समर्थांनी लिहिलेल्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘करुणाष्टकां’चा परिचय आपण या लेखापासून करून घेणार आहोत. त्यावर चर्चा करताना भक्ताच्या अंत:करणातील सच्चेपणा, प्रेमाची आर्तता यांचा प्रत्यय येईल आणि समर्थांच्या प्रभावी वाणींचा अनुभव घेता येईल.
समर्थ रामदास विरचित ‘करुणाष्टकां’चा विषय निघाला की, लोकांना प्रथम आठवतेे ते म्हणजे ’अनुदिनी अनुतापें तापलों रामराया’ हे स्तोत्र, इतकी त्या स्तोत्राची लोकप्रियता आहे. बर्याच ठिकाणी रामभक्तांच्या आणि समर्थभक्तांच्या नित्योपासनेत या स्तोत्राचा समावेश केलेला असतो. हे स्तोत्र म्हटल्याशिवाय त्यांची रोजची उपासना पूर्ण होत नाही. आताच्या ज्येष्ठश्रेष्ठ नागरिकांना आठवत असेल की, त्यांच्या लहानपणी मराठीच्या शालेय पाठ्यपुस्तकात या स्तोत्राचा काही भाग दिलेला होता. शिक्षक त्या वेळी त्याचा उपयोग शिकवण्यापेक्षा पाठांतरासाठी करायचे. तेही बरोबरच होते, कारण त्या कवितेतील भावार्थ, भक्ताची तळमळ, कारुण्यभाव, भक्ती हे समजण्याचे विद्यार्थ्यांचे वय नव्हते; तथापि त्या गीतातील पदलालित्यामुळे ते चालीत म्हणता येत असे, त्यामुळे त्या स्तोत्राची निवड पाठांतरासाठी केलेली असायची. असो. या स्तोत्रातील शब्दमांडणी साधी, सोपी, सरळ, पण भावपूर्ण आहे. त्यात भक्ताने आपले अंतःकरण रामासमोर उघड करून दाखवले आहे. त्यात विचारांचा सच्चेपणा आहे, भावनेचा प्रामाणिकपणा आहे, परमेश्वरभेटीची आतुरता आहे.
या स्तोत्रात कोठेही अहंकाराला, आत्मप्रौढीला, दांभिकतेला थारा नाही. त्या स्तोत्रातील पहिला श्लोक असा आहे -
अनुदिनी अनुतापें तापलों रामराया!
परमदीनदयाळा नीरसी मोहमाया ।
अचपळ मन माझे नावरे आवरितां ।
तुजवीण शिण होतो धांव रे धांव आता ॥ 1 ॥
(अनुदिनी म्हणजे प्रत्येक दिवशी रोज पश्चात्तापाने मी दग्ध होत आहे. हे रामराया, तू अतिशय दयाळू आहेस. माझे माया-मोह तू नाहीसे कर. अतिशय चंचल असे माझे मन मला आवरता येत नाही. काय करू, तुझी भेट व्हावी, या विचाराने माझे मन आता थकले आहे. तेव्हा तूच धावून ये आणि मला भेट दे.)
अशा रीतीने सुरुवातीच्या श्लोकात भक्ताने रामाचा धावा केला आहे. या काव्यातील समर्थांची शब्दरचना मनाला मोहून टाकणारी आहे. समर्थांच्या काव्यप्रतिभेची समीक्षा, शब्दरचनेतील बारकावे पुढे यथावकाश पाहता येतील. तूर्तास समर्थकाव्यातील सहजता, आर्तभाव, व्याकूळता इत्यादी गुणांचा परिचय या स्तोत्रातून होईल.
थोर विचारवंत लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “मराठीचे अपार शब्दवैभव, मराठीच्या विविध अर्थांची बोधक शब्दसामर्थ्ये समर्थांच्या ग्रंथांशिवाय इतरत्र क्वचित पाहायला मिळतात. रामदासी वाङ्मयात विचार व साहित्य सौंदर्य यांचे हृदयमीलन झाले आहे.” शास्त्रीबुवा म्हणतात त्याप्रमाणे मराठी भाषेचे, अर्थच्छटांचे सर्व गुण ‘करुणाष्टकां’च्या रचनेत आलेले आहेत, शिवाय रामभक्तीची आतुरता, तळमळ, भावनेचा ओलावा, आर्त हाक, शरणागतता हेही भाव आले असल्याने ‘करुणाष्टक’ स्तोत्रे थेट मनाला भिडतात यात नवल नाही. तीर्थयात्रेच्या निमित्ताने समर्थ बारा वर्षे हिंदुस्थानभर पायी फिरले. भिक्षेच्या निमित्ताने तेथील जनसमुदायाचे त्यांनी अवलोकन केले. त्यातून त्यांनी लोकस्वभावाची पाहणी केली. त्यामुळे समर्थांचे अनुभवविश्व अफाट आहे. वरील कडव्यांत समर्थांनी खर्या भक्ताच्या मनातील साधकदशा वर्णन केली आहे.
भक्त प्रांजळपणे परमेश्वरापुढे कबूल करतो की,
’अचपळ मन माझे नावरे आवरितां ।’
अचपळ म्हणजे अतिचपळ, चंचल असे माझे मन निमिषभरही एके ठिकाणी स्थिर राहत नाही. मन एक विचार करू लागते, तर दुसर्या क्षणी ते वेगळाच विचार करू लागते. त्यामुळे तुझ्या भेटीसंबंधी विचार करू लागावे तर क्षणार्धात ते दुसर्या विचाराकडे धाव घेते. माझ्या ठिकाणी स्वार्थ, अहंकार, देहबुद्धी कायम असल्याने माझे मन सतत ऐहिक गोष्टींचा विचार करीत असते. या नाशवंत सांसारिक मायामोहाचा पसारा दूर करून शाश्वत अशा तुझा विचार करायला हे मन तयार होत नाही. मी या मनाला आवरण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण माझे मन इतके चंचल आहे की, ते मला आवरता येत नाही. मनाविषयीचा हा अनुभव सर्वांसाठी सामान्य आहे. समर्थांनी अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील. प्रत्येकाचे मन अतिचपळ आणि चंचल असल्याने माणसाच्या विचारात स्थिरता नसते. मन स्थिर नसेल तर त्याचा बुद्धीवर परिणाम होऊन बुद्धी अस्थिर होऊ लागते. बुद्धीची निर्णयक्षमता कमी झाल्याने आपल्यासाठी हितकारी काय, काय स्वीकारायचे, काय टाकायचे याचा विवेक राहत नाही. साधकाला आपल्या अस्थिर आणि चंचल मनाची जाणीव असते; तथापि सामान्य माणसाचा विचार करता, त्याचे विचार मनाबरोबर वाहत जातात. त्यामुळे सामान्य माणसाला मनाच्या चांचल्याची जाणीव उरत नाही. त्याला आपल्या मनाकडे वेगळेपणाने पाहता येत नाही. साधक मात्र मनाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो. साधकाने शाश्वत अशा परमेश्वरप्राप्तीचे ध्येय ठरवले असल्याने त्यात अडथळा निर्माण करणार्या चंचल मनाची त्याला जाणीव असते आणि ते चंचल मन कसे आवरावे, असा साधकाला प्रश्न पडतो.
महाभारतातील अर्जुनाला ऐन युद्धप्रसंगी हा प्रश्न पडला आहे. ‘भगवद्गीते’त अर्जुनाने भगवंताला विचारले आहे की-
चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। (6.34)
(कृष्णा, हे मन चंचल, उचंबळ, बलिष्ठ व दृढ आहे. त्याचा निग्रह करणे हे वादळाला एकट्याने थोपवण्यासारखे अत्यंत कठीण आहे असे मला वाटते.)
यावर संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर अर्थपूर्ण ओवी लिहिली आहे.
म्हणौनि ऐसे कैसे घडेल । जें मर्कट समाधी येईल? ।
का राहा म्हणतलिया राहेल। महावातु? ॥ (6.413)
या चंचल मनाला आवरणे कसे शक्य आहे? त्याला आवरण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माकडाला समाधी लावण्यासारखे किंवा वादळाला थांब म्हटल्यावर ते थांबण्यासारखे नाही का? तसे घडणे शक्य नाही.
त्यामुळे या स्तोत्रात साधक भगवंताला प्रांजळपणे कबूल करतो की, माझे चंचल मन मी आवरू शकत नाही. या मनाने मला पूर्वायुष्यात अनेक गोष्टी करायला लावल्या, की ज्यामुळे अहंकार, स्वार्थ, विकार, देहबुद्धी हे वाढायला मदत झाली. हे रामा, अशाश्वत गोष्टींचा मोह मी धरल्याने शाश्वत अशा तुला मी दुरावत गेलो. त्याचा आता मला पश्चात्ताप होत आहे, पश्चात्तापाने माझे अंत:करण पोळून निघत आहे, कारण गेलेले पूर्वायुष्य काही परत मिळवता येत नाही. त्यामुळे आता तरी माझ्या मनाने अहंकारादी दुर्गुण सोडावेत. रामा, तू परमदयाळू आहेस. माझ्यासारख्या दीनाला तुझाच आधार आहे, म्हणून मी तुला विनवितो की, माझ्या मनाला या मोहपाशातून सोडव. मोहमाया यांना मी सहजपणे बाजूला सारू शकत नाही, त्यामुळे मी तुझ्या दर्शनाला मुकणार की काय, असे वाटू लागले आहे. तुला माझी दया येऊ दे. मला तुझ्याशिवाय कोणाचा आधार नाही. अशाश्वत मोहमयी मायेचा पसारा दूर करून शाश्वत अशा तुला कसे मिळवायचे, या विचाराने माझे मन थकले आहे, तेव्हा तू लवकर धावत ये आणि माझी भेटीची इच्छा पूर्ण कर.
बद्ध अवस्थेतून मुमुक्षुदशेत प्रवेश केल्यावर पूर्वायुष्य लवकर विसरता येत नाही. तो पूर्वायुष्याचा काळ मी कसा फुकट घालवला आणि मी कसा वाहवत गेलो, ही भक्ताच्या मनातील व्यथा आता स्वामी पुढील श्लोकात सांगणार आहेत. तो अनुभव तुमच्याआमच्यासारख्या सामान्य माणसांचा असल्याने, सर्वांना तो जवळचा वाटेल यात संदेह नाही.