भारतात जम्मू-काश्मीरमध्ये 2800 रुग्णालये आहेत, तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांची संख्या तेवीस. जीवनावश्यक वस्तूंची महागाई तर इतकी गगनाला भिडलेली, की तिने रोजचे जगणेही मुश्कील करून टाकलेले. थोडक्यात, खायची भ्रांत, वैद्यकीय सुविधांचा अभाव, महागाईचा मारा, नोकरीची संधी नाही आणि पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार अशी दुर्दशा या ‘आझाद’ काश्मीरमधल्या लोकांची आहे.
पाकव्याप्त काश्मीरच्या मिरपूर आणि दक्षिणेच्या भागात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि हिंसाचार चालू आहे. तेथील स्थानिक नागरिकांच्या रोषाचे पाकिस्तानी लष्कर व पोलीस लक्ष्य बनत आहेत. एरव्ही तुलनेने शांत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरच्या या दक्षिण भागात हिंसाचार सुरू होणं, त्यात पाकिस्तानी लष्कर लक्ष्य होणं यामागे भारत आहे, अशी बोंब ठोकायला पाकिस्तानने सुरुवात केलीच आहे. त्याऐवजी तिथल्या नेतृत्वाने आत्मपरीक्षण केले, तर या घटनांमागची कारणे सहज लक्षात येतील; पण असे करण्यापेक्षा भारतावर चिखलफेक करणे सोपे व सोयीचे आहे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. एकीकडे खैबर पख्तुनख्वावरचा पाकिस्तानी लष्कराचा अंमल ओसरत चालला आहे. तीच स्थिती बलुचिस्तानमध्ये आहे. स्वतंत्र सिंध प्रांताची मागणीही जोर धरते आहे. अशा चारही बाजूंनी पाकिस्तानी लष्कर कोंडीत सापडले असताना मिरपूर आणि परिसरातले लोक उठाव करताहेत, ही गंभीर गोष्ट आहे. आधीच कंगाल असलेला आपला शेजारी अशा अनेक समस्यांनी घेरलेला आहे. त्याला त्याची आजवरची करणी आणि विचारसरणीच जबाबदार आहे.
गेली 70 वर्षे बळजबरीने पाकिस्तानने ताब्यात घेतलेला निसर्गसौंदर्याचे वरदान भरभरून लाभलेला हा भूभाग; पण इथल्या काश्मिरी जनतेच्या नशिबी कायमच दुय्यम नागरिकत्व आले. आझादी ही फक्त नावापुरतीच. प्रत्यक्षात ‘आझादी’ नावाशी पूर्णपणे विसंगत असलेली परिस्थिती हीच या आझाद काश्मीरची खरी ओळख. दहा जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या या भागाची मुझफ्फराबाद ही राजधानी... तीही कागदोपत्रीच. या भागाचे राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान हे तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, इतकेच काय त्यांचे सर्वोच्च न्यायालयदेखील आहे. अशी सगळी स्वतंत्र व्यवस्था असली तरी इथली सूत्रे हलतात ती पाकिस्तानमधूनच. सत्ता चालते पाकिस्तानी लष्कराची. म्हणूनच ‘आझाद’ काश्मीरमधल्या लोकांच्या वाट्याला आली ती पाकिस्तानी लष्कराची गुलामी. हे कमी म्हणून की काय, अनेक प्रकारचा अभाव सहन करत त्यांना दिवस कंठावे लागत आहेत. वाढती महागाई, विजेचे दर गगनाला भिडलेले, उत्पन्नाशी विसंगत कराचा बोजा यात इथली जनता भरडली जात आहे. त्यावर उपाय म्हणून 40 लाख लोकसंख्येतील निम्म्याहून अधिक लोक उदरनिर्वाहासाठी खोरे सोडून अन्यत्र गेले आहेत.
अर्थात ही दुरवस्था काही आजची नाही; पण त्याची प्रकर्षाने जाणीव झाली ती 370 हटविल्यानंतर भारतातील काश्मिरींचे जगणे बदलत गेले तेव्हा. तिथल्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होऊन हा भाग विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसले तेव्हा. पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रिटी, यूट्यूबर्सनीही 370 हटविल्यानंतर भारतातील काश्मीरची प्रगती आणि पाकव्याप्त काश्मीरची दैना यावर प्रत्यक्ष भेट देऊन व्हिडीओ केले. यामुळे शेजारच्या पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना (आणि पाकिस्तानी लोकांनाही) आपल्या दुर्भाग्याची जाणीव अधिक ठळकपणे होऊ लागली आणि असंतोषाला तोंड फुटले.
भारतातल्या काश्मीरइतकाच हा भागही निसर्गसौंदर्याने समृद्ध असला तरी राज्यकर्त्यांनी केलेल्या उपेक्षेमुळे अभावाचे, वंचनेचे जिणे त्यांच्या वाट्याला आले आहे. पाकिस्तानने हा भूभाग बळकावल्यानंतर मिरपूर धरणाची उंची वाढवली. त्यामुळे पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्याने मूळचे मिरपूर पाण्याखाली गेले ते कायमचे आणि इथे जे जलविद्युत प्रकल्प उभारले गेले ते पाकिस्तानातील पंजाब प्रांतासाठी. मिरपूरमधल्या लोकांना मात्र हातपंपाशिवाय कधी पाणी मिळाले नाही, की इथल्या जलविद्युत प्रकल्पापासून निर्माण होणारी वीज मिळाली नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या विजेचा दर आहे प्रति युनिट 50 ते 60 रुपये. त्याच वेळी सीमेपलीकडील भारताच्या अखत्यारीतील काश्मिरींना वीज मिळते प्रति युनिट 5 ते 6 रुपये दराने. भारतीय काश्मीरमध्ये तीसहून अधिक विद्यापीठे आहेत, तर पाकव्याप्त काश्मिरात त्यांची संख्या आहे जेमतेम सहा. त्यातच इथले विद्यार्थी आंदोलनात उतरले, तर त्यांना त्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण केले जात नाही. विद्यार्थ्यांनी अशा आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून केलेला हा उफराटा नियम. (त्याची पर्वा न करता विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत आहेत.) भारतात जम्मू-काश्मीरमध्ये 2800 रुग्णालये आहेत, तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांची संख्या तेवीस. जीवनावश्यक वस्तूंची महागाई तर इतकी गगनाला भिडलेली, की तिने रोजचे जगणेही मुश्कील करून टाकलेले. थोडक्यात, खायची भ्रांत, वैद्यकीय सुविधांचा अभाव, महागाईचा मारा, नोकरीची संधी नाही आणि पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार अशी दुर्दशा या ‘आझाद’ काश्मीरमधल्या लोकांची आहे.
याविरोधात संतप्त नागरिक बंड करणार याची कुणकुण लागल्याने लष्कराने दडपशाही सुरू केली आणि त्याला प्रतिकार करताना पाकव्याप्त काश्मीरमधल्या संतप्त लोकांनी लष्कराविरुद्ध लाठ्याकाठ्या उचलल्या. इतकी हिंमत लष्कराविरुद्ध तिथल्या लोकांनी प्रथमच दाखवली आहे. इतकी वर्षे दबलेला आवाज आता बाहेर येतोय. रस्त्यावर उतरलेला महिला, तरुण वर्ग पाकिस्तानी लष्कराच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत दाखवतो आहे. हा बदल विशेष नोंद घेण्याजोगा आहे.
पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान इथे शियांची वस्ती होती. काही प्रमाणात सूफीही होते. मात्र पाकिस्तानी लष्कराने गेल्या काही वर्षांत वहाबी, सुन्नी अशा कट्टरपंथीयांना इथे वसवायला सुरुवात केली आहे. संघर्षाला असलेला हा पैलूही लक्षात घ्यायला हवा. या भागात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी टेररिस्ट कँप पाकिस्तानी लष्कराने सुरू केले. स्थानिक नागरिकांना ज्या सुविधा मिळत नाहीत त्या वहाबी इथेच राहावेत म्हणून त्यांना दिल्या जातात. धुमसत्या असंतोषाचे तेही एक कारण आहे.
आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं हनन, मनुष्यबळाचं सातत्याने झालेलं शोषण याच्याबद्दलचा वर्षानुवर्षे दबला गेलेला राग आता ज्वालामुखीसारखा उफाळून वर आला आहे.
बळजबरीने बळकावलेल्या या प्रदेशाला आता खरोखरीच मुक्ती हवी आहे. “भारताला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची गरज नाही, कारण तेथील लोक स्वत:हून भारताचा भाग बनू इच्छितात. त्यामुळे हे रहिवासीच भारतात विलीन होण्याची मागणी करतील,” असे जे भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे त्याला तथ्याचा आधार आहे. खर्याखुर्या आझादीच्या प्रतीक्षेत असलेले पाकव्याप्त काश्मीर भारताकडे आशेने पाहत आहे.