनागनाथ (नागेश्वर) मंदिर!!
 
 
चातुर्मासात, त्यातही विशेषतः श्रावणात या मंदिरांत केवळ परिसरातील नव्हे, तर देशभरातील शिवभक्त दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीलादेखील भाविकांची अलोट गर्दी उसळते!
 
ही मंदिरे अतिप्राचीन आहेत. या मंदिरांविषयीच्या पौराणिक कथा आहेत आणि ऐतिहासिक कथा आहेत आणि दंतकथाही आहेत!
कितीदा तरी इस्लामी आक्रमणे झाली, त्यात मंदिरे तोडण्यात आली; परंतु नंतर शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे, माळव्याच्या राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या जाणत्या राज्यकर्त्यांनी मंदिरे पुनरुज्जीवित केली, वसवली!
 
वेरूळ येथील पूर्णस्थान श्री घृष्णेश्वर मंदिर : पौराणिक कथा
 
देवगिरी पर्वताच्या पायथ्याशी सुधर्मा हा तपोनिधी ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुदेहा हे राहत होते. नित्यनेमाने स्वाध्याय, तप करावे. आजूबाजूच्या घरांतील पूजाअर्चा, पौरोहित्य करावे आणि मिळेल त्या भिक्षेवर व दक्षिणेवर चरितार्थ चालवावा असे त्यांचे जीवन सुरू होते. या संसारचित्रात एक दुःख होते ते म्हणजे पोटी संतान नव्हते. सुदेहाने पतीचे मन वळवून आपल्या सख्ख्या बहिणीशी घुष्माशी त्याचा दुसरा विवाह लावून दिला. घुष्मा शिवभक्त होती. ती दररोज एकशेएक मृत्तिका शिवलिंग करीत असे, त्यांना तांदूळ, फुले वाहत असे. नंतर नदीत विसर्जन करून मगच पाणी पीत असे. ती संसार सुरू झाला तरी आपल्या व्रताचे पालन करत होती. काही काळातच तिने सुलक्षणी पुत्रास जन्म दिला. घरात आनंद पसरला. दोघी बहिणी मुलाला वाढवू लागल्या. मुलगाही शिवभक्त होता.
 
 
मुलगा मोठा झाला, त्याचे लग्न झाले. सुनेला दिवस गेले. यथाकाल एक देखणा नातू जन्माला आला. त्या वेळी सुदेहाच्या मनात पाप शिरले. तिने विचार केला की, घुष्माच्या मुलाचे काम आता संपले, त्याचा पुत्र तो आमचा नातू आहे. तो जिवंत राहिला तर घुष्मा वरचढ राहील. तिने त्या मुलाला विष देऊन मारले आणि तळ्यात टाकून दिले. हे तेच तळे होते जेथे घुष्मा आपली पार्थिव शिवलिंगे विसर्जित करत होती.
 
Kolahapur 
मुलगा दिसत नाही हे पाहून सासू-सून रडू लागल्या, शोध घेऊ लागल्या. घुष्माने त्याही परिस्थितीत पार्थिव मृत्तिका शिवलिंगे तयार केली व तळ्याकाठी गेली. पूजन करून विसर्जन करणार तोच तळ्यातून स्वतः शंकर भगवान तिच्या मुलाला घेऊन अवतरले. तिने मुलाला जवळ घेतले आणि नंतर शंकराच्या पायी लोटांगण घातले. शिवशंकर सुदेहाला शासन करणार होते; पण घुष्माने क्षमा केली. तिने महादेव शंकराला विनंती केली की, आपण लिंगरूपाने या स्थानी राहावे आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. म्हणून हे शिवलिंग घुष्मेश्वर या नावाने ओळखले जाते. कालौघात हे नाव घृष्णेश्वर झाले.
 
 
घृष्णेश्वर मंदिर हे बारावे अर्थात शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. हे ज्योतिर्लिंग पृथ्वीवरील पूर्णस्थान मानले जाते, कारण यानंतर ज्योतिर्लिंग अन्यत्र कुठेही प्रकट होणार नाही. या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली असता भाविकांचे नवस फळाला येतात, अशी मान्यता आहे.
 
 
ऐतिहासिक पार्श्वभूमी
 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ येथे जगप्रसिद्ध अशी कैलास लेणी आहेत. तेथून जवळच घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
हे प्राचीन मंदिर महाकाव्य व पुराणकाळापासून चालत आलेले आहे. रामायण, महाभारत, शिवपुराण, स्कंदपुराण या ग्रंथांत मंदिराविषयीचे उल्लेख येतात. येळगंगा ही नदी मंदिराच्या जवळ आहे. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर किती तरी वेळा आक्रमकांनी उद्ध्वस्त केले. जवळच्या लेण्यांनाही फोडून तोडून विद्रूप केले गेले; पण भाविकांच्या मनांत भक्तीची गुप्त सरिता वाहत होती.परकीय राजवटीत शिवलिंगाला कधी विहिरीत, तर कधी तळ्यात लपवून पूजन केले जात होते.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, थोरले राजे शहाजी यांचे पिताश्री शिवभक्त मालोजीराजे भोसले यांनी 16व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथेच जवळ त्यांची समाधी छत्री आहे.नंतर औरंगजेबाच्या राजवटीत पुन्हा एकदा मंदिर भ्रष्ट झाले. त्या वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी परत एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथील दगडी बारव (पायर्‍यांची मोठी विहीर) बांधली. तेथे पूजाअर्चा करण्यासाठी वतन दिले. गुरव पुजारी नेमले.
 
 
आज हे पूर्वाभिमुख मंदिर मोठ्या दिमाखात आपला कळस घेऊन उभे आहे. भाविकांची श्रद्धा कोणत्याही राजवटीपेक्षा प्रबळ आणि चिवट असते, याचे हे मंदिर साक्ष आहे.
 
परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ (वैजनाथ) मंदिर
 
पौराणिक कथा
 
श्रीविष्णूच्या कूर्मावतारात क्षीरसागर मंथन देवदानवांनी केले.त्यातून बाहेर आलेल्या चौदा रत्नांपैकी धन्वंतरी आणि अमृतकलश ही दोन रत्ने कोणत्याही परिस्थितीत दानवांच्या हाती पडू द्यायची नाहीत म्हणून श्रीविष्णूने धन्वंतरीला आणि अमृतकलशाला एका निर्जन स्थानी असलेल्या शिवलिंगात सुरक्षित ठेवले. जो खर्‍या भक्तीने आणि निष्कामभावाने या शिवलिंगाचे पूजन करेल त्यालाच आयु-आरोग्य देणारा धन्वंतरी पावेल, असे प्रतिज्ञाकोंदण शिवलिंगाला घातले.
 
 
तोवर दानवांनी ते स्थान शोधले व त्यांनी अमृतकुंभ आणि धन्वंतरी मिळण्यासाठी शिवलिंगाला हलवण्याचा प्रयत्न केला.तोच त्यातून ज्वाला प्रकट झाली. त्यामुळे दानव दूर पळाले. नंतर देव आले. त्यांनी यथासांग पूजाअर्चा केली. येथील अमृतकुंभ व धन्वंतरी त्रिलोकातील सर्वांसाठी सुरक्षित असो, अशी प्रार्थना केली. त्याबरोबर अमृतप्रवाह त्यांच्यामध्ये प्रवेशला आणि त्यांना अक्षय आरोग्याची प्राप्ती झाली.
 
 
हे अमर शिवलिंग त्यामुळेच वैद्यनाथ म्हणून ओळखले जाते. अर्थात वैद्यांचा नाथ धन्वंतरी पृथ्वीवर या स्थानी सूक्ष्म रूपाने वसलेला आहे. पंढरीच्या विठोबाप्रमाणे येथेही गाभार्‍यात विग्रहाला स्पर्श करता येतो. इतरत्र हे अभावानेच आढळते.
 
 
ऐतिहासिक पार्श्वभूमी
 
 
हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधले गेले. त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने या मंदिराची रचना केली, अशी इतिहासात माहिती मिळते. हे मंदिर आक्रमकांनी भ्रष्ट केल्याचे दिसत नाही, मात्र काळाच्या ओघात व परक्या राजवटीत देखभालीअभावी मंदिराची पडझड झाली होती. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार शिवभक्त देवी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात केला. या तीर्थक्षेत्रावर राणी अहिल्याबाई होळकरांची विशेष श्रद्धा होती.
 
 
श्रावणात या मंदिराची शोभा पाहाण्यासारखी असते. चिरेबंदी असलेले हे भव्य मंदिर विशेष पर्वांमध्ये गजबजून जाते. लक्ष वेधून घेणारे सुंदर प्रवेशद्वार, सभामंडपात प्रवेश करताच ज्योतिर्लिंगाचे होणारे दर्शन भाविकांना आनंद देऊन जाते. कोणीही वैद्यनाथाच्या दर्शनाला वंचित राहू नये, प्रत्येकाला आयु-आरोग्य लाभावे म्हणूनच जणू काही मंदिरांचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर आहेत. इतरत्र शिवमंदिर तळाशी असते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. हे मंदिर भारतातील बारा मुख्य ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जवळच आंबेजोगाई हे शक्तिपीठ परळी वैजनाथपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे.
परळी वैद्यनाथ येथील दैनंदिन पूजाअर्चा व अनुष्ठान अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते. अभिषेक, आरती विशेष प्रहरकालात केली जाते.
 
 
मंदिर श्रावणात आणि महाशिवरात्रीच्या काळात अक्षरशः शिवस्थान कैलासाचे वैभव आपल्यात सामावून घेतल्यासारखे झळाळून जाते. येथे शिवरात्रीच्या कोणत्याही एका प्रहरात शिवशक्ती आशीर्वाद देण्यासाठी स्वरूपात अवतरते अशी मान्यता आहे.
देशभरातील शिवभक्तांना आयु-आरोग्य देणारे परळी वैद्यनाथ (वैजनाथ) ज्योतिर्लिंग तीर्थस्थळ सदैव आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. येथील शांत वातावरण, स्थापत्य सौंदर्याची प्राचीन भव्यता आणि दिव्य ज्योतिर्लिंग एक आत्मिक संतोष देते.
 
 
औंढा येथील नागनाथ (नागेश्वर) मंदिर : पौराणिक कथा
 
पांडवांनी द्यूतात हरल्यानंतर बारा वर्षांचा वनवास पत्करला. त्या काळी सध्याचा हिंगोली जिल्हा आहे ते स्थान घनदाट जंगल होते. येथेच कुटी बांधून व आजूबाजूला असलेल्या गाईंचे पालन करीत पांडव राहत होते. त्यांच्या लक्षात आले की, या गाईंपैकी एक गाय रोज नदीमध्ये विशिष्ट ठिकाणी दुधाची धार सोडते. पांडवांनी शोध घेतला असता त्यांना तेथे शिवलिंग आढळले. गाय दुग्धाभिषेक का करते हे कोडे सुटले. नंतरच्या काळात राज्य मिळाल्यावर युधिष्ठिराने तेथे भव्य मंदिर बांधले. हेच औंढा येथील नागनाथ मंदिर होय.
 
 
पुराणात या मंदिराची आणखी एक कथा आहे. दारुकवनातील दारुका राक्षस व त्याच्यापासून महादेवाने वाचवलेल्या शिवभक्त सुप्रिया यांची ही कथा आहे.
 
 
भगत नामदेव आणि नागेश्वर मंदिरावर असलेली शीख संप्रदायाची श्रद्धा -
 
या मंदिराच्या बाबतीत हे एक विशेष आहे की, शीख समुदाय येथे दर्शनासाठी आवर्जून येतो, कारण त्यांच्या संकीर्तनात ’भगत नामदेव महाराज’ यांची एक कथा आणि या क्षेत्राची महती सांगितली जाते. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची पदे ’श्री गुरू ग्रंथ साहिब’मध्ये आहेत. त्यातच नागनाथ मंदिराची कथा सांगितली आहे. एकदा नामदेव महादेवाकडे पाहून गुणगान करीत होते, त्या वेळी पुजार्‍यांनी त्यांना ढकलून दिले. मंदिराच्या मागच्या बाजूला येऊन नामदेवांनी महादेवाचे गुणगान सुरूच ठेवले. त्यांचे आळवणे इतके उत्कट होते की, महादेवाला त्यांचे हावभाव बघावेसेे वाटले आणि महादेव पूर्ण मंदिर फिरवून नामदेव महाराजांच्या सामोरे आले. आजही मंदिर पूर्वेकडून पश्चिमेला फिरलेले वाटते.
 
 
शीख भक्त येथे दर्शनासाठी येतात तसेच नामदेवांचे गाव नरसीबामणी येथेही भेट देतात. वैष्णव पताका फडकवणार्‍या वारकरी संप्रदायाचे नामदेव महाराज यांचे गुरू विसोबा खेचर शैव होते. विसोबांची भेट नामदेवांना याच मंदिरात घडली. त्यामुळे हे मंदिर हरिहर ऐक्याचे प्रतीक आहे. विसोबा पिंडीवर पाय टाकून पहुडले होते. नामदेवांनी त्यांना हटकले असता, तूच पाय उचल आणि पिंड नसलेल्या स्थानी खाली ठेव, असे ते म्हणाले. नामदेव जेथे त्यांचे पाय ठेवीत तेथे पिंड प्रकट होत होती. अखेरीस नामदेवांना सर्वांभूती परमेश्वराचा, सर्वव्यापी शक्तीचा साक्षात्कार झाला. अशा संतकथा गुंफल्या गेल्यामुळे या मंदिरात भावभक्तीचे तरंग जाणवतात.
 
 
ऐतिहासिक पार्श्वभूमी
 
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अशी मान्यता असलेले हे औंढा नागनाथ मंदिर महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात आहे.
होंडा नागनाथ मंदिर किंवा औंढा नागनाथ मंदिर, देवगिरीच्या यादवांच्या देखभालीखाली होते. त्यांनी या मंदिराच्या आसपास उत्तम बांधकाम करून ते पक्के केले होते. नंतर मात्र मुघल आक्रमकांनी मंदिर नष्ट करण्याचा चंग बांधला; परंतु घटना अशा घडल्या की, मंदिर पूर्णपणे पाडताच आले नाही. कधी हल्लेखोरांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला, तर कधी प्रचंड पावसाने झोडपले.
 
 
तरीही काही प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच पुन्हा हल्ला चढविला जाऊ शकत होता. म्हणून राणी अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केला तेव्हा मंदिर बंदिस्त राहावे अशी रचना केली.
 
 
औंढा नागनाथ शिवलिंग जमिनीपासून खाली तळात आहे. पायर्‍या उतरून खाली जावे लागते. शांत शीतल गाभारा, पवित्र वातावरण दर्शनार्थींसाठी आनंददायी ठरते. शांतता, समृद्धी प्राप्त व्हावी आणि वाईटापासून रक्षण व्हावे यासाठी येथे प्रार्थना केली जाते.
 
 
मंदिरात सुरेख सभामंडप आहे. सुंदर शिल्पांनी सजलेल्या भिंती आहेत. प्रवेशद्वारावर हत्तीचे शिल्प आहे. येथील नंदी महाराज मंदिराच्या मागच्या बाजूला आहेत!! मंदिरामागे जेथे पांडवांना शिवलिंग मिळाले होते ती नदी वाहत आहे.
 
औंढा नागनाथ मंदिराजवळच्या तीर्थांपैकी एक आहे ऋणमोचन तीर्थ! त्याचे आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. दर 12 वर्षांनी एकदा वाराणसी येथील गंगेचे जल आणून या कुंडात अर्पण केले जाते. त्यामुळे येथे दर्शन घेतले की, काशीयात्रेचे पुण्य पदरात पडते, असे म्हणतात.
 

रमा दत्तात्रय गर्गे

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे

शिक्षण:M.A.(हिस्ट्री)Ph.D.(योगशास्त्र)...वैचारिक /साहित्य /तत्वज्ञान/इतिहास विषयक लेखन..

6 पुस्तके प्रकाशित। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या पूलं गौरव विशेषांक,व बाळशास्त्री हरदास गौरव विशेषांकात लेखन।
कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प.महाराष्ट्र समन्वयक।
समरसता साहित्य परिषद,महाराष्ट्र प्रांत सदस्य
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुर्नविलोकन समिती सदस्य