सन्मान सरस्वतीपुत्राचा

विवेक मराठी    23-Feb-2024   
Total Views |
स्वामी रामभद्राचार्य हे नाव आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आदराने घेतले जाते. राम मंदिर असो, राम मंदिराची सुनावणी असो किंवा प्रभू रामचंद्रांशी संदर्भित साहित्य असो.. विविध क्षेत्रांत स्वामी रामभद्राचार्य यांनी महत्त्वाचा ठसा उमटवलेला आहे. सारस्वताला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होणे हा या पुरस्काराचाच गौरव ठरेल. रामभद्राचार्य यांच्या कार्याचा आणि साहित्याचा घेतलेला हा आढावा.
 
rambhadracharya
 
मागील आठवड्यात साहित्य क्षेत्रातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. प्रसिद्ध उर्दू कवी व शायर गुलजार आणि संस्कृत विद्वान, जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना साहित्यातील योगदानाबद्दल 2023 वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येणार आहे. गुलजार हे नाव साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुपरिचित आहेच, तसेच स्वामी रामभद्राचार्य हे नाव आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आदराने घेतले जाते. राम मंदिर असो, राम मंदिराची सुनावणी असो किंवा प्रभू रामचंद्रांशी संदर्भित साहित्य असो.. विविध क्षेत्रांत स्वामी रामभद्राचार्य यांनी महत्त्वाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या कार्याचा आणि साहित्याचा घेतलेला हा आढावा.
 
 

दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी

2024ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’

भारतात झालेले परिवर्तन समजून घेण्यासाठी, कोणता खेळ मोदींनी बदलला, हे समजून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

 
स्वामी रामभद्राचार्य यांचे बालपण
 
मकरसंक्रांतीला 14 जानेवारी, 1950 रोजी जौनपूर जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) रांडी या गावी स्वामी रामभद्राचार्य यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव शचिदेवी, तर वडिलांचे नाव पंडित राजदेव मिश्र होते. रामभद्राचार्य यांचेही खरे नाव गिरिधर होते. जन्मानंतर केवळ दोनच महिन्यांनी गिरिधर यांची आजारपणात दृष्टी गेली. दृष्टिहीन जरी झाले असले, तरी ते प्रज्ञाचक्षू ठरले. रामभद्राचार्य लिहू-वाचू शकत नाहीत. कारण त्यांनी ब्रेल लिपीचा उपयोग कधी केलेला नाही. मौखिक पद्धतीने त्यांनी सर्व ज्ञान ग्रहण केले.
वयाच्या तिसर्‍या वर्षी त्यांनी अवधी भाषेत पहिली कविता लिहिली. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी गिरिधरांनी संपूर्ण भगवद्गीता पाठ केली होती, तर सातव्या वर्षी तुलसीदासांचे ’रामचरितमानस’ पूर्ण पाठ केले होते. वेद, उपनिषदे आणि भागवत पुराणाचाही त्यांचा सखोल अभ्यास आहे. थोडक्यात, गिरिधरांना कसलेही औपचारिक शिक्षण मिळाले नसताना, बालवयातच त्यांनी अनेक ग्रंथ अभ्यासले होते. 1967मध्ये त्यांनी जौनपूर जिल्ह्यातील सुजनगंज येथे असलेल्या ‘आदर्श गौरीशंकर संस्कृत महाविद्यालया’त प्रवेश घेतला. तेथे संस्कृत व्याकरणाखेरीज हिंदी, इंग्लिश, गणित, इतिहास, भूगोल असे विषयही शिकवले जात. तत्कालीन ’उत्तरा मध्यमा’ (हायर सेकंडरी) ही परीक्षा उत्तीर्ण झाले. 1971मध्ये गिरिधरांनी वाराणसी येथील ‘संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठा’त प्रवेश घेतला. तेथून त्यांनी शास्त्री (बी.ए.) ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. 1976मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून परीक्षेत सर्वप्रथम येऊन आचार्य (एम.ए.) ही पदवी मिळवली. 1981मध्ये त्यांनी पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. 1997मध्ये त्यांनी डी.लिट. ही पदवी मिळवली. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
 
 
rambhadracharya
स्वामी रामभद्राचार्य यांचे कार्य
 
स्वामी रामभद्राचार्य यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. स्वामी स्वत: अंध असले, तरी त्यांना 22 भाषा अवगत आहेत. त्यांनी 50हून अधिक शोधनिबंध व जवळजवळ 100 पुस्तके लिहिली आहेत. परदु:ख जाणण्याची क्षमता स्वामी रामभद्राचार्य यांच्यामध्ये आहे. स्वत: अंध असल्यामुळे शिक्षण घेताना येणार्‍या विविध अडचणी ते जाणत होते. यातूनच 23 ऑगस्ट 1996 रोजी स्वामी रामभद्राचार्य यांनी चित्रकूट येथे अंध विद्यार्थ्यांसाठी तुलसी प्रज्ञाचक्षू विद्यालयाची स्थापना केली. यानंतर त्यांनी केवळ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उद्देशाने त्यांनी 27 सप्टेंबर, 2001 रोजी चित्रकूट, उत्तर प्रदेश येथे जगद्गुरू रामभद्राचार्य अपंग विद्यापीठाची स्थापना केली. हे अपंगांसाठीचे भारतातील आणि जगातील पहिले विद्यापीठ आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या अध्यादेशाद्वारे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, ज्याचे नंतर उत्तर प्रदेश राज्य कायदा 32 (2001)मध्ये रूपांतर करण्यात आले. या कायद्याने विद्यापीठाचे आजीव कुलगुरू म्हणून स्वामी रामभद्राचार्य यांची नियुक्ती केली. या विद्यापीठात संस्कृत, हिंदी, इंग्लिश, समाजशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, चित्रकला, ललित कला, विशेष शिक्षण, प्रशिक्षण, इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व, संगणक आणि माहिती विज्ञान, व्यावसायिक शिक्षण, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. इथे केवळ भारत सरकारने परिभाषित केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो.
 
 
rambhadracharya
स्वामी रामभद्राचार्य आणि अयोध्या रामजन्मभूमी खटला
  
स्वामी रामभद्राचार्य हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सुपरिचित होतेच. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य बघून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना परदेशात डोळ्यांवर उपचारासाठी जाण्याची विनंती केली होती, तसेच उपचाराचा खर्च त्या स्वत: करणार होत्या. परंतु, स्वामी रामभद्राचार्य यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. पारंपरिक पद्धतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अद्भुत बुद्धिमत्तेमुळे त्यांना विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. अयोध्या रामजन्मभूमी खटला अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू असताना स्वामी रामभद्राचार्य यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. मुस्लीम पक्षकारांनी ’तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये राम मंदिर पाडून तिथे मशीद उभारण्यात आली याचा कोणताही उल्लेख नाही’ असे विधान केले. तसेच प्रभू रामांचा जन्म बाबरी ढाच्याच्याच जागी झाला का, याचे पुरावे मागितले. हिंदू पक्षकारांकडे याचे उत्तर नव्हते. तेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांनी अभ्यासाद्वारे याचे उत्तर दिले. त्यांनी प्राचीन हिंदू धर्मग्रंथांचा उल्लेख केला, ज्यात अयोध्या हे रामाचे जन्मस्थान असल्याचे उल्लेख आहेत. 437 ग्रंथांचा संदर्भ त्यांनी दिला. याशिवाय तुलसीदासाने रचलेले दोन श्लोक उद्धृत केले, त्यात विवादित जागेचा उल्लेख होता. तुलसीदासांच्या दोघा षटकामधील एका श्लोकात आणि कवितावलीतील एका श्लोकात विवादित जागेचा उल्लेख केलेला आहे. तसेच मूळ मंदिर हे वादग्रस्त जागेच्या उत्तरेला असल्याचे बोलले जात होते. तेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांनी स्कंद पुराणातील अयोध्या माहात्म्य विभागातील श्लोकांचा संदर्भ दिला. ऋग्वेदातील जैमनिय संहितेतील काही श्लोक न्यायालयापुढे सादर केले. यामध्ये अयोध्येच्या सीमांचे वर्णन आहे, जे सध्याच्या रामजन्मस्थानाशी मिळतेजुळते आहे. स्वामी रामभद्राचार्य यांचा अभ्यास, संशोधन, विद्वत्ता यामुळे त्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
 
 
स्वामी रामभद्राचार्य आणखी दोन राजकीय कारणांनी चर्चेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलसी विद्यालयाला भेट दिली असता स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, ”या विश्वात माझे दोनच मित्र आहेत. एक परम कनवाळू श्रीकृष्ण आणि दुसरे नरेंद्र मोदी.” तसेच राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात महत्त्वाचे विधान केले. ”आमची हनुमानावर श्रद्धा आहे. सीतामाईंना रावणाच्या तावडीतून ते सोडवू शकतात, तर पाकव्याप्त काश्मीर ही नगण्य गोष्ट आहे.” त्यांच्या या विधानातून पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारताचा भाग होईल, हे सूचित झाले.
 
स्वामी रामभद्राचार्य आणि रामचरितमानस
 
स्वामी रामभद्राचार्य विशेषत्वाने रामचरितमानस आणि तुलसीदासांवर केलेल्या त्यांच्या अभ्यास आणि संशोधनामुळे ओळखले जातात. रामचरितमानसची रचना 16व्या शतकात करण्यात आली. पाठभेद, मौखिक परंपरा यामुळे रामचरितमानसच्या श्लोकांमध्ये, व्याकरणामध्ये वैविध्य दिसते. त्यामुळे रामचरितमानसची मूळ आवृत्ती तयार करणे आवश्यक होते. विसाव्या शतकात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठ यांनी महाभारत आणि रामायण यांची ’क्रिटिकल एडिशन’ (चिकित्सक आवृत्ती) तयार केली. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामचरितमानसची कोणतीही चिकित्सक आवृत्ती नव्हती. स्वामी रामभद्राचार्य यांनी रामचरितमानसचे 4 हजारांहून अधिक वेळा पठण केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च संपादित आवृत्ती लिहिण्याची जबाबदारी घेतली. 8 वर्षांच्या कालावधीत 50हून अधिक आवृत्त्यांचा अभ्यास करून विविध हस्तलिखितांचे संशोधन करून 2006मध्ये रामचरितमानसची संपादित आवृत्ती निर्माण करण्यात आली. ही आवृत्ती म्हणजे तुलसीदासांचा शब्द मानली जाते.
 
 
स्वामी रामभद्राचार्य हे ’जगद्गुरू’ आहेत. भगवद्गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे या ’प्रस्थानत्रयीचा’ अभ्यास करणार्‍यांना जगद्गुरू ही पदवी दिली जाते. आजवर वेदान्तामधील 5 आचार्यांना ही पदवी मिळाली आहे. त्यानंतर स्वामी रामभद्राचार्य यांना ही पदवी देण्यात आली. त्यांनी या प्रस्थानत्रयीवर ’आनंदभाष्य’ लिहिले आहे. तसेच हिंदी, संस्कृत, अवधी भाषांत त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांनी चार महाकाव्ये (दोन संस्कृत आणि दोन हिंदीत) लिहिली आहेत. रामचरितमानसवर एक हिंदी भाष्य, अष्टाध्यायीवरील काव्यात्मक संस्कृत भाष्यही त्यांनी रचले आहे. रामायण-भागवत यांच्यावर ते प्रवचनही देतात.
 
 
स्वामी रामभद्राचार्य यांना 2015मध्ये भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कारही मिळालेला आहे. तसेच विविध वाक् सभांमध्ये त्यांना गौरवण्यात आलेले आहे. भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असणार्‍या सारस्वताला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होणे हा या पुरस्काराचाच गौरव ठरेल.

वसुमती करंदीकर

 
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका, तर ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. सध्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात ज्योतिषही शिकत आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत १३ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.