काश्मीरसारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया पडली तेव्हापासून काश्मीरचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश झाला. हिंदू धर्माचा काश्मीरमध्ये लवलेशही राहू नये हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रत्येक इस्लामी आक्रमकाने आटोकाट प्रयत्न केले. मात्र हिंदू अस्मितेसाठी कटिबद्ध असलेल्या सरकारने मार्तंड सूर्यमंदिराची पुनर्उभारणी आणि मंदिर परिसरात सम्राट ललितादित्याचा भव्य पुतळा उभारण्याचे घोषित केले आहे. ज्या काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकवणंही अशक्य होतं, तिथेच आज मार्तंड सूर्यमंदिर पुन्हा उभं राहतं आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत किती विलक्षण बदल घडला आहे, याचंच हे द्योतक आहे.
आपण भारतीय सूर्यपूजक आहोत. वैदिक देवतांमध्ये अग्नी, इंद्र, वरुण यांच्या बरोबरीने सूर्यालाही मानाचं स्थान होतं. गायत्री मंत्राचा जप करत हिंदूंनी हजारो वर्षांपासून सूर्याची उपासना केली आहे. इ.स.पू. 2000 ते 1500 दरम्यान मिटानी या लढवय्या जमातीने भारतातून उत्तर इराककडे स्थलांतर करून तेथे आपले राज्य स्थापन केले. तेथील हिटाईट साम्राज्याबरोबर त्यांनी एक करार केला. हा करार आम्ही इंद्र, वरुण व मित्र (सूर्य) या देवतांच्या साक्षीने करत आहोत, असा त्या करारात उल्लेख आहे. मिटानी सूर्यपूजक होते. त्यांनी ही परंपरा मध्यपूर्वेत सगळीकडे रुजवली. त्यांच्याकडून रोमन साम्राज्यानेही सोलर गॉड मिथ्रास (मित्र) याच्या रूपात ती आपलीशी केली. रोमन साम्राज्यात सगळीकडे सूर्यपूजा प्रचलित होती आणि ख्रिश्चन धर्माला सुरुवातीला या परंपरेशी स्पर्धा करावी लागली. रोमन साम्राज्यात सॅटर्नालिया हा सण 17 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत साजरा केला जात असे. 25 डिसेंबरचा दिवस सोल इन्व्हेक्टस किंवा Unconquered Sunचा दिवस म्हणून साजरा केला जात असे. अनेक विद्वानांचं असं म्हणणं आहे की, रोमन साम्राज्याने सम्राट कॉन्स्टंटाईनच्या राजवटीत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिश्चनांनी हा सोहळा आपलासा करून तो सूर्यपूजेऐवजी येशूचा जन्मदिन म्हणून ख्रिसमस या नावाने साजरा करायला सुरुवात केली. कारण येशूचा खरा जन्मदिन कोणालाच माहीत नव्हता. पेगन धर्माचा हा सण नव्या नावाने का होईना, साजरा करणे सगळ्यांना पटले नाही. म्हणूनच ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी आजही 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा करतात. तात्पर्य काय, तर आपल्या सूर्यदेवतेचा सण आज संपूर्ण जग साजरा करतं. आदिशंकराचार्यांच्या पंचायतनातही शिव, विष्णू, देवी व गणपती यांच्या बरोबरीने सूर्यदेवतेला स्थान देण्यात आलं आहे. अशा या सूर्यदेवतेची काही भव्य आणि अप्रतिम मंदिरं आपल्या पूर्वजांनी उभी केली. यातलं सगळ्यात प्राचीन मंदिर म्हणजे सिंध प्रांतातील मुलतान (मूलस्थान) येथील सूर्यमंदिर, जे श्रीकृष्णाचा पुत्र सांबा याने बांधलं असं मानलं जातं. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातल्या मोढेरा सूर्यमंदिराची उभारणी केली चालुक्य राजा भीम (पहिला) याने 1026-27 साली. तसेच पूर्णगंगा राजवंशातील पराक्रमी राजा नरसिंगदेव याने तेराव्या शतकात, ओरिसातील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराची उभारणी केली.
याच परंपरेतील एक भव्य सूर्यमंदिर म्हणजे काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातलं मार्तंड सूर्यमंदिर. प्राचीन काळापासून काश्मीर हे हिंदू धर्म आणि संस्कृतीचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र होतं. काश्मीर हा हिंदू धर्माचा सर्वार्थाने मुकुटमणी होता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयरिश इतिहासकार जॉर्ज अब्राहम ग्रिअर्सन लिहितात, दोन हजार वर्षांपासून अधिक काळ काश्मीर हे संस्कृतच्या अध्ययनाचं केंद्र राहिलं आहे. या छोट्याशा खोर्यात इतिहास, काव्य, रोमांचक कथा, तत्त्वज्ञान यांसारख्या विविध विषयांतील अजरामर साहित्य निर्माण झालं आहे. शतकानुशतकांपासून सर्वश्रेष्ठ संस्कृत विद्वानांचं वास्तव्य काश्मीरमध्ये राहिलं आहे. भारतातील एक महान धर्म असलेल्या शैव-धर्माच्या प्रभावी गुरुजनांनी झेलमच्या किनार्यावर आपली शिकवण दिली आहे.
संस्कृतच्या काही सर्वश्रेष्ठ पंडित व कवींचा जन्म काश्मीर खोर्यात झाला आहे व संस्कृतमधील जगप्रसिद्ध कथा वाङ्मय असलेल्या पंचतंत्राची निर्मितीही काश्मीरमध्येच झाली आहे. नीलमत पुराणात सांगितलेल्या कथेनुसार काश्मीरचे खोरे हे एक मोठे सरोवर होते. जलोद्भव या राक्षसाने या सरोवराचा ताबा घेऊन आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केल्यामुळे ऋषी कश्यप यांनी विष्णूंची आराधना केली. विष्णूंनी वराहाचे रूप घेऊन एका पर्वतावर आपल्या सुळ्यांनी प्रहार करून पाण्याला वाट करून दिली. पाणी वितस्ता (झेलम) नदीच्या रूपाने वाहू लागले आणि काश्मीर खोरे मुक्त झाले. जिथे वराहरूपी विष्णूंनी सुळ्यांचा प्रहार केला ती जागा वराहमूल (बारामुल्ला) या नावाने ओळखली जाऊ लागली. यानंतर काश्मीर खोर्यात वस्ती करणार्या लोकांना काश्मीरलगत असलेल्या पूर्व अफगाणिस्तान, लडाख या भागांतील विषाणिन (पिशाच्च) वंशाच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली असता, पार्वतीच्या विनंतीवरून ऋषी कश्यप व त्यांचा पुत्र नील नाग यांनी पिशाच्चांचा बंदोबस्त केला व या भागात ते वास्तव्य करू लागले. त्यावरूनच ’पांजाल’ पर्वतराजीच्या प्रदेशाला कश्यप मेरू (काश्मीर) असे नाव पडले.
काश्मीरमध्ये ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती, काव्य यांची अत्यंत समृद्ध परंपरा निर्माण झाली. इसवी सनपूर्व तिसर्या शतकात काश्मीरमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश झाला. कुशाण सम्राट कनिष्क याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात बौद्ध धर्माच्या चौथ्या महासभेचे आयोजन काश्मीरमधील कुंडलवन येथे केले. बौद्ध धर्मातील ग्रंथांचे जतन त्यांच्या मूळ, शुद्ध स्वरूपात व्हावे म्हणून त्यांचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय याच सभेत घेण्यात आला. बौद्ध धर्माच्या महायान पंथाची सुरुवातही काश्मीरमध्ये झाली. नंतर वसुमित्र आणि नागार्जुन या दोन विद्वानांनी महायान पंथाची वैचारिक जडणघडण केली. काश्मीरमधील बौद्ध विद्वानांनी चीन आणि तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. इस्लामी आक्रमणाआधी काश्मीर हा एक खुला आणि उदारमतवादी समाज होता जिथे हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्म सुखेनैव नांदत होते, तसेच स्त्रियांना संपूर्ण स्वातंत्र्य आणि बरोबरीचे स्थान होते. कार्कोट, उत्पल, लोहार यांसारख्या राजवंशांनी काश्मीरवर राज्य केले आणि काश्मीरच्या वैभव आणि सांस्कृतिक वारशात भर घातली. यापैकी उत्पल राजवंशाचे राजे हे चर्मकार जातीचे होते. भारतातील जातिव्यवस्थेचं विकृत चित्रण नंतर ब्रिटिशांनी व विशेषतः मिशनर्यांनी कसं केलं आणि आपणही ते विनातक्रार कसं स्वीकारलं, हा एक स्वतंत्र विषय आहे.
इ.स. 711 मध्ये मोहम्मद बिन कासिम याने सिंधवर आक्रमण केलं तेव्हा काश्मीरमध्ये कार्कोट राजवंशाचं राज्य होतं. सिंध प्रांत जिंकून घेतल्यानंतर अरब सैन्याने उत्तर भारताकडे मोहरा वळवला. पंजाबमधील कांग्रा येथे त्यांची गाठ कार्कोट वंशाचा पराक्रमी सम्राट ललितादित्य मुक्तपीड याच्याशी पडली. ललितादित्याने अरबांच्या सैन्याला धूळ चारली व उत्तर भारताला इस्लामी आक्रमणापासून सुरक्षित ठेवलं. त्यानंतर त्याने सिंधू नदीपलीकडे भरारी घेऊन दर्दीस्तान, बुखारा, बाल्ख यांसारखे मध्य आशियातील प्रदेश पादाक्रांत केले.
सम्राट ललितादित्याने काश्मीरमध्ये अनेक शहरे वसवली आणि अप्रतिम स्थापत्य असलेल्या सुंदर इमारतींचे बांधकामही त्याच्या काळात झाले. यात प्रामुख्याने समावेश होता मार्तंड सूर्यमंदिर या भव्य, वैभवशाली व अप्रतिम सुंदर अशा इमारतीचा. असे म्हणतात की, हे मंदिर सर्वप्रथम पांडवांच्या वंशातील राजा रामदेव याने इ.स.पू. 3007 मध्ये बांधले. त्यानंतर अनेक राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार व पुनर्निर्माण केले; पण त्याचे जगाला ज्ञात असलेले भव्य व सुंदर स्वरूप त्याला ललितादित्याच्या कारकीर्दीतच म्हणजे आठव्या शतकात मिळाले. या मंदिरात अप्रतिम कोरीवकाम केलेले एकूण 84 खांब होते. आठवड्याचे दिवस (7) आणि एकूण राशींची संख्या (12) यांच्या गुणाकारातून येणारी 84 ही संख्या हिंदू धर्मात महत्त्वाची मानली जाते. 84 योनींमध्ये जीवाला जन्म घ्यावा लागतो हे आपण ऐकलेले असते. हिंदू आगमशास्त्राप्रमाणे बांधलेल्या या मंदिरात गर्भगृह, अंतराळ आणि मंडप यांचा समावेश होता. मंदिराचा एकूण परिसर 230 फूट लांब आणि 180 फूट रुंद होता आणि त्याला तीन प्रवेशद्वारे होती. त्याच्या मध्यभागी 63 फूट लांब आणि 36 फूट रुंद अशी मुख्य मंदिराची इमारत होती. त्याच्याभोवती 360 छोटी मंदिरं होती. ज्या ठिकाणी हे मंदिर बांधले होते ते स्थानही निसर्गसौंदर्याने नटलेले होते, ज्याच्या सौंदर्याची बरोबरी मंदिराच्या अप्रतिम स्थापत्याने व कारागिरीने केली केली होती असे त्याचे वर्णन केले जाते. ब्रिटिश लेखक फ्रान्सिस यंगहजबंड यांनी त्यांच्या ’काश्मीर’ या ग्रंथात मार्तंड सूर्यमंदिराबाबत भरभरून लिहिलं आहे. ते म्हणतात, पार्थेनन असो वा ताजमहाल वा सेंट एस्क्युरिअल... जगातल्या कुठल्याही इमारतीपेक्षा अत्युत्कृष्ट जागी बांधलेल्या या इमारतीवरून काश्मिरी लोकांमधील सर्वोत्कृष्टतेचं दर्शन घडतं. खुल्या आणि समतल पठारावर, बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर, हसर्या काश्मीर खोर्याकडे नजर टाकणार्या या जागी उभे आहेत एका मंदिराचे भग्नावशेष. एक असं मंदिर ज्यात होती इजिप्तची भव्यता आणि ग्रीकांची अभिजातता... निसर्गसौंदर्याची पारख नसलेल्या कोणी मंदिरासाठी ही जागा निवडलीच नसती, तसंच जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव असलेल्या कोणी हे मंदिर इतक्या भव्य आणि चिरंतन पद्धतीने बांधलंच नसतं.
या पवित्र, भव्य आणि सुंदर मंदिराचा विध्वंस कधी आणि का झाला हे समजून घेण्याआधी काश्मीरसारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया कधी आणि कशी पडली हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. काश्मिरी आयएएस अधिकारी एम. के. काव आपल्या ’काश्मीर अँड इट्स पीपल’ या ग्रंथात म्हणतात, आपली विचारधारा आणि विश्वास, धर्मशास्त्र, कट्टर कायदे आणि आचारसंहिता, आठवणी आणि आख्यायिका यांच्यासह जेव्हा चौदाव्या शतकात इस्लामचं काश्मीरमध्ये आगमन झालं, त्या वेळी काश्मिरी समाजाच्या सगळ्या धारणा उलट्यासुलट्या झाल्या. त्यानंतर झालेल्या प्रलयंकारी घटनांमुळे काश्मीरचा संपूर्ण सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक पोत विस्कळीत झाला.
इ.स. 1000 नंतर लगेचच मोहम्मद गझनीने काश्मीरवर आक्रमण केलं. त्याच्याशी कडवा संघर्ष करणार्या हिंदू शाही राज्याच्या जयपालचा नातू त्रिलोचनपाल याला काश्मीरच्या लोहार राजवटीचा संग्रामराजा याने आश्रय दिल्याचा प्रतिशोध म्हणून मोहम्मद गझनीने आपले सैन्य काश्मीरचा घास घेण्यासाठी पाठवले. त्यांचा मोठा पराभव झाल्यानंतर स्वतः गझनी सैन्य घेऊन काश्मीरवर चालून आला आणि त्याने 1015-16 साली लोहारकोट किल्ल्याला एक महिन्यासाठी वेढा घातला; पण तोपर्यंत हिवाळा आणि बर्फवृष्टी सुरू झाली आणि गझनीच्या सैन्याची दाणादाण उडाली. अधिक जीवितहानी होऊ नये म्हणून त्याने वेढा उठवून काढता पाय घेतला. त्यानंतर तीनशे वर्षे काश्मीरकडे इस्लामी पावलं वळली नाहीत.
चौदाव्या शतकात काश्मीरवर तुर्कांची आक्रमणं पुन्हा सुरू झाली आणि तिथली शांतता भंग झाली ती कायमचीच. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सुरू होण्याआधी काश्मीरमध्ये हिंदू-मुसलमान कसे गुण्यागोविंदाने राहत होते याचे नेहमी गोडवे गायले जातात. हा भाईचारा काश्मिरी मुसलमानांवर असलेल्या सूफींच्या प्रभावामुळे होता, असंही सांगितलं जातं; पण याइतकं चुकीचं काहीच असू शकत नाही. काश्मीरमध्ये सूफींनी केलेल्या रक्तपात आणि अत्याचाराच्या भयानक तांडवामुळेच तिथून हिंदूंनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलं आणि काश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले. काश्मीरला सूफींची पहिली ओळख झाली ती मीर सय्यद अली हमदानी हा सूफी इराणहून आपल्या सातशे अनुयायांसह काश्मीरला आला तेव्हा. तो स्वतःला सूफी संत म्हणवून घेत असला तरी त्या मुखवट्याआडचा त्याचा चेहरा अत्यंत धर्मांध, असहिष्णू आणि खुनशी असाच होता. त्याच्या प्रभावामुळे काश्मीरमध्ये कट्टरपंथी धोरणे राबवली जाऊ लागली. संगीत, नृत्य, कला यांसारख्या सांस्कृतिक गोष्टींवर बंदी आली. तरीही हिंदू धर्माचं काश्मीरमधून संपूर्ण उच्चाटन न झाल्यामुळे चिडून तो काश्मीर सोडून निघून गेला. इसवी सन 1384 मध्ये हमदानीच्या मृत्यूनंतर त्याच्यापेक्षाही धर्मवेडा असलेला त्याचा मुलगा मोहम्मद हमदानी त्याच्या तीनशे अनुयायांसह 1393 मध्ये काश्मीरला आला. त्याचं आगमन हा काश्मीरच्या भविष्याला कलाटणी देणारा क्षण होता. त्या वेळी काश्मीरमध्ये कुतुब-दिनचा मुलगा सिकंदर राज्य करत होता. सिकंदर, त्याचा पंतप्रधान सैफुद्दीन आणि हमदानी यांनी काश्मीरमध्ये अत्याचारांचं थैमान घालायला सुरुवात केली. हिंदूंवर जिझिया बसवला गेला व त्यानंतर त्यांना तीनच पर्याय देण्यात आले. काश्मीर सोडून जा, मुस्लीम धर्म स्वीकारा वा मृत्यूला सामोरे जा. दुर्दैवी योगायोग असा की, स्वतंत्र भारतात 1990 साली काश्मिरी पंडितांना हेच तीन पर्याय देण्यात आले होते. धातूंच्या मूर्ती वितळवून त्यांची नाणी पाडण्यात आली, दगडाच्या मूर्ती फोडून त्यांचे तुकडे मशिदींच्या पायर्यांमध्ये वापरण्यात आले, हिंदू धर्मग्रंथ दाल लेकमध्ये फेकून देण्यात आले. सगळी ग्रंथालये जाळून टाकण्यात आली. काश्मीरचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश करण्यात आला. हिंदू धर्माचा काश्मीरमध्ये लवलेशही राहू नये हे हमदानी पिता-पुत्रांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. सिकंदरने केलेल्या मूर्तीच्या या विध्वंसामुळे त्याला ’सिकंदर बुतशिकन’ (मूर्तींचा संहारक) या नावाने ओळखलं जाऊ लागलं. या सिकंदरनेच ललितादित्याने बांधलेलं मार्तंड सूर्यमंदिरही उद्ध्वस्त केलं. याचा विध्वंस करायला सिकंदरला एक वर्ष लागलं. शेवटी संपूर्ण मंदिरात लाकडं भरून ती पेटवून देण्यात आली. तरीही ते पूर्णपणे जमीनदोस्त झालं नाही. आजही या मंदिराचे भग्नावशेष त्याच्या भव्यतेची आणि सौंदर्याची ग्वाही देतात. काश्मीरचं प्राचीन सौंदर्य आणि संस्कृती यांचा सर्वनाश सूफींनीच केला आहे.
अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट अशी की, मार्तंड सूर्यमंदिराची पुनर्उभारणी करण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसंच या परिसरात सम्राट ललितादित्याचा भव्य पुतळाही उभारण्यात येणार आहे. ज्या काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकवणंही अशक्य होतं, तिथेच आज मार्तंड सूर्यमंदिर पुन्हा उभं राहतं आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत किती विलक्षण बदल घडला आहे, याचंच हे द्योतक आहे. धर्मांध आक्रमकांनी केलेल्या अत्याचारांच्या खुणा जपून ठेवायच्या आणि ललितादित्यासारख्या भारतमातेच्या पराक्रमी पुत्रांची स्मृती मात्र पुसून टाकायची, या दळभद्री धोरणाचा त्याग करून भारताच्या आत्मसन्मानाला उजाळा देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद द्यायला हवेत.