हिंदू समाज इतिहास विसरतो तेव्हा..

विवेक मराठी    01-Apr-2024   
Total Views |
हिंदू समाजाचा स्वभाव इतिहास विसरण्याचा आहे. हिंदू समाजाने आपल्या इतिहासाचे स्मरण ठेवू नये असा इतिहास शाळा-महाविद्यालयांतून शिकवला जातो. जेव्हा हिंदू समाज इतिहास विसरतो तेव्हा अजमल कसाब उभे राहतात. देशद्रोही संघटना हिंदूंची मिथक कथानके/नॅरेटिव्ह प्रस्थापित करतात आणि देशविघातक कृत्ये करण्यास प्रबळ होतात. म्हणून इतिहासाचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे.
vivek
 
मागील लेखात अजमल कसाब याचा उल्लेख केला होता. ज्यांचा जन्म 2000 साली झाला असेल त्या पिढीला अजमल कसाब कोण होता याची माहिती बहुधा नसेल. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी आतंकवादी संघटनेच्या जिहादी इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 171 भारतीय नागरिक ठार झाले. मोहम्मद अजमल अमीर कसाब याने एकट्याने 72 लोकांना ठार मारले. यापैकी कोणीही त्याचा वैरी नव्हता. इस्लामच्या दृष्टीने मेलेले सर्व काफर होते. त्यांना मारणे हे पवित्र धार्मिक कर्तव्य आहे, असे त्याला पढविले गेले होते.
 
मुंबईवर हल्ला करण्यासाठी जे 10 दहशतवादी मुंबईतील कुलाबा समुद्रमार्गाने भारतात घुसले त्यातील नऊ जण ठार मारले गेले. अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले. त्याला जिवंत पकडण्याचे काम ज्या शूर शिपायाने केले त्याचे नाव तुकाराम ओंबळे असे होते. ते हुतात्मा झाले. कसाबच्या हल्ल्यात तीन कर्तबगार पोलीस अधिकारी मारले गेले. त्यांची नावे अशी होती - हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय साळसकर. हा हल्ला अतिशय भयानक होता. हल्लेखोर जिहादी मुस्लीम होते. ते मरणासाठीच आले होते. त्यांचे अत्यंत बारकाईने प्रशिक्षण झाले होते. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती, सॅटेलाइट टेलिफोन होते, परस्परांशी संपर्क करण्याची आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे होती. हल्ल्याच्या दरम्यान त्यांचा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद याच्याशी सतत संपर्क होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ताज महाल हॉटेल या दोन प्रमुख ठिकाणांवर त्यांनी हल्ले केले. अजमल कसाबची ही अगदी थोडक्यात माहिती आहे.
 
 
या अजमल कसाबवर खटला भरण्यात आला. 21 नोव्हेंबर 2012 ला सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्याला फासावर लटकवण्यात आले. आता दोन प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न 2008 साली घडलेल्या घटनेचे स्मरण 2024 साली कशाला करायचे? तो इतिहास झाला. आणि दुसरा प्रश्न 2024च्या निवडणुकीच्या संदर्भात अजमल कसाबचा संबंध काय? तो तर फासावर लटकलेला आहे. त्याचे भूत जागे कशाला करायचे?
 
हिंदू समाजाचा स्वभाव इतिहास विसरण्याचा आहे. हिंदू समाजाने आपल्या इतिहासाचे स्मरण ठेवू नये असा इतिहास शाळा-महाविद्यालयांतून शिकवला जातो. इस्लामी आक्रमण गांधार देशात झाले. त्यात किती लाख बौद्ध भिक्खू मारले गेले हे आपल्याला माहीत नसते. हे आक्रमण पुढे बलुचिस्तान, सिंध, पंजाब, राजस्थान, दिल्ली येथे सरकत गेले. यात किती बौद्ध मारले गेले, किती वैदिक धर्मीय मारले गेले, किती जैन मारले गेले याची आकडेवारी हिंदूंना माहीत नसते. नाय पॉलसारखे विचारवंत हा आकडा एक ते दीड कोटीच्या आसपास नेतात. जेव्हा हिंदू समाज इतिहास विसरतो तेव्हा अजमल कसाब उभे राहतात. म्हणून त्याचे स्मरण करायचे असते.
 
 
vivek
 
 
भारतात 2005 सालापासून यूपीए सरकार होते. सोनिया गांधी सर्वसत्ताधीश होत्या. त्या कॅथलिक आहेत. डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान होते. सनातन धर्माचा भाग असलेल्या शीख धर्माचे ते होते. मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सेक्युलर पंथीय होते. पं. नेहरूंनी या सेक्युलर पंथाला जन्मास घातले. या सेक्युलर पंथाचे पहिले व्यवच्छेदक लक्षण कडवा हिंदूविरोध हे आहे. ’जे जे हिंदू ते ते निंदू आणि जे जे हिंदू ते ते गाडू’. या सेक्युलर पंथीयांनी न थकता स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी मोहीम चालवली.
 2004 ते 2014 ची राजवट शत प्रतिशत सनातन हिंदू धर्मविरोधी, हिंदुत्वविरोधी आणि हिंदू संघटनांविरुद्ध होती.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीनदा बंदी घातली. गोहत्याबंदीची मागणी करण्यासाठी दिल्लीत संन्यासी संघटनेने मोर्चा काढला, त्यावर गोळीबार करण्यात आला. 2004 ते 2014 ची राजवट शत प्रतिशत सनातन हिंदू धर्मविरोधी, हिंदुत्वविरोधी आणि हिंदू संघटनांविरुद्ध होती.
 
तेव्हा सर्व समाजात संदेश गेला की, दहशतवादी हल्ले करणारे सर्व मुसलमान आहेत. एखाददुसरा अपवाद सोडला तर सगळे परकीय मुसलमान आहेत; परंतु भारतीय माणूस मुसलमान हा परकीय आहे की स्वदेशी आहे असा फारसा भेद करत नाही. ते बरोबर की चूक हा चर्चेचा विषय आहे. यूपीए सरकारातील काँग्रेस पक्षाला असे वाटू लागले की, जर मुसलमान दहशतवादी आहेत हेच कथानक चालू ठेवले तर त्याचा भयानक राजकीय तोटा होईल. हमखास आपल्याला मते देणारा मुस्लीम समाज आपल्यापासून दूर जाईल. तसेच हिंदुत्ववादी संघटना प्रबळ होतील. पाकिस्तान समर्थित दहशतवादाविरुद्ध ते रान उठवतील आणि त्याचा लाभ हिंदुत्वाची विचारसरणी स्वीकारून राजकारण करणार्‍या राजकीय पक्षांना होईल, त्यावर काही तरी उपाय शोधला पाहिजे.
 
 ’भगवा दहशतवाद’ असे म्हणू लागले. 
काँग्रेसच्या थिंक टँकने त्यावर उपाय शोधला. दहशतवादाला धर्म नसतो. ज्याप्रमाणे मुसलमान दहशतवादी आहेत त्याप्रमाणे हिंदूदेखील दहशतवादी आहेत. त्यांनी एक शब्दप्रयोग करायला सुरुवात केली- ‘हिंदू दहशतवाद’. काही जण त्याला ’भगवा दहशतवाद’ अस म्हणू लागले. जर हिंदूंना दहशतवादी ठरवायचे असेल तर ज्याप्रमाणे इस्लामी दहशतवाद्यांच्या संघटना आहेत तशा हिंदूंच्यादेखील असणे आवश्यक आहे. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विसर्जित केलेल्या ‘अभिनव भारत संघटने’चे पुनरुज्जीवन करण्यात आले. कर्नल पुरोहित त्याचे सभासद आहेत, असा प्रसार झाला. त्यासाठी फंड देण्यात आला. याची आणखीन तपशीलवार माहिती ‘द मिथ ऑफ हिंदू टेरर’ - लेखक - आर.व्ही.एस. मणी (मराठी अनुवाद ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’- अनुवाद अरुण करमरकर) या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळेल.
 
 
या काळात नांदेड, मालेगाव येथे स्फोट झाले. या स्फोटामध्ये अनेक हिंदूंना पकडण्यात आले. ते हिंदू दहशतवादी आहेत, असा त्यांच्याविरुद्ध प्रचार करण्यात आला. त्यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, कर्नल पुरोहित, तावडे अशी नावे पुढे आणण्यात आली. आर. व्ही. एस. मणी यांनी आपल्या पुस्तकात याविषयीची फार बारीकसारीक माहिती दिलेली आहे. म्हणून सर्वप्रथम आर. व्ही. एस. मणी कोण आहेत याची माहिती करून घेऊ या.
 
 
आर. व्ही. एस. मणी हे केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागातील एक मोठे अधिकारी होते. आता ते सेवानिवृत्त आहेत. गृह खात्यात दुय्यम सचिव या पदावर त्यांची नेमणूक झाली होती. गृह खात्याचे सचिव या नात्याने त्यांनी देशहितासाठी जे आवश्यक आहे ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. मोदींची हत्या करण्यासाठी इशरत जहां ही मुंब्र्याची तरुणी गुजरातला गेली असता पोलीस चकमकीत तिचा खात्मा झाला. सेक्युलर गँगने पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध हत्येचे आरोप ठोकले, कोर्ट केसेस उभ्या राहिल्या. तेव्हा आर. व्ही. एस. मणी यांनी गुजरात हायकोर्टापुढे या केसची सत्य माहिती ठेवली. तेव्हाच्या सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकारी परिवाराला ही गोष्ट आवडली नाही. आर. व्ही. एस. मणी हे कायद्याचे पदवीधर आहेत. एम.एस्सी. पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. संस्कृत भाषेचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. वेदवाङ्मय आणि भगवद्गीता यांचेही त्यांना उत्तम ज्ञान आहे.
 
 
’हिंदू दहशतवाद’ या संकल्पनेत दिवंगत हेमंत करकरे यांचे नाव घेतले जाते. त्यांच्याविषयी आर. व्ही. एस. मणी आपल्या पुस्तकात पुढील मजकूर लिहितात, ‘त्यांच्याव्यतिरिक्त जी दुसरी व्यक्ती तेथे बसली होती तिला मी तोपर्यंत ओळखत नव्हतो. याच व्यक्तीने मला नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत काही प्रश्न विचारले. किती जण मृत्यू पावले, जखमी किती, तपासाची नेमकी स्थिती त्या वेळी काय होती इ. माहिती त्यांनी मला विचारली. त्यांच्या एकूण अविर्भावावरून ही व्यक्ती पोलीस अधिकारी असणार हे माझ्या ध्यानात आले. गृह खात्यातील माझ्या कार्यकाळात बर्‍याच दिवसांनंतर मला हे अधिकारी माहीत झाले. दुर्दैवाने 26/11च्या हल्ल्यात हे अधिकारी मारले गेले, ते होते हेमंत करकरे.’
 
 
पुन्हा हेमंत करकरेंविषयी मणी हे पृष्ठ 33 वर लिहितात, ’दोन वर्षांपूर्वी दिग्विजय सिंह यांच्याबरोबर गृह मंत्रालयाच्या कार्यालयात ‘हिंदू दहशतवादा’च्या नव्या संकल्पनेविषयी चर्चा करताना मी ज्यांना पाहिले होते ते हेमंत करकरे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख होते. या पथकाने मालेगाव स्फोटांच्या तपासाची सूत्रे हाती घेतली आणि लगेचच तपासाचे कथानक आमूलाग्र बदलले. अहले हडिथ वा हदिस संघटनेचा त्या स्फोटातील सहभाग रद्दबातल केला गेला.
 
 
11 जुलै 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा तपास सुरळीत स्थितीत एटीएसच्या हातात प्राप्त झाल्यानंतरही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी एटीएसला पाच ते सहा महिन्यांचा काळ घ्यावा लागला होता ही वस्तुस्थिती आहे. मालेगावच्या बाबतीत मात्र सूत्रे हस्तगत केली गेली आणि केवळ 35 दिवसांतच (गुन्हा घडल्यापासून 35 दिवसांत) कर्नल श्रीकांत पुरोहित या सेवेत कार्यरत असलेल्या लष्करी अधिकार्‍याला ताब्यात घेतले गेले. या 35 दिवसांतलेही काही दिवस प्रकरण एटीएसकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत गेले असणार. त्याशिवाय सेवारत लष्करी अधिकार्‍याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी लष्करी मुख्यालयाकडून आवश्यक अनुमती मिळवण्यासाठीही काही काळ व्यतीत करावा लागला असणार. हे लक्षात घेताच महिनाभराच्या आतच मूळ तपासाची दिशा पूर्णपणे बदलून ‘हिंदू दहशतवाद्यांनी’ मालेगाव स्फोट घडवून आणला असल्याच्या निष्कर्षाप्रत एटीएस येऊ शकली, ही बाब अर्थातच पचण्यासारखी नाही.’
 
 
ए.टी.एस. प्रमुख हेमंत करकरे मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. आपले कर्तव्य बजावीत असताना त्यांना वीरमरण आले. इस्लामी दहशतवाद्यांशी लढताना त्यांना आलेले वीरमरण सर्वांच्या अभिमानाचा विषय आहे. ते ’हिंदू दहशतवाद’ या संकल्पनेत कसे ओढले गेले, मनापासून ते त्यात ओढले गेले का, की राजकीय नेत्यांनी, विशेष करून दिग्विजय सिंह, शिवराज पाटील आणि चिदंबरम यांच्या दडपणामुळे ते त्यात ओढले गेले हे समजायला आपल्याकडे काही मार्ग नाही.
 
 
हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दलही ’हिंदू दहशतवाद’ ही संकल्पना शोधून काढणार्‍या सेक्युलर गँगने आपला विषय काही सोडला नाही. एस. एम. मुश्रीफ हे महाराष्ट्राचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस होते. मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते निवृत्त झालेले होते. एस. एम. मुश्रीफ यांचे पूर्ण नाव काय हे मी नेटवर अर्धा-पाऊण तास शोधले; पण कुठेही त्यांचे पूर्ण नाव आले नाही. एका ठिकाणी मात्र ते राजनेते मुश्रीफ यांचे बंधू आहेत असा उल्लेख आला आणि मग समजले की एस. एम. मुश्रीफ हे मुस्लीम आहेत. ‘हू किल्ड हेमंत करकरे’ या शीर्षकाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची मराठी, उर्दू भाषेत भाषांतरे झालेली आहेत. ‘हिंदुत्ववाद्यांनी हेमंत करकरे यांना ठार मारले’ हा मुश्रीफ यांचा शोध आहे. ‘आर.एस.एस. देश का बडा आतंकवादी संगठन’ हे त्यांच्या दुसर्‍या पुस्तकाचे शीर्षक आहे.
 
 
’करकरेंची हत्या हिंदुत्ववाद्यांनी केली’ आणि ’आर.एस.एस. देशातील सगळ्यात मोठी दहशतवादी संघटना आहे’ ही दोन्ही वाक्ये वाचल्यानंतर एस. एम. मुश्रीफ यांची लायकी काय आहे यावर अधिक न लिहिलेले बरे. या दुसर्‍या पुस्तकातील शीर्षकाबद्दल त्यांच्यावर कोर्टात केस का दाखल केली गेली नाही, असा प्रश्न मनात निर्माण होतो. मुश्रीफ यांचे वाक्य कॅथलिक सोनियापुत्र राहुल आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही उच्चारतो. आर.एस.एस. हे इस्लामिक ब्रदरहूडचे भारतीय रूप आहे, असे राहुल गांधी म्हणतात. दोघांनाही या अलौकिक ज्ञानाबद्दल अज्ञानपीठ निर्माण करून या पीठाचा पुरस्कार कपिल सिब्बल किंवा दिग्विजय सिंग यांच्यामार्फत द्यायला हरकत नाही.
 
(क्रमश:)

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.