‘यशस्वी’ कामगिरी

विवेक मराठी    18-Mar-2024   
Total Views |
क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 10व्या वर्षी उत्तर प्रदेशच्या खेड्यातून मुंबईत आलेला आणि इथे एकटं राहून आपलं आयुष्य घडवणारा मुलगा म्हणजेच सध्याचा भारतीय क्रिकेटचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल! आक्रमक, कुठलेही आव्हानात्मक फटके खेळताना न बिचकणारा, पण तरीही सातत्यपूर्ण धावा करणारा यशस्वी सध्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलाय. अशा या यशस्वी जयस्वालच्या उत्तर प्रदेश ते मुंबई प्रवासाचा आणि आझाद मैदानातील तंबू ते कसोटी क्रिकेटमधील दोन द्विशतकं या उत्तुंग कामगिरीचा आढावा घेणारा लेख...

yashasvi jaiswal success story
 
बारा वर्षांचा एक मुलगा रोज संध्याकाळी आझाद मैदानातील आपल्या तंबूच्या बाहेर उभा राहून झगमगती मुंबई पाहायचा. त्यातही जवळच असलेल्या वानखेडे स्टेडिअमकडे त्याचं जास्त लक्ष असायचं. तिथले फ्लडलाइट्स उजळलेले असले (सामना सुरू असताना) की, तो आझाद मैदान ते वानखेडे स्टेडिअमचं अंतर चालत जायचा आणि बाहेरच घुटमळत राहायचा. आत कुणी प्रवेश देण्याचा प्रश्नच नव्हता.. आणि इतक्या लहान वयात उत्तर प्रदेशच्या भदोहीजवळच्या खेड्यातून मुंबईत आलेला तो होताही बुजरा. त्यामुळे कधी कुणाला आत प्रवेश देण्याबद्दल विचारलंही नसतं.
 
 
तर अशा या मुलाला संध्याकाळी लखलखणार्‍या मुंबईबरोबरच आणखी एका गोष्टीचं वेड होतं. तो आझाद मैदानात तिथल्या खेळपट्ट्या तयार करणं, मैदानाला पाणी मारणं असली कामं करणार्‍या ग्राउंड्समनच्या तंबूत राहायचा आणि कित्येकदा फक्त ग्लुकोज बिस्किटांवर राहायचा. आवतीभोवती पाणीपुरी विकणारे त्याच्याच प्रांतातून आलेले लोक खूप होते. ते त्याच्याकडून संध्याकाळी छोटी-मोठी कामं करून घेत आणि त्या बदल्यात त्याला 1-2 रुपये देत. हेच त्या काळातील त्याचं नियमित उत्पन्न आणि जेवणाचं साधनही. पण, मुलाची खरंच तक्रार नव्हती. खरं तर त्याला जेवणाची भूकच नव्हती. इथे त्याला पहाटेपासून संध्याकाळपर्यंत क्रिकेट खेळायला मिळत होतं आणि ही त्याची भूक होती. मुंबईत राहणार्‍या गरीब काकांवर आपला भार नको आणि क्रिकेट खेळायला मिळावं, म्हणून त्यानेच काकांचं घर सोडून इथे राहण्याचा पर्याय निवडला होता.
 
 
दोन वर्षं अशीच गेली. मुलाचं क्रिकेट सुरूच होतं. आणि एक दिवशी अचानक ज्वाला सिंग नावाच्या एका क्रिकेट प्रशिक्षकाची नजर त्याच्यावर पडली. डावखुर्‍या लहान चणीच्या मुलाचे मैदानाच्या चारही बाजूंना मारलेले फटके ज्वाला यांचं लक्ष वेधून घेत होते. त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता अगदी त्याच दिवशी या मुलाच्या घरच्यांशी संपर्क केला आणि मुलाला त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतलं. इतकंच नाही, तर ते मुलाचे कायदेशीर पालक झाले.
 

yashasvi jaiswal success story 
 
मुलाला मुंबईसारख्या शहरात पालक मिळाले, डोक्यावर छताची सोय झाली, दोन वेळ पौष्टिक अन्नाची सोय झाली आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळायला मिळालं. गेल्या वर्षी 30 एप्रिल 2023ला या मुलाने राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खणखणीत शतक झळकावलं. 62 चेंडूंत 124 धावांच्या या खेळीमुळे चक्क भारतीय संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी उघडले. शिवाय वानखेडे स्टेडिअममध्ये त्याच्यासाठी आकर्षण असलेल्या फ्लडलाइट्सखाली त्याने ही कामगिरी केल्यामुळे एक वर्तुळही पूर्ण झालं होतं.
 
 
क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 10व्या वर्षी उत्तर प्रदेशच्या खेड्यातून मुंबईत आलेला आणि इथे एकटं राहून आपलं आयुष्य घडवणारा हा मुलगा म्हणजेच सध्याचा भारतीय क्रिकेटचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल. आक्रमक, कुठलेही आव्हानात्मक फटके खेळताना न बिचकणारा, पण तरीही सातत्यपूर्ण धावा करणारा यशस्वी सध्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलाय.
 
 
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन द्विशतकांसह 711 धावा करत कसोटीतील काही विक्रम त्याने आपल्या नावावर केलेत आणि कर्णधार रोहित शर्माचा सलामीचा साथीदार म्हणून संघातील आपलं स्थान भक्कम केलंय.
 
 
10 वर्षांचा असताना वडील त्याला मुंबईत एकटं सोडून गावी परत गेले, तो क्षण त्याच्या मनावर कोरला गेलाय. “मी खूप - खूप वर्षं एकटा राहिलोय. बाबा मला सोडून गावी परत गेले, तेव्हा सगळ्यात जास्त एकटं वाटलं होतं. पण हळूहळू त्या भावनेतून मी बाहेर पडलो. मला एकटेपणाची सवय झाली आणि मी स्वत:ला व्यग्र ठेवायला लागलो.” गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही आठवण सांगितली होती.
 

yashasvi jaiswal success story 
 
आणि एकटेपणाने त्याला काय शिकवलं, हेही त्याने पुढे सांगितलं. “माझा एकटेपणा माझ्या कायम लक्षात राहतो. त्यानेच मला बळ दिलं. आत्मविश्वास दिला आणि लढण्याची ताकद दिली. जे फ्लडलाइट्स बाहेरून पाहत होतो, तिथे आत उभं राहून एकदा तरी हात उंचावायचा, असं मनाशी पक्कं ठरवलं होतं. ते स्वप्नही मला एकटेपणाने दिलं. कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचं धैर्य दिलं.” हे सगळं यशस्वी बोलत होता, तेव्हाही तो 21 वर्षांचा होता. पण परिस्थितीने त्याला तितकं कणखर आणि प्रगल्भ बनवलं होतं.
 
 
आणि कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याविषयी म्हणाल, तर तो खरंच तयार होता. ऑक्टोबर 2019मध्ये देशांतर्गत विजय हजारे एकदिवसीय करंडक स्पर्धेत त्याच्या धावा होत्या - 113, 22, 122, 203 आणि नाबाद 60. पुढे पावसामुळे मुंबई संघाचं विजयाचं गणित बिघडलं आणि मुंबई स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर यशस्वीसाठी पुढचा टप्पा होता तो 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत यशस्वी स्पर्धेत सर्वोत्तम ठरला आणि भारतीय संघ उपविजेता. यशस्वीचं नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागलं.
 
 
त्याच हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने त्याला 2.4 कोटी रुपये मोजून लिलावात विकत घेतलं. राजस्थान रॉयल्सचा फायदा असा झाला की, त्याला संघटित सराव सुविधा मिळाल्या आणि संघाचा मेंटॉर राहुल द्रविडची कौतुकाची थाप आणि प्रोत्साहन. कोविडच्या काळातही राजस्थान रॉयल्स संघाची सुसज्ज सराव यंत्रणा त्याला सरावासाठी मिळाली आणि तिथेच फलंदाजीचं तंत्र आणि कौशल्य घोटवून यशस्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार झाला.
 
 
कोविडचा भर ओसरल्यावर यशस्वीला मुंबईकडून रणजी करंडकही खेळायला मिळाला. इथे त्याने सलग तीन शतकं ठोकून मुंबईला अंतिम फेरीत नेण्यात मोठा वाटा उचलला. आता आंतरराष्ट्रीय बोलावणं आलं आणि त्यासाठीही यशस्वी तयार होता. पदार्पणाच्या रोझो कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने तडाखेबंद 171 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेत फारशी कमाल दाखवू शकला नाही, तर घरच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने कमाल केली.
 
 
विशाखापट्टणम आणि राजकोट अशा दोन लागोपाठच्या कसोटीत त्याने द्विशतक ठोकलं. या संबंध मालिकेत 711 धावा करताना विक्रमांच्या बाबतीत तो सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला. सलग दोन कसोटींत द्विशतक झळकावणारा तो विनोद कांबळी आणि विराट कोहली यांच्यानंतरचा पहिला भारतीय फलंदाज आहे. सुनील गावसकर यांच्याप्रमाणे यशस्वीनेही एका मालिकेत 700पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ही कामगिरी करणारे हे दोघेच भारतीय फलंदाज आहेत; तर 9 कसोटींत 16 डावांत त्याने 1,000 कसोटी धावांचा टप्पाही ओलांडलाय. सगळ्यात कमी डावांमध्ये 1,000 धावा करणारा तो सचिननंतर दुसरा भारतीय आहे. 22 वर्षं 79 दिवस या वयात द्विशतक ठोकून तो द्विशतक ठोकणारा भारताचा सगळ्यात लहान फलंदाज आहे.
 
 
2023चा एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये नवीन चर्चा सुरू झाली. विराट कोहली 35 वर्षांचा आणि रोहित शर्मा 36 वर्षांचा झाला होता. महम्मद शामीही 33 वर्षांचा आहे. अशा वेळी पुढील 4-5 वर्षांनी भारतीय संघाची धुरा कोण वाहणार.. अशा अस्फुट चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन भारतीय संघ घडवायलाही सुरुवात झाली होती. टी-20 क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वाल, अर्शदीप सिंग आणि जितेन शर्मा आले. टी-20 असो किंवा कसोटी, भारतीय संघ स्थित्यंतरातून जात होता. अशा वेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी यशस्वीवर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी विश्वास दाखवला. सुरुवातीपासून मोठे फटके खेळणारा फलंदाज कसोटीत सलामीला येऊ शकेल का, अशी शंका यशस्वीबद्दल वाटणं स्वाभाविक होतं. पण राजस्थान रॉयल्सपासून यशस्वीला ओळखणारे द्रविड यशस्वीबद्दल ठाम होते आणि यशस्वीने त्यांचा विश्वास सार्थही ठरवला आहे.
 
 
एकूणच भारतीय क्रिकेट बदलतंय. आणि यशस्वीच नाही, तर ध्रुव जुरेल, सर्फराझ खान, देवदत्त पड्डिकल, आकाशदीप हे नवीन खेळाडू नवीन भारताचं नेतृत्व करण्यासाठी सिद्ध झालेत. या नवीन पिढीला भीती माहीत नाही. प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला चढवायला ते कचरत नाहीत. पण त्याचबरोबर कामगिरीतील सातत्याचीही त्यांना आस आहे. यशस्वी हा या नवीन पिढीचा सलामीचा शिलेदार आहे. इंग्लंडविरुद्ध दुसरं द्विशतक ठोकताना त्याने एका डावात तब्बल 12 षटकार खेचले होते. हा एक विक्रम तर आहेच. समालोचन कक्षातून ही खेळी पाहणारा संजय मांजरेकर तेव्हा म्हणाला होता, “‘मी आणि माझ्या वडिलांनी अख्ख्या कारकिर्दीत प्रत्येकी एक षटकार खेचला होता.” पण आता काळ बदललाय. भारतीय क्रिकेटही बदलतंय, हे युवा खेळाडूंनी दाखवून दिलंय.
 
 
क्रिकेटमध्ये आधीच्या तुलनेने पैसा आल्यामुळे क्रिकेटपटूंचं आयुष्यही सुरक्षित झालंय. मुंबईत ग्राउंड्समनबरोबर एका तंबूत राहणारा यशस्वी इंग्लंडबरोबरच्या मालिकेदरम्यान 7 कोटींच्या स्वत:च्या घरात राहायला गेलाय. कारकिर्दीत स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा एक टप्पा तर पार झालाय. आता समोर उभं आहे ते टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका. टी-20 विश्वचषकात आयसीसीच्या स्पर्धा जिंकता न आल्याचं शल्य या युवा खेळाडूंना जमलं तर पुसायचंय. तर त्यानंतर उसळत्या आणि हवेत स्विंग असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळण्याचं आव्हान असणार आहे. तिथे चांगली कामगिरी करून दाखवली, तर युवा खेळाडूंना खरा आत्मविश्वास आणि नाव मिळणार आहे. जसा आधीच्या आव्हानांसाठी यशस्वी कायम तयार होता, तसा तो पुढील आव्हानांसाठीही असेलच.

ऋजुता लुकतुके (क्रीडा)

क्रीडा आणि अर्थविषयक वार्तांकन आणि सादरीकरणाचा 18 वर्षांचा अनुभव आहे. IBN लोकमत, जय महाराष्ट्र या टीव्ही चॅनलनंतर बीबीसी मराठी च्या माध्यमातून डिजिटल मीडियात प्रवेश केला आहे. सध्या महामनी या अर्थविषयक वेब पोर्टलमध्ये कार्यरत. क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने अमेरिका, युके, हाँग काँग अशा देशांमध्ये भटकंती. ऑलिम्पिक खेळांमध्ये जास्त रस.