तंत्रस्नेही युवामित्र नरेंद्र मोदी

विवेक मराठी    03-Apr-2024   
Total Views |
Narendra Modi
 
तंत्रज्ञानाबद्दल आग्रही असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर तंत्रज्ञानाला प्रशासनात आणण्याचे सर्व प्रयत्न केले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आपल्या शासनाची कामं, नवीन केलेले प्रकल्प, भाषणं याच्या साहाय्याने ते सर्वत्र पोहोचवले. पंतप्रधान होण्याअगोदरच सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स नीट समजून घेतले आणि त्यांचा अत्यंत कलात्मक रीतीने उपयोग केला. आता डिजिटल इंडिया, डिजिटल थ्रीडी सभा, ऑनलाइन मीटिंग, प्रकल्पांचे उद्घाटन असो किंवा कालपरवा उद्योगपती बिल गेट्सशी बोलताना, दोघांनी भाषिणी अ‍ॅपची घेतलेली मदत यामधून त्यांनी तंत्रज्ञानामुळे देशाला होणारे फायदे दाखवून दिले आहेत. त्याचबरोबर ’नॅशनल क्रिएटर्स अ‍ॅवॉर्ड’च्या निमित्ताने त्यांचा युवकांशी असलेला कनेक्ट प्रकर्षाने जाणवला... हेच मोदींच्या यशाचं आणि अफाट लोकप्रियतेचं सूत्र आहे...!
 
16 मे 2014 ला शुक्रवार होता. सकाळपासून लोकसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली होती. भाजपाने जबरदस्त मुसंडी मारलेली होती. संध्याकाळपर्यंत स्थिती बरीचशी स्पष्ट झाली. 1984 च्या निवडणुकीनंतर प्रथमच एका पक्षाने, अर्थात भाजपाने, स्वबळावर पूर्ण बहुमत खेचून आणले होते. सर्वत्र जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण होते. या विजयाचे शिल्पकार, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, हे वडोदरा आणि वाराणसी, या दोन्ही मतदारसंघांतून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले होते. अहमदाबादच्या भाजपा कार्यालयासमोर सकाळपासूनच ’मोदी - मोदी’च्या घोषणा देत कार्यकर्ते गोळा व्हायला लागले होते.
 
 
संध्याकाळी भाजपाने अहमदाबादच्या विशाल मैदानात एक मोठी विजयोत्सव सभा भरवली. एक प्रकारे मोदींना गुजरातने दिलेल्या निरोपाची ती सभा होती. गुजरातचे प्रभारी ओम माथुर, अहमदाबाद (पूर्व) मधून लोकसभेवर निवडून आलेले परेश रावल आणि स्थानिक भाजपा नेते सोडले, तर ठिकठिकाणी निवडणूक निकालांमध्ये व्यस्त असल्याने इतर ज्येष्ठ नेते तिथे नव्हते. या सभेत मोदी साधारण पाऊण तास बोलले. निरोपाचं बोलले. भाषणानंतर मोदींनी जनतेचं अभिवादन स्वीकारत, त्या मैदानात एक चक्कर मारली. ती चक्कर मारताना मोदींनी जी लहानशी कृती केली, त्याने मोदींचं तरुण पिढीशी असलेलं ’कनेक्ट’ जास्त मजबूत झालं.
 

Narendra Modi  
 
मोदींनी तिथे उभ्या असलेल्या एका तरुणाच्या विनंतीवरून, त्याच्याबरोबर सेल्फी काढली. किंबहुना सेल्फी कशी काढायची हे मोदींनी त्या तरुणाला शिकवलं.
 
अनेक चॅनेल्स हा कार्यक्रम लाइव्ह दाखवत असल्याने सार्‍या देशाने मोदींचं ते सेल्फी प्रकरण बघितलं!
2014 साली, सेल्फीची प्रथा या भरतखंडावर अवतरायची होती. तोपर्यंत फ्रंट कॅमेरा असणारे मोबाइलसुद्धा फारसे मिळत नव्हते. काही उच्चभ्रू तरुणांमध्ये सेल्फी हा प्रकार शिरू लागलेला होता; पण सर्वसामान्यांचा हा देश, सेल्फी प्रकरणाबाबत अनभिज्ञ होता.
 
अशा या समाजाला सेल्फी शिकवली, रुजवली आणि ट्रेंडिंग केली ती मोदींनीच..!
 
काळाच्या काही पावलं पुढे असणं आणि येणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर करणं हे मोदींचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना हे मोदींच्या रक्तातच आहे. गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्सबरोबर बोलताना मोदींनी एक आठवण सांगितली. मोबाइल येण्यापूर्वीच्या काळात, मोदी इलेक्ट्रॉनिक (डिजिटल) डायरीसारखं एक गॅझेट वापरायचे. त्या काळात मोदींचा अमेरिका प्रवास ठरला. अमेरिकेत मोदी एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात गेले आणि त्या दुकानदाराला त्यांनी ’त्या गॅझेट्चं नवीन व्हर्जन आलेलं आहे का’ ते विचारलं. दुकानदाराने ते गॅझेट आलटून - पालटून बघितलं आणि तो म्हणाला, ’हे गॅझेट तर अद्याप इथेही आलेलं नाही. मग याच्या नवीन व्हर्जनचा प्रश्न येतोच कुठे?’ अर्थात, अमेरिकेच्या दुकानातही उपलब्ध नसलेलं गॅझेट मोदीजी वापरत होते!
नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात, मोदी भाजपाचे राष्ट्रीय मंत्री आणि नंतर महामंत्री असताना त्यांचा मुक्काम दिल्लीत होता. महामंत्री या दायित्वाबरोबरच ते हरियाणाचे प्रभारी होते. त्या काळच्या या दोन आठवणी, मोदींचं तंत्रज्ञानाबद्दल प्रेम आणि भविष्य बघण्याची क्षमता दाखवतात -
 
भूपेंद्र कन्सल हे दिल्ली भाजपाचे नेते. त्यांनी सांगितलं की, मोदींनी राष्ट्रीय महामंत्री या नात्याने दिल्लीतल्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांनी, ’ज्यांच्याकडे ई-मेल आहे, त्यांनी हात वर करावा’ अशी सूचना केली. साधारण 1998-1999 ची ती घटना असेल. त्या काळात इंटरनेटसुद्धा नवीनच होतं. त्यामुळे ’हे ई-मेल म्हणजे काय प्रकरण आहे’ असा आम्हा सर्वांना प्रश्न पडला होता. फक्त एक-दोन हातच उंचावले असतील.
 
 
मग मोदींनी सांगितलं, ही बैठक संपेपर्यंत, अर्थात रात्रीपर्यंत, सर्वांनी आपापले ई-मेल अकाऊंट्स तयार करा. त्यासाठी त्यांनी बाहेर काही कॉम्प्युटर आणि त्यावर काम करणार्‍या कार्यकर्त्यांचीही व्यवस्था केली होती.
 
 याच्या आधी 1995 च्या आसपास, मोदी हे भाजपाचे राष्ट्रीय मंत्री असताना, कॉम्प्युटर शिकण्याच्या मागे लागले होते. शैलजा ग्रोवर या मोदींच्या कॉम्प्युटर शिक्षिका होत्या. त्या सांगतात, मोदींची शिकण्याची आवड आणि क्षमता जबरदस्त होती.
  
 
पुढे मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तंत्रज्ञानाला प्रशासनात आणण्याचे सर्व प्रयत्न केले. तंत्रज्ञानाद्वारे लोकांपर्यंत पोहोचणं, हे त्यांच्या आवडीचं काम होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते आपल्या शासनाची कामं, नवीन केलेले प्रकल्प, भाषणं यांच्या सुरेख, व्यावसायिक स्वरूपाच्या सीडी बनवून, त्या मोठ्या प्रमाणावर वितरित करत असत.
 
 
पुढे, साधारण 2008-2009 च्यानंतर, सोशल मीडिया आल्यावर, मोदींचं काम सोपं झालं. त्यांनी सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स नीट समजून घेतले आणि त्यांचा अत्यंत कलात्मक रीतीने उपयोग केला. किंबहुना सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग करणार्‍या जगातील पहिल्या दोन-तीन लोकांमध्ये मोदी असतील.
 
 
शुक्रवार, दिनांक 31 ऑगस्ट 2012 ला त्यांनी नेटिझन्सबरोबर गुगल+हँगआऊट वापरून व्हिडीओ चॅट केलं. तेव्हा व्हिडीओ चॅट हा प्रकार अगदी नवीन होता. मोदींच्या आधी फक्त अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलिया गिलार्ड यांनीच हा प्लॅटफॉर्म वापरला होता.
 
 
 
व्हॉट्सअ‍ॅपची सुरुवात झाली सन 2009 मध्ये, iOS वर. अर्थात फक्त आयफोन/आयपॅडवर ते उपलब्ध होतं. 2010 मध्ये त्याचं एंड्रॉयड व्हर्जन आलं. मात्र 2009 पासूनच मोदी आपल्या कार्यकर्त्यांना म्हणत होते की, ’हे संपर्काचं फार प्रभावी माध्यम आहे. याचा उपयोग करत जा.’ व्हॉट्सअ‍ॅप रुळायला अजून तीन-चार वर्षं जावी लागली; पण त्या दरम्यान मोदींनी व्हॉट्सअ‍ॅपचं चांगलंच जाळं विणलं होतं.
 
 
अमेरिकेत काम करणारा, एक भारतीय मूळ असलेला, संशोधक आहे, जोयजीत पाल. त्याने मोदींच्या सोशल मीडिया पोस्ट्सवर बरंच संशोधन करून एक प्रबंध लिहिलाय. जोयजीतने सन 2018 मध्ये लिहिलंय -
 
 
'Modi has used Social Media successfully to shape his public image as a tech savvy leader, aligning himself with aspiration of a young generation in India.'
 
(मोदींनी सोशल मीडियाचा वापर, ’तंत्रज्ञानाबरोबर असणारा नेता’, या स्वरूपात सफलतेनं केलाय आणि त्याचबरोबर युवा भारताच्या आशा-आकांक्षांबरोबर स्वतःला जोडून घेतलंय.)
 
 
Narendra Modi
 
2014 च्या निवडणुकीत त्यांनी ’लेसरद्वारे थ्रीडी’ हे तंत्रज्ञान वापरलं. एकच मोदी अनेक ठिकाणी भाषण देताना दिसत होते. बहुधा आशिया खंडात हे तंत्रज्ञान वापरणारे मोदी हे पहिलेच राजकीय नेते असावेत. कोणतेही तंत्रज्ञान हे भारताच्या संदर्भात आणि भारतीयांसाठी कसं वापरता येईल, यावर मोदींचा भर असतो आणि म्हणूनच कोविडच्या काळात, ’आरोग्य सेतू’, ’कोविन’ (CoWIN) सारखे अ‍ॅप तयार झाले. त्या काळात व्हॅक्सिनेशन झाल्यावर, अगदी अमेरिकेतसुद्धा हाताने लिहिलेली सर्टिफिकेट्स मिळत होती. मोदींच्या आग्रहामुळे भारतात मात्र, व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांचा केंद्रीकृत डेटाबेस तयार होऊन त्या सर्वांना व्हॅक्सिनेशनची डिजिटल सर्टिफिकेट्स मिळत होती. हे सारं अद्भुत होतं. पुढारलेपणाचा टेंभा मिरवणार्‍या पाश्चात्त्यांसाठी तर हे अतर्क्य आणि अनाकलनीय होतं...!
 
मोदींनी दोन जॅम वापरले आणि सरकारी तंत्रातला बराचसा भ्रष्टाचार दूर केला. पहिला ग-च् म्हणजे जनधन - आधार - मोबाइल आणि दुसरा GeM म्हणजे शासकीय ऑनलाइन बाजारपेठ. यामुळे जसे शासकीय योजनांचे पैसे सरळ लाभार्थी नागरिकांच्या अकाऊंटमध्ये येऊ लागले, तसेच शासकीय सामानाची खरेदीही पारदर्शी झाली.
 
 
मोदी हे असे अनेक प्रयोग करत असतात. भारतासारख्या बहुभाषिक देशात आपापसात संवाद साधणं ही समस्या असते, हे ओळखून त्यांनी ’भाषिणी’ नावाने एक सुरेख अ‍ॅप तयार करवलं. या अ‍ॅपद्वारे, एका भाषेतून दुसर्‍या भाषेत ऑनलाइन (तत्काळ) अनुवाद केला जातो; अगदी बोलल्या जाणार्‍या संवादाचा/संभाषणाचाही. जी-20 च्या समापन अधिवेशनात, दिल्लीत, त्यांनी या भाषिणीचं प्रात्यक्षिकही दाखवलं; पण एवढं करून थांबणार ते मोदी कसले! त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी तमिळनाडूच्या सभेत, हे ’भाषिणी’ अ‍ॅप वापरून भाषण दिलं. म्हणजे मोदी बोलत होते हिंदीत आणि जनसभेतल्या श्रोत्यांना ऐकू येत होतं, अगदी मोदींसारख्या आवाजातच, तेसुद्धा तमिळमध्ये!
 

Narendra Modi
 
परवा, म्हणजे गेल्याच आठवड्यात, बिल गेट्सशी बोलताना, त्या दोघांनी भाषिणीची मदत घेतली होती. मोदी हिंदीतून बोलत होते; पण बिल गेट्सला ते इंग्रजीत अगदी व्यवस्थित ऐकू येत होतं. मोदींनी सोशल मीडियावर जेव्हा हे संभाषण शेअर केलं, तेव्हा अनेकांना हे असं कसं झालं हे कळलं नाही. म्हणून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की, ’बिल गेट्सला हिंदी कसं समजलं?’
 
 
मोदींचं वैशिष्ट्य हे की, हे सर्व करत असताना त्यांचा ’कनेक्ट’ हा तरुण पिढीशी अगदी मजबूत असतो. हे प्रकर्षाने जाणवलं गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्याच ’नॅशनल क्रिएटर्स अ‍ॅवॉर्ड’च्या निमित्ताने. सोमवार, दिनांक 8 मार्चला एक चांगला योग जुळून आला होता. शिवरात्री आणि महिला दिन असा तो संयोग होता. या दिवशी दिल्लीच्या प्रगती मैदानातील ’भारत मंडपम’ या विशाल सभागृहात, भारत शासनाच्या ’नॅशनल क्रिएटर्स अ‍ॅवॉर्ड’चे वितरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले.
 
 
इव्हेंट मॅनेजमेंट हे मोदींचं वैशिष्ट्य आहे. सात हजार लोकं आरामात बसून बघू शकतील, असं हे भारत मंडपमचं सभागृह, खचाखच भरलं होतं आणि या सभागृहात तरुणाई ओसंडून वाहत होती. पांढर्‍या झालेल्या केसांची व्यक्ती शोधली तरच सापडावी, असं चित्र होतं आणि देशभरातून आलेली, सोशल मीडियावर जबरदस्त पकड असलेली ही तरुणाई, ’मोदी - मोदी’च्या घोषणा देत होती.
 
  
हे सारंच विलोभनीय होतं...!
 
 
मोदींनी कार्यक्रमात म्हटलं की, ’भविष्यात डोकावू शकण्याची मला ईश्वरी कृपा लाभलेली आहे. त्यावरून सांगतो, आज हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम असला, तरी भविष्यात हा क्रिएटर्स अ‍ॅवॉर्डचा सोहळा, खूप मोठं स्वरूप धारण करेल हे निश्चित.’
सोशल मीडियामध्ये प्रभाव टाकणार्‍या लोकांसाठी हे अ‍ॅवॉर्ड होतं. यात किती अर्ज आले असतील? वीस वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी तब्बल दीड लाख अर्ज...! ही सर्व आपापल्या क्षेत्रातील नामांकित, सोशल मीडियावर प्रभाव असणारी माणसं होती. त्यातली फक्त वीस निवडली गेली. या वीस प्रभावशाली लोकांमध्ये कोण कोण होतं...?
 

Narendra Modi  
 
न्यू इंडिया चॅम्पियन असणारे अभी-नियू होते, सर्वात चांगलं कथाकथन करणारी कीर्तीहिस्ट्री होती, समाजात परिवर्तन आणणार्‍या जया किशोरी होत्या, हजरजबाबी श्रद्धा होती, सांस्कृतिक राजदूत म्हणून सन्मानित झालेली मैथिली ठाकूर होती, ’कबितासकिचन’वाली कबिता होती, भारतीय संस्कृतीचं प्रमोशन करणारा अमेरिकन ड्र्यू हिक्स होता...
 
 
लक्षात घ्या, यातील प्रत्येकाचं फॉलोइंग हे अक्षरशः लाखा-लाखांमध्ये आहे. सोशल मीडियाचे हे ’सरदार’, सोशल मीडियावर पडीक असणार्‍या तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत आहेत.
 
 
आणि हे सर्व एकमुखाने, एकदिलाने मोदींचा जयजयकार करत होते...!
 
 
हीच मोदींची किमया आहे. मंचावर एकेकाला पुरस्कार देताना मोदी ज्या सहजतेने त्यांच्याशी बोलत होते, ते बघून प्रत्येकाला वाटत होतं की, मोदी या सर्वांचे कंटेंट बघत असतील. आर. जे. रौनक असेल, श्रद्धा असेल, नाही तर मैथिली, मोदी प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांच्या विषयाशी संबंधित बोलत होते आणि भारत मंडपममध्ये बसून, हे सर्व बघणारी तरुणाई मोदींच्या जयघोषात बेधुंद होत होती.
 
 
याआधीच्या भारताच्या एकाही पंतप्रधानांना, तरुणांशी असं ‘कनेक्ट’ होण्याचं भाग्य लाभलं नव्हतं...!
 
मात्र तंत्रज्ञानाबद्दल आग्रही असणार्‍या मोदींनी परवा बिल गेट्सशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली की, मी तंत्रज्ञानाच्या प्रेमात असलो तरी तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेलो नाही. त्याचा गुलाम झालेलो नाही.
 
मोदींच्या यशाचं आणि अफाट लोकप्रियतेचं हे सूत्र आहे...!