मतदाण

भावड्याची चावडी

विवेक मराठी    22-May-2024   
Total Views |
सगळ्यात सेवटी आद्याचा बाप बूथमदी घुसला.. श्याई लावनार्‍या बाईनं रश्मिआक्काचा वचपा आद्याच्या बापावं काडत बोट पूर्न निळं करून टाकलं.. बोट रंगवूण घेऊन फू फू करत वाळवत आद्याचा बाप मशिनीपाशी ग्येला.. पंजा पंजा घोकून बी धनुक्षबानाचं चिण्ह पाहूण त्येचं काळीज गलबललं.. आपल्या बापाणं धनुक्षबानाची काय श्यान ठिवल्याली आनि आपन श्यान खाऊन ती कशी घालवली ह्ये आद्याच्या बापाच्या डोळ्यासमुरनं झळकून ग्येलं.. आत्यंत जड मणाणे पंजाचं बटन दाबूण आद्याचा बाप भाईर पल्डा.

vivek 
अर्कचित्र - अमोघ वझे
आद्या सक्काळधरनं आंगूळ उरकूण रश्मिआक्काणं पाडून धिल्याला भांग सांबाळत येका हातात प्ल्याष्टीकची मशाल आन दुसर्‍या हातात फटफटीचा वाकवल्याला सायलेंसर तुतारी म्हनून बुंगवत घरभर फिरत हुता.. म्हयनाभर प्रचार करूण त्येचं मन भरलं नवतं म्हनून आज मत्दाणाच्या दिवसी सक्काळधरणं त्येचा ह्यो तमाश्या चाल्ल्याला.. जोडीला ‘भविश्य त्याचे आसेल विश्याल जेच्या हाती आसेल मशाल’ आसल्या घोशनाबी चालवल्या हुत्या.. त्यो आसा वरडत घरातनं पळंत आसतानी रश्मिआक्कानं गप्कनी त्येची गचांडी धरली तसा त्यो झटका लागल्यावानी थांबला.. “बास जाला पोरकटपना.. पप्पांला बलीव.. मत्दाणाला जायाचं हाय..!” रश्मिआक्कानं दम भरला तसा आद्या फिस्करून हासला आनि भाईर पळाला.. रश्मिआक्का त्येच्या मागणं भाईर आली तं मागल्या आंगनात आद्याचा बाप खिडकीवं चडून येका हातात मश्याल घिऊन ब्येंबीच्या देठापास्नं ब्येंबाटायला लागला, ‘आरे पुन्ना आयुक्षांच्या प्येटवा मश्याली.. हो हो हो..!’ रश्मिआक्काला बगताच गुमान खिडकीवरणं खाली उतारला आनि हातातली मश्याल झटकनी लपावली आनि कापडं सावरत हुबा र्‍हायला.. “पोरकटपना करून संपला आसन तं व्हा भाईर..!” रश्मिआक्काचा हुकूम आल्यावं आद्या आन् त्येचा बाप डायरेक दाराभाईर जाऊन थांबले.. रश्मिआक्का दाराला कुलूप घालून यीस्तवर तेज्याबी जंगलातणं दबक्या पावलांणी यून तेंच्या म्हागं थांबला.. चौकडी पूर्न झाल्याली बगून रश्मिआक्काणं रिक्षाला हात क्येला आन् तिघांला रिक्षात कोंबूण जिल्ला परिशदच्या साळंत आली.. तितं भाईरच देव्या आन् दाढीची मानसं सॉगताला थांबल्याली.. त्यांला बगून आद्याला आन् तेच्या बापाला च्याव चडला आन् त्यो मणातल्या मणात पण्णास येळेला मशालीचं चिण्ह दाबूण आला..! रश्मिआक्काणं त्ये ह्येरलं आनि आद्या आन् तेज्याला घिऊण लायनीत घुस्ली.. तिचा पदर धरूण आद्याचा बाप बी लायनीला लागला.. वळकीचा यक जन मत्दाण करून चाल्ल्याला पाह्यल्यावं आद्याच्या बापाला पुन्ना च्याव आला.. त्येणं दाढीच्या मानसांला आयकू जाईन आसं इच्यारलं, “पावनं, प्येटलीया काय मश्याल..!?” “न्हाय बा.. ब्येचाळीस डीग्रीला कुटं मश्याल प्येटवता..!? आपलं गारेग्गार कमळाचं फूल बरं हाय की..!” पावन्यानं हावा काडली आन् भाईर दाढीच्या मानसांमदी हशा पिकला.. कोरड्या पल्डेल्या व्हटांवरूण आनि भाईर आलेल्या दातांवरूण जीभ फिरवत आद्याच्या बापाणं त्वांड लपवलं.. चोरूण रश्मिआक्काकं पाह्यलं तं रश्मिआक्का मारक्या म्हयशीवानी आद्याच्या बापाकं बगत हुती.. लायनीतल्या चार बायाबी हासल्याणं तिची इज्जत जात हुती.. ती आद्याच्या बापाला काही बोलनार यवड्यात मत्दाण केंद्रातूण आवाज आला, ‘चला नेक्ष्ट..!’ त्ये आईकल्यावं आद्या शायनिंग मारत म्हन्ला, “मम्मी, म्या जातू पयला..!” आसं म्हनंत आद्या बूथमदी घुसला बी..! मशीनीपाशी ग्येल्यावं त्येला धनुक्षबानाचं चिण्ह दिसलं आन् त्येचं जरा कन्फ्युझन झालं.. मश्यालीचं चिण्हच दिसंना.. लै शोधलं पन सापडंच ना.. आघाडी आसल्याणं तेंच्या वार्डात पंजाला मत्दाण करायचं रश्मिआक्काणं घरणंच बजावून आनल्यालं.. आद्याणं सोत्ताला सावरत पंजावं बोट दाबलं आनि भाईर आला.. फुडं रश्मिआक्का आत घुसली.. श्याई लावनार्‍या बाईला डिझाईण चांगलं काडा, यकदम नाजूक काडी वडा म्हंजी फोटू चांगला यीन, आसं म्हनून वात आनला.. आपन सत्तेत आल्यावं शाई लावनार्‍यांना ब्यूटीपार्लरचा बेशीक कोर्स कंपल्सरी करायचा तिचा इच्यार पक्का जाला.. बटन दाबून ती बी भाईर पल्डी.. म्हागनं तेज्या ग्येला आनि ‘निलूम्बो ल्युसीफेरा नवतंच तितं’ आसलं काय तरी पुटपुटत ‘टँमरिंडस इंडिका’च्या सावलीत जाऊन थांबला.. सगळ्यात सेवटी आद्याचा बाप बूथमदी घुसला.. श्याई लावनार्‍या बाईनं रश्मिआक्काचा वचपा आद्याच्या बापावं काडत बोट पूर्न निळं करून टाकलं.. बोट रंगवूण घेऊन फू फू करत वाळवत आद्याचा बाप मशिनीपाशी ग्येला.. पंजा पंजा घोकून बी धनुक्षबानाचं चिण्ह पाहूण त्येचं काळीज गलबललं.. आपल्या बापाणं धनुक्षबानाची काय श्यान ठिवल्याली आनि आपन श्यान खाऊन ती कशी घालवली ह्ये आद्याच्या बापाच्या डोळ्यासमुरनं झळकून ग्येलं.. आत्यंत जड मणाणे पंजाचं बटन दाबूण आद्याचा बाप भाईर पल्डा.. बान वर्मी लागल्याला..!

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.