’भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’.. प्रतिज्ञेतले हे वाक्य जगण्यातून सिद्ध करायचे आहे. याचे भान असले, तर जागोजागी पेरलेले सापळे निष्प्रभ होतील. गरज आहे ती सामंजस्याची.. सामूहिक शहाणपणाची.
अगदी अलीकडेच, वसंतपंचमीच्या शुभमुहूर्तावर अबुधाबी येथील हिंदू मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे एक असाधारण वैशिष्ट्य अधोरेखित केले. “समाजातील वैविध्याला वैशिष्ट्य समजणारी, ताकद समजणारी भारतीय संस्कृती आहे” असे ते म्हणाले. भारतात अनेकेश्वर उपासनापद्धती असताना आणि प्रांताप्रांतात अनेक प्रकारचे वैविध्य असतानाही परस्परांविषयी कटुता वा तेढ निर्माण न होता एकत्वाची भावना रुजली, वर्धिष्णू राहिली आणि त्यातून बंधुत्वाचे दृढ बंध निर्माण झाले, हे या देशाचे वैशिष्ट्य आहे, याचा पंतप्रधानांनी या भाषणात पुनरुच्चार केला. अगदी प्राचीनतम काळापासून आपल्या देशाचे हे वैशिष्ट्य राहिले आहे. ’वसुधैवकुटुंबकम’ हा विचार आपल्या सामूहिक जीवनाचा मूलाधार आहे आणि तो शांततामय सहजीवनातून सिद्ध केला आहे. म्हणूनच त्याला मंत्राचे मोल आहे.
गेल्या काही वर्षांत भारताकडे विश्वनेतृत्वाची आलेली जबाबदारी पार पाडताना, हाच मंत्र घेऊन आपण वाटचाल करत आहोत. सर्व जगाला बंधुत्वभावनेने जवळ आणण्याची मनीषा असलेला, त्यासाठी सुसंवादाच्या आणि सौहार्दाच्या माध्यमातून प्रयत्न करणारा आजचा भारत जगात लक्षवेधी ठरतो आहे.
त्याच वेळी, ’सॉफ्ट पॉवर’ ही बिरुदावली मिरवण्याची योग्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहारातून सिद्ध करणारा भारत आज अनेकांच्या डोळ्यांत खुपतो आहे. त्याला मिळत असलेली जागतिक मान्यता, जागतिक नेतृत्वाची चालून आलेली संधी अनेकांच्या अस्वस्थतेत भर घालते आहे. जगात शांतता नांदली तर ज्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद होतील, अशी ही मंडळी आज दु:खात आहेत. असे होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. अशा दु:खितांमध्ये राजकीय क्षेत्रातील धुरीण आहेत, तसेच धनाढ्य व्यापारी आणि माध्यमांवर वर्चस्व असलेले माध्यमसम्राटही आहेत. हव्या त्या वा मिळेल त्या मार्गाने पैसा ओतून जनमानस कलुषित करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
वैविध्य हे भारताचे वैशिष्ट्य आहे. ते अनेकेश्वर पद्धतीतून, पंथोपपंथातून, विविध धर्मांच्या अनुयायांच्या वर्षानुवर्षाच्या सहजीवनातून दृग्गोचर होते, तसेच ते येथील जातिव्यवस्थेतून दिसून येते. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून निर्माण झालेली ही वर्णाधारित जातिव्यवस्था. हे समाजाच्या परस्परपूरकतेचे, परस्परावलंबित्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. काळाच्या ओघात या व्यवस्थेत हिण मिसळले. श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना रुजली आणि त्यातून समाजातला खूप मोठा गट प्रगतीच्या, विकासाच्या हमरस्त्यापासून शेकडो योजने दूर राहिला. देश स्वतंत्र झाला, तेव्हा अशा या सगळ्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण आणले गेले. संविधानकर्त्यांनी अतिशय विचारपूर्वक उचललेले हे पाऊल होते. ही वंचितांविषयीची सह अनुभूती होती. या माध्यमातून शिक्षणाच्या आणि अर्थार्जनाच्या समान संधी समाजातल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या.
1950पासून आरक्षणाच्या माध्यमातून तमाच्या तळाशी असलेल्या समाजबांधवांच्या जीवनात विकासाचा, प्रगतीचा उजेड आणायचा प्रयत्न अव्याहत चालू आहे. आरक्षणाच्या सवलतीपासून दूर असलेल्या मराठा समाजालाही आरक्षणाची गरज असल्याचे जेव्हा अलीकडच्या काही वर्षांत अभ्यासाअंती सिद्ध झाले, तेव्हा आधीच्या फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊ केले. काही मराठा बांधवांना त्याचा लाभ झालाही. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकू न शकल्याने पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन उभारले गेले. तेव्हा सध्याच्या शिंदे सरकारने युद्धपातळीवर सर्वेक्षण करून मराठा समाजाला ओबीसी गटात कुणबी म्हणून आरक्षण न देता, स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देऊ केले. त्याला दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाली आणि ते 26 फेब्रुवारीपासून कायदेशीर लागूही झाले.
आंदोलनाच्या नेतृत्वाला काही हे मान्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषणास्त्र उगारले. भरकटलेले, दिशाहीन नेतृत्व समर्थकांचे किती नुकसान करू शकते, याचे हे ताजे उदाहरण. हे नेतृत्व जेव्हा मर्यादा सोडून संबंधित राजकीय नेत्यांच्या जातीचा उद्धार करू लागले, तेव्हा आंदोलनकर्त्यांच्या मूळ हेतूबद्दल शंका येऊ लागली. आरक्षणासाठी म्हणून चालू केलेले हे आंदोलन समाजात, देशात उभी फूट पाडण्यासाठी तर वापरले जात नाहीये ना, हे तपासून पाहायला हवे.
अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुका, त्यात भाजपाला मोठा विजय मिळून नरेंद्र मोदींना तिसर्यांदा सत्तासूत्रे मिळण्याची असलेली संधी ही भारतविरोधी शक्तींसाठी संकट ठरू शकते. तेव्हा देशाच्या विविध भागात विविध प्रश्नांवर चाललेली आंदोलने ताब्यात घेऊन समाजामध्ये उभी फूट पाडण्याचे उद्योग चालू केले असावेत. पैशाची आणि अनेक प्रकारची आमिषे दाखवून तथाकथित बुद्धिवंतांना आणि छद्मपुरोगाम्यांना या शक्तींनी आपल्या दावणीला बांधले आहेच. आता सर्वसामान्य जनतेलाही वळवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
तेव्हा अविचारातून अन्य जातींवर केलेली जहरी टीका म्हणजे फेकलेले एक कोलीत आहे. यावरून पेटून उठून समोरच्याने चाल करून यावे, त्यातून अशांतता वाढावी हाच तर डाव आहे. न दिसणारा पण शांत डोक्याने विचार केल्यास बुद्धीला जाणवणारा असा हा सापळा आहे. त्यात अडकायचे नाही असा निश्चय करून, समोरून भिरकावलेले जातिद्वेषाचे कोलीत हाती न घेणे यातच सामूहिक शहाणपण आहे.
’भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’.. प्रतिज्ञेतले हे वाक्य जगण्यातून सिद्ध करायचे आहे. याचे भान असले, तर जागोजागी पेरलेले सापळे निष्प्रभ होतील. गरज आहे ती सामंजस्याची.. सामूहिक शहाणपणाची.