लोकांमध्ये निरोगी जीवनशैलीची सवय रुजावी, त्यांना दैनंदिन व्यायामाचे - तंदुरुस्तीचे महत्त्व कळावे यासाठी लॉकडाऊनच्या काळात सौरभ बोथरा या तरुणाने ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणात त्याने योगासनांचे प्राथमिक प्रशिक्षण आणि त्याला अन्य व्यायाम प्रकाराची जोड अशी सांगड मोठ्या कौशल्याने घातली. त्याचे होणारे सकारात्मक परिणाम सहभागींना दिसू लागल्याने, फक्त तीन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाचे आज जगभर तीस लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. हॅबिट बिल्डिंग म्हणजे सवयी रुजवणे. या हॅबिट बिल्डिंगचे लघुरूप म्हणजे हॅबिल्ड. त्याच्या नावातच त्याचे उद्दिष्ट गुंफलेले आहे आणि त्याच दिशेने सौरभ आणि त्याच्या टीमची यशस्वी वाटचाल चालू आहे. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सौरभ बोथरा याच्या उपक्रमाचा घेतलेला वेध.
आपल्या अवतीभवतीचे काही जण एखाद्या ध्यासाने झपाटलेले असतात. कितीही संकटे आली तरी ते त्यातून मार्ग काढत ठरलेल्या दिशेने पुढे जात राहतात. सौरभ बोथरा... सर्वांमध्ये व्यायामाची, योगासनांची आवड रुजवण्याच्या ध्यासाने झपाटलेला एक तरुण. नागपूरस्थित सौरभ "Yoga Everyday - Habuild' या ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून योगाची आणि व्यायामाची सवय जगभरातल्या आबालवृद्धांमध्ये रुजवत आहे.
दररोज योगासने करण्याची सवय लागली, त्याची आवड रुजली, त्याचे परिणाम शारीरिक तंदुरुस्तीवर दिसू लागले, तर एखादी व्यक्ती आयुष्यभर योगासने करेल. लोकांमध्ये ही आवड रुजवणे, हेच सौरभचे ध्येय. दिसायला छोटे दिसले तरी चांगल्या सवयी रुजवणे हे सोपे काम नाही. शारीरिक मेहनत कमी करण्याची सवय असलेल्या आजच्या बहुसंख्य लोकांमध्ये अशी सवय रुजवणे, हे आव्हानात्मक आहे. व्यायाम व योगासने ही नित्यकर्माइतकीच अत्यावश्यक व्हायला हवीत. त्यासाठी रोजच्या वेळापत्रकातला वेळ राखून ठेवण्याची आणि त्या वेळेला ठरल्याप्रमाणे व्यायाम करण्याची सवय रुजली, की वाढत्या वजनावर ताबा राहतो. अशा वजनदार देहामुळे ज्या शारीरिक तक्रारी सुरू असतात त्या हळूहळू कमी व्हायला लागतात, त्यातूनच दैनंदिन व्यायामाचे महत्त्व रुजायला मदत होते.
या ऑनलाइन वर्गात सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा नाही. त्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही. आपल्या घरात बसून, आपल्याला कंफर्टेबल वाटेल अशा पोशाखात आणि आपल्या सोयीच्या वेळेत हे प्रशिक्षण घेता येते. सोयीच्या वेळेत अशासाठी म्हटले, की हे वर्ग दिवसभरात सहा वेळा, प्रत्येकी पाऊण तासाचे असतात. यातली आपल्या सोयीची वेळ निवडताना फक्त त्याआधी किमान दोन तास काहीही खाल्लेले नसणे, एवढे पथ्य पाळणे आवश्यक. तसेच वर्ग संपल्यावर किमान अर्धा तास काही न खाणे, ही अट पाळली जायला हवी.
या वर्गात सहभागी होण्यासाठी जशी वयाची अट नाही तशी आणखी एक सुविधा आहे. ती म्हणजे, प्रत्येक व्यायाम एकाच वेळी दोन प्रकारे करून दाखवण्यात येतो. सौरभ स्वत: आणि त्याचा सहकारी प्रमोद एकाच वेळी प्रात्यक्षिक दाखवत असतात. एक तुलनेने सोपी पद्धत आणि एक नियमित पद्धत. म्हणूनच ज्यांना खुर्चीत बसून करणे सोयीचे आहे तेही या वर्गात सहभागी होतात. या प्रशिक्षण वर्गाचा अंदाज येण्यासाठी 14 दिवसांचा पूर्णपणे मोफत वर्गही दररोजच्या सहा बॅचमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना यातून होणारे लाभ दिसू लागतात ते त्यानंतर रीतसर फी भरून प्रशिक्षण वर्ग सुरू करतात.
‘हॅबिल्ड’ हा नावापासूनच वेगळा असणाराऑनलाइन उपक्रम आहे. व्यायाम रोज करायचा ठरवला तर तो टाळण्याची सतराशे साठ कारणे तयार असतात; पण सौरभ अतिशय सुहास्य वदनाने आणि ऋजू शब्दांत व्यायामाचे आयुष्यातील महत्त्व लोकांना पटविण्यात यशस्वी झाला आहे. मोफत प्रशिक्षण वर्गानंतर सशुल्क प्रशिक्षण वर्गात दाखल होणार्यांची वाढती संख्या बघितली तर हे लक्षात येते. योग प्लॅटफॉर्म नाही, तर सवयींची कला शिकवणारे संपूर्ण पॅकेज आहे. जशी सहभागींची संख्या वाढते आहे तसे सौरभला मदत करणार्या सहकार्यांचे हातही वाढत आहेत. आज सौरभसह 250 हून अधिक जण ‘हॅबिल्ड’च्या माध्यमातून लोकांमध्ये व्यायामाची व योगासनांची आवड रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
जानेवारी 2024 मध्ये, सौरभ बोथरा आणि त्यांच्या हॅबिल्डमधील टीमने 21 दिवसांचे ऑनलाइन योग शिबिर आयोजित केले. 92 देशांतील 4.5 लाख जण त्याला उपस्थित होते. 12 जानेवारी 2024 रोजी, ’हॅबिल्ड’ वेलनेस प्लॅटफॉर्मने एकाच वेळी 2,46,252 जणांचे एकत्रित सत्र घेतले. योग-व्यायामासाठी एकाच वेळी सर्वाधिक उपस्थिती असलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हॅबिल्डच्या नावावर नोंदवला गेला. यावर सौरभ बोथरा म्हणतात, ‘केवळ विश्वविक्रम करणे हा उद्देश नव्हता, तर लोकांना निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित करणे हे प्रमुख उद्दिष्ट होते आणि त्यात आम्ही यशस्वी झालो.’ या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सौरभ बोथरा यांनी स्वतःला या कामासाठी पूर्ण वाहून घेतले आहे. आयआयटी बीएचयूमधून इंजिनीअर झालेल्या सौरभ यांनी लोकांना योग-व्यायाम शिकवायला बीएचयूपासूनच सुरुवात केली. अनेकांना त्याचा फायदा झाल्याने सौरभ यांनी याचे हे वर्ग घेण्यासाठी भारतभर प्रवास केला.
अनेक शहरांमध्ये निःशुल्क शिकवले आणि कालांतराने स्वत:ची स्वयंसेवी संस्था उभी केली. 2020 मध्ये, जेव्हा लॉकडाऊनमुळे जगभरातील लोक घरात बंदिस्त झाले, तेव्हा त्यांनी नागपूर येथून प्रथम झूम आणि यूट्यूबवर योगाचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यांचे मित्र प्रमोद यादव यांच्यासोबत, त्यांनी दररोज सकाळी 45 मिनिटांचे सत्र आयोजित केले. प्राणायामाचे काही सहजसोपे प्रकार, सूर्यनमस्कार आणि शरीराच्या लवचीकतेसाठी विविध व्यायामाचे प्रकार असे मार्गदर्शनाचे स्वरूप असते. लोकांना याचा फायदा होतो आहे, हे लक्षात आल्यावर ‘हॅबिल्ड’चा व्याप वाढू लागला. मग त्यांनी याला आणखी काही जोड दिली. बहीण त्रिशला बोथरा आणि सहाध्यायी अंशुल अग्रवाल यांच्यासमवेत त्यांनी ‘हॅबिल्ड’ (Habuild) ची पायाभरणी केली. त्याचे सदस्य केवळ भारतातच नाही, तर युनायटेड स्टेट्स, कॅनडा, दुबई आणि सिंगापूरमध्येही आहेत.
सौरभ बोथरा म्हणतात, ‘आमच्या या वर्गांमुळे लोकांनी लक्षणीय बदल अनुभवले आहेत. अनेक जण नियमित व्यायामामुळे दिवसभर उत्साही राहताहेत. आम्ही एक टीम म्हणून सतत नवीन कल्पनांवर विचारमंथन करतो. त्यातूनच योगवर्गांना नृत्य आणि स्ट्रेचिंगच्या मार्गदर्शनाची जोड देण्यात आली. त्याचाही लोकांना फायदा होताना दिसतो आहे. या सगळ्यातून शरीर आणि मनाचं स्वास्थ्य सुधारल्याचे अनेक जण सांगत आहेत.’
’आम्ही या माध्यमातून लोकांमध्ये चांगल्या आणि शरीर-मनासाठी अत्यावश्यक सवयी रुजवत आहोत. याच सवयी तुमच्यात सकारात्मक बदल घडवून आणतात.’ सवयी रुजवणे या एकाच गोष्टीवर काम करत आज सौरभ बोथरा आणि त्यांच्याइतक्याच उत्साही टीमने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे.
सौरभ बोथरा यांनी ‘हॅबिल्ड’च्या माध्यमातून समाजाला निरामय ठेवण्याचे कार्य असेच निरंतर चालू ठेवावे, हीच सदिच्छा.
युवा लेखक सामाजिक ,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक,तरुण भारत नागपूर येथे २ वर्ष स्तंभ लेखन केले आहे. मुंबई तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स,पुण्यनगरी या वृत्तपत्रासाठी विविध विषयांवर लेखन सुरू असते. मध्य प्रदेश येथील इंदोर येथून एक पाक्षिक निघतं “मराठी गौरव”यात ही अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. प्रज्ञालोक ह्या त्रैमासिकात ही लेखन सुरू आहे. आणि प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय आहे. मुंबई तरुण भारताने "कालजयी सावरकर" या नावाने सावरकर विशेषांक प्रसिद्ध केला त्यात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' ह्या विषयावर लेख प्रकाशित झाला आहे. अनेक दिवाळी अंकांसाठी लेखन सुरू असते. साप्ताहिक विवेक साठी लिहितांना कायमच आनंद मिळत असतो. विवेकचा वाचक लेखकांना समृद्ध करणारा आहे.