लंपास

विवेक मराठी    07-Feb-2024   
Total Views |
@केदार अ. दिवेकर -  98228 79181
 


vivek 
 
सुप्री फाटंची वांग्याच्या शेताला पानी पाजाया गेल्ती, ती तिकडंच बसून र्‍हायल्याली. आज तिला घरला जावंसंच वाटंना. बसल्या बसल्या करावं काय म्हनून तिनं वांगी तपसायला घेटली. ‘औंदा येकराला धा कोटीचा भाव भेटनं आवघाड ए कायनु बाई..’ आसा इच्यार करत 12 वाजून ग्येले आसतीन-नसतीन, तवर र्‍होयत्या संज्याच्या गाडीवं बसून सुप्रीला शोधत बोंबलत आला.
“आत्ते.. घरला चल बिगीनं.. आज्या कसंतरी करतंय!”
 
संज्याच्या गाडीवं ट्रीप्सी बसून सुप्री घराकडं निग्ली. वाटेत चौकात मंडप उभारनी चालल्याली. झालर तानून लावतानी तेच्या म्हागं ठिवलेल्या ब्यानरवर सुप्रीला दाद्याचं नाव दिस्ल्यागत झालं. संज्याला थांब म्हनंस्तवर त्यो बुंगाट चौकातनं फुडं निगून ग्येल्ता..
घरापाशी आल्यावं घराम्होरं हीऽऽ गर्दी पाहून सुप्रीचं आवसानच गळालं. तिला पाहून जो त्यो टिपं गाळाया लागला. दारातच रुपाली-दीपाली आन् ग्यांग भोकाड पसरायच्या तयारीत हुती. समद्यांला इग्नोर मारून सुप्री घरात घुसली. दिवानखान्यातच सुप्रीचा बाप भित्ताडाकडं डोळे लावून बसल्याला. शेजारीच येक हवालदार पंचनामा करत हुता. सुप्रीला काय चाल्लंय कळंनाच. तिनं हावालदाराकड बगिटलं तसं हावालदार तिला म्हन्लं,
 
“ताई, तुमीतर इच्यारा नां सायबांला.. आमच्याकडं फोन लावला आन् कायतरी बोल्ले.. चौकीत कुनालाच काय कळंना, म्हनून आमचं सायेब म्हन्लं घरी जावा. म्हतारं मानूस ए. तिकडं जाऊन जबाब घ्या, म्हनून आल्तो.. त्येवडं काय म्हनत्यात सांगता का?” हावालदार घायकुतीला यून म्हन्ला.
 

vivek 
 
सु्प्री चालंत बापाजवळ ग्येली. बापाच्या खांद्यावं हात ठिवला. बापानं तिच्याकडं पाह्यलं आन् तोंडातल्या तोंडात कायतरी पुटपुटला. सुप्री त्येचा आर्थ लावनार, यवड्यात भायेर जरा ‘सरका सरका’चा गलका झाला.. म्हागं वळून पाहते तं संज्या रश्मिआक्काला फुडं घालून घिऊन आल्ता. “आसल्या दुक्काच्या प्रसंगाला आणुभवी मानसं म्हागं हुबी र्‍हायल्याली बरी आसत्यात..” आसं संज्या सुप्रीच्या काणात कुजबुजला. सुप्रीनं आनी रश्मिआक्कानं तेच्याकडं खतरनाक लूक टाकला, तसा संज्या म्हागं झाला.
 
“कुनी सांगनारे का मला, काय झालंय येवडं?”
 
सुप्रीनं आवाज टाकला, तसा संज्या धीर येकवटून पुन्ना फुडं झाला आन् त्येनं सुप्रीचा चेहरा हातात धरून भिंताडावरच्या घड्याळ लटकवलेल्या जागेकडं फिरवला. भित्ताडावरनं घड्याळ गायप झाल्तं. आता सुप्रीला सम्दा उलगडा झाला. तिनं तडक दाद्याला मोबाइल लावला. दाद्या नॉट रीचेबल झाल्ता.
 
हावालदार जबाब नोंदवायला ताटकळंत हुता. त्येला हकीगत सांगावी का घरचा मामला हाय सोडून द्या म्हनायचं.. हे काय सुप्रीला समजंना. भित्ताडावरची घड्याळाची रिकामी जागा येकटक बगत र्‍हायल्येवा सुप्रीचा बाप लैच केविलवाना दिसत हुता.
 
सुप्रीच्या घरातनं घड्याळ चोरीला ग्येलंय ह्ये समजल्यावं गर्दी पांगली. जन्ता कुजबुजाया लागली, “चतुर्थीला मटन खाऊन गनपतीला जाशीन तं त्यो आसा तसा सोडंन का!” येक आवाज आला - “शेतकर्‍याचे तळतळाट हैत ह्ये!”’ दुसरा - “आकेला देव्या क्या करेंगा? भोग आता..” तिसरा - “दुसर्‍याची घरं फोडल्यावं दुसरं काय पदरात पडनारे!” चौथा..
 
सुप्रीचं डोकं जाम झाल्तं. सेवटी रश्मिआक्कानं देव्याला फोन लावून सुप्रीच्या हातात कोंबला.
 
“बोलून बगा.. काही करंन तं ह्योच करन.”
 
रश्मिआक्का सायलेंटली बोल्ली. सुप्रीनं फोन कानाला लावला. देव्याला फोन लावल्यावं ‘मय हूं डॉन’ कॉलर टोन आयकायची सवय झालेल्या सुप्रीला आजून येक सॉफ्ट धक्का बसला. देव्यानं कॉलर टोन बदलल्याली. नवं गानं हुतं ‘जैशे ज्याचे कर्म तैशे फळ देतो रे ईश्वर!’
 
घड्याळ नसल्यालं भित्ताड बगंत सुप्री फोन कट करायचं इसारली. फोन वाजत र्‍हायला..

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.