संघाची शाखा भगव्या ध्वजाला वंदन करून प्रारंभ होते व भारतमातेला वंदन करून पूर्ण होते. शाखेत कोणत्याही देवतेची वा व्यक्तीची प्रतिमा ठेवली जात नाही. सर्वोच्च स्थान ध्वजाला दिले जाते. ध्वजासमोर सर्व समान. उच्च-नीच, शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा कोणत्याही प्रकारच्या भेदाला स्थान नाही. सर्वांची एकच आराध्य देवता- भारतमाता. भारतमातेसाठी सर्वस्व त्याग करण्याची तयारी म्हणजे ‘स्वयंसेवक पततु एष:काय:’ अशी इच्छा स्वयंसेवक रोज प्रार्थनेत व्यक्त करतो.
संघाचे ध्येय आपल्या देशाला परमवैभव प्राप्त करून देणे. त्याचे रोज म्हटल्या जाणार्या प्रार्थनेत स्मरण केले जाते. ‘परम् वैभवन् नेतुमेतत् स्वराष्ट्रम्’.
परमवैभव प्राप्त होण्यासाठी समाज संघटित असावा लागतो. वर्तमानात बहुसंख्य असलेला हिंदू समाज उच्च-नीचतेच्या भावनेने भरलेला, एक दुसर्यापासून दूर झालेला, जातिभेदाने विस्कळीत झालेला, अस्पृश्यतेसारख्या रूढीने उभा दुभंगलेला दिसतो. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. सर्व समाजसुधारकांनी हिंदू समाज निर्दोष करण्याच्या प्रयत्नाला प्राधान्य दिले आहे. ‘समाज’ म्हणावे असे गुण हिंदू समाजामध्ये आचरणात कमी आढळतात.
‘मी आणि माझे’ अशा संकुचित विचारांमध्ये हिंदू समाजातील व्यक्ती ग्रस्त आहे.
देश स्वतंत्र, समृद्ध व सुखी करण्यासाठी हिंदू समाज निर्दोष व संघटित करणे अति आवश्यक आहे. परमवैभव प्राप्त करण्यासाठी ती पहिली शर्त आहे, हे ओळखून संघाने आपले काम म्हणून हिंदू समाज संघटन करण्याचे ठरवले.
संघाचे ध्येय परमवैभव व त्यासाठी काम हिंदू संघटन. ‘हिंदू संघटन’ या शब्दांमध्ये समाजसुधारणेच्या सर्व संकल्पना सामावलेल्या आहेत.
श्रीगुरुजी यांच्या कुलवृत्तांतापासून त्यांच्या पूर्णाहुतीपर्यंत विस्तृत माहिती या जीवनचरित्रात वाचायला मिळते.
हिंदू समाज संघटन सोपे काम नाही व ते धैर्याची परीक्षा पाहणारे आहे. जिवंत बेडकाचे वजन करणे जितके कठीण त्याहून हिंदू समाज संघटन कठीण! हिंदू समाज भेदा-भेदांनी इतका पोखरलेला आहे की, आपले जीवन संपेल, पण संघटन होणे दूरच राहील. निराशा-हताशा हाती येईल.
असे असंभव वाटत असले तरी करणे आवश्यक आहे. सतत करत राहतील, निराश आणि हताश होणार नाहीत, काम मध्येच सोडणार नाहीत, असे संघटनकुशल कार्यकर्ते निर्माण करावे लागतील.
संघाची शाखा संघटनकुशल कार्यकर्ता निर्माण व्हावे म्हणून चालवली जाते. संघाने त्याला ‘स्वयंसेवक’ हे नाव स्वीकारले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा अर्थ थोडक्यात असा लावता येईल. ‘राष्ट्रीय म्हणजे हिंदू’, ‘संघ म्हणजे समाज’, ‘हिंदू समाज संघटित करण्याचा विडा ज्यांनी उचलला आहे ते स्वयंसेवक’. संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन, ही संकल्पना गळी उतरणे इतके सोपे नाही. एखाद्या जातीचे, एक भाषा बोलणार्यांचे तसेच शेतकर्यांचे, मजुरांचे, काँग्रेसचे, भाजपचे संघटन या संकल्पना समजण्यास सोप्या आहेत. ‘नि:शेष हिंदू समाजाचे संघटन’ ही संकल्पनाच डॉ. हेडगेवारांशिवाय कोणी मांडली नाही. ग्रामवासी, शहरवासी, गिरीवासी, वनवासी, धनवान, निर्धन असे लोक सहा लाख गावांत पसरलेले व विविध भाषा बोलणार्या ‘विराट’ समाजाचे संघटन करण्याचा संकल्प करणे हाही एक चमत्कारच आहे. डॉक्टर याला ईश्वरी कार्य मानत असत. डॉ. हेडगेवार यांनी तर हे कार्य करता करताच आपले जीवन संपवले. डॉक्टरांचा आदर्श समोर ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी आपले जीवन खपविले आहे. परमपूजनीय सरसंघचालक श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, प्रो. राजेंद्र सिंहजी, माननीय सुदर्शनजी यांनी तोच आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. असंभव वाटणारे हिंदू समाज संघटन करावयास निघालेल्या स्वयंसेवकांमध्ये कोणते गुण आवश्यक आहेत, हा संघनिर्माता डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा सखोल चिंतनाचा विषय असला पाहिजे. सार्वजनिक जीवनात काम करणार्या अनेक व्यक्तींशी त्यांचा परिचय होता. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षी योगी अरविंद, त्र्यैलोक्यनाथ चक्रवर्ती, भाई परमानंद अशा काही जणांचा उल्लेख करता येईल.
सर्वसामान्यपणे एखाद्या अधिवेशनासाठी कार्यक्रमांची व्यवस्था करणार्यांना स्वयंसेवक म्हटले जात असे. डॉ. हेडगेवार यांच्या मनातील ‘स्वयंसेवक’ ही संकल्पना पूर्णपणे भिन्न होती.
* संघटन करणे म्हणजे माणसे जोडणे. जोडणारा स्वभाव हवा, तोडणारा नको. जोडणे अवघड!
* स्वयंसेवक अहंभावी नसावा. संपूर्ण समाजाबद्दल आत्मीयता हवी. कोणताही भेदभाव मनात नको.
* जोडण्यासाठी व्यक्तीच्या घरी जावे लागते. आपणहून अनोळखी व्यक्तीकडे जाण्याचा स्वभाव बनवावा लागतो.
* नवनव्या लोकांकडे जाण्यासाठी वेळ काढावा लागतो. अन्य जबाबदार्या कमीत कमी वेळेत उरकून जास्तीत जास्त वेळ संघटनेला देणारा हवा.
* मृदुभाषी आणि मितभाषी असावा.
* प्रतिज्ञा घेऊन काम करणारा असावा.
हिंदू समाज संघटनेचे कार्य धैर्याची कसोटी पाहणारेच आहे. ‘कार्यंवासाधयेत् देहंवापातयेत्’ अशी मनोभूमिका ठेवूनच काम सातत्याने करावे लागेल.
हाच वसा पुढच्या पिढीला द्यावा लागेल. डॉ. हेडगेवार यांच्यानंतर चार सरसंघचालक झाले आणि विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे आहेत. सातत्यपूर्ण निरंतर काम चालू आहे. आपल्या ‘मनातील स्वयंसेवक निर्माण करू शकणारी शाखा कार्यपद्धती’ डॉक्टरांनी विकसित केली. संघाची शाखा भगव्या ध्वजाला वंदन करून प्रारंभ होते व भारतमातेला वंदन करून पूर्ण होते. शाखेत कोणत्याही देवतेची वा व्यक्तीची प्रतिमा ठेवली जात नाही. सर्वोच्च स्थान ध्वजाला दिले जाते. ध्वजासमोर सर्व समान, उच्च-नीच, शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा कोणत्याही प्रकारच्या भेदाला स्थान नाही. सर्वांची एकच आराध्य देवता- भारतमाता. भारतमातेसाठी सर्वस्व त्याग करण्याची तयारी म्हणजे ‘स्वयंसेवक पततु एष:काय:’ अशी इच्छा स्वयंसेवक रोज प्रार्थनेत व्यक्त करतो. भारतमाता आपली आराध्य देवता. समाज हा परमेश्वर व भगवा ध्वज हा आदर्श. संघशाखेची अशी रचना असते. अहंकाराला व स्वार्थाला कुठेही स्थान नाही.
शाखेसाठी एक तासाचा वेळ निश्चित केला आहे. एक-एक मिनिटाचा विचार करून एक तासाचे नियोजन केले जाते. शरीर-मन-बुद्धीचा समन्वय साधणारे ते असते. शरीर-मन-बुद्धीचा समन्वय साधता आला, तर मनुष्य हाती घेतलेल्या कामात यशस्वी होतो. बुद्धी एकीकडे, मन दुसरीकडे व शरीरेद्रिंये तिसरीकडे ओढत असलेले व्यक्तित्व एकात्म असणार नाही. नेहमीच द्विधामनःस्थितीचा अनुभव येईल.
एका तासाचे नियोजन साधारणतः पुढीलप्रमाणे असते.
प्रारंभीची पाच मिनिटे ध्वजवंदनासाठी, शेवटची पाच मिनिटे भारतमाता वंदनासाठी. 40 मिनिटे खेळ, सूर्यनमस्कार, योग, समता, संचलन इ. शारीरिक कार्यक्रमासाठी असतात. रोज दहा मिनिटे बौद्धिक कार्यक्रमासाठी. सप्ताहाचे वेळापत्रक ठरवले जाते.
खेळामुळे मन प्रसन्न, उत्साही आणि विजयाकांक्षी बनते. ‘मी विजयी होणार’ ही भावना जीवनात महत्त्वाची असते. समाजामध्ये विजय प्राप्त करण्याची, पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा आवश्यक असते. योग, समता, संचलन इ. कार्यक्रमांतून स्वयंसेवकाच्या अंगी अनुशासन बाणवण्याचा प्रयत्न होतो. शरीरेंद्रियांची मनमानी कमी होते. आपल्या मनाच्या ताब्यात शरीर राहते.
सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून गणला जातो. सात आसने व प्राणायामाची सांगड त्यात घातली आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीरसौष्ठव प्राप्त होते. परिश्रम करणारे शरीर तयार होते.
‘शरीरमाध्यम् खलु धर्म साधनम्’ हे अमृतवचन प्रसिद्ध आहे. शरीर मोठे, मेंदू लहान असतो. दहा मिनिटे बौद्धिक कार्यक्रमासाठी असतात. हिंदू समाजाबद्दलची निष्ठा, वर्तमान समाजाची विस्कळीत अवस्था, एकात्मतेचा अभाव, समरसतेचा भाव निर्माण करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी वेळ देणे इत्यादी विषयांवर चर्चा असतात. समाजप्रेम, शौर्य, पराक्रम, चारित्र्य, सेवा, समर्पण इ. गुणवाचक छोटे प्रेरक प्रसंग सांगणे असे बौद्धिक कार्यक्रमाचे स्वरूप असते. शाखेत देशभक्तीची गीते सामूहिकपणे गायिली जातात. स्वयंसेवक गीत म्हणण्यात रंगून जातात. रोज म्हटली जाणारी प्रार्थना, हा बौद्धिक विभागाचा महत्त्वाचा विषय आहे. शाखा चालवणार्या स्वयंसेवकास ‘मुख्य शिक्षक’ म्हटले जाते. त्याहून थोडा मोठा स्वयंसेवक जो त्याला मदत करतो, त्याला ‘शाखा कार्यवाह’ म्हणतात. शिशू, बाल, विद्यार्थी, तरुण व प्रौढ या श्रेणीप्रमाणे ‘गणशिक्षक’ नेमले जातात. शिशू, बाल, विद्यार्थी, तरुण, व्यवसायी-तरुण, व्यवसायी-प्रौढ असे शाखांचे प्रकार असतात. शाखेत पाच-सात स्वयंसेवकांचे गट करतात. प्रत्येक गटाला एक ‘गटनायक’ असतो. गटनायक आपल्या गटातील प्रत्येक स्वयंसेवकाच्या घरी जातो. घरातील सर्वांशी ओळख करून घेतो. गटनायकापासून संघटनशास्त्र कौशल्य प्रारंभ होते.
शाखा स्तरापासूनच योजना कौशल्य विकसित होते. बारकाईने तपशिलात जाण्याची सवय लागते. योजना कौशल्य व अंगी बाणलेले अनुशासन यामुळे मोठमोठी कामे स्वयंसेवक सहज पार पाडताना दिसतात. भूकंप असो, पूर असो, वादळी तडाखा असो, की कोरोना महामारी असो, आपत्तीच्या वेळी हे गुण प्रकटपणे दिसतात.
मध्यंतरी गंगामाता-भारतमाता यात्रा झाली. पन्नास हजार किलोमीटरचा प्रवास झाला. वेळ पाळली गेली. व्यवस्थेत कुठेही गोंधळ झाला नाही. एका आघाडीच्या दैनिकाच्या रकान्यात ‘मिलिटरी प्रिसिजन दिसून आले’, असे वर्णन केले होते. पूर्ण कार्यक्रमाचे अखिल भारतीय संयोजक होते बालवयापासून स्वयंसेवक असलेले आदरणीय मोरोपंत पिंगळे. ‘मी जिंकणारच’ या आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकणारे व विवेकानंद शिला स्मारक साकार करून दाखवणारे माननीय एकनाथजी रानडे हे संघशाखेच्या मुशीतून तयार झालेले व्यक्तिमत्त्व! मा. एकनाथजी रानडे स्मारक उभे करूनच स्वस्थ बसले नाहीत. स्वामी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन समाजसेवेसाठी पुढे येणार्या युवक-युवतींना योग्य प्रशिक्षण मिळेल असे विद्यापीठ निर्माण केले आहे. विवेकानंद केंद्रात प्रशिक्षित झालेले शेकडो कार्यकर्ते देशभर समाज संघटनेचे कार्य करत आहेत. प्रारंभीच्या काळात नागपूरहून तसेच महाराष्ट्रातून अनेक स्वयंसेवक आपले घर सोडून दुसर्या प्रांतात, अनोळखी प्रदेशात शाखाकार्य वाढवण्यासाठी गेले. ज्या संघशाखेने त्यांना तयार केले त्या शाखेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पंजाबमध्ये राजाभाऊ पातुरकर व माधवराव मुळे, दिल्लीला वसंतराव ओक, उत्तर प्रदेशमध्ये भाऊराव देवरस व नानाजी देशमुख, बिहारमध्ये मधुसूदन देव, ओडिसाला बाबूराव पाळधीकर, दक्षिणेमध्ये दादाराव परमार्थ, दत्तोपंत ठेंगडी व यादवराव जोशी अशी काही नावे सांगता येतील. ही सर्व मंडळी कुठे झोपत असतील? केव्हा जेवत असतील? त्यांच्या कल्पकतेची अन् योजकतेची, एका-एका व्यक्तीबद्दलच्या आत्मीयतेची आणि चिकाटीची कमालच म्हणावी लागेल. आज स्वयंसेवक निर्माण करणार्या ऐंशी हजार संघशाखा चालवल्या जातात.
स्वामी विवेकानंदांच्या साहित्यात पुढील वाक्य वाचावयास मिळते. ‘हवी आहेत माणसे. त्यानेच सर्व काही साध्य होईल. मी अशाच माणसांच्या शोधात आहे. ज्याच्या शब्दातील M हे अक्षर कॅपिटल असेल, I am in search of man making machine. Man with capital M' असे म्हणत असताना त्यांना देशातील व्यक्ती कशी हवी होती? मृत्यूच्या जबड्यात प्रवेशतील, अथांग सागर पोहून पार करतील, असे बुद्धिमान आणि धैर्यशील युवक मला हवे आहेत. ध्यासपूर्तीची धग त्यांच्या हृदयात हवी. पावित्र्याच्या तेजानेे तळपणारे ईश्वरावरील श्रद्धेचे शुभ कवच ल्यायलेले, मृगेंद्राचे स्नायू नसांत स्फुरत असलेले युवक हवेत. दीन-दलितांबद्दल अपार करुणा असलेले सहस्रावधी युवक-युवती हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत संचार करतील, असा मला विश्वास आहे. मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे व सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन ते करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल.
व्यक्ती-निर्माण म्हणजे स्वयंसेवक-निर्माण (Man with capital M) असे उद्दिष्ट ठेवून शाखा कार्यपद्धतीच्या रूपाने स्वामी विवेकानंदांच्या राष्ट्र पुनरुत्थानाच्या वरील विचारांना साकार करण्याचे प्रयत्न संघाने चालवले आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही.