नालंदा - सुवर्णकाळाचे पुनरुज्जीवन

विवेक मराठी    26-Jun-2024   
Total Views |
इस्लाम आणि ब्रिटिश यांच्या साम्राज्यवादाचं हजार वर्षांचं अंधकारयुग संपलं तरी मनातला गुलामीच्या भावनेचा काळोख दूर झाला नाही आणि चहूबाजूला पसरलेल्या गुलामीच्या खुणाही तशाच राहिल्या. 2014 नंतर हा काळोख, या खुणा दूर करण्याचं काम मोदीजींनी हाती घेतलं. मोदीजींनी गुलामीच्या खुणा दूर करत भारतीयांचा आत्मसन्मान जागृत केला. नालंदा विद्यापीठाची पुनर्उभारणी हे भारताच्या पुनरुत्थानाच्या दिशेने टाकलेलं असंच एक महत्त्वाचं पाऊल आहे.

vivek
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून 2024 रोजी बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचे उद्घाटन केले. पाचव्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात स्थापन झालेलं नालंदा विद्यापीठ प्राचीन जगतातलं ज्ञानार्जनाचं एक महान केंद्र होतं. नालंदा विद्यापीठाच्या भव्य परिसरात दोन हजार अध्यापक कोरिया, जपान, ग्रीस, इंडोनेशिया, कंबोडिया, चीन, पर्शिया इथून आलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञानदान करत असत. नालंदा विद्यापीठ हे शिक्षणाबरोबरच संशोधन आणि ज्ञानाच्या निर्मितीचंही मोठं केंद्र होतं. इथल्या ग्रंथालयातील लाखो ग्रंथांमध्ये भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना विद्यार्थ्यांना व संशोधकांना अभ्यासासाठी उपलब्ध होता. 1193 साली बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावली आणि संपूर्ण विद्यापीठ भस्मसात करून टाकले. बख्तियार खिलजी हा अतिशय शूर, पण कमालीचा धर्मवेडा, काफिरांचा द्वेष करणारा तुर्की सरदार होता. मोहम्मद घोरीबरोबर भारतात आलेल्या बख्तियार खिलजीने, कुतुबुद्दीन ऐबकच्या सैन्यात आपल्याला महत्त्वाचे स्थान मिळत नाही हे पाहून पूर्वेला बिहारमध्ये आपल्या स्वतंत्र मोहिमा सुरू केल्या. त्याच्या मोहिमा म्हणजे जुलूम, अत्याचार, कत्तली, मंदिरांचा विध्वंस, बलात्कार, लुटालूट यांचा प्रलयंकारी आविष्कार होता. असे म्हणतात, एकदा तो खूप आजारी पडला असता त्याला कोणी तरी नालंदा विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांची भेट घेण्याचे सुचविले. काफिरांकडून कुठलेही उपचार घेण्यात कमीपणा वाटून खिलजीने अट घातली की, तुम्ही दिलेले कोणतेही औषध मी घेणार नाही. यावर वैद्यराजांनी त्याला सांगितले, तू औषध घेऊ नकोस; पण रोज न चुकता कुराणाचे पठण करत जा. वैद्यराजांनी खिलजीच्या नकळत कुराणाच्या पानांना औषध चोपडून ठेवले. बख्तियार खिलजीला पानं उलटताना बोटाला थुंकी लावण्याची सवय होती. त्यामुळे पोटात औषध जाऊन तो हळूहळू बरा झाला. आपला आजार दूर केल्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याऐवजी खिलजीला भारतीय वैद्यांचे ज्ञान आपल्या हकिमांपेक्षा उच्च दर्जाचे असल्याचा राग आला. त्याचा दुखावलेला अहंकार त्याला स्वस्थ बसू देईना. इस्लामची शिकवण असे सांगते की, इस्लामच्या उदयाच्या आधीचा काळ हा जाहिलियत म्हणजेच अडाणीपणाचा कालखंड होता. जगातील सगळे ज्ञान कुराणमध्ये असताना जाहिलियतच्या कालखंडातील ज्ञानाची गरजच काय, ही भावनाही खिलजीच्या मनात होती. शेवटी त्याने काफिरांच्या ज्ञानाचे भंडार असलेल्या नालंदा विद्यापीठाला आग लावली, तिथल्या गुरुजनांची व देशविदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांची कत्तल केली. तिथल्या ग्रंथालयातील नव्वद लाख ग्रंथ तीन महिने जळत होते. इतिहासकार मिनाझ-ई-शिराझ याने त्याच्या तबाकत-ई-नसीरी या ग्रंथात खिलजीने केलेली कत्तल, तलवारीच्या धाकाने घडवलेले धर्मांतर आणि ग्रंथालयांचा संहार याविषयी लिहून ठेवलं आहे. तो म्हणतो, जळणार्‍या ग्रंथांमधून निघणार्‍या धुराचा पडदा कित्येक दिवस आजूबाजूच्या टेकड्यांवर पसरला होता.
 
 खिलजीने अट घातली की, तुम्ही दिलेले कोणतेही औषध मी घेणार नाही. यावर वैद्यराजांनी त्याला सांगितले, तू औषध घेऊ नकोस; पण रोज न चुकता कुराणाचे पठण करत जा. वैद्यराजांनी खिलजीच्या नकळत कुराणाच्या पानांना औषध चोपडून ठेवले. बख्तियार खिलजीला पानं उलटताना बोटाला थुंकी लावण्याची सवय होती. त्यामुळे पोटात औषध जाऊन तो हळूहळू बरा झाला. आपला आजार दूर केल्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याऐवजी खिलजीला भारतीय वैद्यांचे ज्ञान आपल्या हकिमांपेक्षा उच्च दर्जाचे असल्याचा राग आला. 
 
डाव्या इतिहासकारांनी अर्थातच नालंदाचा विध्वंस बख्तियार खिलजीने केला हे नाकारण्याचा खूप प्रयत्न केला. हिंदू आणि बौद्ध यांच्यातील भांडणामुळे हिंदूंनी ग्रंथालयाला आग लावली, एकमेकांत खेळणार्‍या गुराख्यांच्या पोरांकडून चुकून एक पेटता बोळा पडला आणि आग पसरली... असले अनेक हास्यास्पद सिद्धांत या ’एमिनंन्ट हिस्टरियन्स’नी मांडले. तबाकत-ई-नसीरी यांसारखे ठोस पुरावे नसते, तर त्यांनी त्यांना हवा तोच इतिहास लादला असता. आजही या घटनेबद्दल वेगवेगळी मतं असल्याची मखलाशी ते करतातच. आपल्या प्रतिपादनासाठी गैरसोयीचे ठरेल अशा घटनेबद्दल कुठलाही पुरावा नसताना आपणच वेगळी मतं ठोकून द्यायची आणि या घटनेबद्दल वेगवेगळी मते असल्याचे सांगून तिच्या सत्यतेविषयी संशय निर्माण करायचा, ही या मंडळींची हातखंडा खेळी असते. यानंतर खिलजीने विक्रमशीला आणि ओदांतपुरी या बिहारमधील इतर प्रमुख विद्यापीठांनाही आगी लावून असाच विनाश घडवला. या संपूर्ण विध्वंसात भारताच्या ज्ञानपरंपरेचं किती भयंकर नुकसान झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी.
 
अशा या वैभवशाली विद्यापीठाचं पुनर्निर्माण हा देशासाठी गौरवाचा क्षण आहे; पण देशाच्या आनंदात मोकळ्या मनाने सामील झाले तर ते काँग्रेसवाले कसले! त्यांनी लगेच मनमोहन सिंह यांच्या काळात सुरू झालेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन मोदींनी केले, असा गलका सुरू केला. खरं तर अशा आनंदाच्या प्रसंगी राजकीय चिखलफेक व्हायला नको; पण मोदीद्वेषातून सांगितलेलं हे असत्य, सत्य म्हणून प्रस्थापित होऊ नये यासाठी खरं काय हे समजून घेतलंच पाहिजे.
 
 

nalanda university 
2006 साली तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन केले जावे, अशी सूचना केली. त्यावर या पुनरुज्जीवनाची रूपरेषा ठरविण्यासाठी मनमोहन सिंह सरकारने अमर्त्य सेन यांच्या अध्यक्षतेखाली ’नालंदा मेंटॉर ग्रुप’ची जून 2007 मध्ये स्थापना केली व त्यांना तीन महिन्यांत अहवाल देण्यास सांगितले. अमर्त्य सेन यांची मुस्लीम आक्रमकांबद्दलची मतं, त्यांचे अत्याचार लपवणारी आणि नाकारणारी होती. त्यामुळे बख्तियार खिलजीच्या धर्मांधपणामुळे नष्ट झालेले नालंदा विद्यापीठ पुन्हा उभे करण्यासाठी त्यांची निवड अयोग्यच होती. त्यानुसार तीन महिन्यांत काहीच घडले नाही. त्यावर नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. या नऊ महिन्यांतही अहवालाचा जन्म झाला नाही म्हटल्यावर तब्बल तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. शेवटी 2012 साली अमर्त्य सेन यांचीच कुलपती म्हणून नेमणूक झाली आणि एखाद्या तलाठ्याचं ऑफिस वाटावं अशी एक इमारत तिथे उभी राहिली. अशाच ढिसाळ आणि बेमुर्वतखोर पद्धतीने चालढकल सुरू राहिली आणि 2014 पर्यंत या प्रकल्पाची काहीही प्रगती झाली नाही.
 
 
दरम्यान खर्च मात्र बेबंदपणे होत गेला. बैठका अमर्त्य सेन यांच्या सोयीसाठी न्यूयॉर्क, टोकियो, सिंगापूर येथे होत राहिल्या. इतक्या महत्त्वाच्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी एखाद्या नामवंत विद्वानाची नेमणूक करण्याऐवजी दिल्लीतील एका महाविद्यालयात साध्या रीडर असलेल्या गोपा सबरवाल यांची वर्णी लावण्यात आली. 2007 ते 2014 दरम्यान 2730 कोटी रुपये खर्च झाला आणि हाती काहीच लागलं नाही.
 
 
या सर्व व्यवहारावर कॅगने कठोर ताशेरे ओढले. स्वतः राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी परराष्ट्रमंत्री कृष्णा यांना पत्र लिहून या प्रकल्पासाठी खर्‍याखुर्‍या विद्वानांची नियुक्ती केली जावी आणि त्यांनी नालंदा इथे हजर राहावं, अशी अट घालण्यात यावी, अशी सूचना केली.
 
 
शेवटी नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात या प्रकल्पावर खर्‍या अर्थाने काम सुरू झाले. आता जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ अरविंद पानगढिया हे कुलपती, तर प्रा. अभय कुमार सिंग हे कुलगुरू म्हणून नालंदाचे नेतृत्व करत आहेत. जागतिक कीर्ती प्राप्त करून गतवैभवाला पोहोचण्याच्या दिशेने नालंदाची वाटचाल आता सुरू झाली आहे. नालंदा विद्यापीठात सध्या बुद्धिस्ट स्टडीज्, तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र, इतिहास, पर्यावरण, भाषा आणि साहित्य, व्यवस्थापनशास्त्र असे विविध विभाग सुरू करण्यात आले आहेत. या विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर, तसेच डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सेस चालविले जातात. इतर अनेक विषयही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. चारशे एकरांवर पसरलेल्या या विस्तीर्ण कँपसमध्ये दीडशे एकरांवर वृक्षराजी, तर शंभर एकरांवर तलाव आहेत. साडेसहा मेगा वॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असलेले सोलर पार्क हे कँपस जगातील सगळ्यात मोठे ’कार्बन झिरो’ कँपस आहे. जगप्रसिद्ध आर्किटेक्ट बी. व्ही. दोशी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या कँपसमध्ये चिरपुरातन भारतीय संस्कृतीचा नित्यनूतन आधुनिकतेशी झालेल्या समन्वयाचा अप्रतिम आविष्कार आढळतो.
 
 
nalanda university
 
उद्घाटनप्रसंगी केलेल्या आपल्या प्रेरणादायी भाषणात पंतप्रधानांनी सांगितलं की, आगीच्या ज्वाळांमध्ये पुस्तकं जाळून टाकली तरी ज्ञान संपवता येत नाही. ते म्हणाले, नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना ही भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे. हे कँपस जगाला भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देईल. जे राष्ट्र मानवी मूल्यांच्या आधारावर उभे असते, तेच इतिहासावरील खोटेपणाची आवरणे काढून टाकत उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करू शकते. नालंदाचा इतिहास भारताबरोबरच इतर अनेक देशांशी जोडला गेलेला आहे. म्हणूनच या प्रकल्पातील इतर अनेक देशांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. शिक्षणाला सीमा नसतात. त्यामुळे प्राचीन काळात अनेक देशांमधले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इथे येत असत. आजही वीसहून अधिक देशांमधले विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. नालंदा विद्यापीठ हे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय मूल्याचे खरेखुरे प्रतीक आहे. भगवान बुद्धांच्या ‘अत्त दीप भवः’ या संदेशानुसार, मानवतेला नवा मार्ग दाखविण्याचे काम हे कँपस करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
 
 
इस्लाम आणि ब्रिटिश यांच्या साम्राज्यवादाचं हजार वर्षांचं अंधकारयुग संपलं तरी मनातला गुलामीच्या भावनेचा काळोख दूर झाला नाही आणि चहूबाजूला पसरलेल्या गुलामीच्या खुणाही तशाच राहिल्या. 2014 नंतर हा काळोख, या खुणा दूर करण्याचं काम मोदीजींनी हाती घेतलं. भारतीय नौदलाच्या ध्वजावरचं चिन्ह बदलणं, राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ करणं, जम्मू काश्मीरला देशापासून तोडणारं कलम 370 रद्द करणं, भव्य राम मंदिराची उभारणी करणं, संसदेत सेंगोलची स्थापना करणं, अशी अनेक पावलं उचलून मोदीजींनी गुलामीच्या खुणा दूर करत भारतीयांचा आत्मसन्मान जागृत केला. नालंदा विद्यापीठाची पुनर्उभारणी हे भारताच्या पुनरुत्थानाच्या दिशेने टाकलेलं असंच एक महत्त्वाचं पाऊल आहे. ज्ञान ही भारताची खरी ओळख आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेचा सर्वोच्च आविष्कार असलेलं नालंदा विद्यापीठ पुन्हा उभं राहणं, ही भारताच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे.
 
 

अभिजित जोग

हे नामवंत लेखक असून भारताच्या इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण याविषयीचे 'असत्यमेव जयते?' हे त्यांचे पुस्तक खूपच लोकप्रिय आहे. त्याच्या इंग्रजी, हिंदी व गुजराती आवृत्त्याही उपलब्ध आहेत. डाव्या विचारसरणीविषयी त्यांनी लिहिलेल्या 'जगाला पोखरणारी डावी वाळवी' या विषयाला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याची इंग्रजी आवृत्ती नुकतीच उपलब्ध झाली आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाविषयी 'हेरिटेज फर्स्ट' या समाजमाध्यमांवरील पेजचे ते लेखन करतात. ते विख्यात ब्रँड कन्सल्टंट, जाहिराततज्ज्ञ व काॅपीरायटर असून त्यांचे 'ब्रँडनामा' हे ब्रँडिंगवरील मराठीतले पहिले पुस्तकही खूप वाचकप्रिय आहे. इतिहास, संस्कृती, राजकारण, ब्रँडिंग व भूराजकीय डावपेच हे त्यांचे आवडते विषय आहेत. या विषयांवर ते विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच समाजमाध्यमांवर नियमित लेखन करतात, तसेच विविध व्यासपीठांवर व्याख्याने देतात.