रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे श्रेय आणि जन्मस्थानावर मंदिर बांधण्याचे श्रेय यात चढाओढ चालू असलेली पाहायला मिळते. मंदिर निर्माणाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला, एका संघटनेला देता येणार नाही. हिंदू समाजाच्या निर्धाराने हे मंदिर उभे राहिले आहे. हिंदू समाजाने दृढ निश्चयाने राम जन्मभूमीवर मंदिर उभे केले आहे. हिंदू समाजाच्या निर्धाराचा हा विजय आहे.
यशाचे अनेक बाप असतात, अपयश मात्र अनाथ असते’ अशी उक्ती आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानावर राम मंदिर उभे राहिले आहे आणि हे राम मंदिर आमच्यामुळेच उभे राहिले असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. पहिला विनोदी षटकार उद्धव ठाकरे यांनी मारला. ते म्हणाले की “2018 साली मी शिवनेरीची माती घेऊन अयोध्येला गेलो, त्यामुळे राम मंदिर झाले.” अगोदर ते बडबडत राहिले की मला 22 जानेवारीचे निमंत्रण नाही. त्यांना निमंत्रण गेल्यानंतर, सोनिया गांधींना वाईट वाटेल म्हणून ते गेले नाहीत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणतात की “राजीव गांधी यांच्यामुळे 1986 साली अयोध्येतील मंदिराचे टाळे उघडले गेले, शिलान्यास त्यांच्या काळी झाला. त्यामुळे मंदिर काँग्रेसमुळे उभे राहिले.” ज्या काँग्रेसने रामाचे अस्तित्व नाकारण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कोर्टात वकिलांची फौज उभी केली, ते आता म्हणू लागले की, मंदिर आमच्यामुळेच उभे राहिले. काही पीठांचे स्वामी असे सांगू लागले की, सुप्रीम कोर्टाच्या माझ्या साक्षीमुळे हिंदूंच्या बाजूने निकाल लागला. काही राजकीय नेते म्हणू लागले की, “राम मंदिर निर्माणाचे श्रेय भाजपाला देता येणार नाही. हे मंदिर सर्व हिंदू समाजाचे मंदिर आहे.”
चुकून का होईना, काही राजकीय नेते खरे बोलतात. मंदिर निर्माणाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला, एका संघटनेला देता येणार नाही. हिंदू समाजाच्या निर्धाराने हे मंदिर उभे राहिले आहे. हिंदू समाजाने दृढ निश्चय केला की शेकडो वर्षे का लागेनात, रामजन्मभूमीवर मंदिर उभे करायचेच. हिंदू समाजाच्या या निर्धाराचा हा विजय आहे. यात आजीपासून नातीपर्यंत, आजोबापासून नातवापर्यंत, श्रीमंतापासून गरिबापर्यंत, डोंगर-दर्यातील बांधवापासून ते मलबार हिलपर्यंत राहणार्या सर्वांचा निर्धार होता.
ही निर्धाराची ज्योत प्रखर करून ती धगधगत ठेवण्याचे काम देशाच्या कानाकोपर्यातील संघस्वयंसेवकांनी केले आहे आणि संघसंस्थापक डॉ. हेडगेवार ही त्याची प्रेरणा आहेत. ’काशी विश्वेश्वराच्या देवळाजवळ मशीद का व घाटावर मिनार का उभा आहे? असा प्रश्न हिंदू मनाला पडत नाही वा त्याची खंतही वाटत नाही! ही स्थिती पालटण्यासाठी संघ आहे हे विसरू नका.’ पूजनीय डॉक्टरांना हे सांगायचे आहे की आपल्या श्रद्वास्थानावरील परकीयांच्या खाणाखुणा पुसून टाकल्या पाहिजेत. डॉ. हेडगेवारांचे हे वाक्य संघ शैशवावस्थेत असतानाचे आहे, तो नुकताच रांगायला लागला होता. डॉक्टरांच्या प्रत्येक वाक्यातच काय, तर शब्दात मंत्राचे सामर्थ्य आहे. हिंदू समाजातील सुप्त अग्नी जागा करण्याचे काम डॉ. हेडगेवारांनी केले.
नंतरच्या काळात हा अग्नी प्रखर करण्याचे कार्य श्रीगुरुजींनी केले. ’संघटित व्हा, बलसंपन्न व्हा, चारित्र्यसंपन्न व्हा, आपल्या श्रद्धांचे व मानबिंदूंचे रक्षण करण्याची शक्ती मिळवा, सामर्थ्य हे जीवन आहे आणि दुर्बलता हा मृत्यू आहे.’ 32 वर्षे श्रीगुरुजी हेच सांगत राहिले. मर्यादापुरुषोत्तम राम आमचा आदर्श आहे हे कधीही विसरू नका. श्रीगुरुजींच्या त्यागामुळे, तपस्येमुळे हिंदू समाजाच्या फार मोठ्या वर्गात अस्मितेचा अग्नी प्रज्वलित झाला.
पूजनीय डॉक्टरांनी मांडलेली खंत बाळासाहेब देवरस कशी व्यक्त करतात, पाहा - 1983 साली अलाहाबादला संघ शिबिर होते. या संघ शिबिरात बाळासाहेबांनी प्रश्न विचारला, “अयोध्येत मंदिराला टाळे लावण्यात आले आहे का?” उत्तर आले, “होय, लावण्यात आले आहे.” त्यावर बाळासाहेब छोटेच वाक्य बोलले, “टाळे किती काळ राहणार आहे?” स्वयंसेवकांना या वाक्याचा अर्थ समजला. यानंतर रामलल्ला कारागृहात आहेत, हा संदेश खेडोपाडी पोहोचविला गेला. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब म्हणाले, “हे आंदोलन दीर्घकाळाची लढाई आहे. 30 वर्षांची तयारी करून आपल्याला आंदोलनात उतरावे लागेल.“ बाळासाहेबांची दूरदृष्टी खरी ठरली. 40 वर्षांनी हे आंदोलन यशस्वी झाले.
अयोध्येत शिलान्यासाच्या कार्यक्रमात बाळासाहेबांचे एक वक्तव्य वाचून दाखविण्यात आले. त्याचे शीर्षक आहे ’राम, हमारे राष्ट्रीय नायक’. “मैं रामजन्मस्थान को बचाने और इस देश के सबसे महान नायक - भगवान श्रीराम के मंदिर को फिर से स्थापित करने के लिये सदियों से लाखों हिंदुओं द्वारा किये गये महान बलिदानों को श्रद्धापूर्वक याद करता हूँ। 10 नवंबर, 1989 को शिलान्यास हिंदुओं के सदियों से चले आ रहे संघर्ष का परिणाम और निरंतरता है। भले ही हमें 1947 में राजनीतिक स्वतंत्रता प्राप्त हुई, हम अभी भी सांस्कृतिक और वैचारिक स्वतंत्रता हासिल करने की प्रक्रिया में हैं। राम जन्मस्थान का जीर्णोद्धार महान सोमनाथ मंदिर के पुनर्निमाण की तरह है।”
1983 साली बाळासाहेबांनी विचारले होते, “टाळे किती काळ राहणार” आणि हिंदू समाजाने टाळेच काय, तो ढाचाच जमीनदोस्त केला. डॉ. हेडगेवारांनी जागी केलेली ठिणगी आता धगधगता अग्नी झाली होती.
बाळासाहेब देवरस यांच्या काळातच बाबरी ढाचा जमीनदोस्त झाला. 1983 साली बाळासाहेबांनी विचारले होते, “टाळे किती काळ राहणार” आणि हिंदू समाजाने टाळेच काय, तो ढाचाच जमीनदोस्त केला. डॉ. हेडगेवारांनी जागी केलेली ठिणगी आता धगधगता अग्नी झाली होती. या अग्निशिखेत सेक्युलरवादी नव्हते, समाजवादी नव्हते आणि फक्त राजकीय फायद्यासाठी हिंदुत्ववादी झालेली शिवसेनादेखील नव्हती. हा अग्नी अधिक प्रज्वलित करण्याचे कार्य रज्जूभय्या, सुदर्शनजी आणि मोहनजी यांनी केले. रज्जूभय्यांचे शब्द किती सुंदर आहेत, पाहा - “तब वनवासी रामने वनवासी जातियों की सहायता से इस महापराक्रमी को उसी की लंका में जाकर पराजित किया। रावण को कई विलक्षण शक्तियाँ प्राप्त थी। उसकी लंका सोनेकी बनी हुई थी। युद्ध कितना असमान था इसे तुलसीदासजी ने एक पंक्ती में कहा है - रावण रथी, विरथ रघुवीरा। प्रतिवर्ष विजयादशमी हमको स्मरण कराती है कि साधनों की चिंता न करते हुए ऊँचे सिद्धांतो के लिए यदि मनुष्य संघर्ष करता है तो उसे विजय प्राप्त होती है।
संभवत: इस शताब्दी में रामका अनुकरण करनेवाले और अपनी शक्ति को राष्ट्रकार्य के निमित्त झोंक देनेवालों में सर्वश्रेष्ठ उदाहरण संघ निर्माता डॉ. हेडगेवारजी का ही है।”
सरसंघचालक सुदर्शनजी यांच्या कार्यकाळातही रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन धगधगते ठेवण्यात आले. जन्मस्थानावर रामाचे मंदिर कशासाठी? हे स्पष्ट करताना सुदर्शनजी म्हणाले, “भगवान राम के जीवन में वे सारे जीवनादर्श और जीवनमूल्य प्रकर्ष के साथ प्रगट हुए हैं जो भारतीय समाज, धर्म और सभ्यता का आधार हैं। और इस आदर्श रामचरित को सर्वप्रथम अमर किया आदि कवि महर्षि वाल्मीकि ने अमर काव्य रामायण लिखकर। उनका जीवन स्वयं इस बात का जीता जागता प्रणाम है कि एक सामान्य व्यक्ति किस प्रकार राम नाम के प्रभाव से समस्त मानवता का पथप्रदर्शक बन गया।”
मोहनजी भागवत यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आला आणि श्रीरामजन्मभूमीवर प्रभू रामाचे मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. याविषयी मोहनजी म्हणतात, “श्रीरामजन्मभूमी संबंधित न्यायिक प्रक्रिया 60 वर्ष तक खींची जाने के कारण संपूर्ण समाज की समरसता में विभेद का विष व संघर्ष की कटुता व पीड़ा को घोलनेवाला, एक अकारण खड़ा किया गया विवाद समाप्त कर, अपनी राष्ट्रीय मानमर्यादा के प्रतीक मर्यादापुरुषोत्तम श्रीराम की अयोध्या स्थित जन्मभूमि पर उनका भव्य मंदिर बनाने के निमित्त, हम सभी को बीती बाते भूलकर एकत्र आना चाहिए।”
रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे श्रेय आणि जन्मस्थानावर मंदिर बांधण्याचे श्रेय संघ आपल्याकडे घेत नाही. हे आंदोलन कुणी चालविले? संघ सांगणार - हिंदू समाजाने चालविले. मंदिरासाठी धन कुणी दिले? संघ सांगणार - हिंदू समाजाने दिले. मंदिराचे बांधकाम कुणी केले? संघ सांगणार - हिंदू समाजाने केले. रामलल्लाची मूर्ती कुणी घडविली? - हिंदू समाजाच्या एका मूर्तिकाराने घडविली. चमत्कार वाटावा असे काम करण्याची ऊर्जा कुणी निर्माण केली? त्याचे नाव आहे, रामनामाने केली. ऊर्जा जशी पदार्थात असते, तशी मर्यादापुरुषोत्तम श्रीराम या दोन अक्षरातदेखील आहे. म्हणून हा विजय रामविजय आहे. त्याचे श्रेय घेण्याच्या हस्यास्पद भानगडीत न पडणे यात शहाणपण आहे. परंतु ज्याने शहाणपणच विक्रीला काढले आहे, त्यांना सांगण्यात काहीच अर्थ नाही. हा ‘राम संदेश’ असावा, असे मला वाटते.