ईशान्य भारतात चांगल्या कामगिरीनंतरही एकंदरीत विदेशी शक्ती नवनवीन क्लृप्त्या लढवून लोकांना बहकवत आहेत आणि आपली पावले परत एकदा ईशान्य भूमीत मजबूत करत आहेत हेच दिसत आहे. त्यामुळे वेळेत सावध होणे आवश्यक आहे.
लोकसभा निवडणुकांचा 4 तारखेला निकाल लागला. भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने लोकांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे; पण त्याच दिवशीच्या भाषणात मोदींनी सरकार बनवणार म्हटल्यावर आता लोक आश्वस्त होऊन निकालांकडे तटस्थपणे पाहण्याचा, निकालांच्या आकड्यांवरून भारतीय जनमानसाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
बाकी भारताप्रमाणेच ईशान्य भारतातही थोडीफार भाजपा नेते, कार्यकर्ते आणि मतदारांच्या मनातली भीती सत्य ठरल्याचे दिसून आले आहे. आपण राज्यनिहाय विश्लेषण करून ईशान्येकडील राज्यांचा कल समजून घेण्याचा प्रयत्न करू.
आसाम - ईशान्य भारताची सात राज्ये मिळून एकूण लोकसभा जागा केवळ 24 आहेत; पण त्यातले सर्वाधिक लोकसंख्या असणारे मोठे राज्य म्हणजे आसाम. आसामच्या जनतेने 2019 मध्ये एनडीएला 14 जागांपैकी 12 जागा बहाल करून भाजपाच्या विकासात्मक राजनीतीला शाबासकीची थाप दिली होती.
या वेळी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांत आसाममधील सर्व 14 मतदारसंघांमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली. एनडीएचा भाग म्हणून, भाजपाने 11, एजीपीने दोन आणि यूपीपीएलने एक जागा लढवली. काँग्रेसने 13 जागांवर उमेदवार उभे केले आणि एक जागा सहयोगी आसाम राष्ट्रीय परिषदेसाठी सोडली. आता यातील नऊ जागा आणि मित्रपक्षांच्या तीनपैकी दोन जागा भाजपाने पटकावल्या आहेत.धुबरी या मतदारसंघातली लढत मनोरंजक होती. इथे काँग्रेसचे उमेदवार रकीबुल हुसैन यांनी एआययूडीएफ या पक्षाचे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांना जवळपास नऊ लाख मतांच्या फरकाने पराभूत केले. हा प्रामुख्याने मुस्लीमबहुल त्यातही बांगलादेशी मुस्लिमांचा गड म्हणून ओळखला जाणारा भाग आहे. स्वाभाविकच सर्वच पक्षांनी मुस्लीम उमेदवार दिले होते. या ठिकाणी मुस्लीम ध्रुवीकरणामुळे असोम गण परिषदेच्या उमेदवाराला अपयश आले असले तरी बारपेटा इथला त्यांचा उमेदवार निवडून आला आहे. हे निकाल बर्यापैकी समाधानकारक असले तरी बाकी भारताप्रमाणे ईशान्येतही काँग्रेसची ताकद वाढते आहे आणि मुस्लीम ध्रुवीकरण करणे हा त्यांच्या हातचा मळ झाला आहे. हे धोक्याचे इशारेच इथे मिळत आहेत.
अरुणाचल प्रदेश - उत्तरेचे सगळे अंग चीन, म्यानमारला घासून असणार्या अरुणाचलचे निकाल गेली काही वर्षे भाजपासाठी अगदी सुखावह ठरत आहेत. काही दिवसांपूर्वीच इथल्या विधानसभांचे निकाल लागले. त्यात भाजपाचे सरकार बनत आहेच; परंतु राजनीतिक मैदानातील किरेन रिजुजु आणि तापीर गाओ या दोनही खंद्या खेळाडूंनी या वेळीही भाजपाला सुस्पष्ट यश मिळवून दिले आहे.
मणिपूर - मणिपूरचे निकाल मात्र विचार करण्यासारखे आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यामध्येच मणिपूर अंतर्गत गृहकलहाच्या आगीत जळत होते. दोनही बाजूंच्या जनजातीय लोकांना यामुळे आजही यातना सहन कराव्या लागत आहेत. मणिपूरमध्ये हळूहळू येत असलेली शांती, व्यवस्था, विकासाची गती या सर्वच गोष्टी या घटनेनंतर अशक्य वाटू लागल्या. केंद्र आणि राज्य भाजपा सरकारने विविध उपाययोजना केल्या. मने जुळवण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेतच; पण ज्यांचे सर्व विश्वच उद्ध्वस्त झाले त्यांना हा दिलासा पुरेसा नाही, असे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. मणिपूरच्या दोनही जागा काँग्रेस उमेदवारांनी बळकावल्या आहेत. लोक भाजपेतर कोणाकडे आशेने बघू लागले आहेत का? भाजपाचा राग त्यांनी आपल्या मताच्या अधिकारातून व्यक्त केला आहे का? की मतदानाच्या कालावधीत काही बळाचा प्रयोग केला गेला आहे? मतांची हेराफेरी झाली आहे? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.
नागालँड - मणिपूरच्या उत्तरेला विस्तारलेला नागा जनजातीय लोकांचा प्रदेश म्हणजेच नागालँड. आतंकवादी गटांचे साम्राज्य असणारा, त्यांच्या बंदुकीच्या भयाच्या छायेत जगणारा नागालँड गेल्या काही वर्षांत भाजपाच्या शांतता प्रयत्नामुळे हळूहळू विकासाच्या प्रकाशात येत आहे. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये इथल्या एनडीपीपी या पक्षाने भाजपासोबत विधानसभेत बहुमत आणले आहे.
पण मणिपूर घटनेचे पडसाद नागालँडमधील नागा समाजावरही पडले असण्याची शक्यता इथल्या काँग्रेसच्या विजयाने व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या सुपोन्गमेरेन जमीर यांना एनडीपीपीच्या डॉ. चुनबेम मुरी यांना 50,000 मतांनी हरवण्यात यश आले आहे. भाजपाने विचार करून आपली धोरणे ठरवावीत, अन्यथा इतकी मेहनत पाण्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विकास कार्यक्रम ठप्प करून पार नागा समाजाला भ्रष्टाचार, अंदाधुंदी, दहशतवादाच्या खाईत लोटणे काँग्रेसला अशक्य नाही.
नागालँडमध्ये ख्रिश्चन चर्चची दंडुकेशाही चालते याचे उत्तम उदाहरण ही निवडणूक आहे. नागालँडमध्ये विकासकामे झाली नाहीत, वीज पोहोचत नाही वगैरे कारणांसाठी आम्हाला राज्य वेगळे करून द्या, अशी मागणी जोर धरत आहे. यात ईस्टर्न नागालँड होहो नावाची संघटना अग्रणी आहे. त्यांनी मतदानाच्या दोन दिवस आधीपासूनच उत्तर नागालँडमधील त्यांच्या भागातील सहा आमदारांना धमक्या द्यायला सुरुवात केली. आपली मागणी पुढे रेटायची नामी संधी त्यांना मिळाली. याला काँग्रेस उमेदवारानेही चांगलीच हवा मिळवून दिली.
मतदानाच्या दिवशी त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. सगळी मतदान केंद्रे खुली असूनही जनसामान्य मतदान करायला घराबाहेर पडलेच नाहीत, कारण मतदानाला बाहेर पडलात तर जे परिणाम होतील त्याचे जबाबदार तुमचे तुम्ही असाल, अशी गर्भित धमकी सामान्य लोकांना दिली गेली होती. असे काही झाले नसते तर भाजपाच्या मित्रपक्षाचे निवडून येणे स्वाभाविक होते, कारण जिथे हा सगळा प्रकार घडवून आणण्यात आला ते सगळे विभाग भाजपा समर्थक म्हणून ओळखले जातात. मणिपूरमध्ये चर्चप्रणीत सॉलिडॅरिटी मार्च घडवून आणून त्याचे रूपांतर हिंसेत केले गेले हे ताजे उदाहरण असल्यामुळे या धमक्या, बहिष्कार खूप सावधपणे दोन पावले मागे येऊन हाताळला गेला. त्याचा परिपाक निवडणूक हरण्यात झाला, असे म्हणू शकतो.
मिझोराम - मिझोराममध्ये, सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) उमेदवार रिचर्ड वनलालहमंगाइहा यांनी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) के. वनलालवेना यांचा 66845 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये, रालाओ सहयोगी असलेल्या एमएनएफने जागा जिंकली.
मेघालय - मेघालयमध्ये, व्हॉइस ऑफ पीपल पार्टीचे (व्हीपीपी) उमेदवार रिकी अँड्र्यू जे. सिंककॉन यांनी शिलाँग जागेवर विद्यमान काँग्रेस खासदार व्हिन्सेंट एच. पाला यांचा 3.7 लाख मतांनी पराभव केला. आता ते काँग्रेसची साथ देणार, अशी बातमी प्रसिद्ध होते आहे. तुरा जागेवर काँग्रेसचे उमेदवार सालेंग ए. संगमा यांनी नॅशनल पीपल्स पार्टीच्या विद्यमान खासदार अगाथा संगमा यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. 2019 मध्ये याच्या बरोबर उलट म्हणजे काँग्रेसने शिलाँगची जागा जिंकली होती, तर एनपीपीने तुरा जिंकला होता.
त्रिपुरा - त्रिपुरामध्ये भाजपाने दोन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकून मोठा विजय नोंदवला. माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी त्रिपुरा पश्चिममध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशीषकुमार साहा यांचा सहा लाखांहून अधिक मतांनी पराभव करून विजय मिळवला. त्रिपुरा पूर्वमध्ये, टिपरा मोथा प्रमुख प्रद्योत देबबरमन यांची बहीण कृती देवी देबबरमन यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) उमेदवार राजेंद्र रेआंग यांचा 4.86 लाख मतांनी पराभव केला. भाजपाने 2019 मध्येही या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. त्रिपुरा पूर्वमधून रेबती त्रिपुरा विजयी झाल्या होत्या, तर प्रतिमा भौमिक यांनी त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला होता.
चांगल्या कामगिरीनंतरही एकंदरीत विदेशी शक्ती नवनवीन क्लृप्त्या लढवून लोकांना बहकवत आहेत आणि आपली पावले परत एकदा ईशान्य भूमीत मजबूत करत आहेत हेच दिसत आहे. त्यामुळे वेळेत सावध होणे आवश्यक आहे.