शेतकरी व उद्योजकांसाठी वरदान ठरलेले एक अभिनव वाळवण तंत्र म्हणजे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अतुल मोहोड यांनी निर्माण केलेला आगळावेगळा ‘पिरॅमिड सोलर ड्रायर’. कोकणची ग्रामीण अर्थव्यवस्था नाशवंत फळपिकांवर अवलंबून आहे. म्हणूनच पिरॅमिड सोलर ड्रायरसारखी तंत्रं केवळ अन्नपदार्थांनाच नव्हे, तर अर्थव्यवस्थेलाही टिकाऊ, सुदृढ आणि शाश्वत बनवतील.
मानवी खाद्यसंस्कृतीची उत्क्रांती हा एक मनोरंजक विषय आहे. कंदमुळं, फळं खाणं, प्राण्यांची शिकार करून खाणं यापासून त्याची सुरुवात झाली. मग हळूहळू शेती सुरू झाली. अन्नाच्या उपलब्धतेबरोबरच ’अन्न सुरक्षा’ ही माणसाला महत्त्वाची वाटू लागली आणि त्यातून नाशवंत पदार्थ दीर्घकाळ कसे टिकवायचे, हा विचार सुरू झाला आणि त्याची नवनवीन तंत्रं जन्माला आली. सूर्याची ऊर्जा सर्वत्र मुबलक उपलब्ध असल्याने अन्नपदार्थ उन्हात वाळवून ठेवणं, हे तंत्र प्रदीर्घ काळापासून आजतागायत सर्वत्र वापरात आहे. पर्यावरणदृष्ट्या या तंत्राचं महत्त्व असं की, यात कोणतीही कृत्रिम ऊर्जा वापरली जात नाही, तर सौर ऊर्जा ही ‘थेट’ वापरली जाते. साधारणपणे फेब्रुवारी ते मे हा तीव्र उन्हाचा काळ असतो. या काळात सर्व प्रकारच्या भाज्या, फळं, अन्नधान्य, प्रक्रिया केलेले पदार्थ हे वाळवून ठेवायला संधी असते. कोकणात आंबा पोळी, फणस पोळी, फणसाचे गरे, आमसुलं, पापड-फेण्या, आंबवशी, चिंच अशी वाळवणांची लगबग असते. एका आकडेवारीनुसार, कोकणात साधारणतः 450 ते 600 वॅट प्रति वर्ग मीटर, दिवसातले 7 ते 8 तास व वर्षातले 250 दिवस सौर ऊर्जेची उपलब्धता असते. म्हणजेच, एका दिवसाला 15 ते 20 मेगाज्यूल प्रति चौरस मीटर एवढी सौर ऊर्जा मिळते. मात्र, थेट उन्हात अन्नपदार्थ वाळवणं याला अनेक मर्यादा पडतात. वाळवणात केरकचरा पडतो. प्राणी-कीटक यांचा धोका असतो. शिवाय पदार्थाला वारा लागल्याने उष्णता पुरेशी मिळत नाही. या सगळ्या मर्यादांवर मात करण्यासाठी नवनवीन उपकरणांची निर्मिती संशोधकांकडून केली जात आहे. महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या कोकणभूमीचं वैशिष्ट्य म्हणजे दमट हवा. या दमट हवेत अन्नपदार्थ टिकवणं हे मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीत सौर वाळवण तंत्राची गरज प्रकर्षाने जाणवते. शेतकरी व उद्योजकांसाठी वरदान ठरू शकेल असं एक अभिनव वाळवण तंत्र म्हणजे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अतुल मोहोड यांनी निर्माण केलेला आगळावेगळा ‘पिरॅमिड सोलर ड्रायर’.
जगभरात सोलर ड्रायरची विविध प्रारूपं आत्तापर्यंत निर्माण केली गेली आहेत. सोलर ड्रायर हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात - डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट सोलर ड्रायरमध्ये थेट सूर्यकिरणांची उष्णता पदार्थाला लागते व त्यातील आर्द्रतेचे बाष्पीभवन होते. इनडायरेक्ट सोलर ड्रायरमध्ये उष्णतेचा संकलक बसवलेला असतो, जो सूर्यप्रकाशाने तापतो व त्यामुळे त्याच्या संपर्कात येणारी हवा तापते. कुठल्याही तंत्राचं प्रारूप हे स्थानिक परिस्थितीला अनुकूल असावं लागतं तर त्याचे अपेक्षित फायदे मिळतात. डॉ. मोहोड यांनी गेली पाच वर्षं संशोधन करून बनवलेला सोलर ड्रायर हा पिरॅमिडच्या आकाराचा असून त्याचा जमिनीच्या पृष्ठभागालगतचा आकार 2.4 ु 2.4 फूट एवढा आहे व उंची सुमारे तीन फूट आहे. एका वेळी 5 ते 8 किलो अन्नपदार्थ वाळविण्याची या सोलर ड्रायरची क्षमता आहे. यात मेथी-कोथिंबीर इ. भाज्या; फळे, पापड, मासळी असे बहुतांश अन्नपदार्थ वाळवता येतात. याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा सहज कुठेही नेता येण्यासारखा आहे. वापरानंतर हा सोलर ड्रायर घडी करून ठेवता येतो. या ड्रायरचा तळ हा काळ्या रंगाच्या पॉलिथीन शीटचा असतो, ज्यामुळे सूर्यकिरणांद्वारे येणारी उष्णता शोषून घेतली जाते. त्यावर चार वाळवणी ट्रेची रचना केलेली आहे. या ट्रेमध्ये अन्नपदार्थ ठेवता येतात. या ड्रायरच्या तीन बाजूंना 200 मायक्रॉन अल्ट्राव्हॉयलेटेड पॉलिइथिलीन शीट बसवलेल्या आहेत. या शीटच्या आवरणातून सूर्याची किरणं पदार्थांमध्ये शोषली जातात. पिरॅमिड आकाराच्या ड्रायरच्या शिखरावर गरम वाफ जाण्यासाठी चिमणी बसवलेली आहे. भौतिकशास्त्रीय नियमानुसार थंड हवा जमिनीलगत राहते व गरम हवेचं वरच्या दिशेने वहन होत राहतं.
या सोलर ड्रायरच्या तळाशी मोकळी जागा असते, जिथून वातावरणातील सामान्य तापमानाची हवा आत जाते. आतील उष्णता संकलक तापलेला असल्याने त्याच्या संपर्कात येऊन ही हवा गरम होते व वरच्या दिशेने वाहू लागते. वरच्या दिशेने वाहताना अन्नपदार्थांच्या संपर्कात येऊन त्यातील आर्द्रता हवेकडून शोषून घेतली जाते व अंतिमतः शिखरावरील चिमणीतून आर्द्रतायुक्त गरम हवा बाहेर पडते. परिणामतः अन्नपदार्थ कोरडा होऊन अधिक टिकाऊ बनतो. ड्रायरच्या आतलं तापमान 40 ते 65 अंश सेल्सिअसपर्यंत होऊन राहतं. उघड्यावर नुसत्या उन्हात अन्नपदार्थ वाळायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा 30 टक्के कमी वेळेत या सोलर ड्रायरमध्ये पदार्थ वाळून निघतो. एका वेळी सर्वसाधारणपणे पाच किलोपर्यंत पदार्थ यात वाळवता येतात.
डॉ. अतुल मोहोड - 9422546905
अन्नपदार्थ उन्हात थेट वाळवण्याच्या मर्यादा लक्षात आल्यावर विद्युत ऊर्जेवर चालणारे ड्रायर शोधले गेले. मात्र विद्युत ऊर्जेवरील ड्रायरलाही अनेक मर्यादा आहेत. हे ड्रायर अवजड असतात. या ड्रायर्सची किंमत 30 ते 40 हजारांवर जाते. हे ड्रायर चालवण्यासाठी विजेचा खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. यांच्या यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता असते. या मर्यादांचा विचार करता सौर ड्रायर फायदेशीर ठरतात. डॉ. मोहोड यांनी बनवलेल्या पिरॅमिड सोलर ड्रायरने अन्य प्रकारच्या सोलर ड्रायर्सच्या मर्यादांवरही मात केलेली असल्याने हा सामान्य शेतकरी, उद्योजक, छोटे व्यावसायिक यांना वापरण्यासाठी, तसंच कोकणासारख्या सलग जमीन क्षेत्र नसलेल्या, चढउतारांच्या प्रदेशातही सहज वापरता येण्यासारखा आहे. या पिरॅमिड सोलर ड्रायरची किंमत 12000 ते 15000 एवढी आहे. राजीव गांधी फूड सायन्स टेक्नॉलॉजी या संस्थेनेही या तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे. या संस्थेच्या अनुदानातून पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या शेतकर्यांना कृषी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सौर ऊर्जा विभागाकडून हा ड्रायर देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. संशोधनाच्या बाबतीत अनेकदा असं होतं की, संशोधन हे प्रयोगशाळेत केलं जातं. प्रयोगशाळेत मर्यादित क्षेत्रात त्याची चाचणी घेतली जाते व तांत्रिकदृष्ट्या त्याचे अपेक्षित परिणाम मिळाले, की ते संशोधन यशस्वी झाल्याचं घोषित होतं; परंतु लोकांना प्रत्यक्ष व्यवहारात त्या संशोधनाचा खरंच उपयोग किती होतो? हा पुढचा टप्पाही महत्त्वाचा असतो. डॉ. मोहोड यांनी बनवलेला पिरॅमिड सोलर ड्रायर हे केवळ प्रयोगशाळेतलं यशस्वी संशोधन नसून प्रत्यक्ष व्यवहारातही अत्यंत उपयोगी आहे. याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डहाणू तालुक्यातील शेतकरी व महिला बचत गट हा पिरॅमिड सोलर ड्रायर वापरत आहेत व त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. कोसबाड (डहाणू) इथल्या कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी व महिला बचत गटांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू-बोर्डी-घोलवड या भागांतले चिकू प्रसिद्ध आहेत. मात्र चिकू हेही नाशवंत फळ असल्याने त्यावर प्रक्रिया करून त्यापासून टिकाऊ मूल्यवर्धित उत्पादनं बनवणं याला पर्याय नाही. या परिसरात बचत गटांच्या माध्यमातून चिकूपासून पावडर, चॉकलेट, मुखवास, लोणचं इ. पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ तयार करण्यासाठी चिकूचे काप उन्हात वाळवून कोरडे करण्याची गरज असते. थेट उन्हात चिकूचे काप वाळण्यासाठी चार दिवस लागतात. त्यात धूळ, किडे, मुंग्या, वारा यांचाही त्रास होतो. पिरॅमिड सोलर ड्रायर हा या प्रश्नावर रामबाण उपाय ठरला आहे. येथील 70 लोकांना हा ड्रायर वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपल्या उत्पादनात आणि उत्पन्नात 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं इथले शेतकरी सांगतात.
कोकणची ग्रामीण अर्थव्यवस्था ही बहुतांशी आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद, जांभूळ अशा नाशवंत फळपिकांवर अवलंबून आहे. पदार्थ टिकवण्याची काही सोय नाही आणि वाळवायला ऊन पुरेसं मिळत नाही म्हणून अनेक पदार्थ टाकून दिले जातात. पिरॅमिड सोलर ड्रायरसारखी तंत्रं केवळ अन्नपदार्थांनाच नव्हे, तर अर्थव्यवस्थेलाही टिकाऊ, सुदृढ आणि शाश्वत बनवतील.