राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ

विवेक मराठी    05-Jan-2024   
Total Views |

यंदाचं वर्ष हे राजमाता जिजाऊसाहेबांच्या 350व्या पुण्यतिथीचं वर्ष. ज्या स्वप्नाचा त्यांनी आजीवन ध्यास घेतला, ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलेलं बघण्याचं भाग्य त्यांना लाभलं. त्यांचे सुपुत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराजांनी हे स्वप्न सत्यात आणलं. स्वराज्याची राजधानी रायगडावर त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा झाला. तो सोहळा जिजाऊंनी डोळे भरून पाहिला आणि त्यानंतर अवघ्या बाराच दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी त्यांचं देहावसान झालं. या देशातील हिंदूंमधील लोपलेलं आत्मतेज जागं करण्याचं काम छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने केलं. त्या स्वराज्यनिर्मितीच्या प्रेरणेचं बीज ज्यांनी त्यांच्या मनात रुजवलं, जोपासलं, त्या राजमाता जिजाऊंचा 12 जानेवारी हा जन्मदिवस. या दिवसाचं औचित्य साधत जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचं केलेलं हे स्मरण.
  jijamata
राजमाता जिजाऊ आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजीमहाराज हा आपल्या इतिहासातला एक अद्वैत समास आहे. ती शिवाजीमहाराजांची केवळ जन्मदात्री नव्हती, तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न महाराजांच्या मनात रुजवणारी, ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी विचारपूर्वक बाल शिवाजीचं संगोपन करणारी आणि ते सत्यात येईपर्यंत महाराजांना सावलीसारखी सोबत करणारी अशी ती आगळीवेगळी आई होती. जिजाऊंचं चरित्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अजोड गुण हे आजच्या मातापित्यांनीही आत्मसात करण्याजोगे आहेत. जिजाऊंचं माहात्म्य सांगणार्‍या विनीता तेलंग यांच्या चार ओळी आहेत -
 
जिने शस्त्र केले तिच्या वेदनेला

जिने अर्पिला पुत्र अपुला धरेला

जिच्या शौर्य-धैर्यास तुलनाच नाही

तुला वंदिते मी शिवाई जिजाई।
 
अशी ही जिजाऊ. आपल्या मुलाला घडवताना त्याच्यावर ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार कसा करायचा, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे जिजाऊ. त्यांनी केवळ रामायण-महाभारतल्या गोष्टी सांगून शिवरायांवर संस्कार केले नाहीत, तर लढवय्या वृत्ती, स्वराज्याविषयीचं, स्वधर्माविषयीचं प्रेम आपल्या जगण्यातून बाल शिवरायांमध्ये रुजवलं. गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यात लहानग्या शिवाजीसह वस्ती करायची हिंमत दाखवणार्‍या आणि त्या पुण्याचं पुन्हा एकदा नंदनवन करण्याची जिद्द बाळगणार्‍या जिजाऊ ही त्यांची रूपं पाहत बाल शिवराय वाढत होते.. घडत होते.
पती परप्रांतात कायमस्वरूपी स्थायिक असताना त्यांच्या अनुपस्थितीत आई आणि वडील होऊन बाल शिवाजीला समर्थपणे वाढवणारी जिजाऊ, मोठ्या घराचा बारदाना सांभाळतानाच मुलगा मोठा होईपर्यंत पतीची जहागीर आत्मविश्वासाने सांभाळणारी, सदरेवर त्याला शेजारी बसवून जहागिरीचं, न्यायदानाचं कामकाज करणारी प्रजाहितदक्ष जिजाऊ.. एकाच वेळी या सगळ्या भूमिका समर्थपणे आणि यशस्वीपणे जिजाऊंनी पार पाडल्या.
गाढवाचा नांगर फिरवल्याने उजाड झालेल्या पुण्यात तिथल्या लोकांना परत बोलावताना त्यांनी त्यांच्या योगक्षेमाचा केलेला विचार त्यांच्यातील दूरदृष्टी असलेल्या कुशल राज्यकर्तीचं दर्शन घडवतो. लोकांना पुण्यात परत बोलावताना त्यांनी त्यांना कसण्यासाठी जमिनी उपलब्ध करून दिल्या. सर्वस्व गमावलेल्या गावकर्‍यांना शेती करण्यासाठी बी-बियाणं पुरवलं. अवजारं पुरवली. पहिल्या वर्षी त्यांच्या शेतात उगवून आलेल्या धान्यात वाटा न मागता ते संपूर्ण पीक स्वत:च्या घरासाठी ठेवायला सांगितलं. यांच्या मुखी सकस अन्न पडलं तर प्रजा धष्टपुष्ट होईल आणि तसं झालं, तरच ती स्वराज्यासाठी उभी राहतील. केवळ राजाच नाही, तर ज्यांच्या साथीने हे स्वप्न पूर्ण करायचं, ते मावळेही धट्टेकट्टे असायला हवेत हा विचार आणि दूरदृष्टी त्यामागे होती. परिघाबाहेरचा विचार करणारं असं त्यांचं मातृत्व होतं. जी पुण्यभूमी आक्रमकांनी वैराण केली होती, त्याच भूमीत घर वसवताना जिजाऊंनी सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवला. लोकांमध्ये विश्वास जागवण्याची ही रीत विलक्षण म्हटली पाहिजे.
 
 
साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी जेव्हा बाईची स्वतंत्र करिअर हा विचार सर्वसामान्यांच्याच काय, अभिजनांच्याही विचारविश्वाचा भाग नव्हता, तेव्हा जिजाऊंनी तसं जगून दाखवलं आहे. अशी कणखर, स्वधर्माभिमानी, स्वराष्ट्राभिमानी स्त्री या महाराष्ट्रदेशी जन्माला आली. इथल्या स्त्री वर्गासाठी कर्तृत्वाचा, विचारांचा वैभवशाली वारसा ठेवून गेली. आपण त्यांचं कृतज्ञ स्मरण तर सदैव ठेवायला हवं आणि त्यांच्या जगण्यातून शिकायलाही हवं.
 
जिजाऊ म्हणजे वीरकन्या.. वीरपत्नी-वीरमाता-राजमाता-राष्ट्रमाता.. यातलं प्रत्येक विशेषण हे त्या थोर स्त्रीचं एकेक आभूषण आहे. त्यांच्या कर्तृत्वाने बहाल केलेली आभूषणं.


jijamata
मुळात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते शिवाजीमहाराजांचे वडील महापराक्रमी शहाजीमहाराजांनी. मात्र ते प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न दोन वेळा असफल झाला होता. त्यांच्या मनातला हा हेतू ओळखून आदिलशाहाने त्यांना कर्नाटकाची जहागिरी देत महाराष्ट्रापासून दूर पाठवलं. तेव्हा, आपल्या पतीइतकीच हिंदवी स्वराज्याची आस असलेल्या जिजाऊंनी धाकट्या लेकासह पुण्यात वास्तव्य करायचं ठरलं. हा त्या उभयतांचा विचार आणि निर्णय होता. ‘शिवाजी जन्मावा तो दुसर्‍याच्या घरात’ अशी आजही बहुतेकांची मानसिकता असलेल्या जगात या दोघांनी किती विचारपूर्वक आपल्या पोटच्या मुलाला घडवलं, हे विचार करण्याजोगं आहे. म्हणूनच दोन वर्षं बेंगळुरू इथे शहाजीराजांच्या सान्निध्यात राहून जिजाऊ आणि बाल शिवराय पुण्यात परतले. त्या वेळी शहाजीराजांनी आपल्या विश्वासातल्या, कर्तबगार लोकांना त्यांच्यासमवेत पुण्यात पाठवलं. दादोजी कोंडदेव हे त्यांपैकीच एक. बाल शिवरायांना सर्व प्रकारचं शिक्षण मिळावं हा विचार त्यामागे होता. सकल हिंदू समाजाच्या भल्यासाठी-स्वराज्यनिर्मितीसाठी शिवरायांना घडवताना त्यातली जोखीम, धोके सगळं काही ठाऊक असूनही जिजाऊंनी कधी माघार घेतली नाही.

जिजाऊंचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न कधी बदललं नाही.
 
त्याचबरोबर आयुष्यातला बहुतेक काळ संघर्षाचा, ताणतणावाचा, धकाधकीचा आणि अनिश्चिततेचा असूनही जिजाऊंचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न कधी बदललं नाही. सततच्या परकीय आक्रमणांनी गलितगात्र झालेल्या इथल्या सर्वसामान्यांच्या मनात स्वत्वाचं, सत्त्वाचं स्फुल्लिंग चेतवण्याचा ध्यास जिजाऊंनी घेतला होता. इथल्या निस्तेज झालेल्या क्षात्रतेजाला धार लावण्यासाठी आणि या भूमीचं गतवैभव परत आणण्यासाठी त्या शिवरायांना घडवत होत्या. छत्रपती शिवाजीमहाराज सर्वगुणसंपन्न, बुद्धिमान, कर्तृृत्ववान होतेच. शिवाजीमहाराजांचं स्वकर्तृत्वाचं श्रेय कोणी नाकारत नाही. पण बालपणापासून त्यांच्या आजूबाजूला जे घडत होतंं ते डोळसपणे बघण्याची, त्यावर विचार करण्याची दृष्टी विकसित केली ती जिजाऊंनी.
 
 
जिजाऊंचं माहेर विदर्भातल्या सिंदखेडराजा इथलं शूरवीर, महापराक्रमी जाधवरावांचं मातबर घराणं. पोरसवदा जिजाऊवर पराक्रमाचे पहिले संस्कार केले ते माहेराने. चार भावांची एकुलती एक लाडकी बहीण असलेल्या जिजाऊला त्यांच्या वडिलांनी - लखुजीरावांनी पराक्रमाचे धडे दिले होते. तिच्यातल्या मूळच्या धीट वृत्तीला खतपाणी घालून तिची जोपासना केली होती. जणू काही महापराक्रमी शिवराय घडवण्यासाठीची ती पूर्वतयारी असावी.
 
 बलाढ्य अफझलखानाच्या भेटीला जाण्यापासून शिवाजीमहाराजांना जिजाऊंनी अडवलं नाही.
 
करारीपणा, न्यायनिष्ठुरता ही जिजाऊंची गुणवैशिष्ट्यं. त्याचे अनेक दाखले त्यांच्या जीवनचरित्रात सापडतात. अशा जिजाऊंनी शिवाजीमहाराजांना ‘तुझं राज्य न्यायीपणाचं असावं आणि तुझ्या राज्यात स्त्रीची अब्रू राखली जावी’ हे आग्रहाने सांगणं साहजिकच होतं. महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे कनकगिरीच्या वेढ्यात अडकलेले असताना अफझलखानाने ऐन वेळी मदत नाकारल्याने संभाजीराजे मारले गेले. ज्या अफझलखानामुळे थोरला पुत्र गमावला, त्याच बलाढ्य अफझलखानाच्या भेटीला जाण्यापासून शिवाजीमहाराजांना जिजाऊंनी अडवलं नाही. उलट त्यांना बजावलं की, “भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायला कचरू नका. स्वराज्यप्राप्तीच्या आड जो येईल त्याला नेस्तनाबूत करा. यशस्वी होऊन या. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.” अशी विलक्षण धाडसी माता होती ती. देशाच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी स्वत:च्या पुत्राला लढण्यासाठी प्रोत्साहन देणारी, पाठिंबा देणारी.
असेच आणखी काही प्रसंग.. आदिलशाहीमुळे पन्हाळ्याच्या वेढ्यात महाराज अडकलेले असतानाच, मोगलांकडून शाईस्तेखान पुण्यावर स्वारी करायला निघाल्याची खबर मिळाल्यानंतर मागचा-पुढचा विचार न करता, ही रणरागिणी स्वत:च्या कमरेला तलवार लावून महाराजांना सोडवण्यासाठी जायची तयारी करते.
 
 पुरंदरच्या तहानंतर स्वराज्यात उरलेल्या 12 गडांची व्यवस्था जिजाऊंनी चोख ठेवली होती.
 
12 मे 1666ला आग्र्याच्या दरबारात अपमानास्पद प्रसंग घडल्यानंतर जवळजवळ तीन महिन्यांहून अधिक काळ औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेले महाराज मोठ्या धाडसाने आग्र्यातून सुटका करून घेतात. या साडेतीन महिन्यांच्या काळात राजांच्या जिवाचं बरंवाईट करण्याचा विचारही स्वत:च्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांना मारणार्‍या औरंगजेबाने न करण्यामागचं एक कारण जिजाऊबाईसाहेबही आहेत. या काळात, पुरंदरच्या तहानंतर स्वराज्यात उरलेल्या 12 गडांची व्यवस्था जिजाऊंनी चोख ठेवली होती. मिर्झाराजेंनी ही माहिती देतानाच, ‘ही करारी स्त्री आहे. शिवाजीमहाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तरी ही वाघीण मोगलांवर तुटून पडेल’ याची जाणीव औरंगजेबाला करून दिली होती, म्हणूनही औरंगजेब शिवाजीमहाराजांच्या जिवाला धोका उत्पन्न करू शकला नाही, असं काही इतिहास अभ्यासकांचं मत आहे.
 
 महाराजांना केवळ पुण्याची जहागीर राखण्यासाठी तयार केलं नाही, तर त्यांच्यासमोर हिंदवी स्वराज्याचं मोठं उद्दिष्ट ठेवलं.
 
हिंदू धर्माच्या कट्टर पुरस्कर्त्या होत्या जिजाऊ. परकीय आक्रमकांनी हिंदू धर्माची विटंबना तर केली होतीच, पण जिजाऊंची केलेली व्यक्तिगत हानी कशानेही भरून येण्याजोगी नव्हती. शिवजन्माच्या वेळी दिवस भरत आलेले असताना वडील लखुजी जाधवराव आणि तीन भावांच्या हत्येची सुन्न करणारी घटना घडली होती. त्यानंतर काही काळाने मोठ्या मुलाची - संभाजीराजेंची झालेली हत्या आणि मोेहिमांमध्ये गुंतलेल्या, तसंच जहागिरीमुळे दूर गेलेल्या पतीचा कायम सहन करावा लागलेला विरह.. असे परीक्षा पाहणारे प्रसंग वाट्याला येऊनदेखील जिजाऊंमधली विजिगीषू वृत्ती कमी झाली नाही. त्यांनी महाराजांना केवळ पुण्याची जहागीर राखण्यासाठी तयार केलं नाही, तर त्यांच्यासमोर हिंदवी स्वराज्याचं मोठं उद्दिष्ट ठेवलं. त्यासाठी शिवरायांना स्वत:च्या सुखावर तुळशीपत्र ठेवावं लागेल, जिवाची बाजी लावावी लागेल याची जिजाऊंना कल्पना होती. पोटी जन्माला आलेल्या सहा मुलांपैकी दोनच जगलेले. त्यातला थोरला मारला गेलेला. अशा वेळी सर्वसामान्य बाई असती, तर ती राहिलेल्या एकुलत्या एका मुलाला अशी स्वप्नं दाखवती ना! पण हेच जिजाबाईंचं वेगळेपण होतं, म्हणूनच इतिहासाला त्यांचं कधी विस्मरण झालं नाही, यापुढेही होणार नाही.

बजाजी निंबाळकरांना केवळ हिंदू धर्मात परत घेतलं नाही, तर
 
बजाजीराव निंबाळकरांना परत हिंदू धर्मात घेण्याचा आग्रह करणार्‍या जिजाऊच होत्या. अशा रितीने धर्मांतराने हिंदूंची संख्या कमी होऊ लागली, तर त्याचा हिंदूंच्या संख्येवर परिणाम होईल हे ओळखण्याचं शहाणपण त्यांच्याजवळ होतं. त्यांनी बजाजी निंबाळकरांना केवळ हिंदू धर्मात परत घेतलं नाही, तर आपल्या नातीची त्यांच्या घराशी सोयरीक जुळवत मनापासून स्वीकारल्याचा संदेश कृतीतून दिला.
 
 
एखाद्या प्रकरणात त्यांना महाराजांपेक्षा वेगळा न्याय करावासा वाटला, तर ते स्वातंत्र्य जिजाऊंना असे. इतकंच नव्हे, तर त्या प्रकरणात त्यांनी केलेला निवाडा अंतिम मानून त्याची अंमलबजावणी केली जाई. हा केवळ आई म्हणून राखलेला आदर नव्हता, तर त्यांच्या न्यायीपणावर महाराजांच्या असलेल्या विश्वासाचं ते प्रतीक होतं.
 
शिवाजीमहाराज सर्वगुणसंपन्न व कर्तृत्ववान होतेच, पण त्यांना जिजाऊ माता म्हणून लाभल्या नसत्या आणि त्यांचा एवढा दीर्घकाळ सहवास लाभला नसता, तर ते जसे घडले तसेच घडले असते का? हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

 
शिवरायांना त्या विचारपूर्वक वाढवत होत्या, तेव्हा त्यांच्यातलं मातृत्वही विकसित होत होतं. स्वराज्यातल्या मावळ्यांनाही त्यांचा मोठा आधार वाटत असे तो त्यामुळेच. वीरमाता ते राष्ट्रमाता या उपाधीपर्यंत झालेला त्यांचा प्रवास हे त्यांच्यातल्या विकसित मातृत्वभावनेचंच द्योतक आहे.

 
शिवाजीमहाराज जिजाऊंसाठी स्वतंत्रपणे आर्थिक तरतूद करत असत. या आर्थिक तरतुदीतून वाचवलेल्या 25 लक्ष होन मोहरा या माउलीने महाराजांना परत केल्या होत्या आणि प्रजेच्या भल्यासाठी त्याचा विनियोग केला जावा, अशी इच्छा/सूचनाही शेवटच्या पत्रातून केली होती. ‘राष्ट्राय स्वाहा, इदं न मम’ हा मंत्र त्या प्रत्यक्ष जगल्या होत्या, त्याचं हे उदाहरण ठरावं. राजमाता तर त्या होत्याच, राष्ट्रमाताही होत्या हे त्यांनी जगण्यातून समोर ठेवलं.

 
कुटुंबाबरोबरच समाजाविषयीची आणि देशाविषयीची आपुलकी, अभिमान मुलांमध्ये रुजवायचा तो आपल्या कृतीतून.. तसं झालं, तर मुलांच्याही सुखाच्या कल्पनांना संकुचिततेचं कुंपण पडत नाही याचा वस्तुपाठ म्हणजे जिजाऊंचं आयुष्य. त्यांचं स्मरण करायचं ते आपल्यातील मातृत्वाला वळण देण्यासाठी. आपल्या मुलांचं संगोपन कसं करावं, त्यांच्यासमोर स्वत:च्या जगण्यातून कसे वस्तुपाठ ठेवावेत हे जिजाऊंचं चरित्र सांगतं. अशा या माउलीचं स्मरण करणं म्हणजे तिचे गुण अंगी बाणवण्याचा मन:पूर्वक प्रयत्न करणं. तेच आपण करू या. खर्‍या अर्थाने जिजाऊच्या लेकी होऊ या.

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.