संत गोरोबांची जन्मभूमी त्रिविक्रम क्षेत्र‘तेरढोकी’चे प्राचीन माहात्म्य

विवेक मराठी    12-Jul-2024   
Total Views |
 
sant gora kumbhar
संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील संत मांदियाळीमधील वयाने ज्येष्ठ आणि साक्षात्कारी, जीवनमुक्त संत म्हणून गोरोबा कुंभारांचे स्थान विशेष आहे. त्यांचे जन्मगाव ‘तेर’ हे पौराणिक काळातील ‘त्रिविक्रम क्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे. तेर हे ‘मंदिरांचे गाव’ म्हणूनही सर्वपरिचित आहे. इतिहासकाळात सातवाहन राजवटीत ‘तेर’ला उपराजधानीचा दर्जा होता. येथे बौद्धकालीन अनेक प्राचीन अवशेष आहेत. अर्वाचीन काळातील तेलुगू ग्रंथांमध्येही संत गोरोबांचे चरित्र गायलेले आहे.
काय सांगू आता, संतांचे उपकार।
 
मज निरंतर जागविती॥
 
संतांनी समाजाला सतत जागवण्याचे कार्य केलेले आहे. स्वार्थलोलुप सुखात रममाण होऊन आत्मभान गमावलेल्या समाजात, संतांनी आपल्या अभंगवाणीद्वारे कर्तव्याचे, श्रेयाचे, पारमार्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, एवढेच नव्हे तर राष्ट्रीय विहितकर्माचे जनजागरण-प्रबोधन केलेले आहे. म्हणून या संतांचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. हे उपकार समाजावरील ऋण असून, हे ऋण फेडण्यासाठी नसून अभिमानाने मिरवण्याचे व त्या ऋणाच्या पुण्यस्मरणात नव्या नव्या प्रेरणा प्राप्त करण्याचे लोकमंगल ऋण आहे.
 
 
महाराष्ट्राचे भाग्य थोर की, आपणास प्रदीर्घ संत परंपरा लाभलेली आहे. संत निवृत्तीनाथ ते थेट संत गाडगे महाराज-तुकडोजी महाराज यांच्यापर्यंतची ही प्रदीर्घ संत परंपरा महाराष्ट्राचे वैभव आहे. या संत मालिकेतील संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास यांना तर ‘महाराष्ट्राचे पंचप्राण’ म्हणून गौरवले जाते. हा गौरव त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव आहे. संतांचे हे ऐतिहासिक कार्य ही एक प्रकारची क्रांतीच आहे. देव आणि धर्मरक्षणासमवेत संतांनी अप्रत्यक्षरीत्या देशरक्षणाचेही कार्य केलेले आहे. संत तुकाराम महाराजांचे पाईकाचे अभंग, संत एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’ आणि संत रामदासांची राम-मारुती बलोपासना, ही त्याची ठळक प्रसादचिन्हे आहेत.
 
 
संत ज्ञानदेवांची प्रभावळ
 
महाराष्ट्रात नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय असे अनेक पंथ-संप्रदाय गुण्यागोविंदाने नांदले आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात ना शैव-वैष्णव संघर्ष झाला, ना सगुण उपासक-निर्गुण उपासकांचे वाद विकोपास गेले, ना द्वैत-अद्वैत-विशिष्टाद्वैत असा विवाद झाला. हेच महाराष्ट्रातील संत परंपरेचे कौतुकास्पद मोठेपण आहे. मराठी संतांच्या व्यापक समन्वय दृष्टीचीच ती मंगल फलश्रुती आहे. या संत परंपरेमध्ये विठ्ठलभक्त वारकरी संतांचे सातत्यपूर्ण प्रदीर्घ परंपरेचे योगदान अपूर्व व ऐतिहासिक आहे. भक्तिकालातील, 13व्या शतकात संत ज्ञानदेव व त्यांच्या संतसांगातींच्या मांदियाळीस ‘संत ज्ञानदेवांची प्रभावळ’ म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये अठरापगड जातींचे, विविध ज्ञाती घटकांतील संत सहभागी होते. मराठवाड्यातील तेरणा नदीकाठच्या ‘तेर’ गावाचे ‘संत गोरोबा कुंभार’ त्यातील एक प्रमुख संत होते.
 


sant gora kumbhar 
 
गोरोबा ः संत मंडळातील ‘काका’
 
संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील संत मंडळींमध्ये संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत सेना, संत सोयराबाई, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, ज्ञानदेवबंधू सोपानदेव आणि भगिनी मुक्ताई हे प्रमुख होते, त्यामध्ये संत सावता माळी आणि संत गोरा कुंभार हे वयाने सर्वात मोठे होते. त्यामुळे संत गोरोबा कुंभार यांना सर्व जण ‘गोरोबाकाका’ म्हणून मान देत होते.
 
केशवाचे ध्यान धरोनी अंतरी। मृत्तिके माझारी नाचतसे॥
विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा।
नेत्री वाहे जळ सद्गदित्॥
कुलालाचे वंशी जन्मले शरीर।
तो गोरा कुंभार हरिभक्त॥
 
असा आपल्या अभंगातून स्वपरिचय देणार्‍या गोरोबांनी ‘कुलालाचे वंशी जन्मले शरीर।’ या ओळीत स्वजातीचा, व्यवसायाचा स्वाभिमानपूर्वक उल्लेख केलेला आहे. ‘कुलाल’ म्हणजे कुंभार. कोणी कोठे, कोणत्या जाती-वर्णात जन्म घ्यायचा, हे मनुष्याच्या हाती नसते, त्यामुळे आपण ज्या ज्ञाती-समाजात जन्मलो त्याचा न्यूनगंड वा गर्व न करता, सर्व संतांनी ज्ञानदेव-नामदेवांच्या नेतृत्वाखाली पारमार्थिक समतेचा झेंडा उभारीत जाती-वर्णासह सर्व प्रकारच्या भेदाभेदांना पंढरीच्या वाळवंटात मूठमाती दिली. ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील संतांची नावे वाचल्यावर त्यामध्ये अठरापगड जाती-व्यवसायांतील संत असल्याचे दिसते; पण हे सारे संत एकच जात-वर्ण मानत होते ती म्हणजे विठ्ठलभक्ती! ‘विठ्ठलभक्त नामधारक’ हीच त्यांची खरी ओळख होती. म्हणूनच संत गोरा कुंभार उपरोक्त अभंगात आपला परिचय ‘हरिभक्त’ असा करून देतात. हीच गोष्ट आपणास अन्य संतांच्या अभंगांतून ठळकपणे जाणवते. ते आपली जात व व्यवसाय हीन न मानता स्पष्टपणे सांगतात. त्यांच्यात जातींची विविधता आहे; पण भेदाभेदाच्या द्वेषाचा लवलेश नाही. विठ्ठलाचे भक्त, पंढरीचे वारकरी म्हणून ते एकमेकांचे सांगाती व सोयरेच आहेत.
 
 
संत गोरोबा कुंभार हे संत निवृत्ती-ज्ञानदेव, नामदेव यांच्यापेक्षा वयाने वडील-मोठे होते. संत ज्ञानदेवांपेक्षा गोरोबा आठ वर्षांनी, तर संत नामदेवांपेक्षा तीन वर्षांनी मोठे होते. आळंदीत ही सर्व संतमंडळी एकत्र जमत असत, तेव्हा एकदा सर्व संतांच्या आध्यात्मिक स्थितीची परीक्षा करण्याचे काम संत मुक्ताबाईंनी, वडीलकीच्या अधिकाराने गोरोबाकाकांवर सोपवले, अशी एक आख्यायिका आहे. तेव्हा गोरोबाकाका, कुंभार मडकी तपासतो तसे प्रत्येकाच्या डोक्यावर थापी मारून सर्वांची परीक्षा घेतात आणि नामदेवांना ‘कच्चे मडके’ ठरवतात, कारण नामदेव बालभक्त होते; पण त्यांना अजून गुरू अनुग्रह लाभलेला नव्हता. अशा नामदेवांना ‘निगुरा’ म्हणून गुरूचे महत्त्व ते सांगतात आणि पुढे नामदेवांना औंढ्यानागनाथच्या संत विसोबा खेचर यांचा गुरू म्हणून अनुग्रह-उपदेश लाभतो. या कथेचा बोध, संप्रदायातील गुरुतत्त्वाचे महत्त्व सांगणे हा आहे; पण या आख्यायिकेतून संत गोरोबांच्या पारमार्थिक साक्षात्कारी अधिकारस्थितीचे दर्शन होते.
 

sant gora kumbhar 
 
त्रिविक्रम क्षेत्र ‘तेर’ची ऐतिहासिक पार्श्वभूमी
 
मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या मराठवाड्यातील सध्याच्या धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीकाठी वसलेले प्राचीन गाव ‘तेर’ हे संत गोरोबाकाकांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाला 3000 वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. अगदी बौद्धकालीन अनेक प्राचीन अवशेष या गावाच्या परिसरात आढळतात. पूर्वी सातवाहन राजघराण्याच्या राजवटीत, आजचे संत एकनाथांचे श्रीक्षेत्र पैठण हे राजधानी होते आणि ‘तेर ’ या गावाला उपराजधानीचा दर्जा व मान होता. मातीच्या भांड्यासाठी ‘तेर’ त्या प्राचीन काळी हिंदुस्थानभर प्रसिद्ध होते. ‘तेर’मध्ये त्या वेळी मातीची-खापराची विविध प्रकारची, आकारांची व नक्षीची लहानमोठी भांडी बनवली जात होती. ती देशविदेशात निर्यात होत होती. येथील कुंभारांची ख्याती जगभर झालेली होती.
 
 
या भागाला पुराणकाळात ‘त्रिविक्रम क्षेत्र’ म्हणून ओळखले जात होते. संतांच्या अभंगातही ‘तेर’चा उल्लेख त्रिविक्रम क्षेत्र ‘पुण्यनगरी’, ‘सत्यपुरी’ असा आदरयुक्त गौरवपूर्ण उल्लेख आढळतो. संत एकनाथ यांनी ‘तेर’चा उल्लेख ‘सत्यपुरी’ असा केलेला आहे. संत गोरोबांपर चरित्रात्मक अभंगात संत एकनाथ म्हणतात -
 
सत्यपुरी ऐसे म्हणती ‘तेरे’सी।
हरिभक्त राशी कुंभार गोरा॥
नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल।
भक्तिभाव सबळ हृदयामाजि॥
 
 
यावरून एके काळी तेरचे नाव ‘सत्यपुरी’ असेही होते हे समजते. तसेच काहींनी या गावाचे मूळ नाव ‘त्रयोदशी’ असे होते, पुढे त्याचा अपभ्रंश होत ‘तेर’ झाले, असे म्हणतात. तेरणा नदीकाठी म्हणून ‘तेर’ नाव पडले, असेही एक मत आहे; पण सध्या हे गाव ‘गोरोबांचे तेरे ढोकी’ असे ओळखले जात आहे. धाराशिव (उस्मानाबाद) पासून सुमारे 25 कि.मी. अंतरावर कळंब तालुक्यात हे गाव आहे.
 


sant gora kumbhar 
 
अनेक मंदिरांचे गाव
 
 
तेर गावची आणखी एक ओळख म्हणजे या गावाला ‘मंदिरांचे गाव’ म्हटले जाते. अनेक देवदेवतांची असंख्य मंदिरे या छोट्या गावात आहेत व ती या गावचा प्राचीन इतिहास व वैभवाच्या खुणांची प्रसादचिन्हे आहेत. सध्या या गावात संत गोरोबा कुंभार यांचे समाधी मंदिर हे मुख्य आकर्षण भक्तिकेंद्र असून त्याशिवाय 17 शिवमंदिरे आहेत. सिद्धेश्वर, कनकेश्वर, अमरेश्वर, उत्तरेश्वर, नीलकंठेश्वर, हरकेश्वर, इंद्रेश्वर, चंदनेश्वर, रक्तेश्वर, मेंढेश्वर, शांतेश्वर, वाळकेश्वर आणि ढवळेश्वर अशी विविध नावांची शिवमंदिरे हे ‘तेर’चे खास वैशिष्ट्य आहे. या शिवमंदिरासमवेतच ‘त्रिविक्रम मंदिर’ हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या त्रिविक्रम मंदिरात प्राचीन हिंदू-बौद्ध समन्वयाच्या, सौहार्दाच्या अनेक खाणाखुणा दिसतात. त्याशिवाय मारुती मंदिर, जैन मंदिर अशा विविधतेने ‘तेर’चे भक्तिक्षेत्र संपन्न आहे. विविध पंथ, संप्रदायांचे श्रद्धास्थान म्हणून ‘तेर’ एक समन्वय क्षेत्र आहे.
 
 
तेरणा नदीकाठचे संत गोरोबांचे समाधी मंदिर जुन्या दगडी वाड्यासारखे भव्य मंदिर आहे. याच मंदिरात संत नामदेवांचे कीर्तन झाल्याची जागा भाविक श्रद्धेने दाखवतात. तेथे आजही अंथरूण-सतरंजी वगैरे न टाकता श्रद्धेने या जागेचे पावित्र्य जतन केले जाते. या जागेचे दर्शन करून भाविक धन्यता अनुभवतात. संत नामदेव महाराजांच्या येथे झालेल्या कीर्तनातच, थोटे हात वर करताच भजन करता करता संत गोरोबांच्या हाताला पूर्ववत पंजे निर्माण झाले होते, अशी आख्यायिकाही श्रद्धेने सांगितली जाते. या आख्यायिकांना स्थळमाहात्म्ये, धर्मेतिहास, संतचरित्रे यांच्या भावविश्वात एक विशेष स्थान आहे. भक्तीची, नामाची महती सांगण्यासाठी या आख्यायिकाचा-लोकश्रुतीचा जन्म संभवतो. संत चरित्रातील सार्‍या चमत्कार कथांचा बोध, तात्पर्य, नामभक्तीची महती सांगून भक्तीचा प्रचार हाच आहे.
 
 
आषाढीच्या वारीसाठी सकल संतांच्या भजनी दिंड्यांसह पालख्या पंढरपूरला पायी जातात; पण संत गोरोबांची पालखी आषाढीऐवजी कार्तिक वारीला पंढरपूरला जाते. दर वद्य एकादशीला गोरोबाकाकांच्या समाधी मंदिरात भाविकांची यात्रा भरते. तसेच चैत्र महिन्यातील वद्य एकादशीला वार्षिक उत्सव-यात्रा होते. तेव्हा दोन-तीन लाख भाविक एकत्र येतात व भजन-कीर्तन, प्रवचन, दिंडी, पालखी असा धार्मिक-सांप्रदायिक भव्य-दिव्य भक्तिसोहळा संपन्न होतो. भक्तीसमवेतच ज्ञानेश्वरी पारायण, भागवत, रामायण यांच्या पारायणाद्वारे ज्ञानालाही विशेष प्राधान्य दिले जाते.
  
 
पुराणांमध्ये उल्लेख
 
स्कंदपुराण, पद्मपुराणातील संस्कृत पांडुरंग माहात्म्यामध्ये गोरोबांच्या ‘तेर’चा उल्लेख ‘त्रिविक्रम क्षेत्र’ म्हणून आढळतो. तसेच संतकवी श्रीधर, संत प्रल्हाद महाराज बडवे यांनी मराठीत रचलेल्या ‘पांडुरंग माहात्म्य’ पोथ्यांमध्ये, पंढरीच्या भोवतालच्या दिशांना असलेल्या चतुर्द्वार क्षेत्राचा उल्लेख आहे. त्यामध्ये आग्नेय दिशेस ‘त्रिविक्रम क्षेत्र’ असल्याचा निर्देश दोन्ही संतांनी केलेला आहे. असे गोरोबांच्या ‘तेर’ (तेरढोकी)चे पौराणिक महत्त्व आहे आणि हीच या भूमीच्या प्राचीनत्वाची ओळख आहे.
 
नाथपंथी घरात जन्म
 
तेरढोकी येथे संत गोरोबांचा, काळेश्वर महादेव मंदिराचे उपासक माधवबुवा आणि रुक्मा यांच्या पोटी शके 1189 मध्ये झाला. गोरोबा हे त्यांचे आठवे अपत्य होते. आधीच्या सात मुलांचा बालमृत्यू पाहण्याचे दुःख या दांपत्याने नियती म्हणून सोसले होते. नाथपंथीय गुरू गोरक्षनाथ यांचा जन्म राखेतून झाला म्हणून त्यांचे नाव ‘गोरक्षनाथ’ पडले. तद्वतच ‘गोरी’ (बालमृतांची दफनभूमी) मधून देवकृपेने पुनर्जन्म झाला म्हणून ‘गोरा’-‘गोरोबा’ अशी गोरोबांच्या नावाची उत्पत्ती सांगितली जाते. नाथपंथीय गुरू रेवणनाथ यांची लहानपणीच गोरोबांना अनुग्रह-दीक्षा लाभली होती आणि अगदी लहान वयातच भक्तीमार्गी लागले होते. संत निवृत्ती-ज्ञानदेव या नाथपंथीयांप्रमाणेच गोरोबा हे विठ्ठलभक्त वारकरी भक्ती विचारधारेचे पाईक झाले होते. त्यांचे सध्या आपणास फक्त 20 अभंग उपलब्ध आहेत. काळाच्या उदरात बाकी अभंग लुप्त झाले असावेत; पण हे 20 अभंग विठ्ठलभक्तीचा, अनुभवाचा अनुपम ठेवा आहे. संत गोरोबांच्या मनी बालविठ्ठलभक्त संत नामदेवांविषयी आदर व पूज्यभाव होता. तो त्यांच्या 20 अभंगांतून ठायीठायी व्यक्त होतो. एका साक्षात्कारी संताचे या 20 अभंगांतून विलक्षण उत्कट दर्शन होते. संत गोरोबांना सकल संतांमध्ये मोठे मानाचे स्थान होते. ‘विठु माझा लेकुरवाळा’ या अभंगात संत जनाबाई ‘गोरा कुंभार मांडीवरी।’ असे गोरोबांचे विठ्ठलअंकित स्थान वर्णन करतात. ‘विठ्ठलाच्या मांडीवर’ विराजमान होण्याचा मान हा गोरोबांनी आपल्या भक्तिसामर्थ्याने प्राप्त केलेला होता. संत नामदेव या समकालीन आणि संत एकनाथ या उत्तरकालीन संतांनी संत गोरोबांचे चरित्र गायलेले आहे. हीच साक्षात्कारी संत गोरोबाकाका कुंभार यांच्या संतत्वाची अगाध-अनंत थोरवी आहे.
 
तेलुगू साहित्यातील गोरोबा गौरव
 
अर्वाचीन काळातील अनेक अभ्यासकांनी संत गोरोबांच्या थोरवीची दखल घेतलेली दिसते. मराठी साहित्यातील अनेकांनी संत गोरोबांचे चरित्र लिहिलेले आहे; पण दक्षिण भारतातील आंध्र-तेलंगणामध्ये तेलुगू भाषेत लिहिलेल्या ‘पंढरीभागवतुम’ या ग्रंथात पुंडलिकासमवेत महाराष्ट्रातील पाच संतांची चरित्रे समाविष्ट आहेत. त्यामध्ये संत गोरोबा कुंभार यांचे चरित्र आहे. तेलुगू विद्वान पद्मश्री पुट्टपर्ती नारायणाचार्यलु यांनी द्विपदी छंदात हे चरित्रलेखन केलेले आहे. तसेच लेखक जयरामराव कृत ‘महाभक्तविजयमु’ या ग्रंथामध्येही अनेक विठ्ठलभक्तांची चरित्रे असून त्यात ‘संत गोरोबा कुंभार’ यांनाही मानाचे स्थान देण्यात आलेले आहे. या ग्रंथात भक्त पुंडलिक, संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत तुकाराम यांच्या बरोबरीने संत गोरोबांना गौरवण्यात आले आहे.
 
संत गोरोबांच्याच एका अभंगचरणाने या पुण्यस्मरण लेखाची समाप्ती करणे सार्थ व समर्पक ठरेल.
 
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणे।
 
जग हे करणे शाहणा बापा॥
 
लेखक संत साहित्याचे उपासक, अभ्यासक आहेत.

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.