जम्मू काश्मीरात सुराज्य नांदणारच!

विवेक मराठी    14-Jun-2024   
Total Views |
  
Jammu & Kashmir
बदलत चाललेलं काश्मीर पाकिस्तानच्या आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या पचनी पडत नाहीये. त्याचवेळी, पाकव्याप्त काश्मीरातली अस्वस्थताही दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर, आपले दिवस भरत आल्याची जाणीव झाल्याने बिथरलेला पाकिस्तान दहशतवादाला बळ देतो आहे. 
दिनांक 9 जून 2024ची संध्याकाळ...राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या दिशेने हजारो भारतीय चालले होते. भाजपाच्या नेतृत्वात सलग तिसर्‍यांदा केंद्रात सरकार बनविण्याची संधी मिळालेल्या रालोआ सरकारच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणे...हा दुर्मीळ क्षण ’याचि देही, याचि डोळा’ अनुभवणे हा त्यामागे उद्देश होता. आणि तीच वेळ साधून, जम्मूतल्या सिआसी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चाललेल्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. परिणामी बस खोल दरीत कोसळून 9 जण प्राणाला मुकले. त्यामध्ये दोन लहानग्यांचा समावेश आहे...
 
कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेली ही पहिलीच निवडणूक. ती कशी पार पडते याबाबत जनमानसात धास्ती होती आणि सुरक्षाव्यवस्थेवरही प्रचंड ताण होता. पण, इथल्या निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या. श्रीनगरसह काही भागात तर मतदानाच्या टक्केवारीतही उल्लेखनीय वाढ झाली. काश्मीरात लोकांना लोकशाही नांदायला हवी आहे आणि त्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्यांचं जगणं सुसह्य, सुकर व्हायला हवं आहे असाच संदेश देणारे हे मतदानाचे आकडे होते. (यातून दोन आक्षेपार्ह उमेदवार निवडले गेले ही अतिशय गंभीर बाब असली तरीही...)
 
कलम 370 हटवल्यानंतर, गेल्या वर्षभरात सुमारे सव्वा दोन कोटी पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली. पृथ्वीवरचे नंदनवन प्रत्यक्ष अनुभवले. यातून काश्मिरी जनतेच्या हातात चार पैसे खेळू लागले. त्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर व्हायला मदत झाली. जम्मू काश्मीरमधलं जनजीवन सुरळीत होऊ लागलं. अनेक वर्षं वातावरणात गोठून राहिलेला तणाव हळूहळू निवळू लागला. हे सगळे सकारात्मक बदल अशावेळी होत होते, जेव्हा शेजारच्या पाकव्याप्त काश्मीरात अशांतता पराकोटीला पोचली आहे. त्यामुळे हा विरोधाभास नजरेत भरणारा आणि पाकिस्तानात राहून भारताविरूद्ध दहशतवादी कटकारस्थाने रचणार्‍या संघटनांना अस्वस्थ करणारा. या दहशतवादी संघटनांनी यावेळी नवीन नाव धारण करून वैष्णोदेवीच्या यात्रेकरूच्या बसवर हल्ला केला तरी खिलाडी जुनेच आणि तयारीचे आहेत हे समोर आलेल्या नावांवरून लक्षात येत आहे.
 
या घटनेनंतर नंतर पुढच्या तीन दिवसात कथुआ आणि डोडा जिल्ह्यात दहशतवादी हल्ले झाले. त्यांना प्रत्युत्तर देताना भारताचा एक जवान शहीद झाला तर नऊ जण जखमी झाले.
 
राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणारे भारताचे नेतृत्व या हल्ल्यांनी विचलीत झाले नसले तरी अस्वस्थ झाले. निरपराधांना गमवावा लागलेला जीव सरकारच्या जिव्हारी लागला आहे. त्याचे कडवे आणि चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा संदेश दिला गेला आहे आणि दहशतवाद्यांचा पूर्ण बीमोड करण्यासाठी सशस्त्र दलांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करावा, दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करावी असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. जी7 परिषदेसाठी इटलीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात सविस्तर व सखोल चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही डोवाल यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी आपली सैन्यदले सर्वार्थाने सुसज्ज असल्याची ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली.
 
येथील सुरळीत पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुका, रूळावर येत असलेले जनजीवन, आर्थिक स्थैर्याची लागलेली चाहूल आणि केंद्रात पुन्हा सत्तेवर आलेले भाजपाप्रणित रालोआ सरकार एवढे मुद्दे पाकिस्तानला आणि त्याने पोसलेल्या दहशतवाद्यांना अस्वस्थ करायला पुरेसे आहेत. त्यातच सप्टेंबर अखेरपर्यंत जम्मूकाश्मीर विधानसभेची निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. लोकसभेसाठी झालेल्या भरघोस मतदानामुळे इथली जनताही निवडणुकीसाठी अनुकूल असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळेही आपला शेजारी देश अस्वस्थ आहे. भुकेकंगाल अवस्थेतही काश्मीरवर ताबा मिळवण्याचे त्याचे स्वप्न अद्याप अभंग आहे. ते तसेच राहू देण्यात अमेरिका आणि चीनची पाकिस्तानला असलेली फूसही कारणीभूत आहे. भारतीय नेतृत्वाला या परस्पर संबंधांची जाणीव आहे आणि त्याचवेळी, देशाच्या अंतर्गत बाबीत नाक न खुपसण्याबाबत या सर्वांना ठणकावून सांगण्याचे बळही आज भारताकडे आहे.
 
यावेळी हल्ल्याच्या ठिकाणात आणि संघटनेच्या नावात बदल केला असला तरी हे जैश-ए-मोहम्मदचेच अपत्य आहे हे ओळखण्याइतकी आपली गुप्तहेर यंत्रणा तरबेज आहे. त्यामुळे या घटनेशी शेजारी देशाचा असलेला संबंध स्पष्ट झाला आहे.
 
काश्मिरी जनतेच्या आणि पर्यटकांच्या मनात दहशत निर्माण करून, सुरळीत चालू झालेले इथले जनजीवन पुन्हा ठप्प करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते भारताकडून मोडून काढले जातील. आपली सैन्यदले ते काम चोख बजावतील. त्याचबरोबर इथल्या नागरिकांच्या मनात भारतीयत्वाची भावना खोलवर रूजविण्यासाठी केंद्र सरकार अन्य मार्गही हाताळत आहे. गेल्या 70 हून अधिक वर्षातल्या चुकलेल्या धोरणांमुळे वेगळं समजणार्‍या काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी अनेक दिशांनी काम करावं लागणार आहे याची सरकारला जाणीव आहे.
 
स्वातंत्र्यदिनाला श्रीनगरच्या लाल चौकात लोकांच्या प्रचंड उपस्थितीत भारताचा तिरंगा दिमाखात फडकला. राष्ट्रगीत झाले. आता जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळांमध्ये रोजचे सत्र राष्ट्रगीताने सुरू करण्याचे आदेश आहेत. त्यातून जे देशप्रेमाचे संस्कार इथल्या नव्या पिढीवर होतील, देशाविषयी जी आत्मीयता वाढेल ती महत्त्वाची असेल. ती खोलवर झिरपेल आणि पिढ्या दर पिढ्या संक्रमित होईल. जी भूमी कोणे एके काळी ऋषिमुनींच्या वास्तव्याने, त्यांच्या तपाचरणाने पुनित होती त्याच काश्मीरच्या जगप्रसिद्ध दल सरोवर परिसरात भारताचे पंतप्रधान यंदा जागतिक योग दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित असणार आहेत. त्यासाठी आवश्यक अशी तयारीही सध्या चालू आहे. काश्मिरींना आपल्या महान परंपरेशी जोडून घेण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्यात उपस्थित राहण्याचा पंतप्रधानांचा विचार खरोखर दखल घेण्याजोगा आहे.
 
हे बदलत चाललेलं काश्मीर पाकिस्तानच्या आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या पचनी पडत नाहीये. त्याचवेळी, पाकव्याप्त काश्मीरातली अस्वस्थताही दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर, आपले दिवस भरत आल्याची जाणीव झाल्याने बिथरलेला पाकिस्तान दहशतवादाला बळ देतो आहे. मात्र त्यातून तो स्वतःचीच कबर खोदतो आहे हे कळण्याएवढी समज त्या देशाच्या नेतृत्वाकडे (?) नाही.