‘तस्वीर-ए-सुखन’ या चित्रात्मक शायरीच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि कलासाधनेचा आणि कल्पकतेचा ‘वसंतोत्सव’ रविवार, दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. प्रसिद्ध अभियंता गिरीश वसंतराव मगरे यांच्या ‘तस्वीर-ए-सुखन’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि एकल कला प्रदर्शन (सोलो आर्ट एक्झिबिशन) भरविण्यात आले होते.
‘हर इंसा है शायर, हर इंसा है एक अदना सा फनकार
दिवानगी थोडी सभी में,
दिल सबका धडकता है बार-बार!’
रविवार, दि. 11 फेब्रुवारीची सकाळ अवतरली ती छत्रपती संभाजीनगरकरांसाठी वसंतोत्सवाची चाहूल घेऊनच! या दिवशी एक अत्यंत वेगळ्या धाटणीचे चित्रप्रदर्शन, ‘तस्वीर-ए-सुखन’ या चित्रात्मक शायरीच्या पुस्तकाचे प्रकाशन, महाराष्ट्राच्या लोककलांचे सादरीकरण आणि गझल संगीत रजनी असा अपूर्व मिलाफ असलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घेतला. येथील प्रसिद्ध अभियंता गिरीश वसंतराव मगरे यांच्या ‘अध्यात्म आणि संगीत’ या विषयावरील एकल कला प्रदर्शन (सोलो आर्ट एक्झिबिशन) बीड बायपास रोडवरील शर्विन आउट हाउस या ठिकाणी भरविण्यात आले होते. प्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, आदिवासी कलेतील प्रसिद्ध नाव अनुराधा ठाकूर आणि पंडित उद्धव बापू आपेगावकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
एक वेगळ्याच प्रकारची ‘शायरी’ दिवानगी वागविणारे अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणजे गिरीश मगरे. हाडाचे शिक्षक असलेल्या वसंतराव मगरेंचे हे चिरंजीव. पेशाने एक इलेक्ट्रिकल इंजीनियर असलेल्या गिरीश मगरे यांनी इलेक्ट्रिकल क्षेत्रात देदीप्यमान कारकिर्द घडवत असतानाच अर्धे जग पालथे घातले. ‘केल्याने देशाटन’ ही उक्ती सार्थ ठरविणारे ते जातिवंत मुसाफीर आहेत. मगरे यांची लेखणी आणि कुंचला या कलेच्या दोन्ही आयुधांवर सारखीच हुकमत आहे. त्यांनी शायरीचे पारंपरिक विषय तर हाताळलेच, त्याचबरोबर उर्दू शायरी कागदावर उतरवत असताना ते जगाच्या विद्यापीठातील सामाजिक व सांस्कृतिक आयामांकडे आकर्षित झाले. जगातील थोर कलावंत आणि कलाकृती यांची त्यांच्यावर मोहिनीच चढली. त्यांच्यातील कलावंत जागा झाला. अत्यंत संवेदनशील मनाने त्यांनी चित्रकला आपलीशी केली आणि एक अतिशय उच्च दर्जाचे चित्रकार अशी आज त्यांची ओळख बनली आहे. त्यांचा कुंचला अगदी सहज मुक्तहस्ताने कागदावर रंगांची उधळण करू लागला आणि यातूनच साकारला हा कलासाधनेचा आणि कल्पकतेचा उत्सव!

अन्य कलांप्रमाणेच चित्रकला म्हणजे एक अविरत चालणारी साधना आहे आणि त्यावर सिद्धी प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे अथक परिश्रम घ्यावे लागतात. त्यानंतरच अशी सफलता एखाद्याच्या वाट्याला येते, असेच मत उद्घाटनाच्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.
मगरे यांच्या चित्रप्रदर्शनाला कलाप्रेमींचा अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. त्यांच्या चित्रांमध्ये अध्यात्म आणि संगीत यांचा एक सुंदर मिलाफ झालेला आहे. जगभरातील विविध संस्कृतींचा आणि कला परंपरांचा प्रभाव या चित्रांतून दिसून येतो. कलाप्रेमींनी चित्रांमधील रंगसंगती, मानवी भावभावनांचे सहज चित्रण आणि अनोखी कल्पकता यांचे मनसोक्त कौतुक केले.
या प्रदर्शनात जगातील नामांकित चित्रकारांच्या माहिती फलकांचा समावेश करण्यात आला होता. रशियातील साखा ते तिबेटमधील ध्यान संगीत, उझबेकिस्तानातील शाशमकाम, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पोतराज, भारूड आणि वारकरी दिंडी, छत्तीसगडमधील पंडवानी, मणिपूरमधील जगोई मारुप, केरळमधील पाचा नाट्यचर्या असा कलासंगम रसिकांना अनुभवता आला.
हे प्रदर्शन सुरू असताना तेथे पंकज शिरभाते यांचे व्हायोलीनवादन, निरंजन भालेराव यांचे बासरीवादन आणि प्रशांत गाजरे यांचे तबलावादन यांचाही रसिकांनी आस्वाद घेतला.
सायंकाळी पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या हस्ते गिरीश मगरे यांच्या ‘तस्वीर-ए-सुखन’ पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. गझलांना साजेशी बोलकी रंगीत चित्रे आणि ती सजीव वाटावीत इतकी सुबक छपाई हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य होय. मगरे यांनी अवघड उर्दू शब्दांचे अर्थही दिलेले असल्यामुळे मराठी वाचकांचीही सोय झालेली आहे. प्रेम, भक्ती, भूतदया, देशभक्ती, माणुसकी अशा विविध भावनांनी प्रवाहित होत जाणारी मगरे यांची शायरी हळुवारपणे जीवनाचे अनेक पैलू उलगडत जाते. एका तरल कविमनाचे दर्शन आपल्याला या संग्रहात घडते.
या प्रसंगी चित्रप्रदर्शनाचा मूळ गाभा असलेल्या अध्यात्म आणि लोकसंगीत यावर आधारित कार्यक्रमात जगप्रसिद्ध भारूडकार निरंजन भाकरे यांचे सुपुत्र शेखर भाकरे यांच्या कलासंचाने महाराष्ट्रातील विविध लोककला सादर केल्या. नंतर प्रसिद्ध गायक अतुल दिवे यांच्या गझलगायनाचा कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी मगरे यांच्या निवडक ‘नज्म’ सादर केल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप भाई, सुनील नेरळकर, समीर निंबाळकर, संजय रोडगे, अविनाश औंढेकर, रवी कुलकर्णी, चैतन्य भंडारे, मिर्जा अब्दुल कय्यूम नदवी, मधू देशपांडे, मिलिंद हरदास, मंजुषा मगरे, सावी मगरे, विजयअण्णा बोराडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.