भिंगरी

विवेक मराठी    18-Apr-2024   
Total Views |
 सायबाच्या पायातल्या भिंगरीचा रिमोट दुसर्‍याच कुनाच्या तरी हातात हाय. इव्हीयम् करतच हुते आता भिंगर्‍याबी कराय लागल्ये..!’ आसं येका दमात बोल्ला. सुप्रीणं ‘पप्पांची र्‍हाऊंदेल. बाकीच्या भिंगर्‍या बांदा नीट. प्रचाराचा टाइम झालाय.’ आसा दम भरल्यावं संज्या घाम पुसत कामाला लागला. फुडची भिंगरी सोत्ता सुप्रीच्या पायाला बांधाया घेटली.  टेष्टिंगला सुप्री हुबी र्‍हायली आनि सेम बापावानी गर्रकनी फिरली. पायाला भिंगरी बांधून कसं फिरायचं आसतं याची सुप्रीला काईच प्र्याक्टिस नसल्याणं तिला यकदम चक्कर आली. सु्प्रीचा नवरा तिच्या मदतीला धावला नस्ता तर तिचे दात फिक्स घशात ग्येले आसते.
 
vivek
  अर्कचित्र - अमोघ वझे

सक्काळ सक्काळ सोसाट्याचा वारा सुटल्याला. सुप्री वांग्याच्या शेताला पानी पाजाया ग्येलेली ती लगबगीणं घरीकं आली. दारात चार-पाच गाड्या हुब्या हुत्या. पंदरा-इस कार्यकर्तेबी दाराशी जमल्याले. सुप्री आली तशे समदे ‘ताई आली ताई आली’ करत हुबे र्‍हायले. सुप्री थेट वाड्यात घुसली. भाईर वार्‍याणं धुरळा उडवाय सुरवात क्येल्ती. निवडनुकीच्या निमित्ताणं आल्या-गेल्यांणा बसाय मांडव टाकल्याला. वार्‍याणं त्येचे पत्रे उचकटाय लागले. गप्पा छाटत बसल्याला र्‍होयत्या धावत आला आनि समुरच्या घराच्या गच्चीत जाऊन तितं साटवून ठिवल्याले दगूड पत्र्यावं टाकाया लागला. येक-दोण म्होट्टे दगूड बरूब्बर पत्र्यावं बसल्ये आन् पत्रा उडायचा र्‍हायला. र्‍होयत्याला ज्याम भारी वाटलं. आपन कोन्तंबी वादळ रोखू शकतो आसा इस्वास त्येला सोत्ताबद्दल वाटू लागला.
 
 
हिकडं सुप्रीच्या घरात निराळाच तमाशा चाल्याला. सुप्री, सुप्रीचा बाप, सुप्रीचा नवरा, दाद्याचा भाव, त्येचं पोरगं सम्दी लायनीत बसल्याली. संज्या येका येकाच्या पायात चाळ बांधल्यावानी भिंगरी बांधत हुता. त्येणं पयली भिंगरी सुप्रीच्या बापाच्या पायाला बांधली. बाधून झाल्यावं सुप्रीचा बाप उठून हुबा र्‍हायला तशी भिंगरी गर्रकनी फिरली. आजपात्तूर तव्यावरची भाकरीच गर्रकनी फिरताना पाह्यल्याला सुप्रीचा बाप भिंगरीच्या फिरन्यानी यकदम हाबकला. त्येचा तोल जाता जाता र्‍हायला. त्येणं खुर्ची घट्ट पकडायचा प्रेत्न केल्ता. पन भिंगरी आश्शी गर्रकनी फिरली की खुर्ची सुप्रीच्या बापाच्या हातनं सटाकली. पडवीचा खांब हाताला घावला नसता तर सुप्रीच्या बापाचा कप्पाळमोक्ष फिक्स हुता. सुप्रीणं संज्याकं येक डेंजर लुक टाकला. संज्या कावराबावरा जाला आनि ‘उद्याच्याला सक्काळ सक्काळ प्रेसच घ्येतो आनि सांगतो की ह्या भिंगर्‍या आप्पेझिशनवाल्यांणी ह्याक क्येल्येल्या हैत. सायबाच्या पायातल्या भिंगरीचा रिमोट दुसर्‍याच कुनाच्या तरी हातात हाय. इव्हीयम् करतच हुते आता भिंगर्‍याबी कराय लागल्ये..!’ आसं येका दमात बोल्ला. सुप्रीणं ‘पप्पांची र्‍हाऊंदेल. बाकीच्या भिंगर्‍या बांदा नीट. प्रचाराचा टाइम झालाय.’ आसा दम भरल्यावं संज्या घाम पुसत कामाला लागला. फुडची भिंगरी सोत्ता सुप्रीच्या पायाला बांधाया घेटली. आचाणक सुप्रीला ध्येनात आलं का तिच्या सासूणं तिला येक होली वाटरची बाटली धिल्ती. भाईर जाताणी सोत्ताच्या आंगावं चार थ्येंब शिंपडल्ये की आडचनी वाट आडवत न्हाईत, आशी तिची समजूत हुती. सुप्रीणं ती बाटली आनवली आनि सोत्ताच्या आंगवं शिंपडली. संज्याणं लागलीच तिला भिंगरी बांधाया घेटली. टेष्टिंगला सुप्री हुबी र्‍हायली आनि सेम बापावानी गर्रकनी फिरली. पायाला भिंगरी बांधून कसं फिरायचं आसतं याची सुप्रीला काईच प्र्याक्टिस नसल्याणं तिला यकदम चक्कर आली. सु्प्रीचा नवरा तिच्या मदतीला धावला नस्ता तर तिचे दात फिक्स घशात ग्येले आसते. संज्याणं बोलनी खायाच्या आत बाकीच्यांला भिंगरी लावाया घेटली. दाद्याचा भाव आनि दाद्याचा पुतन्या लय एक्सायटेड झाल्ते. प्रचारासाटी पायाला भिंगरी बांधन्याची त्यांची पयलीच येळ हुती. आदी तसा प्रसंगच गुदरला नवता. भिंगरी बांदून रेडी जाल्यावं दाद्याचा पुतन्या उटला आनि म्हागच्या म्हागं पल्डा. पाठनं चांगलीच श्येकली. सुप्री खवाळली आनि संज्याच्या आंगावं ग्येली. समदे संज्याला बोल लावाया लागल्यावं संज्याबी उचाकला आनि जोर येकवटून बोल्ला, “भिंगरीला आनि माला कशापायी बोल लावताय? ज्यानं पायाला भिंगरी लावाया लावली त्येला बोला की हिम्मत आसंन तर!” संज्याच्या बोलन्यानी समदी शॉकमदी ग्येली. सुप्री भानावं यून काई बोलनार यवड्यात भायेर वावटळीनं जोर धरला. यवड्यात वार्‍याचा जोर कायच्या काय व्हाडून र्‍होयत्याणं दगूड लावल्याला पत्रा उडून सुप्रीच्या आंगनात यून पल्डा.. वळीव झोडपनार आशी शक्यता दिसताच सुप्रीचा बाप च्येकाळला. त्येला चार मानसांनी धरून परत आरामखुर्चीत बसवला..
 
हिकडं देव्या वळवाच्या पावसाचा अंदाज येऊण छत्र्या गोळा कराय लागला. दाद्या त्येला सोत्ताकडची येक छत्री द्येत म्हन्ला, “छत्र्या जमवताय जनू..!?” “व्हय..!” देव्या बोल्ला. “काळजी करू णका. आता कोनी पावसात भिजाया लागला तं लोकं छत्रीच देत्याल. मत द्याची न्हाईत..!” दाद्या बोल्ला. कार्यकरत्यांमदी येकच हशा पिकला. भायेर येक म्होट्टी ईज कडाडली आनी वळीव झोडपाया लागला. प्रचारावं पानी फिरलं. सुप्री तिच्या पायाची भिंगरी काडून पडवीत पाऊस बगत बसली..!

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.