हिंदुस्थानातून राष्ट्रशक्तीचे उच्चाटन करू इच्छिणारे गठबंधन म्हणजे इंडिया आघाडी. सनातन धर्माच्या परिभाषेत सांगायचे तर या सर्व आसुरी शक्ती आहेत. या आसुरी शक्ती हिंदू दहशतवादाचा बंद पडलेला दवाखाना पुन्हा उघडतील. तेव्हा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात अशा आसुरी शक्तींशी आपल्याला लढायचे आहे आणि राष्ट्रीय विचारधारेला विजयी करायचे आहे.
’हिंदू दहशतवाद’ हे कथानक अधिक बलवान करण्यासाठी कसाब हा हिंदू होता हे ठरवणे आवश्यक होते. यावर वाचक म्हणतील, कसाबची जी माहिती तुम्ही मागील लेखात दिली आहे त्यावरून कसाबला हिंदू ठरवणे कसे शक्य होते? ते कसे शक्य होते हे समजून घ्यायचे असेल तर ‘लेट मी से इट नाऊ’ हे राकेश मारिया यांचे पुस्तक वाचायला हवे. ते मुंबई पोलीस कमिशनर होते. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदावरून ते निवृत्त झाले. मणी यांचे पुस्तक जसे अस्वस्थ करणारे आहे तसे राकेश मारिया यांचे पुस्तकदेखील खूपच अस्वस्थ करणारे आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुवर्णा अभ्यंकर यांनी केला आहे.
राकेश मारिया पृष्ठ क्र. 74 वर अजमल कसाबविषयी पुढील वाक्य लिहितात...
* तो बुटका आणि किरकोळ अंगयष्टीचा होता.
* त्याने माझ्या डोळ्याला डोळा भिडवला.
* त्याच्या मनात मृत्यूची कणभरही भीती नव्हती.
* आपण केलेल्या गुन्ह्याचा त्याला अभिमान वाटत होता.
* मी त्याला पंजाबीत विचारले, तू कुठला आहेस? कारण त्याची आणि माझी मातृभाषा एकच होती.
* पंजाबातील त्याच्या गावाची माहिती त्याने दिली.
पुढे जे मारिया लिहितात ते शब्दश: असे आहे. जर सर्व सुरळीत झाले असते, तर तो एखाद्या हिंदूप्रमाणे मनगटावर लाल दोरा बांधून मरण पावला असता. आम्हाला त्याच्याजवळ एखादे काल्पनिक नाव असलेले ओळखपत्र सापडले असते: समीर दिनेश चौधरी, अरुणोदय डिग्री अँड पी.जी. कॉलेजचा विद्यार्थी, वेदे्र कॉम्प्लेक्स, दिलखुशनगर, हैदराबाद-500 060, तसेच 254, टीचर्स कॉलनी, नगरभावी, बंगळुरू येथील रहिवासी. रमेश महाले, प्रशांत मर्डे आणि दिनेश कदम त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हैदराबादच्या वाटेवर असते. हिंदू दहशतवाद्यांनी कसा मुंबईवर हल्ला केला, हे कंठशोष करून सांगणारे मथळे वृत्तपत्रांमध्ये झळकले असते. वरच्या वर्तुळातील वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी बंगळुरूमध्ये त्याच्या कुटुंबीयाच्या आणि शेजार्यांच्या मुलाखती घेण्यासाठी रीघ लावली असती; पण अरेरे, हे असे घडले नाही आणि तो पाकिस्तानातील फरीदकोटचा अजमल अमीर कसाब म्हणूनच इथे हजर होता आणि मी त्याला विचारत होतो, ’‘की करन आया है?” (इथे काय करायला आला आहेस?).
राकेश मारिया यांचे मन:पूर्वक अभिनंदन करायला पाहिजे. एक प्रामाणिक आणि सच्चा देशभक्त पोलीस अधिकारी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. अजमल कसाब याला हिंदू दहशतवादी ठरवण्याचे षड्यंत्र यशस्वी झाले नाही; परंतु अब्दुल रहमान अंतुले आणि एस. एम. मुश्रीफ या जातभाईंनी ’हिंदू दहशतवाद’ हा शब्द काही सोडला नाही. मणी यांच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकात पृष्ठ क्र. 44 ते 48 यावर अंतुले यांच्याविषयी जी प्रश्नोत्तरे आणि पूर्ण चर्चा दिलेली आहे त्याविषयी एवढेच म्हणता येईल की, ती वाचा आणि अस्वस्थ व्हा. आपण आपल्या अस्तित्वापुढे कोणती संकटे घेऊन उभे असतो याचा बोध होईल.
नंतर सत्तापरिवर्तन झाले. भारतीय जनता पार्टीचे शासन आले. मातृभक्त नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. 2014 ते 2024 या काळात दहशतवादी हल्ले जवळजवळ बंद झालेले आहेत. हिंदू दहशतवाद उभा करून मुस्लीम दहशतवादाचे समर्थन करणारे थंड झाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाची गठडी वळत आणलेली आहे. ज्यांची गठडी वळली गेली आहेत ते सर्व गठबंधन करणारे झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या गठबंधनाला नाव दिले आहे इंडिया. म्हणजे हिंदुस्थानातून राष्ट्रशक्तीचे उच्चाटन करू इच्छिणारे गठबंधन. त्यांचा प्रचार खूप धूमधडाक्याने चालू आहे. लोकांना भ्रमित करण्याची त्यांची शक्तीदेखील खूप मोठी आहे, भ्रष्टाचारी धनाची शक्तीदेखील अफाट आहे. आपल्या सनातन धर्माच्या परिभाषेत सांगायचे तर या सर्व आसुरी शक्ती आहेत आणि या शक्तींशी सामना करायचा आहे. या शक्तींचे बळ वाढले तर असे शेकडो अजमल कसाब भारतात येतील. पाकिस्तानी जिहादी, इस्लामी दहशतवाद्यांचे बळ वाढेल आणि त्यांच्याशी लढणे सत्ताहीन समाजाला कठीण जाईल. हिंदू दहशतवादाचा बंद पडलेला दवाखाना ते पुन्हा उघडतील. हिंदू नावाने दहशतवादी संघटना स्थापन करतील, त्यांना पैसा देतील, पैशासाठी काम करणारे शेकडो लोक मिळतात. ’आप’चे केजरीवाल जर पैसा देऊन गोवा विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करू शकतात, तर पैशाच्या आधारे खोटे हिंदू दहशतवादाचे कथानक का निर्माण होऊ शकत नाही? आणि या खेळात दिग्विजय सिंगपासून शरदराव पवारांपर्यंत सर्वच सामील होतील. पकडला गेलेला किंवा मारला गेलेला दहशतवादी मोहम्मद अहमद, इक्बाल, सईद वगैरे कोणी नसून त्याला हिंदू केला जाईल आणि त्याला हिंदू कसा केला जाईल हे मारियांनी आपल्या पुस्तकात उत्तम प्रकारे मांडले आहे.
लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. निवडणूक रिंगणात असंख्य पत्ते आहेत; परंतु खरी लढत काँगे्रस विचारधारा आणि राष्ट्रीय विचारधारा यांच्यातील आहे. या राष्ट्रीय विचारधारेचे प्रतिनिधित्व आज भाजपा आणि नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी या विचारधारेचा चेहरा आहेत. ते संघ विचारधारेतील आहेत. राजकारणात पाठवण्यापूर्वी ते संघ प्रचारक होते. संघ प्रचारक हा बिनचेहर्याचा कार्यकर्ता असतो. संघात काम करत असताना बिनचेहर्याचा कार्यकर्ता बनूनच काम करावे लागते.
संघकार्यपद्धतीचा तो आत्मा आहे. संघ हा तत्त्वपूजक आहे. कोणत्याही प्रकारची व्यक्तिपूजा संघात बसत नाही. म्हणून संघात कोणी सरसंघचालक झाल्यास, सरकार्यवाह झाल्यास किंवा प्रांत प्रचारक झाल्यास त्याच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजले जात नाहीत. जबाबदारीतील बदल असा त्याचा अर्थ होतो.
राजकीय क्षेत्राचे याच्या उलट असते. राजकीय क्षेत्रात चेहरा निर्माण करून तो सतत लोकांपुढे आणावा लागतो. त्या चेहर्यालादेखील मी, मी काय करणार, माझे धोरण कोणते, मला लढाई कशी द्यायची आहे या भाषेतच बोलावे लागते. जे संघाला उपयुक्त ते राजकारणात उपयुक्त असेलच असे नाही. यासाठी नरेंद्र मोदी हे स्वत:ची व्यक्तिगत प्रतिष्ठा वाढवत आहेत, नाममाहात्म्य वाढवत आहेत, अशा प्रकारचा त्यांच्यावर आरोप करणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. स्वत:चे नाममाहात्म्य वाढवून त्यांना करायचे काय? ते वृत्तीने राजयोगी आहेत. एका ध्येयासाठी आणि विचारासाठी ते राजकीय संघर्ष करत आहेत. तो आपण समजून घ्यायला पाहिजे. आंधळी भक्ती जशी उपयोगाची नाही तशीच आंधळी दृष्टीदेखील उपयोगाची नाही. विरोधक हुशार असतात आणि कुठल्या मर्मावर प्रहार केला असता आघात होईल हे त्यांना समजते. ते प्रश्न करतात की, संघात व्यक्तिमाहात्म्य नाही, मग तुम्हाला मोदीमाहात्म्य कसे चालते?
कर्णाने हाच प्रश्न अर्जुनास केला. तो धर्माची भाषा बोलू लागला- मी रथावर नाही, विरथ आहे, नि:शस्त्र आहे, माझ्यावर प्रहार करणे अधर्म आहे. जीवनभर अधर्माची साथ देणार्या कर्णाला भगवान श्रीकृष्णाने अनेक प्रश्न विचारले. त्यातील एक प्रश्न होता, ‘एकाकी अभिमन्यूला चक्रव्यूहात बाण मारताना धर्म कुठे गेला होता?’ ‘द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तुला धर्माची आठवण का झाली नाही?’ आपणही व्यक्तिमाहात्म्याचे पुराण आपल्याला सांगणार्यांना प्रतिप्रश्न विचारला पाहिजे की, शरदराव पवारांचे एवढे व्यक्तिमाहात्म्य कशासाठी? (वय झाले तरी.) नेहरूंचे एवढे व्यक्तिमाहात्म्य कशासाठी आणि सतत अपयश पदरात पाडून घेणार्या राहुल गांधींचा उदोउदो कशासाठी?
ज्यांनी इतकी वर्षे सत्ता भोगली, त्यांनी सत्तेचा गैरवापर करून राष्ट्रीय विचारधारेला खूप छळले. 2014 पूर्वी राष्ट्रीय विचारधारेतील कोणत्या समाजसेवकाला पद्म पुरस्कार मिळाला? गांधीजींच्या तत्त्वाप्रमाणे नि:स्वार्थ सेवा करणार्या शेकडो संस्था आहेत. त्यांना मान्यता किंवा अनुदान यापूर्वी कधी मिळाले का? संघाचा स्वयंसेवक आहे एवढ्या कारणावरून महान गायक सुधीर फडके, भालजी पेंढारकर, राजदत्त अशा महान कलाकारांचा, त्यांच्या कलेचा गौरव होईल असा भव्य सत्कार शासनाने कधी केला का?
सत्तेच्या दंडशक्तीचा वापर अनेक वेळा राष्ट्रीय विचारांच्या विरोधात केला गेला आहे. याच लोकांनी संघाला इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. संघाचा खर्च संघ स्वयंसेवक प्रतिवर्षी गुरुदक्षिणा देऊन करतात, त्याच्या पै न् पैचा हिशोब असतो. संघविचारधारेला दहशतवादी ठरवणे, मानवद्रोही ठरवणे, संविधानविरोधी ठरवणे, दलितविरोधी ठरवणे अशी सर्व कथानके याच लोकांनी रचली आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.
राजकारणात धर्मराज बनून चालत नाही. राजकारण हा संन्याशांचा प्रांत नव्हे. रामदास स्वामी संन्यासी असूनही त्यांना याची उत्तम जाण होती. ’उद्धटासी उद्धट खटनटासी खटनट’ हा त्यांचा आदेश आहे. जे कोणतेही नियम पाळत नाहीत, धर्माने वागत नाहीत, नीतीशी त्यांचा काही संबंध नाही अशा सर्वांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली तर त्यात काय चुकले? अधर्मीशी लढताना रामायण सांगून काही उपयोग नाही. तेथे महाभारतातील कृष्ण लागतो. ज्या कृष्णाचे धर्मीय अधिष्ठान पक्के आहे, रणांगणात कोण उभे आहे, हे ज्याला माहीत आहे, त्यांच्या अधर्मी जीवनचरित्राची त्याला माहिती आहे.
म्हणून तो अर्जुनाला सांगू शकला की, अर्जुना, धनुष्यबाण उचल आणि शरसंधान कर. हे शरसंधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. क्षमाशील असण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. केजरीवालांनी वाईट कर्म केले आहे, तर त्या वाईट कर्माचे फळ त्यांना भोगावेच लागेल. कर्मफळातून कोणाचीच सुटका नाही. शस्त्रे तेव्हाच मारक ठरतात जेव्हा ती योग्य वेळी बाहेर काढली जातात आणि योग्य लक्ष्यावर सोडली जातात. वेळ आणि लक्ष्य चुकले तर शस्त्र निरुपयोगी होते हेदेखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे.