स्वराज्याचे तटरक्षक - शिवछत्रपतींचे आरमार

विवेक मराठी    01-Mar-2024   
Total Views |
भारताला एवढा मोठा समुद्रकिनारा लाभला असताना तत्कालीन कुणाही सत्ताधीशांची बलशाली सशस्त्र नौसेना नसावी, हे एक मोठे वैगुण्यच होते. शिवरायांनी मात्र काळाची पावले ओळखली आणि स्वराज्याच्या आरमाराचा मनसुबा तडीस नेला. म्हणूनच आज आपण शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘भारतीय नौदलाचे जनक’ असा करतो.
 
shivaji maharaj
शिवरायांच्या युद्धनीतीतली आणि स्वराज्यसंरक्षणाची एक अत्यंत महत्त्वाची बाजू म्हणजे स्वराज्याचे आरमार. रामचंद्रपंत अमात्य ’आज्ञापत्रा’त म्हणतात - आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल, तशी त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. ‘याकरिता आरमार अवश्यमेव करावे.’
 
इ.स. 1656मध्ये शिवरायांनी मोर्‍यांकडून जावळी मिळवली आणि कोकणात त्यांचा प्रवेश झाला. कोकण किनारपट्टीचा मुलूख स्वराज्यात येत असताना महाराजांना जाणीव झाली ती समुद्रसीमेवरील संरक्षणव्यवस्थेची. स्वराज्याची सीमा समुद्राला भिडेपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर सत्ता नांदत होती ती सिद्दी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रजांच्या नाविक दलाची. हे सगळे परदेशातून आलेले आणि किनारपट्टीला स्थिरावलेले राहू-केतू स्वराज्याच्या आड येणारच होते. जंजिर्‍याच्या सिद्दीचा अत्याचार कोकणवासीयांसाठी नरकयातना होत्या. तिथल्या लोकांना सुखाचे जीवन लाभावे, यासाठी सिद्दीवर चाप अत्यावश्यक होता. शिवाय समुद्री वाहतूक, सागरी मार्गाने चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापार स्वराज्याच्या महसूलवाढीसाठी उपयोगी पडणार होते.
 
 
आपापल्या नाविक सामर्थ्याच्या जोरावर सुरतेपासून गोवा-कारवारपर्यंतचा समुद्र या परकीय सत्तांनी आपल्या हातात ठेवला होता. भारताला एवढा मोठा समुद्रकिनारा लाभला असताना तत्कालीन कुणाही सत्ताधीशांची बलशाली सशस्त्र नौसेना नसावी, हे एक मोठे वैगुण्यच होते. प्राचीन काळापासून पौर्वात्य राज्यकर्त्यांबाबत एक गोष्ट प्रामुख्याने दिसते, ते म्हणजे व्यापार आणि नौकानयन याखेरीज चोळादी राज्य सोडल्यास कुणाही राज्यकर्त्यांकडे सागरी युद्धशास्त्राची जाण नव्हती. सशस्त्र आरमार कुणाकडेही नव्हते. शिवरायांनी मात्र काळाची पावले ओळखली आणि स्वराज्याच्या आरमाराचा मनसुबा तडीस नेला.
 
समुद्री सत्तेशी पहिली ठिणगी कुठे पडली, या संदर्भात शिवापूर शकावलीत पहिली लहानशी नोंद सापडते. श्रावण शु. 1 (31 जुलै 1657) रघुनाथपंत राजपुरीस गेले. कृष्णाजी अनंत सभासद बखरीत लिहितो - ‘पुढे राजियास राजपुरीचे शिद्दी, घरात जैसा उंदीर तैसा शत्रू, यास कैसे जेर करावे म्हणून तजवीज पडली. तेव्हा रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनी आंगे अर्ज केला की, आपण शिद्दीवर स्वारी करीतो. असे म्हणून सातपाच हजार मावळे खलक पाईचे घेऊन राजपुरीवरी चालिले. त्यांनी जाऊन राजपुरीपावेतो, तळे, घोसाळे, कुल देश मारून राजपुरीपावेतो सरद दरियाकिनारा मोकळा केला.’
 
मराठ्यांची किनारपट्टीपर्यंत झालेली ही पहिली झटपट. ऑक्टोबर 1657 ते जानेवारी 1658 ह्या काळात मराठ्यांनी कोकणातील उत्तरेच्या कोहज किल्ल्यापासून सावित्री नदीपर्यंतचा मुलूख ताब्यात घेतला. शंभर किलोमीटरचा सागरी किनारा आता स्वराज्यात आला. या मुलखाचे रक्षण करायचे, किनारपट्टी राखायची तर सिद्दीशी झुंज घ्यावी लागणार, भूमीवर शत्रूशी आपले लोक लढाया करतीलही, पण समुद्रातून येणारी रसद तोडायची असेल, सिद्दीचे छापे मोडीत काढताना समुद्रातील लढाया जिंकायच्या, तर स्वत:चे आरमार हवे, हे शिवरायांच्या चाणाक्ष बुद्धीने हेरले आणि लवकरच त्यांनी कल्याण, भिवंडी, पेण येथे युद्धनौका बांधायला सुरुवात केली. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी खाडीत 1658च्या दिवाळीत स्वराज्याच्या आरमाराचा श्रीगणेशा झाला.
खरे तर कल्याण-भिवंडी उल्हास नदीच्या काठी, तर पेण भोगवती नदीच्या काठी होते. समुद्रापासून बरेचसे आत. आरमार बांधायचे म्हटले तरी ते समुद्रात येण्यासाठी पोर्तुगीजांच्या सागरी किल्ल्यांच्या समोरूनच आणावे लागणार होते. शिवाय युद्धनौकांच्या तंत्रज्ञानाबद्दल त्या वेळी भारतीयांना विशेष माहितीही नव्हती, म्हणून आरमार निर्मितीसाठी शिवरायांना पोर्तुगीजांची मदत घेणे भाग होते.
सुरुवातीला पोर्तुगीजांशी मराठ्यांचे खटके उडाले, पण मुघलांशी लढायचे तर पोर्तुगीजांबरोबर सलगी करणे भाग होते. फेब्रुवारी 1670मध्ये शिवरायांनी पोर्तुगीजांशी त्यांचा प्रतिनिधी विठ्ठल पंडित याच्यामार्फत तह केला. पोर्तुगीज सहजासहजी बधणारे नव्हतेच. त्यासाठी त्याने मस्कतच्या इमामाबरोबर संबंध प्रस्थापित करून पोर्तुगीजांवर दबाव आणला. पोर्तुगीजांनी सिद्दीला मराठ्यांविरुद्ध कोणतीही मदत करू नये, छोट्या नौकांना पोर्तुगीज कार्ताज (परवाना) न लागता त्यांचा समुद्रसंचार मुक्त व्हावा ह्या दोन्ही अटी तहात मुख्य होत्या. समुद्री किल्ले बांधण्यासाठीचा प्रतिबंध महाराजांनी धुडकावला होता. पोर्तुगीजांच्या निर्विवाद समुद्रसत्तेला महाराजांनी चाप लावला.
पूर्वी-पश्चिम किनारपट्टीवर अरबांची सत्ता होती. अरब नाविकांकडून सोळाव्या शतकापासून ही सत्ता पोर्तुगीजांकडे घेतली. पोर्तुगीजांचे नाविक सामर्थ्य मोठे होते. त्यांच्याकडे मोठमोठी गलबते, गॅले, गॅलेओत, गॅलेआंव अशा तोफांनी व लढाऊ सामग्रीने सिद्ध असलेल्या युद्धनौका होत्या. शिवाजी महाराजांना ह्या लढाऊ जहाजांचा सामना करण्यासाठी त्याच पद्धतीच्या नौकांना सुसज्ज करायचे होते. त्यासाठी आवश्यक होते ते पोर्तुगीजांकडचे अद्ययावत तंत्रज्ञान. महाराजांनी लैतांव व्हियेगश आणि त्याचा मुलगा फेर्नांव व्हियेगश ह्याच्यासह सुमारे तीनशे पोर्तुगीज व टोपॅझ ह्यांना हाताशी धरून त्यांच्याकडून आरमार बांधायला सुरुवात केली. मात्र पुढे हे अडचणीचे ठरू शकते, हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले आणि त्यांनी या दोन्ही तंत्रज्ञांवर दबाव टाकायला सुरुवात केली. पोर्तुगीज गव्हर्नरांच्या धमक्यांमुळे जरी हे सर्व तंत्रज्ञ पुढे पळून गेले, तरी त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर महाराजांनी आपल्याच लोकांकडून सशस्त्र युद्धनौकांची निर्मिती करून घेतली.
पोर्तुगीजांबरोबरच्या तहामुळे जंजिर्‍याच्या सिद्दीला त्यांची मराठ्यांविरुद्ध उघड उघड मदत मिळणे अशक्य झाले. गुपचुप जी काही मदत होईल, ती मात्र पोर्तुगीजांनी गुप्तपणे चालू ठेवली. 1671मध्ये मराठ्यांनी सिद्दीवर सर्व बाजूंनी हल्ला करून त्याच्या नाकी नऊ आणले. मराठ्यांपुढे टिकाव धरण्यासाठी पुढे सिद्दी मुघलांचा मांडलिक झाला. खाफीखानाच्या ’मुत्तखुबुल्लुबाब’ या ग्रंथात ही माहिती मिळते.
इंग्रजांनी सिद्दीला मदत करू नये, त्याला मुंबई बंदरात आश्रय देऊ नये यासाठी महाराजांनी इंग्रजांशीही तह करण्यासाठी बोलणी सुरू केली. इंग्रज बनेल आणि चलाख होते. त्यांना दोघांबरोबर व्यापारी संबंध हवे होते. सिद्दी जौहरच्या पन्हाळ्यातील वेढ्यात त्यांनी सहभाग घेतला, पण त्यामुळे राजापुराची इंग्रजी वखार महाराजांनी खणून काढली, हा राग त्यांनी पाहिला होता. म्हणून इंग्रजांनी सिद्दीस मदत करतानाही महाराजांशी सलोखा राखायचा प्रयत्न केला.
जंजिरा स्वराज्यात यावा यासाठी मराठ्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. पण या जलदुर्गाची अभेद्य बांधणी आणि सागरावरील दुर्गमतेमुळे ते कधीच शक्य झाले नाही. 1676 च्या पावसाळ्यात मोरोपंत पेशव्यांनी जंजिर्‍याची मोहीम पुन्हा हाती घेतली. अलिबागच्या लाय पाटील या साहसी वीराच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी रातोरात पोहत जाऊन जंजिर्‍याच्या तटाला शिड्या लावल्या. पण संपर्कातील तुटीमुळे मोरोपंताचे सैन्य जंजिर्‍यात पोहोचले नाही आणि नाइलाजाने पहाटे लाय पाटलाला शिड्या काढून माघारी परतावे लागले. मोहीम तडीस गेली नाही म्हणून शिवरायांनी मोरोपंतांची कानउघडणी केली, पण तरीही लायपाटलाला सोन्याचे कडे घालून आणि पालखी नावाचे गलबत देऊन त्याचा सन्मान केला.
समुद्रकिनार्‍यावर पारंपरिक मासेमारी, वाहतूक इत्यादीद्वारे समुद्राशी पिढ्यान पिढ्या जोडल्या गेलेल्या कोळी, आगरी, भंडारी अशा लोकांना महाराजांनी हाताशी धरले. पारंपरिक सामुद्री ज्ञानाला महाराजांनी लढवय्या नौसेनेचे रूप दिले. जहाजबांधणीचे कौशल्य अंगी असलेल्या हुशार सुतार, लोहार, चांभार अशा कारागीर लोकांनी आरमाराच्या कामात आपले कसब पणाला लावले.
जंजिर्‍याचा सिद्दी मराठी मुलखात लुटालूट करी. त्याला वठणीवर आणण्यासाठी आणि आरमाराच्या रक्षणासाठी महाराजांनी सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग असे मजबूत जलदुर्ग बांधले. सिद्दीला जर इंग्रजांची आणि मुघलांची मदत नसती, तर मराठ्यांनी पश्चिम किनार्‍यावरून त्याचे उच्चाटन केलेच असते.
पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रजांसारखे जोरदार शत्रू समुद्रावर हजर असताना आणि आदिलशाही-मुघलांची आक्रमणे जमिनीवर सतत चालू असताना या सर्वांविरुद्ध महाराजांनी स्वराज्याचे आरमार उभे केले, ही गोष्ट मोलाची आहे. मुख्य म्हणजे सागरी अनुभव नसतानाही त्यांनी स्वत: त्याचे नेतृत्व केले. बसरूरची स्वारी समुद्रातून केली गेली. आणि महाराजांनी स्वत:च त्याचे नेतृत्व केले होते.
आरमारासाठी लाकूड मोठ्या प्रमाणावर लागे. पण शिवरायांनी स्वराज्यातील मुलखात वृक्षतोडीस मज्जाव केला. आज्ञापत्र स्पष्ट बजावते - ‘आरमारास तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदिकरून थोर लाकूड आसावे लागते. ते आपले राज्यांत आरण्यामध्ये सागवानादि वृक्ष आहेत त्यांचे जे आनकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहित जें लागेल तें परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावें. स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून हेही लाकडे आरमारचे प्रयोजनाचीच. परंतु त्यांस हात लाऊ न द्यावा. काय म्हणोन की ही, झाडें वर्षा दों वर्षांनी होतात यैसें नाही. रयतेने ही झाडें लाऊन लेकरासारखी बहुत काल जतन करून वाढविलीं असता, ती झाडें तोडिलियावरी त्यांचे दु:खास पारावार काये आहे? येकास दु:ख देऊन जे कार्य करीन म्हणेल, तें कार्य करणारासहित स्वल्पकार्लेच बुडोन नाहींसेच होतें. किंबहुना धण्याचेच पदरीं प्रज्यापीडणाचा दोष पडतो.’ आरमारासहित जे जे उद्योग महाराजांनी आरंभले, त्यामागे स्थानिक लोकांच्या हातांना काम मिळावे, प्रत्येकाचे कलाकौशल्य उपयोगी पडावे, स्वराज्यनिर्मितीच्या हरेक कामात लोकसहभाग असावा हा महाराजांचा मुख्य हेतू होता, तरीही त्यामागे प्रजेचे कल्याण आणि स्वराज्याच्या साधनसंपत्तीचे संरक्षण मात्र त्यांनी कधीही नजरेआड केले नाही.
नौकाबांधणी, भूगोल, खगोल, समुद्राची खोली, वार्‍याचे ज्ञान, नाविक युद्धशास्त्र ह्या सार्‍यांची कोणतीही पूर्वबाजू नसताना ते मिळवून मराठ्यांचे आरमार निर्माण करणे ही असाध्य गोष्ट शिवाजी महाराजांनी अतिशय परिश्रमाने निर्माण केली, हे त्यांचे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व सिद्ध करते.
आरंभीच्या काळात महाराजांचे आरमार छोट्या छोट्या नौकांचे होते. सागरी युद्धाचा अनुभवच मराठ्यांकडे नव्हता. इंग्रजांना आणि पोर्तुगीजांना त्यांच्या भव्य आरमारासमोर मराठे टिकणारच नाहीत असे वाटत होते. 15 ऑगस्ट 1674च्या पत्रात मुंबईच्या इंग्रजांनी सुरत काउन्सिलला म्हटलेय की, ‘मोख्याहून येणार्‍या जहाजांवर हल्ला करण्याचा हुकूम शिवाजीने त्याच्या आरमाराला दिला आहे, हे तुम्हाला मिळालेले वृत्त माझ्या ऐकण्यात आलेले नाही. .. पण त्याच्या आरमारात लहान गुराबा आणि हलक्या व शूद्र नावांचाच फक्त भरणा आहे. त्या सुसज्ज नसल्याने आणि त्याच्या माणसांना समुद्राचा अजिबात अनुभव नसल्यामुळे मला त्यांच्याकडून काही धोका वाटत नाही.’ म्हणजे इंग्रजांच्या दृष्टीकोनातून मराठ्यांचे आरमार हलके व निकृष्ट दर्जाचे होते. पण महाराजांच्या याच नौकांनी आणि माणसांनी खांदेरीच्या मोहिमेत नौकाशास्त्रात पारंगत समजणार्‍या श्रेष्ठ अशा इंग्रजांना धूळ चारत, त्यांची मोठमोठाली गलबते समुद्रात जायबंदी करत खांदेरी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.
सभासद बखरीत लिहितो - ‘पाणियातील राजे जेर होतील, असे जाणून कित्येक पाणियातील डोंगर बांधून दर्यामध्ये गड बसविले, पाणियातील म्हणजे केवळ जंजिरे असे करून गड जाहाजे मेळवून दर्यास पालाण राजियांनी घातले (समुद्र काबूत आणला). जोवर पाणियातील गड असतील तोवर आपले नाव चालेल; असा विचार करून अगणित गड, जंजिरे जमिनीवर व पाणियात वसविले. असे कर्म केले.’ जलदुर्गांच्या निर्मितीचे कारण समजावताना सभासद महाराजांनी आरमार कसे सजवले, त्याबाबत पुढे लिहितो - ‘त्यास राजियांनी जाहाजे पाणियातील सजिली. करिन्य गुराबा व तरांडी व तारवे, गलबते, शिबाडे, गुराबा, पगार अशी नाना जातीची धाकट जाहाजे करून दर्यासागर म्हणोन मुसलमान सुभेदार व मायनाईक म्हणोन भंडारी शहूर असे दोघे सुभेदार करून, दोनशे जाहाजे एक सुभा, असे आरमार सजले..’ ज्याच्याकडे जो वकूब, त्याप्रमाणे त्याचे कौशल्य वापरण्यासाठी महाराजांनी त्या प्रत्येकाला संधी दिली. त्यासाठी जातपात, धर्म त्यांनी मनात आणला नाही. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करत ह्या असंख्य कारागिरांनी आपले कौशल्य पणाला लावत स्वराज्याचे आरमार समृद्ध केले. दर्यासारंग वेंटाजी सारंगी, दौलतखान आणि मायनाक भंडारी हे शिवरायांचे कसलेले नौसेनानी होते.
कोकण किनारपट्टीच्या लोकांचे दर्याबाबतचे ज्ञान महाराजांनी उपयोगी आणले. विजयदुर्गाच्या संरक्षणासाठी समुद्रात आत बांधलेली लांबलचक दगडी भिंत ही स्वराज्याच्या आरमारातील कारागिरांची किमया. जगाच्या पाठीवर अद्वितीय ठरावे असे हे सागरी संरक्षणाचे तंत्रज्ञान महाराजांनी आपल्याच मुलखातील लोकांकडून विकसित केले, यातच त्यांची तंत्रज्ञान आणि कौशल्य क्षेत्रातील उच्चकोटीची बुद्धिमत्ता दिसून आली.
समुद्रसंचारासाठी पोर्तुगीजांचा लागणारा कार्ताज ते कोकण किनार्‍यावर चालणारा मराठ्यांचा कार्ताज हा मोठा प्रवास. ही परिस्थिती पालटली ती मराठ्यांच्या सशस्त्र नौकांनी आणि आत्मविश्वासाने. पाश्चिमात्यांसमोर मराठ्यांच्या ह्या भारतीय नौका पुढे इतक्या मोठ्या कामगिरी करू लागल्या की सरखेल कान्होजी आंग्रेच्या काळात मराठ्यांच्या नौदलसामर्थ्याचा सर्वांनी धसका घेतला. आंग्रे आणि त्यानंतर धुळप अशा दोन्ही सरखेल घराण्यांनी कोकण किनार्‍यावर केलेला मराठी आरमाराचा दबदबा ही शिवाजी महाराजांनी जन्मास घातलेल्या निष्ठापूर्ण तंत्रज्ञान आणि कौशल्याची परिणती होती. आणि म्हणूनच ’भारतीय नौदलाचे जनक’ असा आज आपण शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो.

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.