भारतात खास स्त्रियांसाठी धर्म आणि कर्मभावानं काम करणारं कोणतंही निःस्पृह संघटन नव्हतं. अशा काळात 25 ऑक्टोबर 1936 रोजी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. या कार्यात मावशींनी रा. स्व. संघापासून प्रेरणा जरूर घेतलीच; परंतु संघाचं सक्रिय सहकार्य न घेता स्व-सामर्थ्यावर समितीची स्थापना केली. ‘संघटन-संपर्क-सेवा’ हा मंत्र सेविकांना दिला.
भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. त्या घटनेचं वर्णन स्वातंत्र्यप्राप्ती असं करायचं की अखंड भारताचं विभाजन असं करायचं, यावर आजही चर्चा सुरूच असते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल पाच वर्षांनी, 1952 साली, स्वतंत्र भारताच्या लोकसभेसाठीची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीला पार्श्वभूमी ठरली ती भारताची फाळणी आणि फाळणीदरम्यान नवनिर्मित पाकिस्तानात झालेला हिंदूंचा छळ, हिंदू महिलांवर झालेले अत्याचार, हिंदू घरांची लूट आणि हिंदूंच्या निर्घृण कत्तली.
त्यानंतर तब्बल 72 वर्षांनी मे 2024 मध्ये अठराव्या लोकसभेची निवडणूक झाली, तिलाही पार्श्वभूमी लाभली ती देशविरोधी कारवायांची, हिंदूविरोधी घटनांची. मुस्लीमबहुलतेच्या आधारावर पुन्हा एकदा भारताची फाळणी घडवून आणायच्या घोषणा यानिमित्ताने दिल्या गेल्या. पश्चिम बंगालमधील संदेशखालीत घडलेल्या नृशंस घटनेनं तर 72 वर्षांपूर्वीच्या भळभळत्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या केल्या. निवडणुकीआधी काही महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालच्या संदेशखाली बेटांवर घडलेली घटना. इथेही नौखालीसारखाच प्रकार घडला. इथेही अनेक हिंदू महिलांचं लैंगिकशोषण झालं, सामूहिक बलात्काराच्या तक्रारी झाल्या. या घटनाक्रमामागे शाहजहान शेख या तृणमूल नेत्याचा हात असल्याचा आरोप झाला आणि शेख हा तृणमूलचा नेता असल्यानं सरकार त्याला पाठीशी घालत असल्याचे आरोप झाले. भारतीय जनता पार्टीनं त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी संदेशखालीत जाऊ देण्याची मागणी सरकारकडे केली. सरकारनं ती नाकारल्यानंतर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले.
ते वाचत असताना आठवण झाली ती 13 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात घडलेल्या समान घटनाक्रमाची. हिंदूंचे शिरकाण सुरू होते, महिला-मुली बलात्काराच्या बळी ठरल्या होत्या. त्यांना धीर देण्यासाठी कुणी तरी जाणं आवश्यक होतं. भारतातल्या भारतात मुस्लीमबहुल वस्तीत जाण्यास मंडळी कचरत होती. अशा वेळेस परवानगी वगैरे मागत न बसता पुढे सरसावल्या आणि थेट कराचीत जाऊन दाखल झाल्या त्या राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई तथा मावशी केळकर.
त्यांच्या जाण्याला निमित्त बनलं ते सिंधमधील सेविका जेठा देवानी यांचं पत्र. जेठाताईंनी त्या पत्रात लिहिलं होतं, आता आम्हाला सिंध सोडावाच लागेल, कारण आता आमची मातृभूमी मुसलमानांची भोगभूमी बनणार आहे. आपल्या प्राणप्रिय भारतभूचे विभाजन होण्याआधी एकदा तरी आपण इथे यावं, फाळणीच्या या अतिकठीण समयी आपल्यासारख्या प्रेमदायी, धैर्यदायी मातेच्या उपस्थितीमध्ये आमचं दुःख थोडं कमी होईल आणि भविष्यात कर्तव्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुम्ही आमची इच्छा पूर्ण कराल काय?
या पत्राला उत्तरबित्तर देत न बसता, 13 ऑगस्टच्या मध्यरात्री मावशी कराची विमानतळावर उतरल्या. विमानतळावर पाकिस्तानी मुस्लिमांचा जथा हजरच होता, ‘हँसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान‘ अशा घोषणा तो जथा देत होता. त्या घोषणांची जराही फिकीर न करता मावशी मार्गक्रमण करत कराचीतील सेविकांच्या घरी गेल्या, त्यांनी त्यांना आईच्या मायेनं धीर दिला.
कोण होत्या या मावशी? काय होती त्यांची संघटना? मावशी तथा लक्ष्मीबाई केळकर म्हणजे पूर्वाश्रमीच्या कमल भास्कर दाते. दाते कुटुंब टिळकभक्त, मूळचं सातारचं. घरात ‘केसरी’ येत असे, ते वाचूनच स्वतंत्र भारताचा आणि हिंदू धर्माभिमानाचा भाव रुजलेला. तरीही इंग्रजी शाळेत शिकत असताना येशूचं गुणगान आणि हिंदू देवदेवतांची निंदानालस्ती त्यांना अनुभवावी लागली. छोट्या कमलनं त्या शाळेत पुन्हा जायचं नाही, असं ठरवलं आणि एतद्देशीय शाळेत प्रवेश घेतला. बालविवाहांची प्रथा असलेल्या त्या काळात बहुधा हुंडा या एकमेव कारणानं कमलचं लग्न लांबणीवर पडलं. समाजात डोळे उघडे ठेवून वावरताना विधवा आणि सधवा अशा दोघींचं दुःख त्यांनी जवळून पाहिलं होतं आणि स्त्रियांच्या उन्नतीच्या विचारानं त्या अस्वस्थ होत होत्या.
वयाच्या 14 व्या वर्षी कमलचा म्हणजेच मावशींचा विवाह वर्ध्याच्या पुरुषोत्तम केळकर यांच्याशी झाला. केळकरांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. तिच्यापासून झालेली मुलं घरात होती. कमलनं म्हणजेच मावशी केळकर यांनी आईविना पोरक्या अपत्यांना आईची उणीव कधीही भासू दिली नाही. पुरुषोत्तमराव अनेकदा आजारी पडत. मावशींनी त्यांना आजारातून बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले; पण अखेरीस काळानं घाला घातलाच. घर, शेती योग्य प्रकारे सांभाळत मावशींनी मुलांवर उत्तम संस्कार केले. हा काळ होता 1930-35 चा. विधवांना कोणत्याही मंगलकार्यात बोलावलं जात नसे, अशी लोक-रीत असल्याचा.मावशींनी हे कधीच मान्य केलं नाही. त्या पतिनिधनानंतर रामायणावर प्रवचनं द्यायच्या. सोवळं-ओवळं तर त्या मानायच्याच नाहीत. अस्वच्छ सवर्णापेक्षा स्वच्छ हरिजन केव्हाही घरातल्या किंवा शेतीतल्या कामास ठेवावा, असं त्या सांगत आणि स्वतःच्या घरात पाळत.
डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीस्थापना केल्याला तेव्हा तब्बल दहा वर्षं होत आली होती. मावशींची मुलं संघशाखेत जात होती. मुलांच्या संघशाखा पाहून मावशींना असं वाटायचं की, मुलीबाळींसाठीदेखील अशा संघशाखा असायला हव्यात, मुलींनाही स्व-संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. एक मुलगी सुशिक्षित-सुसंस्कारित झाली तर एक घर सुशिक्षित होतं, एक पिढी सुसंस्कारित होते याचा अनुभव मावशी समाजात राहून घेत होत्या. मावशींनी डॉ. हेडगेवारांची भेट घेतली. तो काळच असा होता की, भारतात खास स्त्रियांसाठी धर्म आणि कर्मभावानं काम करणारं कोणतंही निःस्पृह संघटन नव्हतं. ज्या काही संस्था, संघटना महिलांसाठी कार्यरत होत्या, त्या एक तर विदेशी किंवा डाव्या विचारसरणीवर आधारित होत्या. त्यांची वैचारिक मुळंही पाश्चात्त्य देशात रुजलेली होती.
स्वामी विवेकानंद म्हणत, स्त्री आणि पुरुष हे धर्मरूपी गरुडाचे दोन पंख आहेत, त्यामुळे स्त्रीची उन्नती व्हायलाच हवी. पंख असमान असतील तर गरुडझेप कशी घेणार? या विचारांनी प्रेरित होऊन मावशींनी 25 ऑक्टोबर 1936 रोजी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली.मावशींनी संघापासून प्रेरणा जरूर घेतलीच; परंतु संघाचं सक्रिय सहकार्य न घेता स्व-सामर्थ्यावर समितीची स्थापना केली. ‘संघटन-संपर्क-सेवा’ हा मंत्र सेविकांना दिला. राजमाता जिजाबाई, महाराणी अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांचे आदर्श तर समितीने सेविकांसमोर ठेवलेच; परंतु अनेक सेवाभावी उपक्रम सुरूही केले. मावशी म्हणत, ‘मला उच्चशिक्षण घेता आले नाही; परंतु मी जीवनशास्त्रात पारंगत होते.‘ समितीने हे सूत्र ठेवून मुंबईत काही काळ उत्तम गृहिणींच्या प्रशिक्षणासाठी गृहिणी विद्यालय आणि गृहिणी विद्या नावाचा अभ्यासक्रम चालवला.
‘जबाबदारी आणि कर्तव्य यांची गल्लत करू नये. स्त्री म्हणून कुटुंब, समाज, राष्ट्र याबद्दल प्रत्येक स्त्रीनं आपलं कर्तव्य आनंदानं निभवावं,‘ असं त्या म्हणत. त्याच एका भूमिकेतून स्त्री-सुलभ गुणांचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी करून घेण्याचा, स्त्री संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ घराघरांत पोहोचवण्याचा, राष्ट्रनिर्माण करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे हे सिद्ध करून दाखवण्याचा आगळा संघटनात्मक प्रयोग त्यांनी केला. 27 नोव्हेंबर 1978 रोजी नागपूरमध्येेच त्यांचं निधन झालं.