ओसाडगावची देशमुखी..

विवेक मराठी    21-Feb-2024   
Total Views |
vivek
2009पासून आमदार असलेल्या अमित देशमुखांना तब्बल 15 वर्षांनी राज्यस्तरीय नेता होण्याचे स्वप्न पडावे, याचे आश्चर्यच आहे. तसेही आता काँग्रेसमध्ये कोणी नेतृत्व उरलेले नाही. राज्यात, केंद्रात सत्ता नाही. त्यामुळे अशा गावची देशमुखी घेऊन काय करणार? विरोधी पक्षात नेतृत्व प्रस्थापित करण्याची संधी असते. पण 7 वर्षे विरोधी बाकावर आमदार असूनही सरकारविरोधात वातावरण तापवता आले नाही.
स्व. विलासराव देशमुख यांच्या काळ हा राज्यातील काँग्रेसचा सुवर्णकाळच होता. पण दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. विलासरावांनी ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे अधिक घट्ट केली. अगदी सर्वसामान्यांचे फोन उचलणारा, कार्यकर्त्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्याशी संवाद साधणारा, भेटी घेणारा अशीच विलासरावांची प्रतिमा होती. पण त्यांच्या अकाली निधनानंतर अजूनही काँग्रेसला राज्यव्यापी नेता मिळाला नाही. अशोक चव्हाणांंनी मध्यंतरी विलासराव होण्याचा प्रयत्न केला होता. पण आदर्श घोटळ्यात अशोकरावांचे नाव आले, त्यांचे पर्वच काँग्रेसने संपविले. पण त्यानंतरच्या सर्वच काँग्रेस नेत्यांनी एखाद्या संस्थानिकांसारखे आपले संस्थान करून ठेवले आहे. एक लक्ष्मणरेषा आखून घेतली आहे. त्याच्या पलीकडे आपण जायचे नाही. आता तर काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, कोणाताही नेता कधी दुसर्‍या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्या त्यांना काँग्रेसमध्ये टिकवून ठेवणे एवढेच काम काँग्रेस पक्ष करीत आहे. यावरून महाराष्ट्रात काँग्रेसची किती बिकट अवस्था आहे हे दिसून येते. रविवारी निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या वेळी देशमुख कुटुंबीयांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. सतेज पाटील व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम देशमुख कुटुंबीयांचा कौटुंबिक असला, तरी अमित देशमुखांनी आपले काँग्रेसमधील वर्चस्व वाढवण्यासाठी हे ब्रँडिंग होते असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. कारण अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर लातूर, नांदेड परिसरातमध्ये आता तसा मोठा नेता काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे अमित देशमुखांनी राज्यस्तरावर नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न असू शकतो. पण खरेच अमित देशमुखांमध्ये ती पात्रता आहे का? कारण विलासरावांचा पुत्र हेच त्यांचे भांडवल आहे. बाकी त्यांचे आजवर कोणतेही मोठे काम, आंदोलन उभारले नाही किंवा राज्यात मंत्री असताना व्हिजन ठेवलेली नाही. विलासवरांसारखे हावभाव करत भाषण करता येते, एवढीच त्यांची जमेची बाजू आहे आणि ती भाषणेही लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघांपुरती मर्यादित आहेत. लातूरच्या बाहेर त्यांनी कधी स्वत:ला झोकून दिले नाही. 2009पासून आमदार असलेल्या अमित देशमुखांना तब्बल 15 वर्षांनी राज्यस्तरीय नेता होण्याचे स्वप्न पडावे, याचे आश्चर्यच आहे. तसेही आता काँग्रेसमध्ये नेतृत्व उरलेले नाही. राज्यात, केंद्रात सत्ता नाही. त्यामुळे अशा गावची देशमुखी घेऊन काय करणार? विरोधी पक्षात नेतृत्व प्रस्थापित करण्याची संधी असते. पण 7 वर्षे विरोधी बाकावर आमदार असूनही सरकारविरोधात वातावरण तापवता आले नाही. ते आता काय करणार?
 
 
आता संधी ओळखलीच होती, तर स्वत: बँ्रडिंग करताना तरी किमान ते भव्यदिव्य करावे. पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेसचे अध्यक्ष किंवा केंद्रातील मोठ्या नेत्याला तेथे आणायला हवे होते. कारण स्व. विलासराव हे तर राज्यात तीन वेळा मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री राहिलेले होते. पण तसे काहीच झाले नाही. काँग्रेसच्या प्रादेशिक नेत्यांनीच खिंड लढवली. आजच्या घडीला देशमुख कुटुंबीयांकडे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा हे दोन मतदारसंघ आहेत. त्याबरोबर विलासरावांची पुण्याई आहे. या ठिकाणी खासदार काँग्रेस पक्षाचा होऊ शकतो. कदाचित लातूरची लोकसभा लढवण्याचे देशमुख कुटुंबीयांना सांगितले असते, तरी विरोधकांसमोर एक तगडे आव्हान उभे करता आले असते. पण तसे न करता प्रादेशिक कार्यकर्त्यांनी राज्याव्यापी नेता व्हावे असा फुटकळ सल्ला दिला. यातून एक अधोरेखित होते ते म्हणजे ना नेत्यांच्यांमध्ये पक्ष वाढवण्याची तळमळ आणि ना कार्यकर्त्यांच्यात!
 
 
महाराष्ट्रातील सर्वच पक्षात अनेक नेते आहेत, वडिलांच्या पुण्याईने राजकारणात येता आलेे. काहींनी वारसा पुढे नेला, पण काहींना स्वत:चा मतदारसंघ, पक्षही सांभाळता आला नाही. वडिलांप्रमाणे फक्त भाषण करता येणे एवढेच पुरेसे नाही. वडिलांनी ज्या प्रकारे काम केले, लोकांना आपलसे केले, त्या भागाचा कसा विकास केला हे लक्षात घेतले पाहिजे. पुतळे उभारून, उठता-बसता नुसते त्यांचे नाव घेऊन वडिलांची जागा घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांच्या कामाची पद्धत स्वीकारावी लागते. ज्यांना ते जमत नाही, त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात येते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे अमित देशमुखांसारख्या युवा राजकीय व्यक्तिमत्त्वाने यातून धडा घेतला पाहिजे.