हसरी शंभरी...

विवेक मराठी    19-Oct-2024   
Total Views |

S D Phadnis
एक शब्दही न लिहिता कागदावरील आपल्या अस्तित्वाने लोकांच्या ओठावर स्मितरेषा फुलवणार्‍या शि.द. फडणीस नावाच्या निर्मळ हास्यरेषेने नुकतीच शंभरी गाठली. आजही निशिगंधाच्या शुभ्र सुगंधी फुलछडीसारखी ताठ आणि देखणी असलेली ही ‘हसरी शंभरी’ हे महाराष्ट्राला मिळालेलं वरदान आहे. बारीक, लवचीक आणि सर्जनाचे अपार सामर्थ्य ही रेषेची वैशिष्ट्ये शि.दं.च्या व्यक्तिमत्त्वालाही लागू पडतात! त्यांच्या वृत्तीतली प्रसन्नता त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत असते. त्यांच्या रेषेत जे चैतन्य आहे, सौंदर्य आहे ते त्यांच्या आनंदी आणि स्वीकारशील वृत्तीतून आलं आहे. त्यांच्या चित्रात दिसणारी प्रमाणबद्धता, समतोल त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातही सांभाळलेला आहे. हा समतोल आणि त्यांच्या चित्रातल्या आल्हाददायक रंगसंगतीसारखी त्यांची आनंदी वृत्तीच त्यांना शतकाच्या घरात घेऊन आलेली आहे.
एक शब्दही न लिहिता कागदावरील आपल्या अस्तित्वाने लोकांच्या ओठावर स्मितरेषा फुलवणार्‍या शि.द. फडणीस नावाच्या निर्मळ हास्यरेषेने नुकतीच शंभरी गाठली. या निमित्ताने झालेल्या त्यांच्या शतक पदार्पण सोहळ्यातला त्यांचा प्रसन्न आणि सहज वावर पाहता ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ हे शि.द. (आणि शकुंतलाबाई) दोघांनाही लागू पडत नसलं तरी ‘हसा आणि दीर्घायुषी व्हा’ असं मात्र त्यांच्याकडे पाहून नक्कीच रूढ होईल! एक शब्दही न वापरता रेषा आणि रंग यांच्या साह्याने फडणीसांच्या चित्रांनी प्रेक्षकाला खुसुखुसु ते खोऽऽखो असं हसायला लावलं. समाजातल्या विसंगती, व्यंग यावर भाष्य करण्याकरिता त्यांनी एक विशिष्ट व्यक्तिरेखा जन्माला घातली नाही. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली हीच प्रभावीपणे लक्षात राहिली. अत्यंत लवचीक, चैतन्यपूर्ण रेषा, प्रमाणबद्ध आरेखन आणि कुठेही कुरूपता, ओंगळपणा न आणता रेखाटलेली, प्रसन्न रंगांचा वापर असलेली शि.दं.ची चित्रं चटकन ओळखू येतात. मुखपृष्ठे, अंतर्गत सजावट, जाहिराती, शैक्षणिक साधने, क्रमिक पुस्तके, बँकिंग-व्याकरण-व्यवस्थापन-कायदा अशा विषयांची पुस्तके अशा सर्व प्रांतांत शि.दं.च्या रेषांनी मुक्त संचार केला आणि हसता हसता त्या विषयातलं मर्म मनावर ठसवलं. हे सर्व विषय पोहोचवण्यासाठी प्रामुख्याने हास्यचित्र हे माध्यम त्यांनी वापरलं असलं तरी ‘हास्याने विश्व भरू, मांडू आनंदाचे आवारू’ असा प्रण घेऊन शि.द. हास्यचित्राच्या मैदानात उतरले असं मात्र झालेलं नाही. बेळगाव जिल्ह्यातल्या भोज या लहान गावात जन्मलेले शि.द. शिक्षणाच्या निमित्ताने कोल्हापूरला आले. त्या वेळी कलापूर म्हणूनच प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर तेव्हा अनेक उपक्रमांनी गजबजून गेलेलं असायचं. उत्साही ‘शिवराम’ने अनेक प्रांत अजमावून पाहिले. कुस्तीचे आखाडे, पोहणं, संगीत मेळे सगळीकडे हजेरी लावली. मित्रांच्या मदतीने रात्रभर पंचगंगेतून होडीचा साहसी प्रवास केला, ‘एका पैशात मुंबई’ दाखवणारी पेटी असायची तसा बायोस्कोप तयार करून स्वतः तयार केलेल्या चित्रफितींचे शो बालप्रेक्षकांना मोफत दाखवले. एका चौकोनी फळीवर चारी बाजूंनी खिळे ठोकून त्यावर कापड विणून पाहिलं, मित्र जमवून एक क्रिकेटची टीम तयार केली. इतकंच काय, सर्कस पाहिल्यावर आपण सर्कस काढावी, असंही त्यांना वाटू लागलं होतं!
 
 
संघाच्या शाखेत जाणं, शिवजयंती उत्सवात भाग घेणं, त्यासाठी स्वतः महाराजांचा पुतळा करणं हेही केलं. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यासारख्या कलाकारांमुळे तेव्हा कोल्हापुरात चित्रकलेला विशेष महत्त्व होतं. गोट्या-विटीदांडू खेळावं तितक्या सहज स्फूर्तीने मुलं चित्रं, स्केचिंग, लँडस्केपिंग यात रमायची. एलिमेंटरी व इंटरमीजिएट या परीक्षांना तेव्हा खूप महत्त्व होतं. या दोन्ही परीक्षा त्यांनी दिल्या आणि इंटरमीजिएटमध्ये राज्य स्तरावर तीन बक्षिसं मिळाली. एव्हाना मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं होतं. आता पुढे काय, हा निर्णय करायची वेळ आली तेव्हा मात्र आपण चित्रकलेतच रमतो आहोत आणि हेच आपल्याला करायचं आहे असा कौल मनाने दिला. वडील लहानपणी गमावलेले, त्यामुळे कुटुंबप्रमुख असलेले मोठे काका म्हणजे अण्णा हेच वडिलांच्या जागी होते. अण्णा तसे कडक स्वभावाचे, पण तितकेच हळवे आणि मनाने मृदू. ‘मी शिकेन तर जे.जे.तच, अन्यथा पुढे शिक्षण नको’ अशा आशयाचं पत्र शि.दं.नी पाठवलं आणि आपला चित्रकला शिक्षणाचा मार्ग मोकळा करून घेतला. घरातली अन्य मुले बी.ए.-बी.एस्सी. अशा समाजमान्य पदव्या घेत असताना आणि ‘चित्रकला करून का पोट भरता येतं’ ही रास्त काळजी मनात असतानादेखील अण्णांनी या धडपड्या मुलाचं मन समजून घेतलं आणि हा हट्ट मान्य केला हे आपलं भाग्यच! पुढे शि.द. या क्षेत्रात नाव कमवू लागले तेव्हा त्यांची काळजी मिटलीच; पण जेव्हा त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘केसरी’त, महादेवशास्त्रीच्या लेखात शि.दं.चे चित्र छापून आले तेव्हा त्यांना खरा आनंद झाला. जे.जे.ला कमर्शिअल आर्ट विभागात शिक्षण सुरू झालं. प्रमाणबद्ध रेखाटनाचा पाय कोल्हापुरात पक्का झाला होता. आता मुंबईमुळे चित्रकलेचे नवे आयाम समजू लागले. निसर्गचित्रं, चौपाटीवर जाऊन स्केचिंग करणं, ऑइल कलर्समध्ये व्यक्तिचित्रण शिकणं हे सारं आवडत होतं. मुंबईत अनेक उत्तम इंग्रजी नियतकालिकं असायची. तसंच‘किर्लोस्कर’-‘हंस’-‘मनोहर’-‘वसंत’ हे मराठी नियतकालिकांचं विश्वही समृद्ध होतं. त्यातली व्यंगचित्रं पाहताना आपणही असं काढून पाहावं, असं मनात आलं. मुंबईत टीचभर जागेत ढीगभर माणसं कशी दाटीवाटीने राहतात याचा प्रत्यक्ष अनुभव होताच. तोच चित्रात उतरला. खचाखच भरलेल्या चिमुकल्या खोलीत राहणारे कुटुंब आणि दारात सामानासह उभा ठाकलेला पाहुणा! आणि हे पहिलंवहिलं व्यंगचित्र चक्क 1945 च्या ऑक्टोबर महिन्यात ‘मनोहर’च्या अंकात छापूनही आलं! साहजिकच उमेद वाढली आणि या प्रकारात अजून काम करून पाहावं असं मनात आलं. चित्रं, मालिका यांना प्रतिसाद मिळू लागला आणि थोडी कमाईही होऊ लागली. मात्र स्वातंत्र्य मिळताना झालेल्या फाळणीनंतर बिघडलेल्या वातावरणामुळे कोल्हापूरला परत यावं लागल्यामुळे वर्ष बुडलं. पुढच्या वर्षी पुन्हा मुंबईला परतून सकाळी कॉलेज आणि दिवसभर नोकरी असा क्रम सुरू झाला. एका कंपनीत जाहिरात विभागात काम आणि स्वतंत्रपणे व्यंगचित्रे, हे दोन्ही सुरू राहिलं. ‘व्यंगचित्रांमुळे हात बिघडेल’ हा चित्रकला शिक्षकांनी दिलेला इशारा व्यंगार्थाने खरा ठरला आणि हे ‘बिघडलेले वळण’च नवा महामार्ग तयार करणारे ठरले!
 
रसमयी लता
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक…
साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पुस्तकाच्या मॅटर सहित लतादीदींचे सुंदर पोट्रेट, लतादीदींच्या विविध भावमुद्रांची रंगीत चित्रं आणि हार्डबाऊंडिंग कव्हर ही या पुस्तकाची खास वैशिष्टये…
  
‘हंस’ मासिकाने घेतलेली व्यंगचित्र स्पर्धा आणि त्यात मिळालेल्या बक्षिसामुळे ‘हंस’चे उत्साही संपादक अनंत अंतरकर यांच्याशी झालेला परिचय, यामुळे या महामार्गावर गाडी धावत राहिली. डिप्लोमा संपवून कोल्हापुरात आल्यावर शि.द. अन्य जाहिरातींची कामे करत होते; पण अंतरकरांनी मात्र ‘हास्यचित्र सुरू ठेवा’ हा आग्रह धरला. मुंबईला आल्यावर काम भरपूर आलं; पण व्यंगचित्र हा प्रकार अजूनही छंदापुरताच मर्यादित होता. अखेर अंतरकरांची तळमळ आणि पाठपुरावा याला यश आलं. त्यांना आवडलेलं एक हास्यचित्र त्यांनीशि.दं.कडून फेअर आणि रंगीत करून मागवलं आणि ते ‘हंस’च्या विनोद विशेषांकाच्या मुखपृष्ठावर झळकलं. चित्राचा विषय पुन्हा एकदा मुंबईच. मरिन ड्राइव्हच्या कट्ट्यावर बसलेल्या दोन तरुणी.त्यातल्या एकीचा पंजाबी ड्रेसचा दुपट्टा वार्‍यावर उडतोय आणि बाजूला बसलेले दोन युवक खुशाल त्या दुपट्ट्यावर भेळ घेऊन फक्क्या मारत आहेत! पंजाबी ड्रेसची नवी फॅशन, मरिन ड्राइव्हचा भणाणता वारा, ओढणीचे मुक्त उडणे आणि तरुणांची धिटाई यातून सूचित होणारे मुंबईचे मोकळे वातावरण असे अनेक सुप्त विषय त्या चित्राने अगदी सहज, हसत हसत हाताळले.
 
 
vivek
 
दलाल, मुळगावकर यांच्या कुंचल्यातून अवतरलेल्या सुंदर ललना किंवा हातात पणती घेतलेल्या देखण्या चित्रतारका, यांनाच दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर स्थान असण्याच्या काळात अंतरकरांनी जबरदस्त विश्वासानं पुन्हा एकदा ‘मोहिनी’च्या मुखपृष्ठाकरिता हा प्रयोग केला आणि 1952 च्या ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर ‘ते’ दोघं अवतरले! दिवाळीचा कंदील वगैरे खरेदी आटोपून बसची वाट पाहत उभा राहिलेला तरुण, बस पकडण्यासाठी त्याच्या शेजारी एक सुंदर तरुणी येऊन उभी राहिलीय; पण त्याचं लक्ष तिच्या सौंदर्याकडे नाही! तो अंमळ घाबरला आहे आणि डोळे विस्फारून तिच्या साडीकडे पहातोय... कारण? त्याच्या शर्टावर आहेत उंदरांची चित्रं आणि तिच्या साडीवर आहे मांजरांचं प्रिंट! तिला याचा पत्ताच नाही. त्याची बावरलेली मुद्रा पाहून आपल्याला हसू फुटतंच; पण जणू काही ते दोघे शेजारी आल्यामुळे, शर्टावरचे उंदीर धावत सुटलेत आणि साडीवरच्या समस्त मांजर्‍या दबा धरून बसल्यात हा तपशील अधिक सुखावतो! कुणाला ‘तो’ शिकार आहे आणि ‘ती’ शिकारी असंही वाटू शकतं! आज पाऊण शतकानंतरही प्रचंड लोकप्रिय असणारं आणि जराही शिळं न वाटणारं हे चित्र म्हणजे शि.दं.चा या क्षेत्रातला मैलाचा दगड आहे. या चित्राची भरपूर चर्चा झाली, लोकांनी त्यावर अभिप्राय लिहिले, भारताच्या कमर्शिअल आर्टिस्ट गिल्ड म्हणजे कॅगने हे चित्र त्यांच्या बुलेटिनमध्ये छापलं आणि मग प्रकाशक- संपादक यांच्याकडून कामासाठी विचारणा होऊ लागल्या. या मुखपृष्ठामुळे शिदंच्या कारकीर्दीला हे निश्चित वळण लागलं किंवा घेणं भाग पडलं! पुढे आणखी एक सुंदर, मौल्यवान गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली, त्यातही या चित्राचा अप्रत्यक्ष वाटा आहे!
 

S D Phadnis
 
अमरावतीत राहणारी, बी.ए. संस्कृत झालेली शकुंतला बापट नावाची एक कलासक्त मुलगी या चित्रांच्या प्रेमात होती. हे उंदीर- मांजरांचं चित्र पाहून तर ती अक्षरशः पोट दुखेस्तोवर हसली होती. या चित्रकाराच्या चित्राबद्दलचा तिचा अभिप्राय वृत्तपत्रात छापून आला होता. तीच बुद्धिमान, सुंदर, आनंदी मुलगी शिदंची सहधर्मचारिणी बनून सौ. शकुंतला फडणीस होऊन आली. हा शुभ ‘शकुन’ पुढच्या आनंदी, दीर्घ सहजीवनात सर्वार्थाने सोबत राहिला. या दरम्यान अंतरकरांच्या आग्रहाने पुण्यात स्थलांतर झालं होतं. लग्नानंतर कायमचं बिर्‍हाड पुण्यातच झालं. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं, कंपन्यांची कामं सुरू झाली. हळूहळू हास्यचित्र हे आपला विचार पोहोचवण्याचं उत्तम माध्यम होऊ शकतं हे सामर्थ्य जाणवू लागलं होतं. नकला करणं, निरीक्षणशक्ती, वेगवेगळ्या गोष्टी हाताळायची ऊर्मी अशी त्यांची विविधांगी प्रतिभा रेषाटनात, कुंचल्यात एकवटली. चित्र कसं सुचतं हे कविता कशी सुचते हे सांगण्याइतकं कठीण आहे आणि सुचलेली कल्पना चित्रबद्ध व्हायला किती काळ जाईल हेही. एकदा पुण्यात अलका टॉकीजजवळच्या चढावर एक सायकलस्वार मुलगी दिसली. वार्‍यावर फडफडणारा तिच्या साडीचा पदर पाहून ‘याचं शीड केलं तर ही चढण तिला सोपी जाईल’ हा विचार मनात आला. पुढे त्याचंच एक देखणं चित्र झालं. चांदण्या रात्री नौकाविहार करणारं जोडपं आणि तिच्या पदराचं त्यानं केलेलं शीड! याही चित्राला ‘कॅग’चं पारितोषिक मिळालं होतं. कलाकाराचा स्वभाव, त्याची वृत्ती, जीवनदृष्टी चित्रात उतरतेच. ग्रीक सौंदर्यदेवता व्हीनसची मूर्ती ही नेहमी हात नसलेली असते; पण एखाद्या प्रदर्शनात तिच्या शेजारी आपली लक्ष्मीदेवी उभी असेल तर? या कल्पनेने पंधरा वर्षे शि.दं.ना पछाडलं आणि मग ते अद्वितीय चित्र कागदावर उतरलं. भारतीय संस्कार, प्रवृत्ती सांगणारं ते चित्र किती साधं, पण आशयगर्भ आहे. हात नसलेल्या व्हीनसला पाहून चतुर्भुज लक्ष्मी चटकन अगदी सहजतेने आपले दोन हात तिला देऊ करते आहे! पुलंच्या ‘पूर्वरंग’, ‘अपूर्वाई’सारख्या पुस्तकांसाठी केलेल्या चित्रांनी मजकुराची खुमारी वाढली; पण पुलंचे सूक्ष्म निरीक्षण आणि अफलातून वर्णन यावर अवलंबून न राहता शिदंनी ती ठिकाणे, माणसे, संस्कृती यांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. त्यामुळे पुलंनी शब्दांतून उभी केलेली गंमत चित्रांच्या सोबतीने अधिक खुसखुशीत झाली. फ्रान्समध्ये प्रवास करताना दुधाला शब्द ठाऊक नसल्यामुळे काढलेले गाईच्या आचळातून बाटलीत जाणार्‍या ‘दुधा’चे चित्र,चालत नाही, तर ‘तरंगत’ जाणारा फ्रेंच वेटर, जन्मतःच पाळण्यातून थेट पाण्यात उडी मारणारे सयामी बाळ अशी किती तरी चित्रं या पुस्तकांची नावं घेताच आपल्या डोळ्यासमोर तरंगू लागतात! ही सगळी चित्रं एकत्र पाहायला मिळाली तर काय बहार येईल, ही अनेक रसिकांची इच्छा पूर्ण करायचं एकदाचं शिदंनी मनावर घेतलं आणि मग उभी राहिली ‘हसरी गॅलरी’. पहिलं प्रदर्शन फेब्रुवारी 1965 मध्ये मुंबईला चित्रकारांच्या पंढरीत म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरीत ठरलं. हे प्रदर्शन शब्दशः ‘उभं’ करण्यासाठी शि.दं.मधला सुप्त इंजिनीअर कामाला लागला. काही व्यंगचित्रांची थ्रीडी मॉडेल्स करायची ठरली. रेल्वेच्या वरच्या
 

vivek 
 
बर्थवर झोपलेल्या माणसाच्या उसवलेल्या स्वेटरचा धागा वापरून स्कार्फ विणत खालच्या बर्थवर बसलेली ती... हे चित्र त्रिमितीत मांडण्याकरिता चक्क छोट्या आकारात रेल्वेचेकंपार्टमेंट तयार केले, त्यात या दोघांच्या छोट्या बाहुल्या, हुबेहूब चित्राप्रमाणे. प्रदर्शनाला तुडुंब प्रतिसाद मिळाला. भीत भीत दहा पैसे तिकीट लावलेले आणि मुंबईची गर्दी लक्षात घेऊन चांगली तीन हजार तिकिटं छापलेली; पण तीही कमीच पडली. प्रेक्षक, पत्रकार, समीक्षक यांच्या तुडुंब प्रतिसादाने आणि कौतुकाने गॅलरी भरून गेली. मग गॅलरी बाहेर फिरवायची असं ठरलं; पण त्याआधी एकदा पुण्यात प्रदर्शन होऊ दे, या रसिकांच्या आग्रहासाठी पुण्यात प्रदर्शन मांडलं, तर ते तब्बल तेवीस दिवस चालू राहिलं. पन्नास हजार प्रेक्षकांनी त्याला भेट दिली. अगदी अलीकडे, 2004 साली लेक लीनाच्या पुढाकाराने पुन्हा पुण्यात प्रदर्शन लावलं तेव्हा नव्या पिढीला इतका रस आणि वेळ तरी कुठे आहे, अशी साशंकता शिदंच्या मनात होती; पण त्याला छेद देत आठवडाभर पुण्यात गॅलरी गर्दीने ओसंडून वाहिली. किमान एक तास रांगेत उभं राहिल्यावर आत जायला मिळत होतं तरीही लोक भरभरून आले! गॅलरी बाहेर फिरवायची तर त्याकरिता मांडणीची व्यवस्था आपली हवी म्हणून चित्र लावायचे स्टँड, त्यावरचे स्क्रीन हे सारं शिदंच्या कल्पकतेतून आणि खटपटीतून साकार झालं.चित्रं, मॉडेल्स, स्टँड, स्क्रीन असा भला मोठा पसारा न्यावा लागे. एका अर्थी सर्कशीची हौस गॅलरीने भागवली! हास्यचित्रे हा प्रकार लोकांना जवळचा वाटावा, समजावा यासाठी हा मोठाच खटाटोप शिदंनी केला. त्याचा आर्थिक लाभ फारसा झाला नसला तरी समाजातली ‘हास्य साक्षरता’ नक्की वाढीस लागली! गॅलरीने अनुभवसमृद्धी मात्र भरभरून दिली. प्रांत-भाषा काहीही आड न येता प्रेक्षक मनसोक्त हसत आणि प्रसन्नता घेऊन जात. पुनःपुन्हा येणारे प्रेक्षक, बेळगावच्या प्रदर्शनासाठी धारवाडहून आलेल्या महिला, स्ट्रेचरवरून येऊन प्रदर्शन पाहिलेला रुग्ण, अहमदनगरला प्रदर्शन पाहायला चार मैलांवरच्या खेड्यातून चालत आलेली मुलं, कुबड्या घेऊन रोज येणारा आणि रोज तिकीट काढू नका म्हटलं तर, ‘मै कलाकार हूं, कला की इज्जत करता हूं’ म्हणणारा गरीब अपंग माणूस, अशा किती जीवनांत हसरी गॅलरीनं हास्य फुलवलं. याची मोजदाद पैशात होणार नाही. हे निर्मळ हसण्याचे दान सर्वांना मिळायला हवे, या ओढीने गॅलरी चालत राहिली. आपल्या रोजच्या जगण्यात विनोद असतो, आनंद असतो, तो टिपता आला तर जगणं सुकर होतं हे गॅलरीनं लोकांना दाखवलं, निरामय आनंद दिला. 2014 ला हसरी गॅलरीचं 50 वं प्रदर्शन आणि पन्नासावं वर्ष हा योग बालगंधर्व कलादालनात भरलेल्या प्रदर्शनाने साजरा झाला. गॅलरी परदेशात नेणे शक्य नव्हतं; पण हसरी गॅलरी पुस्तक आणि हास्यचित्रांबद्दल भाष्य, प्रात्यक्षिक आणि ‘स्लाइड शो चित्रहास’ हा कार्यक्रम यामुळे शि.द. परदेशातही लोकप्रिय झाले. या सार्‍या खटाटोपात सारं कुटुंब, मित्रमंडळी यांचा उत्साही सहभाग असायचाच; पण मुख्य आधार होता शकुंतलाताईंचा. ‘प्रदर्शनकाळात शकुंतला पुलंच्या ‘नारायण’ची भूमिका करायची’ या शिदंच्या वाक्यातून त्यांचं योगदान लक्षात येईल! स्वतःचं घर न बांधता नुसती ‘गॅलरी’च बांधणार्‍या कलंदर पतीच्या एकूणच कलाप्रवासात शकुंतलाताईंची सक्रिय आणि रसज्ञ सोबत राहिली आहे. उमेदवारीच्या काळातही शिदंनी कधी चावट किंवा उत्तान म्हणावीत अशी चित्रं काढली नाहीत, यामागे केवळ पापभीरू वृत्ती नाही. त्यांच्या कल्पक सर्जनाला काही वर्ज्य नाही. एका कलाकाराने एल न्यूड चित्र केले आहे आणि त्या कलाकाराच्या स्टुडिओत कुणी पाहुणा आला. त्याबरोबर त्या चित्राने कॅनव्हासच आपल्याभोवती लपेटून घेतला, ही कल्पना त्यांनी एका मुखपृष्ठावर चितारली. हे सगळं करत असताना एक कलावंत म्हणून ज्या व्यवहाराला सामोरं जावं लागतं त्याबाबतही त्यांचा विचार स्पष्ट आहे. ‘एकदा प्राथमिक बोलणे व व्यवहार ठरला की कलावंत म्हणून रेखाटन करताना मी सारे विसरून सर्जनाच्या अमूर्त सुंदर जगात रमतो. मात्र चित्र पूर्ण झाल्यावर ठरलेला व्यवहार पूर्ण व्हावा यासाठी दक्ष असतो; पण हे करतानाही संपादक, उद्योजक यांच्याशी संबंध उत्तम राहणंही मी महत्त्वाचं मानतो.’ कलाकार म्हणून जपलेल्या भोंगळ आणि भाबड्या कल्पना मनात असतील तर नंतरच्या व्यावहारिक जगात त्याचा टिकाव लागणार नाही, म्हणून कलामहाविद्यालयात चित्रकलेतील व्यवहार हा विषय शिकवला जावा असं त्यांना मनापासून वाटतं. आपल्या चित्रांच्या रॉयल्टीसाठी त्यांनी धरलेला आग्रह, हसरी गॅलरीच्या निमित्ताने चित्र प्रदर्शनांना कर नसावा यासाठी केलेले प्रयत्न यामुळे अन्य चित्रकारांची वाट सुकर झाली आहे.
 

S D Phadnis  
आपल्या चित्रकलेच्या प्रवासाविषयी शिदंनी केलेलं चिंतन सर्वच सर्जक व्यक्तींनी मनात जपावं असं आहे. ‘रेषाटन’मध्ये ते लिहितात, ‘जमलं तर व्यक्तिचित्र नाही तर आपोआप व्यंगचित्र, ही लोकांच्या मनात असलेली उपहासाची भावना आरंभी खरी वाटली. गंमत म्हणून करून पाहू, नंतर सोडून देऊ,’ असे म्हणून हास्यचित्रकलेची वाट धरली. ‘आज साठ वर्षे उलटून गेली तरी या कलेची विविध रूपं संपत नाहीत. त्यातल्या खोलीचा तळ दिसत नाही. माझ्यातल्या सर्जन शक्तीला सतत आव्हान देत हे चित्र हसतं आहे. प्रत्येक चित्रागणिक मला व रसिकांना आनंद देणारी ही कला आहे.’ ‘हास्यचित्र ही भाषा आहे हे मला उमगू लागलं तेव्हा या माध्यमाची क्षमता लक्षात येऊ लागली. मुखपृष्ठे करण्यातून सुरुवात झाली त्यामुळे रेषेतूनच विचार करायची सवय झाली. जेव्हा एखादी कल्पना सुचते आणि मनाशी हसू येतं तेव्हाच ते चित्र तयार झालेलं असतं. मग सर्जन करणारी पेन्सिल म्हणजे ब्रह्मा, चित्राला हृदयस्थानी जागा देणारा कागद हा विष्णू आणि अनावश्यक तपशील पुसणारे खोडरबर हे महेश. ही त्रिमूर्ती चित्राला जन्म देते. भोवती दिसणारी अगणित माणसं, घटना, विचार व कृती यातल्या विसंगती, ढोंग, हा बीजरूपी कच्चा माल हास्यचित्रकाराच्याबहिर्गोल भिंगातून मोठा होऊन दिसतो. खरे तर कोणत्याही कलाकृतीचा सर्जनाचा प्रवास प्रथम कलाकाराच्या मनात असाच अबोधपणे होत असतो.’

S D Phadnis  
 
शिदंची हास्यचित्रं विसंगतीवर बोट ठेवतात. थेट हल्लाबोल करणारी राजकीय चित्रं कमी. बरीच चित्रं निर्मळ, स्मित फुलवणारी कवितेच्या अंगाने जातात. काही अंतर्यामी गंभीर असतात, ती संवाद छेडतात. काही जड विषयाला सुबोध करतात, तर काही रुक्ष विषयात हिरवळ फुलवतात. काही खळाळून हसवत आपल्याला तणावमुक्त करतात. समाजात प्रश्न आहेत, वाकडेपणा आहे; पण त्यावर बोट ठेवून ऊरबडवेपणा ते करत नाहीत; पण प्रश्नांकडे दुर्लक्षही करत नाहीत.
 
चालू वाहतुकीच्या रस्त्यात मध्येेच मोठे पाइप पडलेले असतात. आपण त्रागा करू, अपघाताचे भय आपल्याला छळत राहील. शिदंना हे पाइप दिसतात तेव्हा त्यांच्याही मनात स्कूटरच्या अपघाताची भीती तरळते; पण तिला ते हास्यचित्रातून वाट करून देतात. वेगाने येणार्‍या स्कूटरस्वाराला कळायच्या आत त्याची दुचाकी त्या रिकाम्या पाइपमधून पलीकडे येते. स्कूटर बाहेर पडते आणि त्यावरचे दोघे स्वार पाइपवर राहतात! हा काल्पनिक अपघात पाहून वरवर हसू येतं; पण वाहतुकीत असणारी असुरक्षितता जाणवून एक अस्वस्थता येते. चित्राच्या विषयाची गंभीर व करुण बाजू संवेदनशील प्रेक्षकाला नक्की जाणवते. तसंच डबलडेकरमध्ये आत शिरणारी एक रांग आणि दुसरी चक्क त्यांच्या डोक्यावर पाय देऊन निर्विकार शांतपणे वरच्या मजल्यावर जाणारी दुसरी रांग. हे चित्र किती गोष्टींवर मूकपणे बोलतं! शहरातली गर्दी, घाई, जीवघेणी स्पर्धा ही तर दिसतेच; पण ‘वरती’ जाणारे लोक खालच्यांच्या माथ्यावर पाय ठेवूनच जातात, ही अपरिहार्यता आणि ती निमूट स्वीकारलेले हे लोक! अनिष्ट, अन्याय्य गोष्टींचा निषेध करण्याचा हा खास शिदंचा, सर्जक अहिंसक मार्ग! आपल्या भाषणात ‘आताचं राजकारण मला कळत नाही, ते जरा सुबोध करा, त्यासाठी शुभेच्छा’, असं ते म्हणतात तेव्हा राजकारणाच्या दूषित झालेल्या मर्मावर त्यांनी फुलांचा बाण मारलेला असतो! असा निर्मळ आनंद पसरवणारा कलाकार, त्यांची अशी निरामय सर्जकता, याचं रहस्य काय? ‘कलावंताचं मन पूर्णपणे निर्भय, मुक्त, शिथिल व शांत असतं, तेव्हा कल्पनांची फुलपाखरं अलगद कागदावर उतरतात’ हे ‘चित्त जेथ भयशून्य’ या रवींद्रनाथांच्या प्रार्थनेची आठवण करून देणारी ही अवस्था, हा सहजभाव सर्वच कलावंताना लाभो आणि ही हसरी शंभरी सुफळ सार्थ तृप्त दीर्घायुष्याची धनी होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
 
 

विनीता शैलेंद्र तेलंग

विनीता शैलेंद्र तेलंग (D.pharm.Post Dip.in Ayu.Pharm.)

 पुनर्वसु आयुर्वेदीय औषधी निर्माण या नावाने स्वतःचा आयुर्वेदिक औषध निर्मितीचा 1995 पासून व्यवसाय .सुमारे शंभर उत्पादने . बेळंकी व हरीपूर येथे चालणाऱ्या कामातून स्थानिक महिलांना रोजगार .

१९८८ ते ९० अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे औरंगाबाद येथे पूर्ण वेळ काम .

 भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्य. या संस्थेतर्फे तीन अनाथाश्रम, एक अल्पमुदत निवासस्थान, कुटुंब सल्ला केंद्रे इ .उपक्रम चालतात .नुकत्याच सुरु केलेल्या नर्सिंग विभागाची संपूर्ण जबाबदारी . अनेक अन्य सामाजिक कामात सक्रिय.

त्याचबरोबर अनेक संगीत व नुत्यविषयक कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन. काव्य लेखन, विविध अंक संपादन याबरोबर ग्राहक हित, सा.विजयंत, सा. विवेक, विश्वपंढरी, प्रसाद ,छात्रप्रबोधन या अंकात नैमित्तिक लेखन. अनेक स्मरणिकांचे संपादन,  रा.स्व.संघाची पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वय समिती सदस्य .