समर्थापुढे काय मागो कळेना

विवेक मराठी    04-Oct-2024   
Total Views |

SWAMI SAMARTH
प्रभू श्रीराम सर्व सामर्थ्यवान असल्यामुळे त्याला या जगातील अशाश्वत वस्तू मागितल्या तर त्या नाशवंत असल्याने आपले मागणे फुकट जाईल. त्याचप्रमाणे आपली मागायची संधीही त्याद्वारा व्यर्थ गमावली जाईल, या विवेकपूर्ण विचाराने भक्ताचे मन संभ्रमित होते व त्याला नेमके काय मागावे ते सुचत नाही.
‘रघुनायेका मागणे हेचि आता’ ही ओळ शेवटी असलेल्या ‘करुणाष्टका’तील आतापर्यंतच्या श्लोकांतून साधकाने आराध्यदैवतेची सेवा घडावी, त्याची भक्ती करता यावी, अशा स्वरूपाच्या मागण्या केल्याचे पाहिले. परमार्थ क्षेत्रात देवाचे सामर्थ्य, वैभव ओळखून आपण त्या भगवंताचे दास आहोत, सेवक आहोत, अशी कल्पना केल्यावर भक्तिपंथ सरळपणे आचरता येतो. साधकाला आपल्या मनातील आवडीनिवडी, वासना, कामना, इच्छा, भय, आसक्ती इत्यादी विकार यांची जाणीव असते. या भावना मनातून केव्हाही बाहेर पडून माणसाला कृती करायला भाग पाडतात. अशा वेळी त्या दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, तर त्या आणखी जोराने उफाळून येण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांना दडपून न टाकता योग्य दिशेने वळवल्या तर साधकाचा मार्ग सुकर होतो. मनात इच्छा, वासना आहे ना? असू दे, तिला देवाच्या भक्तीची वासना असू दे. मनाला कोणाचा सहवास हवासा वाटतो, तर मग देवाच्या सहवासाची इच्छा कर. भक्ताचा देवावर पूर्ण विश्वास असल्याने भक्त श्रद्धापूर्वक अंतःकरणाने आपले मागणे देवाकडे मागू शकतो. भक्त आपल्या मनातील आशा, आकांक्षा, इच्छा यांना आतल्या आत दाबून न टाकता, त्यांना पारमार्थिक वळण देऊन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपल्याला काय नको हे भगवंताला सांगून त्या गोष्टींपासून दूर राहता येते. द्रव्यदारा इत्यादी भौतिक गोष्टी नाशवंत असल्याने त्या मागून काय करायचे, असा विवेक केल्याने तत्संबंधी इच्छा दडपल्या न जाता त्यांना वाट करून दिली जाते. भगवंतावरील दृढ श्रद्धेने मनातील भीती, संकटे नाहीशी कर, असेही देवाला सांगता येते. राम सर्व सामर्थ्यवान, वैभवसंपन्न असल्याने त्याला प्रसन्न करून घेतल्यावर त्याच्याकडे नेमके काय मागावे, असा भक्ताला प्रश्न पडतो. हा विचार स्वामींनी ‘करुणाष्टका’तील या श्लोकात पुढे नेला आहे.
समर्थापुढें काय मागों कळेना ।
दुराशा मनीं बैसली हे ढळेना ।
पुढे संशयो नीरसीं सर्व चिंता ।
रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥ 8 ॥
खर्‍या साधकाची मानसिकता स्वामींनी या श्लोकातून भावपूर्ण शब्दांत दाखवली आहे. आपण ज्याची भक्ती करतो ते आपले आराध्यदैवत सर्वशक्तिमान, ऐश्वर्यसंपन्न आहे, तेव्हा त्याचा भक्त होऊन, दास होऊन जर आपण त्याच्याकडे काही मागितले, तर ते भक्तासाठी देणे देवाला अशक्य नाही; परंतु अशा सामर्थ्यवान, संपन्न धन्याकडे नेमके काय मागावे, हा दासापुढे प्रश्न असतो. सारासारविवेक जागृत ठेवून आपले हित कशात आहे याचा विचार करूनच आपण मागणी केली पाहिजे, हे सुजाण भक्ताला समजते. ‘करुणाष्टका’तील या कडव्याच्या पहिल्याच ओळीत स्वामी, ’समर्थापुढे काय मागो कळेना’ असे म्हणत आहेत. या जगातील अशाश्वत वस्तू मागितल्या तर त्या नाशवंत असल्याने आपले मागणे फुकट जाईल. त्याचप्रमाणे आपली मागायची संधीही त्याद्वारा व्यर्थ गमावली जाईल, या विवेकपूर्ण विचाराने भक्ताचे मन संभ्रमित होते व त्याला नेमके काय मागावे ते सुचत नाही. येथे स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवतो. त्या वेळी ते नरेंद्र होते. त्यांचे वडील अचानक वारल्यावर त्यांच्या घरची आर्थिक स्थिती कोलमडली- ते त्यांनी त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांना सांगितल्यावर रामकृष्ण म्हणाले, “आपली कालीमाता ऐश्वर्यसंपन्न आहे. मी मातेची पूजा करून आलो, की तू मातेकडे जा आणि काय हवे ते मागून घे.” त्याप्रमाणे नरेंद्राने आत जाऊन कालीमातेचे दर्शन घेतले व बाहेर आले. गुरूंनी विचारल्यावर नरेंद्र म्हणाला, ’‘कालीमातेचे रूप पाहून मला क्षणभर ध्यानावस्था प्राप्त झाली. मला स्वतःचाच विसर पडला आणि काही न मागता मी परत फिरलो.” समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, ‘समर्थापुढे काय मागो कळेना’ अशी त्या वेळी स्वामी विवेकानंदांची अवस्था झाली असणार.
 
गोंदवलेकर महाराज म्हणतात, “रामाजवळ काय मागायचे ते भक्तांना कळत नाही. या जगातील कोणतीही वस्तू देण्यास राम समर्थ आहे; पण त्या वस्तूतील अशाश्वतता काढून टाकून ती कशी देता येणार?” गोंदवलेकर महाराज अशा भक्तांविषयी म्हणतात की, प्रापंचिक गोष्टींची हाव धरून त्या भगवंताकडे मागणारे हे हिंगजिर्‍याचे गिर्‍हाईक आहेत. ते ढिगाने सापडतात; पण केशरकस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. लोकांना प्रपंचासाठी देव हवा असतो. देवासाठी देव हवा, असे म्हणणारा हा खरा केशरकस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणे कठीण असते. तरीही संत, सामान्य माणसांतून केशरकस्तुरीचा चाहता तयार करीत असतात. समर्थ रामदास हे अशा संतांपैकी एक आहेत. त्यामुळे ‘करुणाष्टकां’च्या माध्यमातून ते आपल्याला भगवत्प्रेमाकडे घेऊन जात आहेत. भक्तिपंथासाठी भक्ताकडे जी आर्तता, तळमळ लागते त्याचा परिचय करून देत आहेत. स्वामी या श्लोकात पुढे म्हणतात की, भगवंताकडे काय मागावे हे कळत नाही, कारण माझ्या मनात दुराशा आहे. ही दुराशा माझ्या मनात बसली असल्याने ती मला प्रापंचिक गोष्टी मागायला सुचवत आहे. प्रपंचात सुख आहे असे मानल्याने माझी देहबुद्धी दुराशेला साथ देत आहे; परंतु दुराशा, देहबुद्धी, अहंकार मला प्रापंचिक गोष्टींतील अशाश्वतता सांगत नाहीत. देहबुद्धी व अहंकाराने मी दुराशेला माझ्या मनात स्थान दिले; परंतु ही दुराशा काही केल्या तेथून हलायला तयार नाही. सांसारिक गोष्टींची हाव धरल्याने माझ्या मनाची अवस्था संभ्रमित झाली आहे. माझ्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होत आहे, की मी भक्तिपंथाने देवाला आळवावे की प्रापंचिक वस्तू अशाश्वत आहेत हे जाणूनही त्यात रममाण व्हावे. हा संशय माझ्या मनात सतत येत असल्याने मी चिंताक्रांत झालो आहे. या संभ्रमित अवस्थेतून परमेश्वरा, तूच मला बाहेर काढू शकतो. म्हणून हे रघुनायका रामा, आता तूच माझ्या मनातील हे संशय आणि चिंता पूर्णपणे काढून टाक. तसे झाले तरच मला तुझी भक्ती करणे शक्य होईल. तुझ्या भक्तीशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे, हे आता मला कळून चुकले आहे. त्यामुळे माझ्या चिंता, संशय तू दूर कर, हेच माझे तुझ्याकडे मागणे आहे. माझ्या मनाच्या ठिकाणी देहबुद्धी, दुराशा, सांसारिक गोष्टींची हाव, हे सारे आहेत. माझ्या मनात भय, चिंता यांचा वास आहे. स्वार्थ, द्वेष हे विकार मला सोडायला तयार नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करता मी तुझ्या भक्तीसाठी लायक नाही असेही तुला वाटेल. असे आणि तसे झाले तर मला कोणाचा आधार राहील? मी अनाथ होईन. मी अनाथ झालो तरी तुझी भक्ती सोडणार नाही, कारण अनाथांचा, पापी माणसांचा उद्धार करणे हेच तर तुझे ब्रीद आहे. तशी तुझी प्रतिज्ञा आहे. म्हणून त्या ब्रीदासाठी तरी तुला माझा, या अनाथाचा, दीनाचा विचार करावा लागेल, मला उद्धरून न्यावे लागेल. हा विषय पुढील श्लोकात स्वामींनी विस्ताराने मांडला आहे, त्यावर चर्चा पुढील लेखात होईल.

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..