कार्यकर्त्याच्या मनोव्यापारातील चढ-उतार मी अनुभवले आहेत. चरितार्थासाठी करण्याची धडपड, कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक कामाच्या वाढत्या गरजा अशा सर्व आघाड्यांवर संतुलन साधत काम करणे सोपे नसते. कामाच्या ठिकाणी वाढणारी प्रेशर्स, एकल कुटुंबात, बदलत्या जीवनशैलीतील वाढते ताण, आणि चांगल्या सामाजिक कामाकडून समाजाच्या वाढत असणार्या अपेक्षा यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याची चांगलीच दमछाक होत असते. अशा सर्व कार्यकर्त्यांना दमू नका, निराश होऊ नका. ह्या देशातील महापुरुषांनी दाखवलेला हा मार्गच आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. यशस्वी करणारा आहे. हे आश्वासन हे गीत आजही देते आहे...
जहाँ बढते जीत होती और रुकते हार है।
चिरविजय की कामना ही राष्ट्र का आधार है॥
समाजात, अनेक सभा-समारंभात कार्यक्रमाची सुरुवात गीताने करण्याची पद्धत आहे. गीत सुरू होते, मग लोकांना कार्यक्रम सुरु झाल्याचे लक्षात येते. त्यानंतर निवेदक स्टेजवर अवतरेपर्यंत सभागृहात, कार्यक्रमस्थानी लोकांची वर्दळ सुरू राहते. लोक आपापल्या आसनाकडे येत राहतात. थोडक्यात सांगायचे तर, सभागृह भरेपर्यंत आणि निवेदक येऊन कार्यक्रम सुरू करेपर्यंत ‘फिलर’ चे काम गीतगायकाकडे असते. रा. स्व. संघाच्या कार्यक्रमात हे असे कधीच घडत नाही. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यक्रमाचा भाग म्हणून गीत होते. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मंडळी आसनस्थ झालेली असतात. सुरेल आवाजात सादर झालेले आशयघन गीत हे कार्यक्रमाच्या ‘कंटेंट’चा महत्वाचा भाग असते. कार्यक्रमाचा, कार्यक्रमाच्या आयोजनातील शिस्तीचा, प्रत्यक्ष भाषणाचा वा चर्चेचा, कार्यक्रमात सादर होणार्या गीतांचा आणि कार्यक्रम संपल्यानंतर होणार्या अनौपचारिक भेटीगाठींचा एकत्रित परिणाम उपस्थितांवर होतो आणि तो सकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो असा अनुभव आहे. एका अर्थाने संघ परिवारातील संस्थांच्या कार्यक्रमाचा हा एक यशस्वी साचा झाला आहे.
अशा अनेक समारंभात, बैठकांत ‘चिरविजय की कामना ही राष्ट्र का आधार है!’ हे सुप्रसिद्ध संघगीत मी गेली चार दशके तरी ऐकत आलो आहे. वर सांगितल्याप्रमाणे त्या त्या कार्यक्रमातून सादर होणारी विविध गीते सकारात्मक परिणाम करतच असतात. पण विविध कारणांमुळे ‘चिरविजय की कामना ही राष्ट्र का आधार है!’ हे गीत माझ्या भावविश्वाचा महत्वाचा भाग बनून गेले आहे. संघाच्या किंवा संघपरिवारातील विविध संस्थांच्या अस्तित्वाच्या हेतूमध्ये ‘देशाला सामर्थ्यवान बनवण्याचे ध्येय’ हा मध्यवर्ती भाग आहे. ह्या गीतातून संघटना म्हणून, कार्यकर्ता म्हणून आपल्या गंतव्यस्थानाचे, ध्येयाचे नित्य स्मरण होत राहते असे मला वाटते. आणि नुसते स्मरण नव्हे तर ध्येयमार्गावर चालताना हा विजयी करणारा मार्ग आहे, ह्या मार्गावर कार्यरत राहण्याची परिणती यशस्वी होण्यातच आहे असे खंबीर आश्वासन कार्यकर्त्याला देण्याची ताकद ह्या गीतामध्ये आहे.
'हिंदू समाजाचे संघटन' या सूत्राला धरून काम करणाऱ्या रा. स्व. संघाच्या प्रयत्नातून मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनेक विषयांवर प्रभावी काम झाले आहे. हे जाणून घेण्यासाठी...
https://www.evivek.com/RaashTrotthaanvisheshgranth/ चार कडव्यांच्या या गीतात ध्येयमार्गावर मिळणार्या यशश्रीचे आश्वासन सतत मिळत राहते. सुष्ट शक्तींनी कायम दुष्टांवर मिळवलेल्या विजयाचे आश्वासन. ह्या प्रवासात, संघर्षात जरी शेकडो अडचणी आल्या तरी खंबीरपणे मार्गक्रमणा करण्याचे आवाहनही हे गीत करते. त्यासाठी भारताच्या दोन ऐतिहासिक महानायकांच्या संघर्षमय जीवनाच्या उदाहरणांचा आधार हे गीत घेते. रामायणातील श्रीरामाचा संघर्षमय प्रवास, श्रीकृष्णाने धर्मसंस्थापनेसाठी वेचलेले अवघे आयुष्य ह्यांचे दाखले हे गीत देते. ओळी आहेत...
शान्त-चिर-गम्भीर और जयिष्णु राघव
क्रान्तिकारी सर्वगुण सम्पन्न माधव
कर सके जिस तत्व से अरि का पराभव
वह विजय की कामना ही राष्ट्र का आधार है॥
ज्या गुणांचा, तत्वांचा आधार घेत ह्या दोन महापुरुषांनी दुष्ट शक्तींचा पराभव केला त्यांची उदाहरणे देश उभारणीचा आणि देशाच्या एकजुटीचा ध्यास घेतलेल्या कार्यकर्त्यांना ह्या गीतातून मिळणे हे अत्यंत औचित्यपूर्ण वाटते. शेवटी श्रीराम आणि श्रीकृष्ण ही देशाच्या अनुक्रमे उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम एकात्मतेची प्रतीकेच मानली जातात.
विजयी होण्याचे, जयिष्णू असण्याचे भान जर समाजाचे सुटले तर समाजाच्या होणार्या अवनतीकडे देखील हे गीत स्पष्टपणे अंगुलीनिर्देश करते. गीतकार लिहितो...
दिया हमने छोड़ जब-जब चिर-विजय-व्रत
हुए तब पददलित पीड़ित और श्रीहत
विजयश्रीचा ध्यास सुटलेला समाज सामर्थ्यहीन आणि दुर्बल होतो, कंगाल होतो, राष्ट्र म्हणून आत्मसन्मान विसरतो. असा समाज गुलामगिरीचे संकट सहजपणे ओढवून घेतो ह्याचीही स्पष्ट जाणीव नेमक्या शब्दांत हे गीत करून देते. ह्या गीताचे हे वैशिष्ट्य देखील मला अत्यंत महत्त्वाचे वाटते.
गेल्या चाळीस वर्षांत कार्यकर्ता म्हणून मनात चलबिचल होण्याचे प्रसंग काही कमी आले नाहीत. अगदी सुरुवातीला, ऐन विशीत असताना, सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ईशान्य भारताच्या प्रदेशात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे असुरक्षित आणि भयावह रूप बघितल्यानंतर आणि अशा विदिर्ण सीमाप्रदेशातून चालणार्या घुसखोरीचे प्रत्यक्ष दर्शन घडल्यानंतर मनांत एक विषण्णता घर करून बसली. दुसरीकडे, हे चित्र बदलावे अशी मनोमन इच्छा धरून त्या प्रदेशात कार्यरत असणार्या प्रयत्नांना मिळणारा अपुरा प्रतिसाद त्या विषण्णतेला अधिकच दु:खद बनवत होता. तेव्हा वाटायचे, ... खरंच वाटायचे, की हे चित्र खरेच बदलणार आहे का कधी? की आपण सगळेजण एक हरणारी लढाई लढत आहोत? त्यानंतर काही वर्षांतच काश्मीरमधील प्रश्नाने उग्ररूप धारण केले. इस्लामी दहशतवादाचे थैमान सुरू झाले. हजारो काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोरे सोडून पळून यावे लागले. आपल्याच देशात निर्वासिताचे जिणे त्यांच्या नशिबी आले. एक कार्यकर्ता म्हणून हे सर्व बघणे, अनुभवणे दु:खद होते. व्यथित करणारे होते. मन निराश होऊन जायचे. पुन्हा वाटायचे की परिस्थिती कशी सुधारणार आणि कधी? अशा विविध प्रसंगी हे गीत मनाला उभारी द्यायचे. आपण स्वीकारलेला मार्गच आज ना उद्या आपल्या पदरी विजयाचे दान नक्की टाकेल असा विश्वास हे गीत जागृत करायचे. मनातली निराशा झटकली जायची.
मागील चाळीस वर्षांत संघ परिवाराने सामूहिकरीत्या मोठी मजल मारली आहे हे खरेच. पण अजून करण्याचे भरपूर काही शिल्लक आहे ह्याचीही जाणीव कार्यकर्ता म्हणून सर्वांनाच आहे. आर्थिक-सामरिक स्वयंपूर्णतेकडे देशाला मोठी वाटचाल करायची आहे. अर्थकारण, शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांत मोठा पल्ला अजून गाठायचा आहे. दारिद्र्यरेषेच्या आत-बाहेर असलेल्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मोठ्या लोकसंख्येला विकासवाट अजून दिसायची आहे. जाती-धर्म-भाषा अशांचा वापर करत फुटीरतेची बीजे पेरण्याचे काम सुरू आहे. अशा वातावरणात समाजात एकजुटीचे आणि परस्पर सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचा ध्यास घेतलेल्या कार्यकर्त्यांची मार्गक्रमणा आजही सोपी नाही. त्यांना पदोपदी वैचारिक मार्गदर्शनाची आणि मानसिक आधाराची गरज असते. अशा वेळी तसा आधार देण्याचे काम असे आशयघन गीत नक्कीच करू शकते.
अगदी व्यक्तिगत पातळीवर देखील कार्यकर्त्याच्या मनोव्यापारातील चढ-उतार मी अनुभवले आहेत. चरितार्थासाठी करण्याची धडपड, कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक कामाच्या वाढत्या गरजा अशा सर्व आघाड्यांवर संतुलन साधत काम करणे सोपे नसते. कामाच्या ठिकाणी वाढणारी प्रेशर्स, एकल कुटुंबात, बदलत्या जीवनशैलीतील वाढते ताण, आणि चांगल्या सामाजिक कामाकडून समाजाच्या वाढत असणार्या अपेक्षा यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याची चांगलीच दमछाक होत असते. अशा सर्व कार्यकर्त्यांना दमू नका, निराश होऊ नका. ह्या देशातील महापुरुषांनी दाखवलेला हा मार्गच आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. यशस्वी करणारा आहे. हे आश्वासन हे गीत आजही देते आहे आणि ध्येय मार्गावर चालणार्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवरून वडिलकीने धीर देणारा हात फिरवीत आहे. सांगत आहे...
जहाँ बढते जीत होती और रुकते हार है।
चिरविजय की कामना ही राष्ट्र का आधार है॥
sharadmanigmail.com