आज केरळमधील यहुदी लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे; प्रामुख्याने 1948 मध्ये इस्रायलच्या स्थापनेनंतर इथल्या लोकांनी केलेल्या स्थलांतरामुळे. पण या एके काळी समृद्ध असलेल्या समुदायाचा इतिहास कोचीमध्ये अजूनही या सिनेगॉगच्या स्वरूपात जिवंत आहे. क्रंगणूरच्या यहुदी राज्याचा इतिहास ज्यू विस्थापितांची लवचीकता आणि हिंदूंची सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी अधोरेखित करतो. भारतीय ज्यू लोकांच्या इतिहासातील हा अनोखा अध्याय म्हणूनच महत्त्वाचा आहे.
मी केरळमधल्या कोची शहरात आहे. इथल्या मट्टनचेरी ह्या जुन्या भागात ज्यू किंवा यहुदी लोकांचा एक सुरेख सिनेगॉग आहे. परदेशी सिनेगॉग म्हणून ह्या सिनेगॉगला ओळखले जाते. ह्या काहीशे वर्षे जुन्या सिनेगॉगमधल्या शांत, सुंदर, प्रसन्न जागेत दुपारी मी एकटीच बसले होते. मनामध्ये विचारचक्र सुरू होते.
ज्यू म्हणजे यहुदी लोकांचा इतिहास हा विस्थापितांचा इतिहास आहे. त्यातही भारताताल्या यहुदी लोकांचा इतिहास फार जुना आहे. इस्रायल हे आजच्या जगातले एकमेव यहुदी राष्ट्र हे हमास ह्या इस्लामी दहशतवादी संघटनेने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर युद्धाच्या परिस्थितीत आहे. इस्रायलचा जन्म दुसर्या महायुद्धानंतर कसा झाला आणि तिथली भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती किती ज्वलनशील आणि अशांत आहे हे भारतातल्या बर्याच लोकांना ठाऊक आहे; पण इस्रायलच्या जन्माच्या कितीतरी शतके अगोदर एक यहुदी राज्य भारतात कित्येक शतके शांततेत अस्तित्वात होते हे मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. हे ज्यू राज्य होते क्रंगणूरला, ज्याला यहुदी इतिहासात शिंगली असेही नाव आहे.
चेरा शासक भास्कर रवि वर्मा यांनी यहुदी नेते जोसेफ रब्बान यांना दिलेला विशेषाधिकार
हे यहुदी स्वायत्त राज्य, हे आजच्या केरळमधल्या कोची शहराजवळील क्रंगणूर (आधुनिक कोडुंगल्लूर) येथे जवळजवळ कित्येक शतके एक महत्त्वपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न, स्वायत्त यहुदी वसाहत म्हणून अस्तित्वात होते. क्रंगणूरच्या या यहुदी राज्याचा आणि तिथल्या समुदायाचा इतिहास हा व्यापार, यहुदी संस्कृती आणि हिंदूंच्या धार्मिक सहिष्णुतेचा इतिहास आहे, ज्यामुळे तो यहुदी आणि भारतीय अशा दोन्ही इतिहासांचा एक महत्त्वाचा आणि रोचक अध्याय बनला आहे.
परदेशातून आलेल्या ह्या नव्या लोकांचे त्या प्रदेशातील हिंदू चेरा राजांनी आनंदाने यथोचित स्वागत केले
क्रंगणूरमध्ये हे यहुदी राज्य नक्की कधी अस्तित्वात आले ह्याबद्दल इतिहासकारांच्यात मतभेद आहेत; परंतु सामान्यतः असे मानले जाते की, जेरुसलेम इथले ज्यू लोकांचे दुसरे मंदिर रोमन आक्रमकांनी नष्ट केल्यानंतर तिथले यहुदी लोक जगाच्या चारी दिशांना पांगले. त्यांचेच वंशज आज जगभरात ज्युईश डायस्पोरा म्हणून ओळखले जातात. त्यातलेच काही लोक साधारणपणे 72 CE मध्ये बोटींमध्ये बसून मलबार किनार्यावर पोहोचले. परदेशातून आलेल्या ह्या नव्या लोकांचे त्या प्रदेशातील हिंदू चेरा राजांनी आनंदाने यथोचित स्वागत केले आणि त्यांचा धर्म वेगळा आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या स्वतःच्या धार्मिक परंपरांचे पालन करण्याचे पूर्ण अधिकार दिले.
तसे यहुदी लोक हे कष्टाळू आणि व्यापार करण्यात माहीर. रोमन साम्राज्य आणि भारत ह्या दोन राष्ट्रांना जोडणारी विस्तृत व्यापार प्रणाली भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात होती. ह्या नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ज्यू लोकांचे भारतात येणे-जाणे किमान 2000 वर्षांपासून आहे. क्रंगणूर मलबार किनार्यावरचे एक प्रमुख बंदर असल्याने यहुदी लोकांसाठी एक आदर्श वसाहत स्थान होते. ह्या भागातल्या हिंदू चेरा राजांनी क्रंगणूरमध्ये वेगळी ज्यू वसाहत निर्माण करण्याच्या सनदा ज्यू लोकांना लिहून दिल्या आणि इस्रायलबाहेरची जगातली पहिली स्वतंत्र यहुदी वसाहत भारतात जन्माला आली.
चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत, क्रंगणूरमध्ये एक मोठा सुसंस्कृत यहुदी समुदाय भरभराटीला आला होता. त्यांनी मसाल्याच्या व्यापारात खूप पैसे मिळवले आणि आर्थिकदृष्ट्या ते खूप यशस्वी झाले. सुमारे इसवी सन 1000 च्या आसपास कोरल्या गेलेल्या एका ताम्रपत्रात मल्याळम आणि तमिळ लिपींमध्ये तत्कालीन हिंदू चेरा शासक भास्कर रवि वर्मा यांनी यहुदी नेते जोसेफ रब्बान यांना दिलेल्या विशेषाधिकारांचा तपशील आहे. ह्या ताम्रपत्राद्वारे यहुदी समुदायाला जमीन खरेदी करण्याचा अधिकार, त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आणि क्रंगणूरचे प्रशासन करण्याची संपूर्ण स्वायत्तता दिली गेली आहे. हा ताम्रपट्ट अभिलेख हिंदू चेरा राज्याच्या सहिष्णुतेचे आणि सौजन्याचे उत्तम प्रमाण आहे. यामुळे तत्कालीन यहुदी समुदाय आणि स्थानिक हिंदू शासकांमधील सुसंवादी संबंध अधोरेखित होतात.
क्रंगणूरमध्ये स्थायिक झालेल्या यहुदी लोकांनी आपली भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवली; पण त्याचबरोबर स्थानिक भाषा आणि संस्कृतीही आपखुशीने स्वीकारली. त्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट होण्यास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि संस्कृतीला लक्षणीय योगदान देण्यामध्ये यहुदी लोक यशस्वी झाले. क्रंगणूरमधील यहुदी समुदायाने जे सिनेगॉग बांधले त्यातले कोचीमधले प्रसिद्ध परदेशी सिनेगॉग आजही अस्तित्वात आहे; पण क्रंगणूरमधील मूळ सिनेगॉग आता अस्तित्वात नाही.
क्रंगणूरचे यहुदी त्यांच्या धार्मिक प्रथांचे, परंपरांचे आणि आहार नियमांचे कसोशीने पालन करत होते, त्यांची अनोखी ओळख जपत होते; पण केरळमधल्या स्थानिक संस्कृतीशीही त्यांनी आनंदाने आणि एकोप्याने जुळवून घेतले होते. हिंदू आणि यहुदी संस्कृतींच्या मिश्रणामुळे, त्यांच्या भाषेमध्ये, साहित्यामध्ये, पेहराव, जेवण आणि रूढींमध्ये फरक पडून एक नवी यहुदी-मल्याळी मिश्र संस्कृती तयार झाली, जी आजही इस्रायलमध्ये स्थायिक झालेले कोचिनी ज्यू जपताना दिसतात.
क्रंगणूरच्या ह्या यहुदी राज्याचा र्हास झाला तो चौदाव्या शतकात, विविध घटकांच्या संयोगामुळे. या प्रदेशाला मुस्लीम मूर आणि कट्टर कॅथलिक असलेल्या पोर्तुगीजांच्या आक्रमणांचा आणि संघर्षांचा सामना करावा लागला. क्रंगणूरचे चिमुकले यहुदी राज्य उद्ध्वस्त केले गेले, तिथले सिनेगॉग जाळले गेले आणि क्रंगणूरचा शेवटचा यहुदी शासक सुरक्षिततेसाठी आपल्या पत्नीला पाठीवर घेऊन पोहत कोचीला पोहोचला, जिथे कोचीच्या हिंदू राजांनी त्यांना आश्रय दिला आणि स्वतःच्या राजवाड्याला आणि खासगी मंदिराला लागूनच जमीन देऊन ज्यू लोकांना नवीन सिनेगॉग बांधायची परवानगी दिली. अगदी आजही मट्टनचेरीचा सिनेगॉग आणि हिंदू मंदिर ह्याच्यामध्ये फक्त एका भिंतीचे अंतर आहे! क्रंगणूरच्या ह्या चिमुकल्या यहुदी राज्याचा इतिहास मट्टनचेरीच्या सिनेगॉगमध्ये दहा मोठ्या चित्रांच्या स्वरूपात मांडलेला आहे.
सोळाव्या शतकापर्यंत अनेक यहुदी क्रंगणूरमधून कोचीमध्ये स्थलांतरित झाले, जिथे त्यांनी यहुदी जीवनाचे नवीन केंद्र स्थापित केले. क्रंगणूरचे ज्यू राज्य जरी बुडले तरी क्रंगणूरच्या यहुदी समुदायाचा वारसा कोचीमध्ये जिवंत राहिला आणि कोचिन संस्थानच्या संस्कृतीला प्रभावित करत राहिला. केरळमधल्या यहुदी समुदायाने अनेक शतके त्यांची अनोखी ओळख आणि परंपरा टिकवून ठेवली; पण त्याचबरोबर त्यांचे इतर स्थानिक समुदायांशी संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले.
आज केरळमधील यहुदी लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे; प्रामुख्याने 1948 मध्ये इस्रायलच्या स्थापनेनंतर इथल्या लोकांनी केलेल्या स्थलांतरामुळे. पण या एके काळी समृद्ध असलेल्या समुदायाचा इतिहास कोचीमध्ये अजूनही या सिनेगॉगच्या स्वरूपात जिवंत आहे. क्रंगणूरच्या यहुदी राज्याचा इतिहास ज्यू विस्थापितांची लवचीकता आणि हिंदूंची सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी अधोरेखित करतो. भारतीय ज्यू लोकांच्या इतिहासातील हा अनोखा अध्याय म्हणूनच महत्त्वाचा आहे.
काल मी कोचीच्या रिकाम्या सिनेगॉगमध्ये एका जुन्या वेताने विणलेल्या सोफ्यावर बसून बाहेर धो धो पडणार्या पावसाचा आवाज ऐकत होते. शेजारीच असलेल्या मट्टनचेरीच्या हिंदू मंदिरातून अस्पष्टसा घंटानाद ऐकू येत होता. सिनेगॉगमध्ये मी एकटीच होते. काही क्षण मला अपार शांततेची अनुभूती आली. अशी शांतता जी इस्रायलमधल्या लोकांना आजही हुलकावणी देतेय. मी सिनेगॉगमध्ये मनापासून प्रार्थना केली की, इस्रायलच्या लोकांना संघर्षापासून शांतता मिळो.