मनोगत श्रीरामाचे

विवेक मराठी    02-Jan-2024   
Total Views |
jay shree ram
राम मंदिराच्या लोकार्पणाच्या श्रद्धामय वातावरणात आपण सध्या आहोत. मनात सहज विचार आला की, प्रभू रामचंद्रांना अयोध्येतील राम मंदिराविषयी काय वाटत असेल? तेव्हा मनातील राम बोलू लागला, तो असा -
सर्व भारतवासीयांना माझा नमस्कार. माझी ओळख तुम्हाला करून द्यावी असे नाही, कारण माझ्या नावाची चर्चा प्रत्येक घरी चाललेली असते. तरीही सांगतो, आई-वडिलांनी माझे नाव राम ठेवले. मी कौसल्या आणि दशरथ यांचा पुत्र. यथावकाश जनककन्या जानकीशी माझा विवाह झाला. तुम्ही सर्व जण तिला सीतामाई म्हणता. लक्ष्मण माझा धाकटा बंधू, भरत हा लक्ष्मणापाठचा बंधू असे आम्ही सर्व जण अयोध्येतील ईक्ष्वाकू वंशात वाढलो.
 
 
आई, वडील, गुरुजन, मंत्रिगण यांनी आमच्यावर कर्तव्यधर्माचे फार खोलवरचे संस्कार केले. मातापित्यांचा सन्मान करावा, वडील बंधूने लहान बंधूंची पित्यासमान काळजी घ्यावी, पत्नीला सहधर्मचारिणी म्हणून सन्मान द्यावा, कोणाचाही द्वेष करू नये; आपण राजकुलातील आहोत, प्रजापालन, प्रजारक्षण आणि प्रजेला सर्व प्रकारे सुखी ठेवण्याचा आपला राजधर्म आहे. राजकुळातील असल्यामुळे या कर्तव्यधर्माच्या आड कोणताही नातेसंबंध येऊ देता कामा नये. राजधर्माची कधीही तडजोड करता कामा नये.
 
 
हा धर्म जगण्याचा मी प्रयत्न केला. कधीही कोणत्याही मर्यादांचे उल्लंघन केले नाही. मी मानवदेहधारी असूनही तुम्ही सर्वांनी मला देव केले. परंतु मी स्वत:ला कधीही देव मानले नाही. ब्रह्मांडचालक सर्वशक्तिमान परमेश्वर कुठे आणि मी कुठे.. माझी ओळख कौसल्यापुत्र, दशरथपुत्र, जानकीपती तीच मला भावते.
 
 
मला देव करून तुम्ही माझी मंदिरे बांधलीत, माझ्यावर स्तोत्रे रचली, आरत्या रचल्या, यात्रा सुरू केल्या, व्रतवैकल्ये सुरू केली, त्या बाबतीत मला काही म्हणायचे नाही. मी जन्मभर प्रजेलाच माझे आराध्य मानले आणि प्रजेच्या कल्याणासाठी झिजलो. प्राणप्रिय जानकीचाही त्याग करण्याचा कठोर आणि तेवढाच वाईट निर्णय मला घ्यावा लागला, म्हणून तुम्ही जे काही करता आहात त्याबद्दल मी काही बोलणे उचित होणार नाही. परंतु मला काही गोष्टींची खंत वाटते, तेवढी व्यक्त करतो.
 
 
मला खंत याची वाटते की, मी ज्याप्रमाणे कर्तव्यधर्माचे आचरण केले, तसे आचरण तुम्ही का करीत नाही? भरताला अयोध्येचे साम्राज्य मिळत असतानादेखील त्याने ते नाकारले. राजा बनण्याचा माझा आधिकार नाही, तो रामाचा आधिकार आहे, असे तो म्हणाला. आज तुम्ही टीचभर संपत्तीसाठी एकमेकांचे गळे का धरता? भाऊ भावाचा शत्रू का होतो? जानकीने पत्नीधर्माचे पालन केले. माझ्याबरोबर वनवासात येण्याची काही गरज नव्हती. पण ती म्हणाली, “जेथे राघव, तेथे सीता.” पत्नीधर्म आणि पतिधर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. वैवाहिक धर्माचे एकतर्फी पालन होत नाही. दोघांनी आपआपल्या कर्तव्याचे पालन करावे लागते. माझ्या नावाचा जयजयकार करताना तुम्ही याचे स्मरण करता का? सार्वजनिक जीवनात खोटारडेपणा खूप वाढला. सर्वोच्च न्यायालयात माझ्या जन्मस्थानावर केस चालू असताना ढीगभर खोटे पुरावे दिले गेले. खोटेपणा अधर्म असतो. अशांना काही शिक्षा होणार की नाही? मंदिरात मूर्तीत बसण्याऐवजी मला कर्तव्यधर्मात बसणे अधिक आवडेल.
 

jay shree ram 
 
कोट्यवधी रुपये खर्च करून आज तुम्ही माझ्या जन्मस्थानावर भव्य मंदिर बांधले आहे आणि माझ्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहात. या जन्मस्थानावर शेकडो वर्षे असेच भव्य मंदिर उभे होते. ते परदेशातून आलेल्या बाबराने पाडले. खरे सांगायचे, तर माझे मंदिर पाडले याबद्दल मला काही दु:ख झाले नाही. माझ्या मनात तेव्हा हजारो प्रश्न निर्माण झाले. मंदिर पाडण्याची हिंमत बाबराला कशी झाली? उझबेकिस्तानातून हजारो मैलांचा प्रवास करून अवघड वाटेने बाबर आपल्या पुण्यभूमीत आला. त्याला रोखण्यासाठी सर्व भारत एकवटून का उभा राहिला नाही?
 
 
माझ्या जानकीला रावणाने श्रीलंकेत पळवून नेले. माझे जानकीवर प्राणापलीकडे प्रेम होते. मी शोकमग्न झालो. पण धीर सोडला नाही. नंतर सुग्रीव, हनुमान, जांबुवंत यांचे मला साहाय्य झाले - म्हणजे दक्षिण भारतातील सर्व जनसमुदायाने मला मदत केली. अधर्माचरण करणार्‍या रावणाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे सर्वांचे मत पडले आणि आम्ही लंकेवर स्वारी केली. हनुमंताने लंका दहन केली. मी रावणाचा वध केला आणि सीतेला सोडवून आणले.
 
 
बाबराच्या मुलखात जाऊन अधर्मी बाबरीक मानसिकतेचा समूळ नाश का केला गेला नाही? कुठे गेली ती हनुमंताची शक्ती? कुठे हरवला तो जननिर्धार? कुठे गायब झाली ती सामाजिक एकजूट? कुठे लोप पावला सामाजिक समरसता भाव आणि कुठे हरवली धर्मपालनाची आणि धर्मरक्षणाची ऊर्जा? या सर्व गोष्टी जेव्हा हरवतात, तेव्हा जन्मस्थानावरील राम मंदिर भग्न होते.
 
 
मंदिर भग्न होते म्हणजे मंदिराचे खांब, मंदिराचा कळस, मंदिरातील मूर्ती, मंदिरातील दगड भंग पावतात असे नाही. या सर्व गोष्टी तशा निर्जीव असतात. आकार देणारा त्याला आकार देतो आणि भंग करणारा त्याचे तुकडे करतो. त्यामुळे त्याचे मला कधीही दु:ख झाले नाही. मंदिरातील प्रत्येक दगड म्हणजे समूह निर्धार, मंदिरातील प्रत्येक खांब म्हणजे प्रचंड संघटन शक्ती, दुर्दम्य निर्धार आणि कळस म्हणजे राष्ट्राच्या संघटित शक्तीची पताका. केवळ दगडाने दगडाला बांधून ठेवणार्‍या चुना-सिमेंटने तिचे निर्माण होत नाही.
 
 
यासाठी अयोध्येत जन्मस्थानावर मंदिर उभे राहत असताना माझे तुम्हाला मनापासून सांगणे असे आहे की, तुम्हीच निर्माण केलेले सर्व भेद गाडून टाका, जातीची उतरंड समाप्त करून टाका. आपण सर्व जन्माने समान आहोत. माझ्यासारखा एक मानव राम बनू शकतो, तर तुम्ही का नाही राम बनू शकत? जर मी धर्माचरण करू शकतो, तर तुम्ही का करू शकत नाही? शबरीची उष्टी बोरे खाताना माझ्या मनात कोणताही भेदभाव निर्माण झाला नाही. चेहरेपट्टीने वेगळे असणार्‍या आणि देहानेही वेगळे असणार्‍या वानरसमूहाला गळ्याशी लावताना माझे क्षत्रियत्व कधी आड आले नाही. तुम्ही कोणत्या जातिभेदाच्या कृत्रिम भिंतीत अडकून पडला आहात? मी ज्या पंचमहाभूतांपासून बनलो, त्याच पंचमहाभूतांपासून बनलेले माझ्या जननी जन्मभूमीचे माझे बंधू तुम्ही अस्पृश्य कसे ठरवलेत? नाव धर्माचे, पण आचरण अधर्माचे आणि हा अधर्म जेव्हा प्रमाणाबाहेर जातो, तेव्हा बाबर प्रवृत्ती वाढत जातात आणि मंदिरांचे विध्वंस होतात.
 
 
जन्मस्थानावरील मंदिराचा जन्मोत्सव जरूर साजरा करा. हजारो वर्षांपासून तुम्हाला ती सवय लागलेली आहे. तुम्हाला नम्रपणे सांगायचे आहे की धूप, दीप, नैवेद्य, फुले याद्वारे तुम्ही माझी केलेली पूजा, परंपरागत पूजा धर्म म्हणून ठीक आहे; पण कर्तव्यधर्म म्हणून पूजा करायची असेल, तर समाजधर्म काय असतो तो समजून घ्या, राष्ट्रधर्म काय असतो तो समजून घ्या, पारिवारिक धर्म काय असतो तो समजून घ्या, निसर्गधर्म काय असतो तो जाणून घ्या. हा धर्म 24 तास जगावा लागतो. मला मूर्तीतच केवळ बंदिस्त करू नका. आचरणाच्या माध्यमातून मला तुमच्या हृदयात स्थान द्या, तुमच्या मनात स्थान द्या आणि तुमच्या बुद्धीत स्थान द्या, एवढेच माझे मागणे आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.