दूरदर्शी व कुशल नेतृत्व - अश्विनी वैष्णव

विवेक मराठी    17-Aug-2024   
Total Views |
Ashwini Vaishnaw
जो अधिक कार्यमग्न असतो त्याच्यावरच आणखी जबाबदारी सोपवली जाते. अश्विनी वैष्णव हे त्याचं एक उदाहरण ठरावं. नवीन मंत्रिमंडळात पंतप्रधानांनी त्यांच्यावर रेल्वे मंत्रालय तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) मंत्रालय यांच्याबरोबरच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारीही सोपवली आहे. अलीकडेच एका बैठकीनिमित्त दिल्ली प्रवास झाला तेव्हा केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांना, खासदारांना भेटायचे ठरवले. त्यातीलच एक भेट अश्विनीजी वैष्णव यांची.
‘महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे या महानगराचं आणि महाराष्ट्राचंही देशाच्या दृष्टीने महत्त्व अनन्यसाधारण आहे. रोजगारासाठी देशाच्या सर्व भागांतून करोडो लोक या महानगरात, आजूबाजूच्या उपनगरांत, जवळच्या शहरांत आपलं बिर्‍हाड थाटतात. त्यांचा रोजचा प्रवास हा पूर्णपणे लोकलवर अवलंबून असतो. रेल्वे हे मध्यमवर्गीय, निम्नवर्गीय अशा सर्वांसाठी प्रवासाचं सगळ्यात सुलभ, किफायतशीर साधन आहे. मुंबईकरांसाठी रेल्वेला लाइफलाइनचं महत्त्व आहे. याची जाणीव सरकारला आहे, म्हणूनच महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 15940 कोटींची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.’ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्यक्ष भेटीत ही माहिती दिली तेव्हा दिल्लीतील सरकारसाठी महाराष्ट्राचं असलेलं महत्त्व अधोरेखित झालं. काँग्रेसच्या कार्यकाळात यासाठी 1171 कोटी इतकी तरतूद होती हे सांगताना, ‘हा फरक केवळ आकड्यांमधला नाही, तर सरकारच्या दृष्टिकोनामधला हा फरक आहे. कागदावर मांडली गेलेली योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे प्रयत्न होतात ते तर तुम्हालाही दिसत असणारच.’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. नवीन रेल्वेमार्गिका, अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशा नवीन गाड्यांची ताफ्यात भर, तंत्रज्ञानात सुधारणा आणि या जगड्व्याळ यंत्रणेची काटेकोर देखभाल अशा अनेक दिशांनी हे काम चालू आहे.
गेल्या महिन्यात एका बैठकीनिमित्त दिल्ली प्रवास झाला तेव्हा केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांना, खासदारांना भेटायचे ठरवले. त्यातीलच एक भेट अश्विनीजी वैष्णव यांची.
 
Ashwini Vaishnaw 
आताआतापर्यंत ज्या खात्याचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर होत होता, अशा रेल्वे मंत्रालयाची आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी)ची धुरा यशस्वीपणे सांभाळलेल्या अश्विनी वैष्णव यांच्याकडे नव्या मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोहोंबरोबरच माहिती आणि प्रसार मंत्रालय हे खातेही सोपवले. तीन महत्त्वाच्या खात्यांचा दिलेला कार्यभार म्हणजे त्यांच्या सक्षमतेला वरिष्ठांनी दिलेले प्रशस्तिपत्रच म्हणायला हवे.
 
 
अश्विनी वैष्णव यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्समधून राजस्थानमधील जोधपूर येथील महाविद्यालयातून बी.ई. पदवी मिळवताना सुवर्णपदक प्राप्त केलेल्या अश्विनी यांनी आय.आय.टी. कानपूर इथून एम.टेक. केले आहे. त्याच वेळी यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत संपूर्ण भारतातून ते 27 वे आले. त्यांच्या बुद्धिमत्तेला मिळालेले हे आणखी एक धवल यश. ओडिशा केडरमधून आय.ए.एस. झालेल्या अश्विनी यांनी ओडिशातील बालासोर आणि कटक या दोन जिल्ह्यांचा कार्यभार अतिशय यशस्वीपणे सांभाळला. त्यांच्या कार्यकाळातच ओडिशात ते महाभीषण चक्रीवादळ आले. शतकातून एकदा येणारं असं हे भीषण चक्रीवादळ अश्विनी यांच्या प्रशासकीय कौशल्याचा, व्यवस्थापन कौशल्याचा आणि शुद्ध शास्त्रीय दृष्टिकोनाचा कस पाहणारं ठरलं. चक्रीवादळ झालं त्या परिसरातल्या सुमारे दीड लाख लोकांचा जीव वाचला तो अश्विनी वैष्णव यांनी जिल्हाधिकारी म्हणून बजावलेल्या कामगिरीमुळे. या चक्रीवादळाची दिशा, वेग आणि तीव्रता किती असेल याचे वैष्णव यांनी वर्तवलेले अंदाज आणि त्यानुसार पार पाडलेली जबाबदारी यामुळे पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्या वेळी अटलजी पंतप्रधान होते आणि त्यांचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून अश्विनी यांची पंतप्रधान कार्यालयात नेमणूक झाली. कार्यक्षेत्र विस्तारले आणि त्यातून अनुभवांच्या कक्षा रुंदावायलाही मदत झाली. टेक्नोक्रॅट आणि प्रशासकीय कौशल्यामुळे लक्ष वेधून घेतलेल्या अश्विनी वैष्णव यांनी पुढे प्रशासकीय सेवेतून बाजूला होत फायनान्स या आवडीच्या विषयात अमेरिकेतल्या ख्यातनाम व्हॉर्टन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए. केलं. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम, मग गुजरातेत ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंटस बनविणारे दोन उद्योग उभारून त्यात मिळवलेलं यश... अशा या आव्हानांनी भरलेल्या, पण अंतिमत: यशदायी झालेल्या प्रवासात पुढचा टप्पा आला, तो सत्तेच्या राजकारणात प्रवेशण्याचा...
 आपल्यातलं हुनर जनसेवेसाठी उपयोगात आणायचा. जिल्हाधिकारी म्हणून ओडिशात केलेल्या कामगिरीमुळे नवीन पटनायकांशी असलेले चांगले संबंध आणि पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्यापासून नरेंद्र मोदींशी असलेला परिचय. राजकीय विचारक म्हणून दोन वेगळ्या प्रतलांत वावरणारे पटनायक व मोदी हे दोन दिग्गज नेते, मात्र अश्विनी यांना राज्यसभेत पाठविण्याबाबत दोघांचेही एकमत. असा दुर्मीळ योग जुळून आला. ओडिशाच्या वाट्याला आलेल्या राज्यसभेच्या जागेवर अश्विनी वैष्णव यांना बिनविरोध पाठविण्यात आले. त्याआधी काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपामध्ये रीतसर प्रवेश केला होता.
 
 अश्विनी वैष्णव यांचे घर पूर्वीपासून संघविचारांचं होतं. त्यांचे आजोबा जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असल्याने भाजपात अधिकृत प्रवेश करण्याआधीपासून या विचारधारेशी त्यांचा परिचय होता. प्रशासकीय काम करताना जो सेवाभाव मनात होता तोच भाव मनात ठेवून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
 
त्यांच्या करीअरचा ट्रॅक पाच वर्षांपूर्वी बदलला असला तरी त्यांचं घर पूर्वीपासून संघविचारांचं होतं. त्यांचे आजोबा जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असल्याने भाजपात अधिकृत प्रवेश करण्याआधीपासून या विचारधारेशी त्यांचा परिचय होता. प्रशासकीय काम करताना जो सेवाभाव मनात होता तोच भाव मनात ठेवून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. राज्यसभेच्या माध्यमातून पहिली दोन वर्षे राजकारणाच्या या अंगाचा जवळून अभ्यास केल्यावर त्यांना संधी चालून आली. नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे रेल्वे या अतिशय महत्त्वाच्या खात्याचा कार्यभार सोपविला. त्याला कारण ठरली त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, प्रखर बुद्धिमत्तेला असलेली स्वतंत्र विचारक्षमतेची जोड आणि ही गुणवैशिष्ट्ये जनहितासाठी उपयोगात आणण्याची सहज वृत्ती. अल्पावधीत त्यांनी रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जी पावलं उचलली आहेत ती त्यांच्या निवडीची यथार्थता सिद्ध करणारी आहेत. त्यांच्या बोलण्यातूनही त्यांनी या प्रचंड यंत्रणेचा किती खोलवर विचार केला आहे, हे जाणवत राहतं.
 
 
 
‘मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर दररोज 3200 लोकल गाड्या धावतात. प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत यात वाढ होण्याची गरज आहे. त्याबाबत सखोल विचार करून, अभ्यास करून नियोजन केले आहे. पुढच्या दोन वर्षांत दररोज आणखी 100 गाड्या या दोन्ही मार्गांवर धावाव्यात असे नियोजन चालू आहे. त्यासाठी काही नवीन सुमारे 12 हजार कोटींचे प्रोजेक्ट्स हातात घेतले आहेत. नवीन गाड्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला आहे. त्याच वेळी, एकाच ट्रॅकवरून एकामागोमाग धावणार्‍या दोन गाड्यांमधले अंतर कमी करायचे प्रयत्नही चालू आहेत. सध्या एकाच ट्रॅकवर लागोपाठ धावणार्‍या दोन गाड्यांमधलं अंतर 180 सेकंद इतकं आहे. ते 150 सेकंदांवर आणायचं आहे. गाड्यांच्या सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापराचेही प्रयोग चालू आहेत.’ अश्विनी वैष्णव सांगत होते आणि ते ऐकत असताना त्याची सत्यासत्यता पटविणारे रेल्वेतील अनेक सकारात्मक बदल डोळ्यासमोर आले. देशभरात विविध रेल्वेमार्गांवर अतिजलद वेगाने धावत असलेल्या सुमारे 75 ‘वंदे भारत’ या मालिकेतील गाड्या तर प्रवाशांच्या खास पसंतीस उतरल्या आहेत.
 
 
मुंबईत पाऊस प्रचंड असतो. अशा वेळी पाणी शिरून यंत्रणेत बिघाड होऊ नये यासाठी पॉइंट मशीनमध्ये सुधारणा केल्या आहेत. याचं लवकरच पेटंटही मिळणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. यामुळे एक मीटर खोल पाण्यातही पॉइंट मशीन बिघडणार नाही. मायक्रो टनेलिंगचा उपयोग करून रुळांमधला पावसाच्या पाण्याचा प्रवाह मेंटेन केला आहे. रेल्वे रुळाच्या एका बाजूचे पाणी दुसर्‍या बाजूला जाण्यासाठी खूप ठिकाणी मायक्रो टनेल्स बनवली आहेत. मुंबईच्या पश्चिम आणि मध्य दोन्ही रेल्वेमार्गांवर हे काम झाले आहे.
 
 
सेमी कंडक्टर निर्मिती हा या मंत्रिमहोदयांच्या नित्य अभ्यासाचा आणि आवडीचा विषय. त्याचे प्रतिबिंबही त्यांच्या कामात पडले आहे. रेल्वेसाठी लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी पुण्याजवळ एक इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभे राहत आहे. त्याचा खूप फायदा होणार आहे. इथे सेमी कंडक्टरचे शिक्षण-प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रात ए.आय.चे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सेंटर ऑफ एक्सलन्स तयार केलं आहे. या सगळ्या प्रयत्नांतून रेल्वे विकासाचे उद्दिष्ट तर साधले जाईलच; पण रोजगारनिर्मितीही होईल आणि राज्याच्या विकासाला हातभार लागेल.
 
 
‘रेल्वे ही इथल्या गरिबातल्या गरिबासाठी प्रवासाचे सगळ्यात भरवशाचे आणि हक्काचे साधन आहे. त्याचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी प्रयत्न करणं, हे आमचं ध्येय आहे. माननीय पंतप्रधानांची आमच्याकडून ती अपेक्षा आहे.’ वैष्णव यांनी सांंगितलं. त्यांनी अगदी थोडक्या वेळात त्यांच्या कामाची जी माहिती दिली त्यात या ध्येयाचं प्रतिबिंब पडलेलं दिसत होतं.
 
 
असं म्हणतात की, जो अधिक कार्यमग्न असतो त्याच्यावरच आणखी जबाबदारी सोपवली जाते. अश्विनी वैष्णव हे त्याचं एक उदाहरण ठरावं. नवीन मंत्रिमंडळात पंतप्रधानांनी त्यांच्यावर रेल्वे मंत्रालय तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान(इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) मंत्रालय यांच्याबरोबरच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारीही सोपवली आहे. प्रसारमाध्यमांशी निगडित असलेले हे मंत्रालय. हे खातं मिळून अवघे दोन महिनेच झाले असले तरी, या माध्यमातून काय काय जनहिताचं काम करता येईल याबाबत त्यांचा विचार चालूही झाला आहे.
 
 
एकाच वेळी करोडो देशवासीयांपर्यंत पोहोचवणारं हे क्षेत्र आहे. ते प्रभावी आहे आणि परिणामकारकही... म्हणूनच या क्षेत्रातल्या माणसांनी फार जबाबदारीने व्यवहार करायला हवा, असं वैष्णव यांना वाटतं. या खात्याविषयी बोलताना वैष्णव म्हणाले, ‘हे निर्मितीचं क्षेत्र रोजगाराची प्रचंड क्षमता असलेलं असं आहे. हे लक्षात घेऊन आम्हाला या क्षेत्रात काम करायचं आहे. ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेचा उपयोग या क्षेत्रातही करायचा आहे. रेडिओसाठी लागणारी सामग्री तसेच प्रसारणासाठी लागणारी यंत्रणा यांचंही उत्पादन भारतातच कसं होऊ शकेल यावर आम्ही काम करत आहोत.’
 
 
याबरोबर आणखी एका विषयावर काम चालू आहे. आपल्या फिल्म इंडस्ट्रीला आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यायोग्य कसे तयार करता येईल याचा विचार चालू आहे. हा उद्योग कसा वाढवता येईल. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल. 25 लाखांपर्यंत रोजगार देणारा हा उद्योग आहे. एका क्षेत्राचा कालसुसंगत विकास झाला तर लक्षावधी लोकांच्या हातांना काम मिळेल, तेव्हा ते अग्रक्रमाने करायचा विचार आहे.’
 
 
तंत्रज्ञान कशासाठी? तर अंत्योदयासाठी. हा विचार आचारात उतरवलेले हे मंत्रिमहोदय. अतिशय संयत भाषेत, पण ठाम स्वरात केलेली तर्कशुद्ध मांडणी आणि मुख्य ध्येयावर- ‘जनहिता’वर असलेली अढळ नजर ही त्यांची वैशिष्ट्ये.
 
Ashwini Vaishnaw 
 
लेखाच्या शेवटी एक प्रसंग आवर्जून नमूद करावासा वाटतो. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये ओडिशातील बालासोर इथे तीन गाड्यांची टक्कर होऊन महाभयंकर असा अपघात झाला. त्यात तीनशे प्रवासी ठार आणि हजाराहून अधिक लोक जखमी झाले. रेल्वेमंत्री या नात्याने वैष्णव यांनी फक्त अपघातस्थळाला भेट दिली नाही, तर सलग 51 तास तिथे बसून प्रशासकीय यंत्रणा गतीने काम करण्यासाठी देखरेख केली. अपघातात सापडलेल्यांची सुटका, जखमींवर वेळेवर औषधोपचार, मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क आणि नुकसानभरपाईचे वाटप तसेच रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरू करणे या कामावर त्यांनी जातीने लक्ष ठेवले. अपघातानंतर 51 तासांनी जेव्हा पहिली गाडी या रुळांवरून धावली तेव्हा रेल्वे रुळांच्या बाजूला उभे राहून त्यांनी गाडीला हात जोडून नमस्कार केला. हा प्रसंग त्यांच्यातल्या कार्यतत्पर मंत्र्याची जशी साक्ष आहे तशीच त्यांच्यातील संवेदनशील वृत्तीचीही साक्ष आहे.
 
 
‘वैष्णव जन तो... तेणे कहिये जो पीड परायी जाने रे...’ असं एक अतिशय प्रसिद्ध भजन आहे. अश्विनी वैष्णव यांच्या कामातून त्याची अनेकदा प्रचीती येते. पीड परायी समजून घेणारे आणि त्यावर व्यावहारिक उपाय शोधणारे असे ते खरेखुरे वैष्णव आहेत.

कविता (अश्विनी) मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.